अजूनकाही
‘सायको’, ‘ज्यूरासिक पार्क’ व ‘तुंबाड’मध्ये साम्य आहे. तिन्ही सिनेमे माणसाच्या प्रवृत्तीची काळी बाजू दाखवतात. तिन्हीत तांत्रिक बाबींना कथेएवढच महत्त्व आहे. ‘सायको’ जरी हिचकॉकच्या तंत्र कौशल्यानं समृद्ध असला तरी तो कथेला, त्यातल्या आशयाला दुय्यम मानत नाही. ‘ज्यूरासिक पार्क’ तेच करतो. कथा एका अर्धकच्च्या तंत्रज्ञानावर आपली स्वार्थी महत्त्वाकांक्षा रेटून नेणाऱ्या उद्योगपतीची असली तरी तो मानवी प्रवृत्तीचंच दर्शन घडवतो. तिथंही तांत्रिक गोष्टी कथेला पूरक म्हणूनच येतात. वरील दोन्ही बाबी ‘तुंबाड’लाही लागू होतात. तरीही तो काही प्रमाणात त्यांच्या तुलनेत कमी पडतो तो दिग्दर्शकानं कथेला दिलेल्या दुय्यम वागणुकीमुळे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या तुंबाड गावात एका किल्लासदृश वाड्यात कुणी सरकार राहत असतात. ते ‘हस्तर’ची रक्षा करत असतात. ‘हस्तर’ म्हणजे आदिमायेचा मुलगा. पण त्यानं एक चूक केलेली असते. स्वार्थीपणा करण्याच्या नादात त्यानं आदिमायेची सर्व संपत्ती लुटलेली असते. पण तिच्याकडून समस्त मानव जातीसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या अन्नाची लूट त्याला करता येत नाही. त्याच्या या कृत्यामुळे त्याला शिक्षा मिळते की, तो संपत्ती ठेवून घेऊ शकत असतो, पण त्याला खायला अन्न मिळत नाही. मग तो संपत्ती लुटायला येणाऱ्यांना त्रास देतो.
तिथेच एक गरीब आई (ज्योती मालशे) तिच्या दोन मुलांसह राहत असते. ती एका आज्जीचा सांभाळ करत असते. ती आज्जी भुकेली असते. तिची भूक नाही भागवली की, ती माणसांनाच खात असते. त्या दोन मुलांपैकी विनायकाला मात्र खात्री असते आज्जीकडे वाड्यातल्या खजिन्याची माहिती आहे. त्याच्या भावाला अचानक अपघात होऊन तो दगावतो, तर दुसरीकडे वाड्याचा मालक देह सोडतो. घाबरलेली ती विनायकाकडून वचन घेते की, तुंबाडला परत येणार नाही. तरीही पंधरा वर्षांनी विनायक (सोहम शाह) खजिना शोधण्यासाठी वाड्याकडे परत येतोच.
१९१८ साली सुरुवात होणारी कथा तीन पिढ्यांचा प्रवास दाखवून भारताच्या स्वातंत्र्यानंतर संपते. यासाठी दिग्दर्शक राही अनिल बर्वे त्यांचे सह-दिग्दर्शक आदेश प्रसाद व क्रिएटिव्ह दिग्दर्शक आनंद गांधी एखाद्या उत्तम भयकथेला शोभावी अशी रचना तयार करतात. श्रेयनामावलीत लेखक नारायण धारप यांच्या कथेपासून प्रेरित असा उल्लेख करतात. त्यामुळे सुरुवातीची वीस-पंचवीस मिनिटं एखादी जबरदस्त भयकथा बघतोयत असा आभास तयार करण्यात बर्वे व मंडळी यशस्वी झाली आहेत. त्यानंतर कथानकाला वळण लागतं. हे वळण मात्र त्याला वेगळ्याच दिशेनं नेतं. कारण हस्तर कोण आहे व त्याचा खजिन्याशी काय संबंध वगैरे गोष्टी विनायक त्याचा शोध घ्यायला लागतो, त्यात सांगितल्या जातात. महत्प्रयासानं त्यानं लावलेला शोध पुढे वापरायचा कसा हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो.
पुण्यात वास्तव्यास असणारा विनायक तिथं मिळालेली नाणी विकून पैसा कमवायला लागतो. त्यासाठी एका सावकाराला हाताशी घेतो. सावकाराला त्याच्या या अचानक काही दिवसांच्या अंतरानं सोन्याच्या नाणी आणायच्या गोष्टीचं कुतूहल वाटायला लागतं. तो त्याला थेटच विचारतो की, तुंबाडमध्ये असं काय आहे जे त्याला नेहमी तिथं जायला लागतं. इथंच कथा स्वार्थी वृत्तीच्या माणसांचं दर्शन घडवायला सुरू करते. कथेचा सुरुवातीचा भयपटाचा आभास ही रचना आहे, हे कळायला लागतं. कथेला मिळालेलं हे वळण निश्चित उत्सुकता निर्माण करणारं आहे. पण पटकथाकार बर्वे, प्रसाद, गांधी व मितेश शाह पटकथेत निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लागतात. त्यांच्यासाठी राहतो तो विनायकाचा श्रीमंत होण्याचा प्रवास. कारण सावकाराकडे विनायक का येतो याची कुणकुण एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागते. तो त्याला हटकतो. सावकार घाबरून काहीच सांगत नाही. पुढे त्या ब्रिटिशाचा मागमूसही राहत नाही. तो विनायकाला थेट का भेटत नाही याचं उत्तर नाही. ब्रिटिशांनी भारतातली संपत्ती लुटून इंग्लंडला नेली हा इतिहास आहे. तेव्हा ‘तुंबाड’बद्दल कर्णोपकर्णी असणाऱ्या गोष्टी एखादा ब्रिटिश अधिकारी सहजासहजी सोडून देईल यावर विश्वास बसत नाही.
दुसरा मुद्दा आहे विनायकाचं वागणं. त्याला नंतर आपण करत असलेल्या कृत्याचा पश्चाताप वाटायला लागतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यानं त्याच्या मुलाला प्रशिक्षित केलेलं असते. तो बापापेक्षा दोन पावलं पुढेच जातो. त्याचं वागणं व एकदम श्रीमंत होऊन आलिशान आयुष्य जगणं त्याच्या आजूबाजूच्यांना अजिबात खटकत नाही. त्याच्याबद्दल काहीही बोललं जात नाही. अगदी त्याची बायको स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेली असते, तेव्हा तिचे साथीदार कधीच तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारत नाहीत. पटकथाकार प्लॉटमधले हे गोंधळात टाकणारे प्रश्न उत्तर न देताच सोडून देतात. ते विनायकाच्या वागण्यावर लक्ष केंद्रित करतात. ते योग्यही आहे. पण प्रश्न थिएटर बाहेर पडल्यावरही तसेच मनात राहतात. त्यामुळे एकदा विनायक, हस्तर वगैरे बाबी प्रेक्षकांना परिचयाच्या झाल्या की, कथेला आकार यायला हवा होता, तो येत नाही.
पटकथेकडे दुर्लक्ष झालंय त्याचं कारण दिग्दर्शकानं तांत्रिक गोष्टींकडेच ठेवलेलं लक्ष. हा सिनेमा प्रत्येक बाबतीत नेत्रसुखद आहे. आर्ट डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, साउंड डिझाईन, प्रॉडक्शन डिझाईन, व्हीएफएक्स वगैरे बाबतीत शंभरपैकी शंभर गुण द्यायला हवेत. नैसर्गिक प्रकाशापासून ते यथातथ्य काळ उभा करण्यापर्यंत संपूर्ण माहौल जबरदस्त तयार केलाय. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षक गुंतून राहतो. गेल्या काही वर्षात अशा पद्धतीनं तांत्रिक श्रेणीत वरच्या पातळीवरचं काम बघण्यात आलं नाही. गेलं जवळ जवळ एक दशक बर्वे या सिनेमावर काम करत होते. आठ महिन्यांत त्यांनी सातशे पानांचा स्टोरीबोर्ड बनवला असं सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सांगण्यात आलं. त्यांचे प्रयत्न निःसंशय वाखाणण्यासारखे आहेत. यात चूक दिसून यावी असं वाटत नाही इतकं परफेक्ट काम केलंय. अशा पद्धतीचं काम हे हॉलिवुडमध्ये नित्याचं. तरीही या तांत्रिक परफेक्शनला उत्तम पटकथेची जोड मिळाली असती तर निःसंशय हा यावर्षीचा सर्वोत्तम सिनेमा झाला असता.
बाकी सोहम शाह हे स्वतः निर्माते व अभिनेता असल्यामुळे छाप पाडतातच. सोबतीला अनिता दाते व ज्योती मालशे आहेत. त्यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी लक्षात राहण्यासारख्या. मोहम्मद समद याचं काम मात्र त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढेच. विनायकचा मुलगा अशी भूमिका असली तरी शेवटाकडे त्याच्या अभिनयला वाव मिळाला आहे. त्यानं ते चोखपणे केलं आहे.
इतकी वर्षं मेहनत घेऊन प्रसंगी चित्रीकरण थांबवून कथेत, पटकथेत बदल करून व त्याला उत्तम तांत्रिक बाबींची जोड देऊन बनवलेला हा नेत्रसुखद अनुभव आशयात मात्र ऊंची गाठू शकत नाही, हे खेदानं नमूद करावं लागतं.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment