अजूनकाही
‘बधाई हो’मधील विनोद आणि एकूणच कथानकाच्या प्रभावी वाटण्याचं कारण जितकं त्याच्या खुसखुशीत संवादांमध्ये दडलेलं आहे, तितकंच त्याच्या लहानसहान गोष्टी टिपणाऱ्या निरीक्षणशक्तीमध्येही आहे. उदाहरणार्थ, मध्यमवर्गीय कौशिक कुटुंब वॅगनआर चालवतं, इतकंच नव्हे तर ती गाडी त्यातील अनेक सुख-दुःखाच्या क्षणांची साथीदार आहे. याउलट उच्च वर्गातील रेनीकडे चकाकणारी स्विफ्ट आहे. वॅगनआरवर साचलेली धूळ आणि घरातील शेंडेफळामुळे रिअर विंडोवरील ‘कौशिक्स’मधील हरवलेली अपॉस्ट्रफी यांत चित्रपटाचं वेगळेपण दडलेलं आहे, तर वॅगनआर आणि स्विफ्ट दाखवणाऱ्या चित्रात दोन वर्गांमधील फरक दडलेला आहे.
नकुल (आयुष्मान खुराना) हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करता दिल्लीत राहणारा ‘स्टड लौंडा’ असतो. त्याला वेल सेटल्ड असल्याची भावना निर्माण करणारी नोकरी, त्यावर प्रेम करणारी त्याची गर्लफ्रेंड रेनी (सान्या मल्होत्रा) यांमुळे तसं पाहता त्याचं आयुष्य बरंच सुखकर आहे. त्याच्या मध्यमवर्गीय असण्याच्या न्यूनगंडात्मक भावनेवर पांघरूण घालणारं आहे.
त्याची आई, प्रियंवदा (नीना गुप्ता) ही एक गृहिणी असते. रेल्वेत टीटी असणाऱ्या पती, जितेंदरच्या नोकरीमुळे (गजराज राव) नकुलचा लहान भाऊ आणि जितेंदरच्या आईसोबत (सुरेखा सिक्री) हे पंचकोनी कुटुंब सरकारी घरात राहत असतं. या रूढ अर्थानं सुखी-समाधानी असलेल्या कुटुंबात समस्या निर्माण होते, ती एरवी बबली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या प्रियंवदाच्या गरोदरपणामुळे. अर्थात आपल्या चाळिशी ओलांडलेल्या आई-वडिलांना घरातील मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वयात मूल होत असल्याची बातमी ऐकून घरातील आणि एकूणच परिचयातील सर्वांनी त्या गोड बातमीला काहीशी लज्जास्पद बाब मानून व्यक्त होणं अनपेक्षित नाही.
‘बधाई हो’च्या निमित्तानं कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबाला काहीशा अस्वस्थ करणाऱ्या, टॅबू मानल्या जाणाऱ्या गोष्टीतून समोर आणलेली निरनिराळ्या तऱ्हेची पात्रं अगदी टोकाच्या दृष्टिकोनांतून कशी हाताळतात याकडे पाहिलं गेलंय. त्यांना पडद्यावर वावरण्यासाठी गरजेची असलेली एक परिस्थिती-कम-समस्या समोर मांडून त्याभोवती चित्रपटाची मांडणी केलीय.
‘बधाई हो’ त्यातील बहुतांशी भागाकरिता ‘लोग क्या कहेंगे?’ या प्रश्नानं ग्रस्त असलेल्या कुठल्याही इतर भारतीय कुटुंबाइतक्याच अस्सल अशा कौशिक कुटुंबाच्या क्रिया-प्रतिक्रिया टिपतो. आणि जेव्हा तो हे करत नसतो, तेव्हा त्यातील पात्रं ज्या समस्येत अडकली आहेत, तिच्याकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून एकाच घटनेकडे पाहण्याच्या भारतीय जनमानसातील नानाविध तऱ्हांकडे पाहतो. शिवाय असं करताना तो कौशिक कुटुंबाशी संबंध असलेल्या इतर लोकांच्या या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही टिपतो. ज्यामुळे त्यातील विनोदाला केवळ एखाद्या टीव्ही शोमध्ये दिसणाऱ्या स्किट्सचं स्वरूप प्राप्त न होता, त्याद्वारे समाजातील विरोधाभासापासून ते जनरेशन गॅपपर्यंत अनेक गोष्टी अधोरेखित केल्या जातात.
अशा वेळी तो बऱ्याच ठिकाणी ‘दो दूनी चार’ (सकारात्मकरीत्या)ची आठवण करून देतो. खासकरून कौशिक कुटुंबाचं वास्तव्य असणारी कॉलनी, कमिंग ऑफ एज चित्रपटांत आढळतात, तशी केवळ स्टेरिओटाईप्स बनण्याच्या पल्याड जाणारी पात्रं, पदोपदी जाणवत राहणारा पंजाबी संस्कृतीचा अंश या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
या चित्रपटातील विनोदाला करुण्याची किनार लाभलेली आहे. कारण मुळातच चित्रपट ज्या कथानकाभोवती फिरतो, त्यात एक समाज म्हणून आपण जनरालाईज करणं अपेक्षित असलेल्या (अनेक) गोष्टींपैकी एका महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश आहे. ती गोष्ट म्हणजे सेक्स, संभोग. त्यातही पुन्हा प्री-मॅरिटल सेक्सपासून ते इथं केंद्रस्थानी असलेली ‘आई-वडीलही सेक्स करतात?!’ ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे.
ज्यामुळे जेव्हा नकुल आपले आई-वडील (अजूनही) सेक्स करतात, ही गोष्ट सहजासहजी स्वीकारू शकत नाही, तेव्हा इतर लोक, समाजानं हे स्वीकारणं तर दूरचीच बाब आहे, हे सहज अधोरेखित होतं. त्यामुळे चित्रपट आणखी पुढील पातळीवर जाऊन, ‘लोग क्या कहेंगे?’ इथं न थांबता ‘लोक काहीही म्हणोत, माझं कुटुंब माझ्यासोबत असणं महत्त्वाचं’ याकडेही लक्ष देतो. ज्यामुळे तो अधिक महत्त्वाचा ठरतो.
आई आणि पत्नीच्या मधोमध ताणला जाणारा जितेंदर म्हणून उभा राहणारा गजराज राव नेहमीप्रमाणे लाईकेबल आहेच. पार्श्वभूमीवर रोमँटिक गाणी सुरू असताना बबलीकडे पाहणारा ते गरोदरपणाची बातमी कळाल्यानंतर सर्वांभोवती अस्वस्थपणे वावरणारा अशा दोन्ही टोकांदरम्यानच्या बाप माणसाला तो मूर्त स्वरूप देतो. नीना गुप्ता तर केवळ तिच्या चेहऱ्यावरील भावांतून व्यक्त होत राहिली तरी पडद्यावर भावनांचा कल्लोळ माजतो.
खुरानाबाबत काय बोलणार! त्याला ‘विकी डोनर’, ‘नौटंकी साला’नंतर पुन्हा एकदा दिल्लीच्या स्टड, गबरू लौंड्याची भूमिका मिळाली आहे, परिणामी ती पडद्यावर जिवंत होणं ओघानंच आलं. सुरेखा सिकरी अनेक दृश्यांमध्ये बॅटिंग करून जात खरी सीन स्टिलर ठरते. सान्या आणि शीबा चढ्ढा मोजक्या दृश्यांमध्ये चोख कामगिरी करतात.
चित्रपटाची लेखक मंडळी असलेल्या शंतनू श्रीवास्तव, अक्षत गिलदियाल आणि ज्योती कपूर यांना पंचेस कसे लिहावेत हे कळतं, तर उर्वरित भन्नाट कास्टला ते पडद्यावर कसे आणावेत हे कळतं. एका दृश्यात नकुलला आरश्यासमोर नजीकच्या भविष्यात उपयोगात आणायच्या बच्चनवजा पंचलाईनची तयारी करताना दाखवलं जातं. पंचलाईन वेळेत होणं गरजेचं असतं, यातही ती एक पंच काढते.
अमित शर्मानं दिग्दर्शित केलेली ही चतुराईनं लिहिलेली, दिग्दर्शित केलेली आणि एकूणच कुशलतेने बनवलेली फिल्म आहे. जिला पडद्यावर उत्तमरीत्या दिसणाऱ्या निरीक्षणांची साथ लाभल्यानं ती अधिकच सुंदर झालेली आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment