अजूनकाही
विजय कृष्ण आचार्य ही हिंदी किंबहुना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट वाईट सिनेमे देणाऱ्या गटात मोडणारी व्यक्ती आहे. ‘टशन’, ‘धूम ३’सारख्या अतर्क्य, अशक्यप्राय आणि दोषांनी भरलेल्या सिनेमांचा लेखक-दिग्दर्शक असलेल्या आचार्यचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा नवीन सिनेमा. आचार्यची आधीची कामगिरी पाहता सदर सिनेमा उत्तम असण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळेच तो सिनेमॅटिक आणि तार्किक अंगांनी सुमार असण्याच्या अपेक्षा पूर्ण करतो!
ब्रिटिशकालीन भारतातील रोनकपूरमधील राजा (रोनित रॉय) आणि त्याच्या कुटुंबाची हत्या केली जाते. ज्यामागे कमांडर क्लाइव्हचा (लॉइड ओवेन) हात असतो. राजाचं संरक्षण करण्यात असमर्थ ठरलेला योद्धा खुदाबक्ष आझाद (अमिताभ बच्चन) राजाची मुलगी, जफिराला (फातिमा सना शेख) मात्र वाचवतो. स्लो-मोशनच्या भडिमारात आणि शून्य सिनेमॅटिक मूल्य असलेल्या या दृश्यबदलानंतर आपण काही वर्षांनंतरच्या काळात येतो. फिरंगी मल्ला (आमिर खान) हा ठग लुटमारीसोबतच ब्रिटिशांकरिता हेर म्हणूनही काम करत असतो. त्यानं ब्रिटिशांना काही गुन्हेगार पकडून देण्याच्या त्याच्या कामगिरीच्या निमित्तानं तो किती कूल आणि विनोदबुद्धी असलेला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला जातो. मात्र मुळातच एकूणच चित्रपट आणि त्यातील पात्रं किती ठिकाणांहून उचललेली आहेत, हे अगदी ट्रेलरपासूनच स्पष्ट दिसत असताना आमीर खानचं ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’मधील जॅक स्पॅरोवजा पात्र निर्माण करण्याचे सुमार प्रयत्न विशेष काम करत नाहीत.
आता सुरैय्या (कतरीना कैफ) या पटकथेला हवं तेव्हा (म्हणजे तीन-चार वेळा) अचानक उगवणाऱ्या आणि कमीत कमी वस्त्रांमध्ये वावरणाऱ्या नर्तिकेकडे वळू. जी पुढे उत्तरार्धात उपयोगात आणायची असल्यानं आपल्यापुढे उभी केली जाते. तिचं एक गाणं आणि फिरंगीच्या एका चार्ली चॅप्लिनवजा संगीत आणि शैलीसोबतीला असलेल्या दृश्यानंतर वारंवार ट्रॅक सोडून पळणाऱ्या कथानकाला ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न होतो. फिरंगीला ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून आझादला पकडण्याची कामगिरी मिळते आणि दोन्ही पात्रं एकमेकांसमोर आणली जातात. आता पुढे काय होणार हे सर्वांना कळून जातं. एकामागून एक लांबत जाणाऱ्या दृश्यांच्या रांगा लागून कथानक अधिकाधिक अपेक्षित वळणाचं बनत राहतं. मात्र आचार्यचे ट्विस्ट्स (!) संपता संपत नाहीत.
चित्रपटाला भौगोलिक सीमांच्या परिघात अडकवू नये हे छोटेखानी कथानकाच्या बाबतीत कितीही खरं असलं तरी मोठ्या स्केलवरील आणि ऐतिहासिक गाथा म्हणून प्रसिद्धी केलेल्या सिनेमाबाबत हे लागू पडू शकत नाही. त्यातही पुन्हा राजस्थानमधील भागात समुद्री लुटेरे दाखवत, थायलंड वगैरे बेटवजा भागाला ब्रिटिशकालीन भारतातील काल्पनिक गाव, राज्य असण्याची सूट जरी दिली तरी ती कोणत्या तार्किक वा सिनेमॅटिक अंगानं द्यावी, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. परिणामी सदर ऐतिहासिक चित्रपटाचा भूगोल मात्र कच्चा राहतो. असो.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा -
.............................................................................................................................................
याखेरीज तार्किकता किती वेळा बाजूला सरकवली जाते याची गणतीही नको! कारण हा प्रकार आचार्यच्या खिजगणतीतही नाही. ज्यामुळे आझाद, जफिरा आणि फिरंगी जेव्हा समोर येतात, तेव्हा ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’वजा नौकायुद्ध सुरू असताना हे तिघेही अगदी आरामात, स्लो-मोशनमध्ये एकमेकांकडे पाहत, एकमेकांना अडमायर करत लढत (?) असतात. अशा वेळी आचार्य त्यांचा अव्हेंजर्सप्रमाणे स्टायलिश दिसणारे स्लो-मोशन शॉट्स घ्यायला विसरत नाही, बाकी लॉजिक समोर मरत असलेल्या भारतीय/ब्रिटिश लोकांहून अधिक वेगानं मरतं.
‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ची कास्टिंग (किंबहुना संपूर्ण चित्रपटच) फारच मजेशीर आहे. आणि त्याहून मजेशीर आहे त्यांना मिळालेल्या विरोधाभासी भूमिका. म्हणजे कतरीनाला धड हिंदी बोलता येत नाही, मात्र ब्रिटिश कमांडर क्लाइव्ह आणि त्याचे सहकारी मात्र मस्तपैकी हिंदीत बोलत असतात, सोबतीला म्हणी वगैरे वापरत असतात. बरं, हे काही केवळ भारतीयांशीच हिंदीत बोलतात असं नव्हे, तर आपसांतही हिंदीतच बोलतात. म्हणजे ब्रिटिश हे भारतीयांहूनही अधिक भारतीय आहेत!
तर दुसरीकडे मध्यवर्ती भूमिकेतील फातिमाला संवाद नाहीत आणि आमीर अखंड बडबड करतो. अमिताभ कमरेवर हात ठेवून बोलत असताना आता कुठल्याही क्षणी ‘हम’ (१९८१), ‘शहेनशाह’ (१९८८) किंवा इतरही कुठल्यातरी चित्रपटातील भूमिकेत शिरून ‘जुम्मा, चुम्मा दे दे’ किंवा तत्सम गाणं किंवा संवाद म्हणतो की काय, असं वाटत राहतं. अमिताभचा खर्जातील आवाज चित्रपटभर जवळपास समान पातळीवर राहतो, तर आमीरचा भाषेचा लहेजा चित्रपटाच्या लोकेशन्स जितक्या बदलतात तितकाच बदलत जातो.
विरोधाभास हा सदर चित्रपटाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि लॉजिकला फाट्यावर मारणे हे दिग्दर्शक आचार्यचे वैशिष्ट्य आहे. मुख्य उदाहरण म्हणजे उत्तरार्धात कतरीना आझादच्या फौजेच्या मूर्खपणाचा कळस असलेल्या मोहिमेदरम्यान श्रवणेंद्रियांना खटकणाऱ्या हिंदीत काहीतरी बोलून ‘मंजूर-ए-खुदा’नामक गाण्यावर नाचत असताना फातिमा अचानक ‘बाबा, बाबा’ म्हणत लोरीवजा गाणं गायला सुरुवात करते. ज्यामुळे समोर एक पात्र ‘बाबा लौटा दे मोहे’ म्हणत असताना दुसरं मात्र मादक प्रकारे नाचताना दिसतं. डोळे भरून येतात असं काही पाहिलं की! अजय-अतुलचं संगीतही उथळ, लाऊड आणि अप्रभावी वाटतं, तर चित्रपटातील तुर्की पार्श्वसंगीताचा वापर कुणालाही खटकेल इतक्या उघडपणे आणि वारंवार केला जातो.
अर्थात ‘धूम ३’मध्ये दोरीवरून चालणारी गाडी वगैरे प्रकार दाखवत गुरुत्वाकर्षण आणि प्रेक्षकांची बुद्धी या दोन्ही गोष्टी गृहीत न धरणाऱ्या आचार्यची यात काहीच चूक नाही. कारण अलीकडेच तो एका मुलाखतीत म्हणाला त्यानुसार तो समीक्षा वाचत नाही. त्यामुळे त्याचे चित्रपट असेच ‘बेस्ट ऑफ द वर्स्ट’ ठरत राहणार यात शंका नाही. बाकी शेवटच्या दृश्यानुसार याचा सीक्वेलही येण्याची शक्यता आहे. आचार्यच्या स्वतःवरील आत्मविश्वासाला दाद द्यायला हवी!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment