‘मुळशी पॅटर्न’ : बऱ्यापैकी रंजक आणि एकदा पहायला हरकत नाही असाच!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘मुळशी पॅटर्न’चं पोस्टर
  • Sat , 24 November 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie मुळशी पॅटर्न Mulshi Pattern ओम भूतकर Om Bhutkar प्रवीण तरडे Pravin Tarde मोहन जोशी Mohan Joshi महेश मांजरेकर Mahesh Manjrekar

‘मुळशी पॅटर्न’ हा २०१४ मध्ये आलेल्या ‘रेगे’ चित्रपटाचे लेखक प्रवीण तरडे यांचा नवीन चित्रपट. मराठी चित्रपटसृष्टीतील क्राईम-थ्रिलर जान्रतील मैलाचा दगड ठरलेल्या ‘रेगे’ चित्रपटानंतर तरडे पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्वाचं चित्रण करताना दिसतात. लेखक आणि चित्रपटाचा प्रकार एकच असल्यानं ‘रेगे’ आणि ‘मुळशी पॅटर्न’मध्ये तुलना होणं काहीसं स्वाभाविक म्हणता येईल. दोन्हीही चित्रपटांमध्ये गुन्हेगारी विश्वाकडे आकर्षित होणारी तरुणाई, मेट्रो सिटीजमध्ये वाढत असलेलं गुन्हेगारीचं प्रमाण असे समान मुद्दे असले तरी मांडणीच्या पातळीवर दोन्ही चित्रपटांमध्ये बराच फरक आहे. ‘मुळशी पॅटर्न’ हा तांत्रिक आणि मांडणीच्या पातळीवर असलेल्या उणीवा आणि सदोष पटकथा यांनी ग्रासलेला असला तरी तो पाहणीय आहे, एवढं मात्र नक्की.

राहुल पाटील (ओम भुतकर) हा मुळशीतील पूर्वाश्रमीचं बडं प्रस्थ आणि गावातील पाटील असलेल्या सखारामचा (मोहन जोशी) मुलगा असतो. आपल्या पूर्वजांची जमीन व वाडे शिंदे बिल्डरच्या (अजय पुरकर) पैशांच्या आमिषाला बळी पडून विकून टाकल्यावर आता मात्र पाटील कुटुंब आर्थिक संकटात असतं. सखाराम पाटील वॉचमन म्हणून, तर त्याची पत्नी (सविता मालपेकर) आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यावर नवऱ्यानं सोडून दिलेली मुलगी (दिप्ती धोत्रे) शेतावर मजूर म्हणून काम करत असतात. काही नाट्यपूर्ण घडामोडींनंतर सदर कुटुंब पुण्यात येतं. झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करू लागतं. ज्यातून राहुलचा संपर्क गुन्हेगारांशी येऊन त्याच्या आयुष्याला काहीसं अपेक्षित वळण लाभतं.

राहुल नान्या भाईच्या (प्रवीण तरडे) संपर्कात येऊन त्याच्या टोळीतील महत्त्वाचा भाग बनतो. त्याचे गुन्हेगारी क्षेत्राशी असलेले संबंध वाढत जातात. परिणामी एकीकडे राहुल आणि त्याच्या कुटुंबाचं कथानक, तर दुसरीकडे पोलीस पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करत असलेले प्रयत्न ही आणि अशीच इतर उपकथानकं समांतरपणे सुरू राहतात. याखेरीज एकीकडे वर्तमानकाळात सुरू असणारं मुख्य कथानक, तर दुसरीकडे त्या कथानकात गुंफलेले, एकमेकांशी जोडलेले फ्लॅशबॅक्स, अशा नॉन-लिनीयर पद्धतीनं चित्रपटाची मांडणी केली आहे.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

ही मांडणी चित्रपटाला स्वतःची चतुराई दाखवण्यासाठी आवश्यक वाटत असणारी युक्ती, तशी कथानक पाहता गरजेची नव्हती. कारण या बाबी चित्रपटाच्या चांगल्या असण्यावर विशेष परिणाम टाकतात अशातला भाग नाही. ‘मुळशी पॅटर्न’चा पूर्वार्ध उत्तम म्हणावासा असला तरी उत्तरार्धात मात्र चित्रपट अधिकाधिक रेंगाळत जातो, त्यात अनावश्यक ट्विस्ट्स येत राहतात. सोबतीला तितक्याच अनावश्यक ठरणाऱ्या दृश्यांची संख्या वाढत जाते.  

‘देऊळ’ (२०११), ‘फास्टर फेणे; (२०१७), ‘न्यूड’सारख्या (२०१८) चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारणारा ओम भुतकर इथं मुख्य भूमिकेच्या संधीचं सोनं करत दमदार परफॉर्मन्स देतो. मोहन जोशी, उपेंद्र लिमये, सुरेश विश्वकर्मा, महेश मांजरेकर, सविता मालपेकर, शरद जाधव, क्षितीश दाते अशी सहाय्यक भूमिकांतील तगडी स्टारकास्ट चोख कामगिरी करते. प्रवीण तरडेदेखील काहीशा लहान पण महत्त्वाच्या भूमिकेत चमकून जातात.

महेश लिमयेचं छायाचित्रण अगदी ‘रेगे’इतके नेत्रसुखद आणि प्रभावी नसलं तरी चित्रपटाच्या टोनला साजेसं आहे. चित्रपटातील गाणी बहुतांशी पार्श्वभूमीवर सुरू असल्यानं विशेष अडथळा ठरत नाहीत. नरेंद्र भिडेंचं पार्श्वसंगीत काही वेळा लाऊड वाटणारं असलं तरी एकूणच चित्रपटाला पूरक आहे.

‘मुळशी पॅटर्न’कडून सूक्ष्म आणि मार्मिक असण्याची अपेक्षा तशी रास्त ठरणार नाहीच. त्यामुळे शेवटी समोर मांडला जाणारा काहीसा लाऊड टोन चित्रपटाला, त्यातील विषयाला साजेसा ठरतो असं म्हणता येतं. चित्रपटाची मांडणी अगदीच प्रभावी नसली तरी रंजक ठरण्याचं तिचं मूलभूत काम करणारी आहे.

एकूणच ‘मुळशी पॅटर्न’ हा बऱ्यापैकी रंजक, ट्रेलरमधून निर्माण होणाऱ्या अपेक्षांना न्याय देणारा आणि एकदा पहायला हरकत नाही असा चित्रपट आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......