अजूनकाही
जागतिक साहित्यावर, खास करून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धावर ज्यांची छाप पडली, अशा मूठभर साहित्यिकांतील महत्त्वाचं नाव म्हणजे झेक लेखक फ्रान्झ काफ्का (१८८३-१९२४). त्याचं बरंचसं साहित्य अपूर्ण राहिलं आणि जे प्रसिद्ध झालं तेसुद्धा त्याच्या मृत्यूनंतर. धर्मानं ज्यू असलेल्या या लेखकानं प्रामुख्यानं कथा व कादंबऱ्या लिहिल्या. मात्र त्याच्या कथा/कादंबऱ्यांवर नाटकं झालेली आहेत. अलीकडेच मुंबर्इतील ‘जी 5 ए’ या ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये काफ्काच्या ‘द हंगर आर्टिस्ट’ या गाजलेल्या कथेचा नाट्यप्रयोग बघायला मिळाला.
काफ्कानं सप्टेंबर १९१२ मध्ये ‘द हंगर आर्टिस्ट’ ही कथा लिहिली. यात त्यानं अतिशय गरिबीत असलेल्या एका कलाकाराचं चित्रण केलं आहे. ग्रामीण महाराष्ट्रात व कदाचित भारतातसुद्धा, अनेक तरुण न थांबता, तीन-चार दिवस सायकल चालवतात. सायकलवरून न उतरता तोंड धुतात, चहा पितात, जेवतात वगैरे सर्व व्यवहार करतात. यासाठी ते एक मोठं ग्राऊंड घेतात, तिथं रात्री फ्लड लार्इटची सोय असते. तीन-चार दिवस न थांबता सायकल चालवल्यानंतर त्यांना काहीएक रक्कम दिली जाते. हाच त्यांचा उत्पन्नाचा, जगण्याचा मार्ग असतो. ‘शोर’ या चित्रपटात मनोजकुमार मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी याच प्रकारे सायकल चालवतो व पैसे उभं करतो.
हे सर्व एवढ्या तपशिलानं सांगण्याचं कारण म्हणजे काफ्काच्या कथेत उपवास करून पैसे मिळवणाऱ्या कलाकाराची व्यथा मांडली आहे. या कथेत एक माणूस ४० दिवस उपवास करतो. दरम्यान त्याला बघायला लोक गोळा होत राहतात आणि त्याच्यासमोर पैसे टाकतात. असे शो आयोजित करणारे व्यावसायिक कंत्राटदार असतात.
ही कथा अशीच्या अशी मंचित केली असती तर भारतीय प्रेक्षकांना फारशी समजली नसती. म्हणून दिग्दर्शक श्रीमती गुर्लिन जज व तिच्या सहकाऱ्यांनी तिचं भारतीयीकरण केलं आहे. सादर केलेल्या या एकपात्री प्रयोगाला सलग कथानक नाही. गुर्लिन जज यांनी समकालीन भारतातील काही हृद्रयद्रावक प्रसंग घेऊन नाटकाची संहिता तयार केली आहे. ‘द हंगर आर्टिस्ट’चे प्रयोग मुंबर्इस्थित नाट्यसंस्था ‘ओम यश केंद्र’ (स्थापना १९९७) या संस्थेतर्फे सादर केले जात आहेत.
गुर्लिन जज यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रयोगाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रयोग बहुभाषिक आहे. यात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचा प्रयोग केलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा एकपात्री प्रयोग आहे. यात कधी मंदार गोखले असतो, तर कधी विक्रांत धोटे सादर करतो. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे यात व्हिडिओ फुटेज वगैरे मल्टीमीडियाचा प्रभावी वापर केला आहे. चवथं वैशिष्ट्य म्हणजे ‘द हंगर आर्टिस्ट’मध्ये प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य वगैरे नाट्यघटकांचा कल्पक वापर केला आहे. यामुळे या वैचारिक नाटकाची आघातक्षमता वाढलेली आहे. सुमारे सत्तर मिनिटं चालणारा हा प्रयोग संपतो, तेव्हा आपण अंतर्मुख झालेलो असतो.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा -
.............................................................................................................................................
रंगमंचावर प्रकाश पडतो, तेव्हा एक तरुण एका पिंजऱ्यात बसलेला दिसतो. हा पिंजरा नाटक संपेपर्यंत रंगमंचावर असतो. मात्र हा पिंजरा पारंपरिक पिंजऱ्यासारखा सर्व बाजूंनी बंद नसतो. त्याला आठ काड्या असतात. यामुळे पिंजऱ्याचा आभास निर्माण होतो. हा पिंजरा एक मोठं प्रतीक असतं, वरवर स्वतंत्र असण्याचा आभास निर्माण करणारा पण प्रत्यक्षात अनेक पातळ्यांवर माणसांना बंदिवान करणारा पिंजरा.
नाटक सुरू होतं, तेव्हा या पिंजऱ्यातला तरुण शरीराच्या लयबद्ध हालचाली करत असतो. काही सेकंद गेल्यानंतर तो अचानक मराठीत बोलायला लागतो. त्यातून कळतं की, ती एक दुर्गम भागातील आश्रमशाळा आहे. तिथं विद्यार्थी शिकायला कमी आणि दुपारी फुकट जेवण मिळतं म्हणून येत असतात. त्यातील एक मुलगी तर फक्त गुरुवारीच, न चुकता शाळेत येते. कारण दर गुरुवारी शाळेत जेवण्यात अंडा करी दिली जाते. इतर दिवशी ती मुलगी आर्इला मदत करत असते. एकदा अशाच एका गुरुवारी ती मैत्रिणींसह वर्ग बुडवून शाळेच्या स्वयंपाक घरात घुसते. तिथं शिजत असलेल्या अन्नाचा सुवास पसरलेला असतो, जो या मुलीनं कधीही घेतलेला नसतो. ती एका मोठ्या झाकण लावलेल्या भांड्यात डोकावून पाहते. तिथं तिला सर्वांसाठी केलेली अंडा करी दिसते. त्या मोठ्या भांड्यात शेकडो उकडलेली अंडी तरंगत असतात. एवढ्या प्रमाणात तिनं कधीही अंडी बघितलेली नसतात. तेवढ्यात मागून शाळेच्या चौकदाराची चाहूल लागते. ती मुलगी घाबरते व तोल जाऊन त्या अंडा करीच्या भल्या थोरल्या भांड्यात पडून मरते. या प्रसंगाचा व विक्रांत धोटेच्या अभिनयाचा प्रभाव एवढा जबरदस्त होतो की, नेमकं काय घडलंय, हे समजायला काही क्षण जावे लागतात.
नंतर शेतकऱ्यांच्या तीन पिढ्यांची कथा येते. येथे विक्रांत धोटेची अभिनय क्षमता पणाला लागते. गरीब शेतकऱ्यांच्या तीन तीन पिढ्या उन्हातान्हात मरमर खपल्या. तरीही शेवटी आजच्या पिढीवर आत्महत्या करण्याची वेळ आलीच. याच सुमारे साठ-सत्तर वर्षांच्या काळात ‘क्रोनी कॅपिटल’चा आधार घेऊन शहरातील सफेद डाकू करोडोपती झाले! हा विरोधाभास विचारात पाडणारा होता.
या नाटकात गुर्लिन जज व सहकाऱ्यांनी फार विचारपूर्वक आजच्या भारतातील अशा घटना निवडल्या आहेत की, ज्यामुळे काफ्काच्या ‘द हंगर आर्टिस्ट’च्या मूळ सूत्राला धक्का लागत नाही. माणसाची अन्नाची भूक वैश्विक आहे आणि ती भागवण्यासाठी गरिबांना करावे लागणारे प्रयत्नसुद्धा. यात स्थलकालपरिस्थितीनुसार बदल होत असतात. जसं काफ्काच्या झेक रिपब्लिकमध्ये माणसं जास्तीत जास्त दिवस उपवास करून दाखवतात, तर भारतात माणसं चार-चार दिवस सायकल चालवतात. पण अशा अमानुष प्रयत्नांमागचा हेतू समान असतो आणि तो म्हणजे येनकेन प्रकारे अन्न मिळवायचं. या प्रयत्नांत शेतकऱ्यांचं दुःख तर अफलातून आहे. यातील विरोधाभास समजून घेतला पाहिजे. जो शेतकरीवर्ग दिवस-महिने कष्ट करून अन्नधान्य पिकवतो, त्यालाच अन्न मिळत नाही म्हणून प्रसंगी आत्महत्या करावी लागते!
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
अशा नाटकांना पारंपरिक पद्धतीचा शेवट असणं शक्यच नाही, तसा तो या नाटकालासुद्धा नाही. गुर्लिन जज आणि तिच्या सहकाऱ्यांनी खूप कष्ट करून हा प्रयोग सिद्ध केल्याचं जाणवतं. विक्रांत धोटे यांनी सादर केलेली सफार्इदार देहबोली भरपूर तालमी केल्याशिवाय हाती लागत नाही. गुर्लिन जजच्या मनात या प्रकारे काफ्काच्या नाटकाचं भारतीयीकरण करावं असं गेले काही महिने सुरू होतंच. महाराष्ट्रात मार्च २०१८ मध्ये नाशिक ते मुंबर्इ असा शेतकरीवर्गाचा लाँगमार्च निघाला होता, तेव्हा तिच्या मनातल्या संकल्पनेनं गती घेतली. तिनं सहकाऱ्यांच्या मदतीनं संहिता सिद्ध केली आणि आता रसिकांसमोर प्रयोग सादर होत आहेत.
अशी नाटकं बघणं हा वेगळाच अनुभव असतो. इथं प्रेक्षक पारंपरिक प्रेक्षकांच्या भूमिकेत राहत नाही. या नाटकातील एकमेव पात्र कधी प्रेक्षकांशी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे कधी बोलत असतं. यामुळे अशा नाटकात प्रेक्षकसुद्धा एक प्रकारची भूमिका बजावत असतात आणि ती भूमिका म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या संदर्भात फक्त बघ्याची भूमिका घेणारा वर्ग. अशी नाटकं प्रेक्षकांना आजूबाजूच्या परिस्थितीकडे डोळसपणे बघण्याचं भान देतात.
पण मग हे प्रचारकी नाटक आहे का? याचं उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं आहे. ‘हो’ कारण यात प्रेक्षकांसमोर त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती ठेवली जाते आणि कळत/नकळत त्यांच्यातील माणुसकीला आवाहन केलं जातं. ‘नाही’ कारण प्रचारकी नाटकं जशी कमालीची कंटाळवाणी व कंठाळी असतात तसं हे नाटक नाही. यात दिर्ग्दशक म्हणून गुर्लिन जजनं सर्व नाट्यघटकांची परिणामकारक मोट बांधली आहे. यात तिला तिच्या सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली आहे. या नाटकाचे पार्श्वसंगीत मुक्ताक कांजिलाल यांचं, तर प्रकाश योजना गुर्लिन जजची आहे. या नाटकामुळे रंगमंचावरचा काफ्का बघायला मिळतो!
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment