अजूनकाही
असं म्हणतात उत्तम पटकथा असेल तर वाईट दिग्दर्शक त्याला पुरेपूर न्याय देऊ शकत नाही. त्याच्या हाताळणीमुळे कथा प्रभावहीन ठरण्याची शक्यता वाढते. तर याच्या उलट चांगला दिग्दर्शक वाईट पटकथेत उत्तम रंग भरून नजाकतीनं तिला पेश करतो. त्यामुळे जेव्हा चर्चित साहित्यकृतीवर सिनेमा बनतो, तेव्हा दिग्दर्शक विषय कशा पद्धतीनं हाताळतोय याचं महत्त्व वाढतं. चर्चित साहित्यकृती ही संवेदनशील विषयावर असेल तर त्याची हाताळणी हा कळीचा विषय ठरतो. हिंदीतले ज्येष्ठ साहित्यिक काशी नाथ सिंग यांची बहुचर्चित कादंबरी ‘काशी का अस्सी’ यावर आधारित ‘मोहल्ला अस्सी’ हा सिनेमा संवेदनशील विषयाची हाताळणी कशी असावी, याचा वस्तूपाठ म्हणता येणार नाही, पण बरं उदाहरण ठरेल!
काशीच्या घाटावर आपली रोजीरोटी चालवणारा पंडित धर्मनाथ पांडे (सनी देओल) हा आधुनिकतेचा कट्टर विरोधक. अस्सी घाटावर आपलं वडिलोपार्जित ज्ञान वापरून चार पैसे कमावणारा साधा ब्राह्मण. पण मंडल आयोगाच्या इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या शिफारसीमुळे रागावलेला. धर्मभ्रष्ट करणारा हा निर्णय त्याला मान्य नाही, तसंच आजूबाजूला होणार्या बदलाला तो सामोरा जात नाही. त्याची सोज्वळ, परंपरा प्रिय पत्नी सावित्री (साक्षी तन्वर) त्याच्या ‘ज्ञान हे विक्रीसाठी नसतं’ या तत्त्वज्ञानाला कंटाळलेली. त्यानं निव्वळ घाटावर मिळणार्या पैशांपेक्षा चार पैसे अजून जास्त कमवावेत असं म्हणणारी. कन्नी (रवी किशन) हा हिंदी साहित्यात एम.ए. केलेला तरुण विदेशी पर्यटकांना वाराणसी दाखवत असतो. तसंच त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करून स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करत असतो. त्याच गल्लीत असणारी नेहमीची चहाची टपरी कम दुकान हे वाराणसीच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं ठिकाण. तिथं आयुष्य गेलेले सर्वजण जमून समकालीन विषयांवर आणि अस्सीत होणार्या बदलांवर भाष्य करण्यासाठी जमणारे. अस्सीत खरा बदल घडायला लागतो, जेव्हा ‘हर हर महादेव’ या पारंपरिक घोषणेत बदल घडून ‘हे राम’ ही नवी घोषणा त्याची जागा घ्यायला लागते तेव्हा.
‘काशी का अस्सी’ ही कादंबरी जेव्हा २००४ साली प्रकाशित झाली, तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली. टीका होण्याचं मुख्य कारण होतं त्यात केलं गेलेलं वाराणसीचं चित्रण. हे चित्रण इतकं वास्तववादी होतं की, साहित्यिक काशी नाथ सिंग यांनी प्रत्यक्ष वाराणसीमधल्या व्यक्तींची नावं वापरली आणि त्यांचं बोलणं संवादांच्या रूपात ठेवलं. काळ होता मंडल आयोगानं सुचवलेल्या शिफारसी, त्याचे होणारे संभाव्य परिणाम आणि त्यानंतर अडवाणींची रथयात्रा व अयोध्येत राम मंदिराची बांधण्याची घोषणा. साधारण १९९० व १९९८ चा काळ कादंबरीत आला आहे. तर सिनेमात १९८८ ते १९९२ हा काळ दाखवला आहे. टीकेचा दुसरा मुद्दा होता संवादात असणार्या शिव्या... ज्या वाराणसीत नेहमी बोलल्या जाणार्या पण बाहेरच्यांच्या भुवया उंचावणार्या. उदाहरणार्थ ‘भोसडीके’ हा शब्द सिनेमात सुरुवातीपासून शेवटपर्यंत वापरला आहे. धार्मिक कर्म करणार्या व्यक्तींच्या तोंडी असणारा हा शब्द सर्वांनाच खटकणाराच ठरला असणार. वाराणसी किंवा काशी म्हटलं की, गंगेचा पवित्र घाट, आपलं पापं धुऊन काढणारी गंगा, मोक्षप्राप्तीचं ठिकाण. त्यामुळे तिथं राहणारे सर्वसामान्य लोक कसे जगतात, याचं चित्रीकरण वास्तववादी पद्धतीनं तोपर्यंत साहित्यकृतीत न आलेलं. त्यामुळे त्यावर टीका झाली.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांना ही कादंबरी पडद्यावर का आणावीशी वाटली याचं कारण वरील गोष्टीत असावं. तसंच त्याचं नजीकच्या भूतकाळाचं यथोचित चित्रण करणं हेही आकर्षित करणारं असावं. द्विवेदी हे ‘पिंजर’मुळे संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध, तरीही त्यांची ही कलाकृती त्याच्या जवळही गेलेली नाही. त्याचं कारण ते स्वतःच आहेत. त्यांना कादंबरीतला कोणता भाग घ्यायचा, कोणता नाही हे माहिती आहे, पण हाताळणी कशी करावी यात गोंधळ उडाला असावा. तो पडद्यावर दिसूनच येतो.
दोन-तीन गोष्टी समांतर चालतात, पण त्याच्या केंद्रस्थानी ‘धर्मनाथ पांडे’ आहे. मुख्य कथा त्याच्याभोवती फिरते, पण त्याच गल्लीत असणारं चहाचं दुकान हे सर्वसामान्य लोकं समकालीन घटनांकडे कसे बघत होते यालाही महत्त्व आहे. तिथं सेक्युलर ते डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. ते सतत चर्चा, टिप्पणी, विनोद व शेरेबाजी करतात. बदलणार्या काळाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात. एकमेकांवर कुरघोडी करतात.
वाराणसीत येणारे परदेशी पर्यटक हा अजून एक विषय कथेत मिसळलेला आहे. या पर्यटकांमुळे व त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्याच्या खोट्या बाबा-बुवांची चलती वाढलेली. त्यांची राहण्याची सोय करून देऊन बदलत्या काळात चार पैसे कनातीला जोडणारे लोक आहेत. अशा एकाच वेळी तीन चार धाग्यांना गुंफायचं काम द्विवेदी करतात पण ढोबळ पद्धतीनं.
विषयाकडे बघण्याचा वरवरचा दृष्टिकोन त्याच्या हाताळणीवर दुष्परिणाम करणारा झालाय. तसंच सिनेमाचं सात वर्षांपूर्वीचं चित्रीकरणसुद्धा त्यात भर घालतं. ज्यात काळाची अखंडता दिसून येत नाही. काही प्रसंग नंतर चित्रित करण्यात आले असावेत असं वाटतं. एके ठिकाणी सावित्री सुरुवातीच्या दृश्यात चुलीवर स्वैपाक करताना दिसते, तर मध्यंतरानंतर ती गॅस-सिलेंडरवर काम करताना दिसते. धर्मनाथकडे मुलीच्या कम्प्युटर कोर्ससाठी पैसे नसतात, पण सावित्रीकडे मात्र गॅस-सिलेंडर येतो. त्याचं स्पष्टीकरण देण्यात येत नाही.
तसंच असंख्य प्रसंग, संवाद हे कमालीच्या वरच्या सुरात चित्रित केलेले. पात्र राग किंवा इतर भावना व्यक्त करतानासुद्धा तारस्वरात बोलतात. एकही प्रसंग असा नाही जिथं संयत हाताळणी केली आहे. त्यात दर वाक्यात ‘भोसडीके’ या शब्दाची पेरणी. शिवी ही इतर वेळी खूप अपमानास्पद वाटणारी गोष्ट. पण सिनेमात ती योग्य वेळी व पात्रांच्या मानसिकतेला पोचवणारी असली तरच तिचा प्रभाव राहतो. इथं एका टप्प्यावर पात्रांनी आता ही शिवी न देता साधं सरळ वाक्य बोललं तरी चालेल असं वाटायला लागतं इतका त्याचा वापर वाढतो.
पार्श्वसंगीतात शास्त्रीय संगीताचा वापर अयोग्य हाताळणीत भर घालणारी गोष्ट. ज्या प्रसंगात पात्रांनी संयतपणे प्रसंगांचं गांभीर्य पोचवणं अपेक्षित आहे, तिथं पार्श्वसंगीताचा वापर करून त्याचा परिणाम मेलोड्रॅमॅटिक करतात. त्यामुळे परिणाम शून्य होतो. तसंच सातत्यानं असे ढोबळ हाताळणीचे प्रसंग असल्यामुळे शेवटाकडे सिनेमा कंटाळवाणा व्हायला लागतो.
हाताळणीत मागे पडलेला हा सिनेमा तोलून धरतात ते यातले कलाकार. रवी किशन, साक्षी तन्वर, सौरभ शुक्ला, मुकेश तिवारी, राजेंद्र गुप्ता, मिथिलेश चतुर्वेदी, सीमा आझमी, फैसल रशीद, श्रीचंद मखिजा, नरेश जंग व मोहित सिन्हा अतिशय उत्तम काम करतात. त्यांचा पात्रांना जिवंत करण्याच्या अभिनयामुळे सिनेमा प्रेक्षणीय ठरतो.
यात सर्वांत चुकीची पात्रयोजना आहे ती धर्मनाथ पांडेची. सनी देओलची निवड द्विवेदींनी कोणत्या चुकार क्षणी केली असेल हे त्यांनाच माहिती. देओल ब्राह्मण वाटत नाहीत. त्यांनी भाषेवर मेहनत घेतलेली नाही, कारण बर्याच संवादात संस्कृतचा वापर आहे. उच्चार अतिशय बाळबोध. तसंच त्याचं सनी देओल असणं लपत नाही. भावुक प्रसंगात चेहर्यावर हावभावच दिसत नाहीत. धर्मनाथ व सावित्रीच्या वयात बरंच अंतर असतं असा उल्लेख एके ठिकाणी आहे. निव्वळ या गोष्टीसाठी देओलची निवड हे कारण असू शकत नाही. दुर्दैवानं ज्याच्या खांद्यावर सिनेमाचा डोलारा उभा करायचा, त्याचीच चुकीची निवड केल्यामुळे सिनेमाच्या प्रभावहीनतेत भरच पडत गेली आहे.
आणीबाणीनंतर भारतात घडलेल्या दोन घटना म्हणजे मंडल आयोगाची शिफारस व बाबरी मशिदीचा पाडाव. त्यातच संगणक क्रांती व आर्थिक उदारीकरणासाठी भारतानं उघडलेले दरवाजे. या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी पडद्यावर आणताना तिची हाताळणी संयत व प्रभावी करण्याची एक खूप मोठी संधी दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदींना होती. त्यांनी त्याच्याकडे ढोबळपणे बघितल्यामुळे ही संधी वाया गेलीय असं म्हणावं लागतं.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment