‘नाळ’ : माय-लेकाची भावस्पर्शी कथा 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘नाळ’ या चित्रपटाचं पोस्टर
  • Sat , 17 November 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie नाळ Naal सुधाकर रेड्डी यक्कंटी Sudhakar Reddy Yakkanti नागराज मंजुळे Nagraj Manjule देविका दफ्तरदार Devika Daftardar

भगवान श्रीकृष्णाची देवकी ही जन्मदात्री होती, मात्र लहानपणापासून त्याचा सांभाळ मोठ्या ममतेनं- यशोदेनं केला, ही  महाभारतकालीन कथा सर्वांनाच माहीत आहे. वास्तव जीवनातही अशा अनेक ‘यशोदा’ असतात. त्यांनी जन्म दिलेला नसतानाही त्यांनी ज्यांना लहानपणापासून ममतेनं सांभाळलेलं असतं, अशा मुलांबरोबर त्यांची ‘नाळ’ इतकी घट्ट जोडलेली असते की, कोणीही त्यांचं हे अतूट नातं हिरावून घेऊ शकत नाही. ‘नाळ’ या नवीन चित्रपटात अशाच एका माय-लेकाची भावस्पर्शी कथा आहे. चित्रपटाच्या कथेला ग्रामीण पार्श्वभूमी आहे.

शिवाय एक निर्माता, संवादलेखक आणि प्रमुख भूमिका या नात्यानं कथेला नागराज मंजुळे यांचा खास ‘टच’ आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या चित्रपटाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चं छायाचित्रण करणारे सुधाकर रेड्डी यांनीच या चित्रपटाचं छायाचित्रण व दिग्दर्शनही केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या सर्व अंगांनी विचार केला तर प्रेक्षकांशी घट्ट नाळ जोडण्यात हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाल्याचं प्रारंभापासूनच जाणवतं. 

नदीचं विस्तीर्ण पात्र जवळच असणाऱ्या एका गावात राहणाऱ्या चैत्या (चेतन) या लहान मुलाची ही कथा आहे. कथेचा केंद्रबिंदू तोच असल्यामुळे अर्थातच संपूर्ण कथा त्याच्याभोवतीच फिरते. आपली आई, सावकार असलेले वडील आणि आजी समवेत राहणारा हा चैत्या अवखळ आणि अल्लड आहे. इंग्रजी माध्यमातील स्कुलमध्ये ‘टमटम’मधून जाणारा चैत्या शाळेव्यतिरिक्त सर्व खेळ नदीच्या पात्रात हुंदडण्यात आणि मित्रांसमवेत खेळण्यात घालवतो. खेळण्याबाबत आजी नेहमीच त्याला पाठीशी घालत असल्यानं अभ्यास करण्याचा लकडा लावणाऱ्या आईला तो प्रेमानं का होईना तसा त्रासच देत असतो.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

इतर वेळी मात्र गृहिणी असलेली त्याची आई त्याच्यावर विलक्षण प्रेम करत असते. मात्र एकदा त्याच्या घरी आलेला त्याचा मामा चैत्याला एक असं काही ‘सिक्रेट’ सांगतो की, त्यामुळे चैत्याच्या आयुष्यात एक ‘वादळ’ येतं. चैत्याला आपली आई एकदम परकी वाटायला लागते. त्या दिवसापासून त्याचं आयुष्यच बदलून जातं. तो वेगळ्याच संशयानं आईकडे पाहायला लागतो. तिच्याशी तुटकपणे वागू लागतो. सुरुवातीला आईला हे जाणवत नाही, मात्र नंतर हळूहळू त्याच्या या विचित्र वागण्याचं कारण कळू लागतं.

एके दिवशी म्हाताऱ्या आजीला आपल्या भावाकडे पाठवण्याचं सावकार ठरवतात. त्यावेळी चैत्याही आजीबरोबर जाण्याचा हट्ट धरतो. त्याचं खरं कारणही मामानं सांगितलेलं ‘सिक्रेट’ असतं. आणि आजीमुळे त्याचा हा हट्ट पूर्ण होतो. परंतु बैलगाडीनं काकाच्या गावाला जात असताना मध्येच एक विपरीत घटना घडते. त्यामुळे त्या सर्वांना काकांच्या गावी न जाता पुन्हा आपल्या घरी परत यावं लागतं. ती घटना कोणती? आणि मामानं असं कोणतं ‘सिक्रेट’ सांगितलेलं असतं की, ज्याच्यामुळे चैत्या आपली आईशी तुटकपणे वागू लागतो. आणि त्याला काकाच्या गावाकडे जाण्याची ओढ का लागलेली असते, हे सर्व पडद्यावर पाहणंच उचित. 

कथेला पूर्णपणे ग्रामीण वातावरणाची पार्श्वभूमी आहे. चित्रीकरणासाठी परिसरच असा निवडला आहे की, या निसर्गाच्या साक्षीनं प्रेक्षक कथेत चांगलाच गुंतत जातो. नदीचं विस्तीर्ण पात्र मात्र पाणी कमी आणि रखरखीत वाळवंट जास्त. त्यामुळे ग्रामीण भागातील जगण्याचं वास्तव एक वेगळंच परिमाण दाखवून जातं. तसंच चित्रपटात सावकाराच्या घरी पाळलेल्या म्हशींची आणि तिला नव्यानं झालेल्या रेडकुचीही एक समांतर कथा पहायला मिळते. मात्र म्हशींची ही कथा मूळ कथेला पूरक असल्यामुळे तीही आई-मुलाच्या भावस्पर्शी नात्याबद्दल बरंच काही सांगून जातं. तसंच ‘म्हातारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवरीच्या फुलाला लटकून आकाशात उंच भरारी घेणारा चैत्या आणि त्याला खाली घेण्यासाठी जमिनीवरून धावणारी त्याची आई हे स्वप्नदृश्यही खूपच बोलकं ठरलं आहे.

कथेची भाषा वऱ्हाडी आहे. त्यामुळे काही संवाद ऐकताना मजेशीर वाटतात. त्यामानानं चित्रपटात संवाद कमी आहेत, नाट्यपूर्ण घटनाही फारशा नाहीत. परिणामी चित्रपट काही वेळा संथ वाटतो. मात्र अनेक दृश्यं सुधाकर रेड्डी यांच्या कॅमेऱ्यानं खूपच ‘बोलकी’ केली आहेत. त्यामुळे उत्कृष्ट छायाचित्रण ही जमेची बाजू ठरली आहे. संगीताबरोबरच पार्श्वसंगीतही खूप छान झाले आहे.

“आई मला खेळायला जायचे, जाऊ दे न वं ....” हे चैत्यावर चित्रित केलेलं गाणं मजा आणतं.  

चैत्याची भूमिका केलेल्या श्रीनिवास पोकळे या बालकलाकरानं पदार्पणातच खूप चांगलं, आश्वासक काम केलं आहे. त्याचे निरागस भाव अनेक प्रसंगातून व्यक्त झाले आहेत. देविका दफ्तरदारनंही नेहमीप्रमाणे आपला प्रभावी अभिनयानं चैत्याची आई खूप छान रंगवली आहे. तर चैत्याच्या वडिलांच्या भूमिकेत नागराज मंजुळे यांनी सहज-सुंदर अभिनय केला आहे. आज्जी झालेल्या सेवा चौहान आणि दीप्ती देवी याही छोट्याशा भूमिकेत चमकल्या आहेत. कथेचा नायक बालकलाकार असला तरी हा चित्रपट लहान मुलाचा ठरलेला नाही. तो सर्वांनीच पाहण्यासारखा आहे. कारण सर्वच दृष्टीनं ही ‘नाळ’ रसिक प्रेक्षकांशी जोडली गेली आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......