‘अरे! मायावी सरोवर’ :  राजाची होते स्त्री, मग ती आई होते आणि खरा ‘ड्रामा’ सुरू होतो!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘अरे! मायावी सरोवर’मधील दोन प्रसंग
  • Sat , 20 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe अरे! मायावी सरोवर ARE MAYAVI SAROVAR शंकर शेष Shanker Shesh

भारतीय समाजमनाला स्पर्शून जाणारी दोन महाकाव्यं म्हणजे रामायण आणि महाभारत. यातही महाभारतात मानवी स्वभावांची एवढी गुंतागुंत आहे की, विचारता सोय नाही. म्हणूनच आधुनिक काळात जेवढी रामायणाला समोर ठेवून कलानिर्मिती केली जाते, त्याच्या कितीतरी पट महाभारताला समोर ठेवून केली जाते. आजकाल रामायण म्हणजे ‘फक्त सीतेची व्यथा’ असं आहे की काय असं वाटावं, एवढ्या प्रमाणात सीतेला समोर ठेवून नाटकं/ कथा इत्यादी लिहिल्या जात आहेत. तसं महाभारताचं नाही. या महाकाव्यातील कोणत्याही भागाचा अन्वयार्थ लावणारी नाटकं, कथा आजही रसिकांसमोर येत असतात. अलीकडे कै. डॉ. शंकर शेष यांनी लिहिलेलं ‘अरे! मायावी सरोवर’ हे दोन अंकी हिंदी नाटक बघण्याचा योग आला. हे नाटक तसं थेट महाभारतावर आधारित नाही, पण सुजाता राणीला असलेली शंभर मुलं वगैरे संदर्भांमुळे कळत-नकळत नाटक महाभारताकडे बोट दाखवतं.

डॉ. शंकर शेष (१९३३-१९८१) हे भारतातील हिंदी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटककार. त्यांनी एकुण २२ नाटकं व १० कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कादंबरीवर ‘घरोंदा’ आणि ‘दूरींयां’ हे दोन हिंदी चित्रपट निघाले. ‘एक और द्रोणाचार्य’, ‘पोस्टर’, ‘रक्तबीज’, ‘कोमल गांधार’ व ‘अरे! मायावी सरोवर’ ही त्यांची अतिशय गाजलेली नाटकं. यातील ‘एक और द्रोणाचार्य’ तर भारतातील सर्व भाषांत गेले व त्याचे भारतभर प्रयोगही झाले.

शंकर शेष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी २०१५ साली ‘शंकर शेष फाऊंडेशन’ स्थापन करून त्यांच्या स्मृती, त्यांची नाटकं जपण्याचं ठरवलं. या फाऊंडेशनतर्फे नवीन नाटककारांना प्रोत्साहन दिलं जातं आणि अनेक प्रकारे रंगभूमीची सेवा केली जाते. शिवाय फाऊंडेशनतर्फे शंकर शेष यांच्या नाटकांचा महोत्सव आयोजित केला जातो. अलीकडेच ‘डॉ. शंकर शेष नाट्यमहोत्सव २०१८’ झाला. हा अतिशय महत्त्वाकांक्षी नाट्यमहोत्सव होता. या अंतर्गत डॉ. शंकर शेष यांच्या नाटकांचे प्रयोग दिल्ली, भोपाळ, इंदोर, कानपूर, लखनौ, रायपूर, पटियाला, होशंगाबाद, पुणे आणि मुंबई अशा अकरा शहरांत पंधरा प्रयोग झाले. या नाट्यमहोत्सवाचा भाग म्हणून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत ‘अरे! मायावी सरोवर’ हे दोन अंकी हिंदी नाटक बघण्याचा योग आला.

हे नाटक म्हणजे फँटसी आहे. स्त्री-पुरुष खरोखरच कधी एकमेकांना समजून घेऊ शकतात का? स्त्रीचं मन पुरुषाला कधी तरी समजेल का? या तक्रारी अनादी काळापासून केल्या जात आहेत. यावर एक जवळजवळ अशक्यप्राय उपाय सुचवला गेलेला आहे. तो म्हणजे पुरुषानं काही काळासाठी का होईना स्त्री होऊन बघावं. हे या नाटकाचं मध्यवर्ती सूत्र आहे. अर्थात नाटककारानं हे सूत्र फक्त स्त्री-पुरुष मानसिकतेवर प्रकाश टाकण्यासाठी वापरलं नाही. नाटककारानं जरी स्त्रीवर होत असलेल्या अन्यायांची प्रामुख्यानं चर्चा केली असली तरी यात एक-दोन ठिकाणी जातिव्यवस्थेवर टीका आहे. या सर्वांचा वापर करून त्यानं नाटकात लोकनाट्यात असतो, तसा रसरशीत विनोद निर्माण केला आहे. लोकनाट्यातल्या विनोदाचा वापर करून सामाजिक व्यंगांचा उपहास केला आहे.

शिवाय हे नाटक एक सांगीतिका आहे. म्हणून हे नाटक बघणं हा एक प्रसन्न अनुभव ठरतो. हे नाटक जरी १९७४ साली लिहिलेलं असलं तरी दिग्दर्शक सलीम आरिफ यांनी त्याचं समकालीनीकरण केलं आहे. म्हणूनच या नाटकातील पात्रं मोबाईल फोन्स वापरतात, तर कधी सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच रद्द केलेल्या कलम ३७७चा उल्लेख येतो.

नाटकाचं कथानक पारंपरिक पद्धतीचं आहे. इल्वलू नावाचा राजा असतो. तो तसा अनेक अर्थांनी सुखी असतो. गुणी, सुशील पत्नी, राज्याला वारस असलेला राजपुत्र, सुखी प्रजा वगैरेमुळे राजा तसा निश्चिंत असतो. असं असलं तरी राजा आतून एका वेगळ्या, अनामिक दुःखानं हवालदिल झालेला असतो. एकदा राजा-राणी वनविहार करत असताना त्यांना एक सरोवर दिसतं. त्यातलं पाणी बघून राजाला त्यात स्नान करण्याची इच्छा होते. राणीची इच्छा नसताना राजा सरोवरात उडी मारतो. स्नान करून आलेल्या राजाचं रूपांतर एक सुंदर स्त्रीत होतं. येथून नाटक गंभीर वळण घेतं, पण सादरीकरण विनोदी असल्यामुळे नाटकात प्रसंगानुरूप होत असलेली तात्त्विक चर्चा अंगावर येत नाही.

सरोवरातून स्त्रीच्या रूपात बाहेर आलेला राजा आता स्त्रीच्या जीवनात रमायला लागतो. तो राणीला सांगतो की, तिनं परत जावं, राज्यकारभार सांभाळावा व यथावकाश राजकुमाराचा राज्याभिषेक करून द्यावा. राणी या सर्व बदलांनी गांगरते, पण स्त्रीच्या रूपातील राजाला ती राजधानीत नेण्यास फारशी राजी नसते. या प्रकारे राणीची बोळवण केल्यावर स्त्रीच्या रूपातला राजा वनजीवनाचा आनंद घेतो. यात त्याला तपस्या करणारा एक रुबाबदार तरुण ब्राह्मण भेटतो. स्त्रीच्या रूपातला राजा या ब्राह्मणावर भाळतो, त्याची सेवा करतो, त्याच्याशी लग्न करतो. तो ब्राह्मण व स्त्री रूपातला राजा संसारसुख आकंठ भोगतात. या दरम्यान स्त्रीच्या लैंगिक गरजेची, या संदर्भात तिला निवड करण्याच्या अधिकाराची चर्चा येते.  एव्हाना राजाचं रूपांतर फक्त स्त्रीच्या शरीरात होत नाही, तर तिचं मनसुद्धा स्त्रीचं होते. ती नवऱ्याची मनोभावे सेवा करते, त्याचे पाय दाबते, त्याला स्नानासाठी गरम पाणी काढून देते वगैरे पारंपरिक स्त्रीची भूमिका चोख निभावते.

निसर्गनियमाप्रमाणे ती गरोदर होते व तिला पुत्ररत्न होतं. पुत्र झाल्यावर कालपर्यंत ब्राह्मणाच्या सतत मागेमागे असणारा राजा आता मुलाच्या संगोपनात एवढा रमतो की, तो संसाराकडे सरळ दुर्लक्ष करतो. मात्र खरा पेच पुढेच येतो, जेव्हा मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहतो. ब्राह्मण म्हणतो की, ब्राह्मणाचा मुलगा आहे वेदसंपन्न झालाच पाहिजे, तर राजा म्हणतो क्षत्रिय स्त्रीचा मुलगा आहे लढाईचं शिक्षण घेईल. हा वाद टिपेला जात असताना लवकर दुसरा वाद समोर येतो.

सर्व काही सुरळीत सुरू असताना राजाची राणी येते व राजाला परत येण्याची विनंती करते. येथून नाटकात गंभीर चर्चा सुरू होते. राणीच्या मते राजाला तिच्यापासून झालेला मुलगा राजा होर्इल, पण आता स्त्री झालेल्या राजाच्या मते त्याला ब्राह्मणापासून झालेला मुलगा हा त्याचा खरा मुलगा आहे, ज्याला त्यानं नऊ महिने पोटात वाढवलं आहे. म्हणून राज्य त्यालाच मिळालं पाहिजे. इथं चर्चा ‘अपत्यावर कोणाचा अधिकार असतो? आईचा की वडिलांचा?’ या विषयाभोवती फिरते. राणीच्या मते तिचा मुलगा हा राजाचाच मुलगा आहे, तर राजा म्हणतो की त्या मुलापेक्षा मला हा आताचा मुलगा माझा आहे असं वाटतं. वादाच्या एका टप्प्यावर राणी राजाला टोमणा मारते की, पण माझा मुलगा क्षत्रिय आहे व राज्य चालवण्यास तोच जास्त लायक आहे. यावर राजाकडे काही उत्तर नसतं. शेवटी दोन्ही राजपुत्रांमध्ये द्वंद्व होईल व जो जिंकेल त्याला राज्य मिळेल असा तोडगा काढला जातो.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

द्वंद्व युद्ध सुरू होतं. ज्यात राजाचा मुलगा जिंकतो व क्षत्रिय राजपुत्र पराभूत होतो. इथं नाटककारानं जाताजाता आपल्या जातिव्यवस्थेला चिमटा काढला आहे. क्षत्रियवृत्ती तसंच ब्राह्मण्य जन्मानं मिळत नसून ते मिळवावं लागतं. युद्धानं हा प्रश्न सुटणारा नसतो म्हणून मग देवेंद्र इंद्र मध्यस्थी करतो व राजाला पुन्हा राजा करतो. अर्थात ब्राह्मण तक्रार करतोच की, यात माझ्या बायकोचं काय? अशा प्रकारे हसतखेळत नाटक संपतं.

वर उल्लेख केल्याप्रमाणे हे नाटक जरी अतिशय गंभीर व महत्त्वाच्या विषयांची चर्चा करते तरी सादरीकरण विनोदी पद्धतीचं असल्यामुळे व फॉर्म लोकनाट्याचा असल्यामुळे ही गंभीर चर्चा अंगावर येत नाही. उलटपक्षी विनोदाचा आधार घेत सादर केलेलं गंभीर मुद्दे प्रेक्षकांना अंतर्मुख करतात. हे ‘अरे! मायावी सरोवर’चं मोठं यश आहे.

या नाटकाच्या यशात डॉ. शेष यांच्या पक्क्या बांधलेल्या संहितेचं मोठे योगदान आहे. त्या खालोखाल दिग्दर्शक सलिम आरिफ यांना श्रेय द्यावं लागतं. त्यांनी नाटकाची प्रकृती ओळखून नाटक उभं केलं आहे. यात त्यांना प्रमुख पात्रांची साथ लाभली आहे. पारस गांधी (मूळ राजा), सिमरन टंडन (राणी) व मोहित मेहता  (राणी झालेला राजा) या तीन प्रमुख पात्रांनी कमालीचा सहज अभिनय केला आहे. यातही मोहित मेहता यांचा खास उल्लेख करावा लागेल. त्यांनी स्त्री झालेल्या पुरुषांची देहबोली, हावभाव, संवादांची फेक, मानसिकता वगैरे बदल कमालीच्या सहजतेनं सादर केले आहेत. त्यांची व राणीच्या भूमिकेतील सिमरन टंडन यांच्यातील स्त्रीच्या अधिकाराची चर्चा, हा या नाटकाचा उत्कर्षबिंदू आहे.

कोणत्याही सांगीतिकेत संगीताला अतोनात महत्त्व असतं. या नाटकात संगीताची जबाबदारी अनादी रवी नागर यांनी सांभाळली आहे, तर नृत्यदिग्दर्शन श्रीकांत अहिरे यांचं आहे. या सर्वांच्या दर्जेदार योगदानामुळे ‘अरे! मायावी सरोवर’ हे नाटक प्रेक्षणीय तर ठरतंच, शिवाय प्रेक्षकांसमोर काही विचारप्रवर्तक मुद्दे ठेवण्यात यशस्वी होतं.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......