अजूनकाही
यंत्रणा, मग ती सामाजिक असो, प्रशासकीय असो व न्यायालयीन असो, ती प्रामुख्याने ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वावर चाललेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. अशा वेळी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे सामर्थ्यही त्याच्याकडे नसते. परंतु या सामान्य माणसाने ठरवलेच तर तो आपल्यावरील अन्यायाचा बदला घेऊ शकतो. मात्र त्यासाठी त्याला कायदा हातात घ्यावा लागतो. चित्रपटाच्या कथेसाठी ही संकल्पना तशी नवी नाही. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘मी शिवाजी पार्क’ हा नवीन मराठी चित्रपट याच संकल्पनेवर आधारित आहे. कथेची संकल्पना जुनी असली तरी त्यांनी सादरीकरण ज्या पद्धतीने केले आहे, त्यामुळे ‘चला उठा, कायदा हातात घ्या आणि आपल्यावरील अन्यायाचा बदला घ्या’ ही भावना रुजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अन्यायाचा बदला ‘स्व-न्यायाने’ घेणारी सूडकथा असेच या चित्रपटाचे वर्णन करण्यात येईल.
अर्थात कथेचा आणि चित्रपटाच्या नावाचा अर्थाअर्थी तसा काही संबंध नाही. ‘मी शिवाजी पार्क’ हे नाव मुंबईतील ‘शिवाजी पार्क’ या बहुतेकांना परिचित असलेल्या स्थळाचे आत्मवृत्त वाटते. मात्र कथेत तसे काहीही नाही. केवळ शिवाजी पार्कमध्ये दररोज एकत्र येणाऱ्या काही सेवानिवृत्त मित्रांची ही गोष्ट आहे. त्यामुळे चित्रपटाला हे नाव का दिले असावे याचा फारसा उलगडा होत नाही. चित्रपटाला दुसरे कोणतेही समर्पक नाव चालले असते.
यामध्ये पाहायला मिळते ती वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच सेवानिवृत्त मित्रांची गोष्ट. जे शिवाजी पार्कमध्ये रोज गप्पा मारण्यासाठी एकत्र येत असतात. त्यापैकी एक असतात निवृत्त न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष (विक्रम गोखले), दुसरे निलंबित पोलीस अधिकारी दिगंबर सावंत (अशोक सराफ), तिसरे डॉक्टर असलेले रुस्तम मेस्त्री (शिवाजी साटम), चौथे सीए असलेले सतीश जोशी (सतीश आळेकर) आणि पाचवे प्राध्यापक दिलीप प्रधान (दिलीप प्रभावळकर). यापैकी प्रा. दिलीप प्रधान हे कट्टर गांधीवादी असतात. गांधीवादापासून दूर गेल्यामुळे देशात सर्व क्षेत्रांत अनागोंदी निर्माण झाली आहे असे त्यांचे ठाम मत असते. मात्र हिंसेला हिंसाचाराने उत्तर न देता शांततेने आणि सामंजस्यानेच कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे याबाबतीतही ते आग्रही असतात. उर्वरित चौघांचे मात्र नेमके त्यांच्या उलट मत असते. ‘अन्याय सहन करणारा माणूस हाही तेवढाच दोषी असून त्यामुळे अन्याय करणाऱ्यांचे फावते’ अशी त्यांची धारणा असते.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
एके दिवशी सतीश जोशी यांच्या नातीच्या संदर्भात घडलेली अतिशय भीषण घटना त्यांना समजते. या घटनेतील मुख्य आरोपी असलेला गुटखा किंग बलवा अर्थातच पैशाच्या जोरावर जामिनावर सुटतो. आणि तो दोषी असूनही उजळ माथ्याने वावरत आहे, हे लक्षात घेऊन राजाध्यक्ष, सावंत, रुस्तम मेस्त्री आणि स्वतः सतीश जोशी हे चौघे एकत्र येतात आणि एक धाडसी कट करून गुटखा किंग बलवाला आपल्या जाळ्यात ओढतात. आणि न्यायालयाबाहेरचे खास न्यायालय चालवून न्या. विक्रम राजाध्यक्ष यांच्या आदेशानुसार बलवाला मृत्युदंडाची शिक्षा देतात आणि ती अंमलातही आणतात.
तर दुसऱ्या प्रकरणात पोलीस अधिकारी दिगंबर सावंत यांच्या निलंबनाला, तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वनमंत्री आणि त्याच्या मुलाला याच पद्धतीने मृत्युदंडाची शिक्षा देऊन ते त्याची अंमलबजावणी करतात. विशेष म्हणजे गांधीवादी असल्यामुळे पहिल्या प्रकरणाला विरोध करणारे प्रा. प्रधान दुसऱ्या प्रकरणात मात्र त्यांच्याबरोबरीने सामील होतात. या दोन्ही प्रकरणांमुळे साहजिकच खळबळ माजते. अन्याय दूर करण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्या या पाचही सेवानिवृत्त मित्रांचे पुढे काय होते हे पडद्यावर पाहणेच इष्ट.
चित्रपटाच्या पूर्वार्धात जोशी यांच्यासंबंधीच्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे, तर उत्तरार्धात सावंत यांचे प्रकरण आहे. दोन्ही प्रकरणातील ‘थ्रिल्लिंग’ निर्माण करण्यात दिग्दर्शकाला चांगले यश मिळाले असले तरी दुसरे प्रकरण अचानक ठिगळ जोडल्यासारखे वाटते. त्यादृष्टीने पटकथेवर अधिक काळजी घेण्याची गरज होती. शिवाय कथेत काही अतार्किक गोष्टी सहन कराव्या लागतात. अभिराम भडकमकर यांचे संवाद मात्र सुरुवातीपासून मजा आणतात, तर काही ठिकाणी सध्याच्या परिस्थितीबाबत अंतर्मुखही करून जातात. कथेच्या दृष्टीने संवादातून गांधीवादाबाबत केलेले भाष्यही बरेच बोलके आहे. करमणुकीसाठी चित्रपटात एक कडक लावणी नृत्य आणि रेल्वे डब्यातील गाणे असा सांगीतिक मालमसालाही आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या सर्वांनीच लक्षवेधी भूमिका केलेल्या आहेत. विशेषतः अशोक सराफ आणि पारशी डॉक्टरांच्या भूमिकेतील शिवाजी साटम यांनी छान मनोरंजन केले आहे. उदय टिकेकर (गुटखा किंग बलवा), शरद पोंक्षे (वनमंत्री), संतोष जुवेकर (वनमंत्र्याचा मुलगा) यांनीही त्यांना चांगली साथ केली आहे. सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, दिप्ती लेले या अन्य कलाकारांनी छोट्या भूमिकेतही आपली छाप पडली आहे. मंजिरी फडणीस ही मात्र अगदी सुरुवातीलाच चमकून जाते.
जाता जाता. मुंबई बॉम्बस्फोटात सामान्य नागिरकांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांचा खातमा करणारा ‘वेनस्डे’ या हिंदी चित्रपटातील ‘कॉमन स्टुपिड मॅन’ दीर्घकाळ लक्षात राहतो. त्यामानाने सामान्य माणसावरील अन्यायाचा बदला घेणाऱ्या ‘मी शिवाजी पार्क’मधील या ‘रॉक स्टार्स’चा तेवढा प्रभाव पडत नाही हे मात्र खरे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment