अजूनकाही
‘बॉईज-२’ हा चित्रपट ‘बॉईज’चा सिक्वेल आहे. ‘बॉईज’मध्ये दोन इरसाल कार्ट्यांनी कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये धुमाकूळ घातला होता. आता हीच कार्टी आणखी मोठी झाली आहेत. त्यांना शारीरिक आकर्षणाची गोडी निर्माण झाली आहे. आणि त्यातही या कार्ट्यांना विरोध करणारा एक अधिकृत खलनायकही सामील झाला आहे. विशेष म्हणजे कथेचा विषयही असा आहे की, त्यानुरूप या कार्ट्यांनी हॉस्टेलमध्ये केलेली ‘ग्रँड मस्ती’च पडद्यावर पाहायला मिळते आणि त्यावर अर्थातच तरुण वर्ग ‘फिदा’ होतो.
मात्र सिक्वेलला चांगली कथा लागतेच असा दिग्दर्शकाचा अट्टहास नसावा. त्यामुळे पूर्वीच्याच चित्रपटातील कथा कशीबशी पुढे रेटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थात हॉस्टेलमधील ‘कार्टी’ आता मोठी झाल्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला आवडेल असा विषय घेऊन आणि त्याला द्वैअर्थी संवादाची जोड देऊन चित्रपट मनोरंजक करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ‘बॉईज’ची ‘अडल्ट कॉमेडी’ असे या चित्रपटाचे वर्णन करता येऊ शकेल.
‘बॉईज’मधील ढुंग्या (पार्थ भालेराव), धैर्या (प्रतीक लाड) आणि कबीर (सुमंत शिंदे) हे तिघे मित्र आता बारावीत आले आहेत. अर्थात पहिल्या चित्रपटात हॉस्टेलमधील घालण्यात आलेल्या धुमाकुळामुळे ‘येथे अभ्यास होणार नाही’ या सबबीखाली कबीर आपल्या घरीच बहिणीबरोबर राहत असतो. मात्र ढुंग्या आणि धैर्याला त्याला कोणत्याही परिस्थितीत हॉस्टेलमध्ये पुन्हा आणावयाचे आहे. शिवाय हॉस्टेलमध्ये आता ‘ज्युनिअर विरुद्ध सिनिअर’ असा वादही सुरू झालेला असतो. नऱ्या (ओंकार भोजने) नावाचा श्रीमंत बापाचा मुलगा या ‘सिनिअर’चा दादा असून त्याचे आणि ढुंग्या-धैर्याचे चांगलेच वाकडे आलेले असते. त्यामुळे हॉस्टेलमध्ये सतत संघर्षाचे वातावरण आहे. वडिलांच्या बदलीमुळे चित्रा (सायली पाटील) नावाची मुलगी हॉस्टेलवर राहायला येते आणि तिच्यावर भाळलेला कबीर पुन्हा हॉस्टेलवर राहायला येतो. ‘ज्युनिअर विरुद्ध सिनिअर’ अशा संघर्षात एक विचित्र पैज लावली जाते. जो कोणी ही पैज हरेल त्याला कॉलेज सोडून जावे लागणार असते.
‘बॉईज-२’च्या कथेत हे बॉईज कसे ‘बॅड’ आहेत, यावरच सुरुवातीपासून भर देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा सारा वेळ कॅन्टीन आणि तेथील मारामारीतच जातो. ज्या दिवशी ‘राडा’ नाही, तो दिवस ‘अळणी’, अशा स्वरूपाचे संवाद त्याची साक्ष देतात. शिवाय कथेमध्ये प्रेम आणि शारीरिक आकर्षण याच विषयावर भर देण्यात आल्यामुळे आणि त्याला अनुलक्षूनच द्वैअर्थी संवाद लिहिण्यात आलेले असल्यामुळे विनोद निर्मिती होते खरी, मात्र ती फार अश्लील होऊ नये याचीही योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रेम आणि शारीरिक आकर्षण याबाबत आता मुलींनाही चांगली जाणीव झाली आहे, हेही या चित्रपटात काही प्रसंगातून दाखवण्यात आले आहे. हल्लीची तरुण पिढी मोबाईलच्या फार आहारी गेली आहे. त्यामुळे कसे दुष्परिणाम होतात हा खरे तर तरुणाईच्या दृष्टीने एक चांगला विषय होऊ शकतो. या चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने ते एक महत्त्वाचे सूत्र ठरले असते, मात्र या विषयाला जाता जाता स्पर्श केला आहे. त्यामुळे चित्रपटाचा शेवट फारसा प्रभावी ठरत नाही.
तसेच सुरुवातीला आपल्या लाडक्या नऱ्याच्या बेताल वागणुकीचे प्रिन्सिपॉलसमोर वाट्टेल त्या शब्दांत समर्थन करणारा आणि स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘आयटेम साँग’च्या कार्यक्रमाला अख्खे हॉस्टेल बोलवणारा व ‘सोनेरी शर्ट’ घालणारा बाप शेवटी नऱ्याला का बदडतो? त्याला क्षणात कशी उपरती होते, त्याचे कारण मात्र कळत नाही. या चित्रपटात ‘गोटी तुटली बाटली फोडली’ यासारखी गाणीही आहेत अर्थात ती मालमसाला भरण्यासाठीच वापरण्यात आलेली आहेत.
लडाखचे निसर्गसौंदर्य ही मात्र या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचा शेवट लक्षात घेता नजीकच्या काळात ‘बॉईज-३’ हा चित्रपटही येऊ शकतो अर्थात त्यामध्ये ‘बॅड बॉईज’ची ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ दाखवण्यात येईल अशीच अपेक्षा आहे.
पार्थ भालेराव, प्रतीक लाड हे ‘बॉईज’मध्येच ‘ओव्हरस्मार्ट’ होते, तो त्यांनी या चित्रपटात आणखी वाढवला आहे. त्यामानाने कबीर झालेला सुमंत शिंदे दिसतो छान, मात्र अभिनयात कमी पडतो. नऱ्याच्या भूमिकेत ओंकार भोजनेने मात्र कमाल केली आहे. खलनायकाच्या विविध छटा त्याने उत्तम अभिनित केल्या आहेत. यतीन कार्येकर, पल्लवी पाटील, अमित रियान यांच्याही भूमिका चांगल्या वठल्या आहेत. नऱ्याच्या बापाच्या छोट्याश्या भूमिकेतील गिरीश कुलकर्णीही चांगले लक्षात राहतात. कबीरच्या बहिणीच्या भूमिकेत शर्वरी जमेनीसला मात्र तसे फारसे काम नाही.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment