ए दिल है मुश्किल जीना यहाँ, ज़रा हटके, ज़रा बचके, ये है ‘बाजार’ मेरी जान!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘बाजार’ची पोस्टर्स
  • Sat , 27 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie बाजार Baazaar सैफ अली खान Saif Ali Khan राधिका आपटे Radhika Apte चित्रांगदा सिंग Chitrangada Singh

मॅरेथॉन आणि शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत कोण लक्षात राहतो आपल्याला? अर्थात युसेन बोल्ट. त्याचे जगातले सर्व विक्रम तोडण्याच्या व नवे प्रस्थापित करण्याच्या सवयीमुळे. त्याने कोणत्या स्पर्धेत विक्रम केले, हे आपल्याला तोंडपाठ असतं. त्याचवेळी धावण्याच्या शर्यतीत इतरही प्रकार असतात हे आपल्याला माहिती असून आपण त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देत नाही. कदाचित शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेला वलय असल्यामुळे व चित्त्याच्या चपळाईनं धावून पहिला येण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा आपल्या मनात असल्यामुळे असेल, त्याकडेच आपण जास्त लक्ष देतो. जितकी मेहनत शंभर मीटर स्पर्धेसाठी लागते, तितकी किंवा त्यापेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागते. कारण तिचा पल्ला दीर्घ असतो. मानसिक-शारीरिक ताण असतो. दीर्घ पल्ला गाठायचा म्हणजे चिकाटी अंगी बाळगावी लागते. त्याशिवाय ती स्पर्धा जिंकणं अवघड होऊन बसतं. ‘बाजार’ या सिनेमात याच गोष्टीचा चांगला वापर पात्रांच्या मानसिकतेशी करून त्यांना एकमेकांशी खेळायला दिग्दर्शक गौरव चावला यांनी भाग पाडलं आहे. प्रश्न उरतो यात जिंकतो कोण?

रिजवान अहमद (रोहन मेहरा) हा अलाहाबादमध्ये राहणारा, शेअर मार्केटमध्ये लोकांनी पैसे गुंतवावेत म्हणून धडपड करणारा तरुण. पण येणारी माणसं पुरेशी गुंतवणूक करत नसतात. त्याला यापेक्षा जास्त पैसा हवा असतो. पण निवृत्त झालेले वडील, ज्यांनी एका मोठ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पंचवीस वर्षं नोकरी केलेली असते, त्यांना आपला मुलगा जे कमावतोय त्यात समाधान मानावं आणि सुखानं दोन वेळच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा असं वाटत असतं.

पण त्याला उडायचं असतं. त्यासाठी तो मुंबईला येतो. मुंबईत त्याचा आदर्श असतो शकून कोठारी (सैफ अली खान). शकून हा कोणत्याही परिस्थितीत पैसा आपल्याकडेच यायलाच हवा या तत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी धंदा म्हणजे गणित असतं. जे काही करायचंय ते गणितातल्या समीकरणावर. त्यात भावभावना वगैरे गोष्टींना बिलकुल थारा नसतो. रिजवानला एका शेअर कंपनीत जॉब मिळतो. तिथंच त्याची ओळख प्रिया रायसोबत (राधिका आपटे) होते. तिची मैत्री त्याच्या फायद्याची ठरणार, अशी लक्षणं दिसायला लागतात.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category/

.............................................................................................................................................

या सिनेमाची कथा वाचली की, ऑलिव्हर स्टोनच्या ‘वॉल स्ट्रीट’ सिनेमाची आठवण होणं साहजिक आहे. कदाचित कथानकात साम्य आढळेल. तरीही हा सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, ते पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार्‍या गौरव चावला यांच्या चांगल्या दिग्दर्शनामुळे. आणि निखिल आडवाणी, परवीज शेख व असीम अरोरा यांच्या पटकथेमुळे. ही पटकथा चांगली सुरुवात, विश्वसनीय मध्य व समाधानकारक शेवट या आवश्यक चौकटीचा वापर करते. त्यासाठी ती शेअर मार्केटची पाळेमुळे कुठपर्यंत गेलीयेत याचा अदमास घेते.

आर्थिक उदारीकरणामुळे व इंटरनेटच्या वापरामुळे पारंपरिक सोनं-चांदी किंवा पोस्ट/बँक ठेवी/दीर्घकालीन योजना यापेक्षा नवमध्यमवर्गाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक योग्य वाटू लागली. छोट्या शहरात मोबाईलवर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची अॅप्स दिसू लागली आहेत. चर्चा रंगतायत. रिजवान अहमद जेव्हा मुंबईला जातो, तेव्हा तो अशाच एका मध्यमवर्गीय घरातला मोठी स्वप्नं बघणारा युवक असतो. पटकथाकारांनी या आजच्या वास्तवाचा कथानकाची पहिली पायरी म्हणून छान उपयोग केलाय. त्यामुळे मुंबईत आल्यावर त्याला या क्षेत्रातली श्रीमंती दिसायला लागते, तेव्हा हा विरोधाभास चांगला प्रभाव टाकतो. तो ज्या चाळीत राहतो, त्याच्या पलीकडेच एक श्रीमंतांची गगनचुंबी इमारत असते, ज्यात त्याला स्वतःचा फ्लॅट घ्यायचा असतो. त्याचा हा उद्देश तडीस जायला मात्र त्याला खूप मेहनत घ्यायला लागते.

दिग्दर्शक चावला एका क्लृप्तीचा वापर योग्य वेळी करताना दिसतात. रिजवान अहमद मुंबईला जायला विमानात बसतो, तेव्हा तो शकून कोठारीबद्दल बोलतो ते थेट कॅमेर्‍यात बघून. एके ठिकाणी स्टॉक मार्केटचं काम कसं चालतं हे सांगतो, तर दुसर्‍या एका प्रसंगात शकून कोठारीच थेट कॅमेर्‍यात बघून बोलतो. असा फोर्थ वॉल ब्रेक करण्याचा उद्देश चांगला असला तरी याचा वापर खटकण्याचा संभव असतो. कारण पात्रं सतत जर थेट प्रेक्षकांना उद्देशून बोलायला लागली तर त्यांचं काल्पनिक असणं उघडं पडायला लागतं. प्रेक्षकांचा विश्वास कमी व्हायला लागतो. गौरव चावलांनी कदाचित ‘डेडपूल’मध्ये केलेल्या वापराचा इथं उपयोग करायचा म्हणून केला असेल. त्यांनी ते कमी वेळा वापरलं आहे. एका अर्थानं ते बरंच आहे. कारण कथा रिजवान अहमदला निवेदक म्हणून वापरते. तो सर्वसाक्षी निवेदक आहे. त्यामुळे तो कथेतल्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देत असताना मध्येच हे असं कॅमेर्‍यात बघून बोलणं खटकू शकतं. त्याला शकून कोठारीची सगळी माहिती आहे. त्यामुळे हा वापर क्लृप्ती ठरतो ना की, पारंपरिक कथानक सादरीकरणाला छेद. एकदा निवेदक तोच आहे म्हटल्यावर परत अशा क्लृप्तीची गरज नव्हती. इतर पद्धतीनं स्टॉक मार्केटच्या कामाची माहिती देता आली असती.

हिंदी सिनेमांना खटकेबाज, टाळ्यापिटू संवादांची कधीच कमतरता भासत नाही. इथंही तेच आहे. पात्रांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञानसुद्धा अशाच कुठल्यातरी संवादातून मांडलं जातं. अगदी पोस्टरवर सिनेमातला ‘बडा आदमी बनाना है, तो लाईन क्रॉस करनी होगी' हा संवाद मिरवतो. शकून कोठारी तर येता-जाता असे संवाद समोरच्याला ऐकवत असतो. अर्थात त्याची मानसिकता या संवादातून दिसून येतेच. हा थ्रिलर सिनेमा आहे. इथं प्रत्यक्ष शेअर बाजारात काय होतं, यापेक्षा पैशांच्या हव्यासापायी माणसं कशी नैतिकतेला तिलांजली देतात, हे दिग्दर्शकाला दाखवायचं आहे. त्यामुळे हे संवाद डायलॉगबाजीकडे झुकणारे असले तरी निव्वळ संवादांची जुगलबंदी म्हणून येत नाहीत. त्यांच्या वापराला एक कारण आहे, जे पात्रांच्या कृतीला पूरक ठरतं. त्यामुळे ते उपरे वाटत नाहीत.

सिनेमात गाण्यांचा का वापर केलाय ते मात्र कळत नाही. मध्यंतरानंतर येणारी गाणी वेळ घेतात. त्यामुळे सिनेमा लांबतो. सर्वच गाणी तेवढ्यापुरती लक्षात राहणारी. थ्रिलर सिनेमात एखादं क्लबमधलं किंवा पार्श्वभूमीला साजेसं गाणं वापरणं समजून घेता येतं, पण मध्येच त्यांचा वापर नसता केला तरी चाललं असतं.

छोट्या भूमिकेत चांगल्या अभिनेत्यांचा वावर याला परिपूर्ण करतो. मुख्य भूमिकेत असणार्‍यांपैकी चित्रांगदा सिंग शकून कोठारीची दुखावली गेलेली बायको म्हणून चांगली छाप पाडतात. नवोदित रोहन मेहरा दिग्दर्शकाला अपेक्षित अभिनय करतो. अजून सिनेमे यायला लागल्यावर त्याच्या अभिनयात सुधारणा होईल. दिग्दर्शक संपूर्ण सिनेमात त्याला दाढी करायला का लावत नाही, हे मात्र कोडंच राहतं. कदाचित त्याची बसलेली गालफाडं दिसून येऊ नयेत किंवा चेहर्‍यावरील हावभाव दाढीत लपून रहावेत म्हणून असेल.

‘सॅक्रेड गेम्स’च्या अनपेक्षित यशामुळे जोशमध्ये असणारे सैफ अली खान व राधिका आपटे सिनेमा खिशात घालतात. दोघांची पात्रं ही करड्या रंगाची आहेत. एकाच वेळी चांगल्या व वाईट प्रवृत्तीचा वास आहे त्यांच्यात आणि ते दाखवण्यासाठी ते कुठेही कमी पडत नाहीत. ते समोरासमोर खूप कमी वेळा येतात, पण त्यांच्या पात्रांच्या आलेखाला खाली येऊ देत नाहीत. नायक-खलनायक यातल्या सीमारेषेवर असणारा शकून कोठारी हा ‘सरताज सिंग’पेक्षा वेगळा आहे. इथं कोठारीला त्याच्या लब्धप्रतिष्ठित असण्याला कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ द्यायचं नाही. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला मागेपुढे पाहत नाही. सैफ अली खान खटकेबाज संवादासोबत मुद्राभिनयातून ते मस्तपणे पोचवतो.

मजरूह सुलतानपुरींनी ‘सीआयडी’मधल्या ‘ए दिल है मुश्किल जिना यहाँ’ या सुप्रसिद्ध गाण्यात एके ठिकाणी म्हटलंय की, ‘खुद काटे गले सबके, कहे इसको बिज़नस’. ते ‘बाजार’च्या कथानकाला चपखल लागू होतं. त्याच गाण्यात मुंबईचं समर्पक वर्णन त्यांनी करून ठेवलंय. त्यांची माफी मागून त्यांच्याच शब्दांमध्ये एका शब्दाचा बदल करून म्हणावसं वाटतं- ‘ए दिल है मुश्किल जीना यहाँ, ज़रा हटके, ज़रा बचके, ये है ‘बाजार’ मेरी जान.’  

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख