‘२.०’ : दोन घटका तोंडाचा ‘आ’ वासण्यासाठी उत्तम, पण थिएटर बाहेर विसरून जाण्यासारखा!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘२.०’चं एक पोस्टर
  • Sat , 01 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie २.० 2.0 रजनीकांत Rajinikanth अक्षय कुमार Akshay Kumar शंकर Shankar

दिग्दर्शक शंकरच्या सिनेमात व्हीएफएक्सचा वापर नेहमीच मोठ्या प्रमाणावर असतो. हॉलिवुडचा प्रभाव हे कारण असावं. शंकरकाय किंवा कमल हासन काय, यांचा पडद्यावर नेहमीच्या वास्तववादी प्रतिमांपेक्षा व्हीएफएक्स वापरून त्यांना अतिवास्तववादी बनवायचा प्रयत्न दिसतो. त्यासाठी इतर तांत्रिक चमत्कारांचा वापर ते सढळपणे करतात. पण दुर्दैवानं कथा, पटकथा या महत्त्वाच्या आशय निर्मितीच्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे एका टप्प्यावर कथा पकड घेणार वाटत असतानाच व्हीएफएक्सचा वापर वाढायला लागतो आणि कथा त्याच्या वावटळीत दूर फेकली जाते. ‘एंदिरन : द रोबो’चा पुढचा भाग असणारा हा सिनेमा शंकरच्या कारकिर्दीत अपवाद ठरणारा झाला नाही.

चेन्नईत अचानक सेलफोन्स हवेत उडून कुठेतरी गायब होण्याचे प्रकार वाढायला लागतात. लोक व सरकार चिंतेत पडतात. गृहमंत्री (अदिल हुसेन) इमर्जन्सी मिटिंग बोलावतात. तिथं डॉ. वशीगरन (रजनीकांत) एक थिअरी मांडतात की, यात कुठल्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे, जी परिचित विज्ञानाच्या विरोधात आहे. ते हे शोधून काढायचं ठरवतात, पण चिट्टी (रजनीकांत) हा रोबोट जो पूर्वी अनियंत्रित झाला होता त्याची मदत घेतल्याशिवाय हे शक्य नाही असं सांगतात. पण सरकारनं त्याच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी त्याला एका संग्रहालयात ठेवलेलं असतं. तेवढ्यात एक उद्योगपती व मंत्री यांचा विचित्र पद्धतीनं खून होतो, जो अतींद्रिय शक्ती असणाऱ्या सेलफोन्समुळे झालेला असतो. गृहमंत्र्यांच्या समोर हे घडल्यामुळे ते ताबडतोब चिट्टीला याचा छडा लावण्यासाठी संग्रहालयातून बाहेर काढायचे आदेश देतात.

सिनेमाची संकल्पना गेल्या काही वर्षांत सेलफोन्स वापरत असलेल्या फ्रिक्वेन्सीमुळे पक्ष्यांचा नैसर्गिक फिरण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येण्याच्या आणि त्यांची शहरातून उचलबांगडी होण्याच्या घटनेशी आहे. काही समजुतीनुसार हे सर्व मोबाईल कंपन्यांच्या सर्वव्यापी संचारामुळे झालं आहे. खासकरून चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याच गोष्टीचा मुख्य कथा म्हणून शंकरनी वापर केला आहे. त्यासाठी डॉ. पक्षी राजन हे पात्र सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ ‘डॉ. सलीम अलीं’च्या व्यक्तिमत्त्वाशी जुळेल असं घेतलं आहे. तरीही ते पुरेसं प्रभावी नाही, याचं कारण दिग्दर्शक स्वतः शंकर आहेत.

शंकरना एकाच वेळी बऱ्याच डगरींवर पाय ठेवून कथा मांडायची असते. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून कथा मांडली तर कदाचित आपण उत्तम दिग्दर्शक होणार नाही, अशी त्यांची समजूत असावी. त्यामुळे ते मायक्रो लेव्हलवर काम करायचं टाळतात. ‘स्टीवन स्पीलबर्ग’, ‘रोलंड एमरिक’, ‘मायकेल बे’ व ‘जेम्स कॅमरून’ सारखं काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचं असा पण करतात. मग एक ढोबळ कथा घेऊन तितक्याच ढोबळ पद्धतीच्या हाताळणीत प्रचंड व्हीएफएक्सच्या माऱ्यात तिला गुदमरून टाकतात. त्यामुळे चांगली संकल्पना, चांगली कथा यांना ते चांगल्या पटकथेची, त्रिमिती पात्रांची जोड देत नाहीत. कमालीची एकमिती पात्रं हे त्यांचं वैशिष्ट्य. हा चित्रपटसुद्धा त्याला अपवाद नाही.

वरील दिग्दर्शकात ‘स्पीलबर्ग’ सोडला तर इतरांच्या कथा-पटकथेत बऱ्याच त्रुटी असतात. तरीही ते कौशल्यपूर्ण हाताळणीनं खिळवून ठेवणारे सिनेमे देतात. ‘स्पीलबर्ग’साठी कथेसोबत त्या पाठीमागचा विचारही महत्त्वाचा असतो. शंकरना त्याचं वावडं आहे. त्यांना हॉलिवुड धर्तीची व्हिज्युअल्स हवेत, पण पटकथेतून ते यावेत असं वाटत नाही. त्यामुळे ते व्हीएफएक्स कसे व कुठे वापरायचे याचा आधी विचार करतात. एकदा ते पक्क झालं की, त्यात कथा भरतात. त्यामुळे त्यातले दोष तसेच राहतात.

तसंच या सिनेमात व्यवस्थेतल्या दोषांमुळे व्यथित झालेला नायक ही ‘हिंदुस्थानी’ सिनेमात वापरलेली संकल्पनाच त्यांनी परत वापरली आहे. ‘हिंदुस्थानी’, ‘नायक’ व हा सिनेमा हे संकल्पनेची चित्रत्रयी म्हणता येतील इतके सारखे आहेत. ‘हिंदुस्थानी’चा वृद्ध नायक भ्रष्टाचार मिटून टाकण्यासाठी हिंसेचा आधार घेतो. ‘नायक’चा टीव्ही रिपोर्टर राजकारण व प्रशासनातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी रीतसर लोकशाही मार्गाचा वापर करतो. तर इथला सर्वसामान्य पक्षीतज्ज्ञ सुरुवातीला लोकशाही व कायदेशीर मार्गानं व्यवस्थेला आव्हान करतो. जेव्हा ते होत नाही म्हटल्यावर तो जो मार्ग स्वीकारतो, तो वरील दोघांपेक्षा एकदम वेगळ्याच पातळीवरचा आहे. तरीही त्याच्यासाठी ते योग्य आहे. या सिनेमात व्हिज्युअल्स महत्त्वाची असतात, पण ती आशयात मिसळलेली असावीत. आशयाला दुय्यमत्व मिळालं की, फक्त व्हिज्युअल्स हातात उरतात जे चक्षुर्वैसत्यम् पद्धतीनं सिनेमा बघणाऱ्यांना प्रभावित करतात. शंकरना अशा प्रेक्षवर्गाची नाळ मस्त पकडता आली आहे. याबाबतीत ते त्याला निराश करत नाहीत.

यातील सर्वांत प्रभावी व जमलेला भाग म्हणजे डॉ. पक्षी राजन याची पक्ष्यांचा अभ्यास करण्याची पद्धत. कुठल्यातरी तळ्याकाठी कॅमेऱ्यात त्यांना बंदिस्त करणारा राजन व्हीएफएक्सच्या वावटळीत जिवंत वाटतो. सिनेमॅटोग्राफर निरव शाह ते सुंदरपणे पडद्यावर दाखवतात. खऱ्याखुऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे पडद्यावर बघणं डोळ्यांचं पारणं फेडतात.

यातील मारामारीचे प्रसंग मात्र हॉलिवुडमधील नव्वदच्या दशकापासून ते आत्ताच्या मार्व्हलच्या सिनेमांशी मिळतेजुळते आहेत. कदाचित ते प्रेरित असतील पण आहेत. यात सुद्धा काही ओरिजिनल करावं असं त्यांना वाटत नाही. ‘संदर्भासहित स्पष्टीकरण द्या’ अशी स्पर्धा ठेवली तर कट्टर हॉलिवुड चाहता पहिल्या नंबरात पास होईल इतके संदर्भ त्यांनी वापरले आहेत. तांत्रिक गोष्टींची उत्तम जाण असणारा हा दिग्दर्शक कल्पनेसाठी इतर सिनेमांवर का भिस्त ठेवतो याचं आश्चर्य वाटतं.

पटकथाच सदोष असल्यामुळे त्यातील पात्रं कचकड्याची आहेत. एकही पात्र असं नाही, ज्याला काही मिती आहे. अगदी डॉ. वशीगरन हा नायकसुद्धा एकमितीत वावरतो. अनावश्यक गंभीर होऊन परिस्थितीचा आढावा घेतो. त्याला पटकथेत फारसा वाव नसल्यामुळे संवाद म्हणणं इतकंच त्याचं काम उरतं. दुसरं महत्त्वाचं पात्र डॉ. पक्षी राजन. त्याला काही तार्किकता बहाल करण्याचा प्रयत्न शंकरनी केला आहे, पण तीसुद्धा थोडक्या काळापुरती वापरली जाते. ते मागे पडून अतार्किक अतिवास्तववादी फँटसीच्या अंगानं गेल्यामुळे त्याचाही वास्तवाशी संबंध तुटतो. बाकी पात्रं ही बोलक्या बाहुल्या आहेत.

अभिनयाच्या बाबतीत तीच बोंब आहे, जी पटकथेच्या बाबतीत. रजनीकांत मुळातच सुपरस्टार. त्यामुळे त्यांच्या स्टायलिश मॅनरिझमयुक्त अभिनय आपण बघतच आलो आहोत. इथंही ते तेच करतात, जे त्यांनी याआधी केलंय. अक्षय कुमारला अभिनयाला वाव असणारे चार-दोन प्रसंग आहेत, पण दाक्षिणात्य पद्धतीच्या हाताळणीमुळे ते अतिरंजित वाटतात. त्यामुळे त्यातल्या त्यात अभिनय करण्याचा प्रयत्न कमकुवत ठरतो. एमी जॅक्सनल कायमस्वरूपी रोबोची भूमिका देण्यात यावी. भावहीन अभिनय करण्याचा तिचा अभिनय वाखाणण्यासारखा.

निव्वळ तंत्राची उत्तम जाण ही सिनेमाला तारू शकत नाही. त्याला आशयाचं पुरण घालणं नितांत गरजेचं असतं. आशय नसलेला हा सिनेमा दोन घटका तोंडाचा ‘आ’ वासण्यासाठी उत्तम आहे. पण थिएटर बाहेर विसरून जाण्यासारखा. दिग्दर्शक शंकरची कारकीर्दच अशा सिनेमांनी भरलेली आहे.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख