अजूनकाही
मध्यांतरानंतर नायकाला मारण्यासाठी एक जण त्याच्या घरी जातो. त्याच्यापासून स्वतःला सोडवून घेऊन तो तिथनं पळून जातो. सिनेमाच्या सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात येतं की, नायक ‘प्रभात रोड, पुणे’ इथं राहतोय. मग पळून गेल्यानंतर तो घराबाहेर पडल्यावर प्रभात रोडवरून मदत मागत फिरणं अपेक्षित आहे. त्याचं कारण तो आंधळा असतो. तर सिनेमात तो बाहेर पडला की, थेट शनिपार चौकात येतो, जिथं चिंतळेंचं दुकान व बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. बँकेच्या बाजूच्या गल्लीत तुळशीबाग आहे. तो चौकातून वळून उजवीकडे जातो. तर त्याचा मारेकरी लगेच तिथं येतो. तो शोधतो त्याला, पण तो दिसत नाही. हा सिनेमा आहे. त्यामुळे जे दाखवलं जातंय ते निमूटपणे बघायचं असा शिरस्ता आहे. पण तरीही ही भौगोलिक चूक दिग्दर्शक श्रीराम राघवन का करतात ते मात्र कळत नाही. जे पुण्यात राहिलेले आहेत व या भागाशी परिचित आहेत त्यांना हा फरक लगेच जाणवेल. प्रभात रोड ते शनिपार चौक हे अंतर अडीच किलोमीटर्सचं आहे. जर प्रभात रोडवर राहणारा नायक पळून जाणार असेल तर तो त्याच रस्त्यावरून जाणं अपेक्षित नाही का? तो एकतर लॉ कॉलेज रस्त्याकडे जाईल किंवा तिथंच इतर गल्ल्यात फिरणार नाही का? पुण्यातल्या महत्त्वाच्या स्थळांना सिनेमात स्थान द्यावं यासाठी त्याला पुण्यात फिरवणार असं वाटतं. हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण राघवन तपशिलात कथा व पात्र उभे करतात, तेव्हा अशी भौगोलिक चूक का राहू देतात याचं उत्तर मिळत नाही.
आकाश (आयुष्यमान खुराना) हा पुण्यात प्रभात रोडवर असणार्या एका एनजीओनं चालवलेल्या हॉस्टेलवर राहतोय. तो आंधळा आहे. तो उत्तम पियानो वाजवतो. नेहमीप्रमाणे सकाळी एके ठिकाणी जात असताना एक मुलगी त्याला धडकते. तिचं नाव सोफी (राधिका आपटे). त्याच्या पियानोच्या कौशल्यामुळे ती त्याला ‘फ्रँकोज’ नावाच्या तिच्या वडिलांच्या बारमध्ये घेऊन जाते. त्याला तिथं पियानो वाजवण्याचं काम मिळतं. तिथंच त्याची ओळख प्रमोद सिन्हा (अनिल धवन) या जुन्या सिनेस्टार्सची होते. तो आता रियल इस्टेटमध्ये असतो. त्याची बायको सिमी (तब्बू) ही तीन वर्षांपूर्वी त्याच्या जीवनात आलीय, पण तिचं प्रमोदच्या मुलीशी फारसं पटत नाहीये. प्रमोद नेहमीप्रमाणे फ्रँकोजमध्ये येतो, तेव्हा आकाश त्याच्याच एका यशस्वी सिनेमातलं गाणं पियानोवर वाजवतो. ते ऐकून तो त्याला घरी खास मैफलीकरता बोलावतो. लग्नाच्या वाढदिवसासाठी सिमीला सरप्राईज द्यावं असा त्याचा प्लॅन असतो. आकाश येतो, पण पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला कल्पना नसते.
दिग्दर्शक श्रीराम राघवन हे वेळ घेऊन, कथेवर काम करत सिनेमा बनवणारे दिग्दर्शक. त्यामुळे दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी त्यांची एखादी फिल्म येतेय असं होत नाही. त्यांनी एकूण पाचच सिनेमे गेल्या चौदा वर्षांत दिग्दर्शित केले आहेत. यावरून त्यांच्या कामाची शैली दिसून यावी. त्यांचे विषयही गुन्ह्याशी निगडीत असतात. त्यामुळे त्यांची पात्रं एखाद्या गुन्ह्यात अडकली की, काय करतील याचा अदमास त्यांना घ्यायचा असतो. ‘एक हसिना थी’ ही सूड कथा असली तरी पात्रं साधी सरळ नव्हती. ‘जॉनी गद्दार’ मुळातच चोरांमधल्या गद्दाराबद्दल होता, तर ‘एजंट विनोद’ गुप्तहेर कथा असल्यामुळे तिचा आवाका मोठा होता. ‘बदलापूर’च्यावेळी राघवन परत त्यांच्या आवडत्या छोटासा जीव असणार्या कथेकडे व त्यातील पात्रांकडे आले. ही सुद्धा एक सूडकथा होती, पण तिला पात्रांच्या मानसिकतेचा भक्कम आधार होता.
याही सिनेमात ते आहे, पण इथं सूडकथा नसून पात्रं परिस्थितीला शरण न जाता उद्भवलेल्या प्रसंगाला सामोरं जातात. जे सुचेल ते करतात. त्याचे परिणाम काय होणारेत याची पर्वा करत नाहीत. त्यामुळे उंदरा-मांजराचा खेळ शेवटपर्यंत चालू असतो. मुळात ही सर्व स्वार्थी पात्रं आहेत. त्यांचा स्वार्थ हा व्यक्तिगत स्वरूपाचा आहे. आकाशला पैसे गोळा करून लंडनला जायचं आहे, तर सिमीला हातातून जे घडलय ते निस्तरून त्यातनं सुटका करून घ्यायची आहे. पण परिस्थितीवर तिचं नियंत्रण नाही. तिच्या अपेक्षांना व संकटांना परिस्थिती कारणीभूत असल्यामुळे ती फक्त स्वतःचाच विचार करून निर्णय घेत असते. पटकथाकार-दिग्दर्शक राघवन व त्यांचे साथीदार अरिजित बिस्वास, पुजा सुरती आणि योगेश चांदेकर यांनी प्रेक्षकांना सर्व कळावं याची पूर्ण काळजी घेतली आहे. त्यामुळे कथा सरळसोट स्वरूपात समोर घडत जाते. पात्रांची संख्या वाढायला लागते. त्यांचे तात्पुरते निर्णय व त्यावरची त्यांची प्रतिक्रिया असा त्याला आकार यायला लागतो.
गुन्ह्यात अडकत जाणार्या या पात्रांकडे राघवन सहानुभूतीनं बघत नाहीत तर व्यक्ती म्हणून बघतात. त्यांच्या वासना, विकार ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत असे बघतात. पण वासना, विकारांनी पछाडलेल्या या व्यक्तिरेखा खूप खोलवरची मानसिकता दाखवतात असं दिसत नाही. ती काय करतात की, चुका घडल्यात तर त्या सुधारायच्या कशा याकडे लक्ष देतात. त्यामुळे क्रिया-प्रतिक्रिया असं त्याचं स्वरूप होतं. त्यात राघवन धक्कातंत्राचा वापर करतात. संदेह वाढवायला जागा असताना त्याचा वापर करत नाहीत. हे धक्का म्हणजे इथं रहस्य स्वरूपाचं नाही, तर पात्रांच्या प्रतिक्रियांपुरतं आहे. पात्र थोडा वेळ घेऊन उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करत नाहीत. जिवाच्या आकांतानं वागतात. यामुळे कथा सरळसोट स्वरूपात येते. तिला म्हणावी तशी खोली मिळत नाही. तशा बर्याच शक्यता यात दिसून येतात.
उदाहरणार्थ ‘सोफी’ हे पात्र या संदर्भात बघता येईल. ती आकाशच्या सहवासात येते. प्रेमात पडते. पण तिला आकाशच्या वागण्याचं काहीच वाटत नाही. तो जे दाखवतोय ते विश्वसनीय नाही, हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती रागात भरात निघून जाते. त्याचं पुढे काय झालं असेल किंवा सिमीशी त्याचे संबंध असले तरी असे अचानक का तयार झाले आहेत, हे खोलात जाऊन शहानिशा करण्याचं तिच्या मनात येत नाही. तो तिला त्याची बाजू सांगायचा प्रयत्न करतो, पण रागावलेली ती त्याला तोडून टाकते. राग शांत झाल्यावर तो जे सांगणार होता, ते कशासंदर्भात होतं म्हणून त्याला फोन करत नाही. कारण हे असं एक पात्र आहे, ज्याच्यावर आकाशच्या वागण्याचा थेट परिणाम दिसून आला असता. पटकथेतली ही शक्यता एका टप्प्यावर पटकथाकार सोडून देतात.
खुद्द अनिल धवन यांना घेऊन त्यांच्या जुन्या गाजलेल्या गाण्यांचा व सिनेमांचा संदर्भ आणून राघवन मजा आणतात. ‘प्रमोद सिन्हा’ आता काम करत नसला तरी सिमीला त्यांचे आवडते सिनेमे दाखवून स्मरणरंजनात हरखून गेले आहेत. त्यांनी छोटीसी पण महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. अमित त्रिवेदी, रफ्तार व दिनेश नाकोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपैकी ‘नैना दा क्या कसूर’, ‘आप से मिलकर’, ‘वो लडकी’ लक्षात राहतात. यातील पियानोचे तुकडे खूपच श्रवणीय आहेत. प्रमोद सिन्हाच्या घरी पहिल्यांदा आकाश जातो, तेव्हा तो जे वाजवतो त्याच्या प्रसंगातला वापर मस्तच. तसेच यासाठी आयुष्यमान खुरानानं अमेरिकेत पियानो वाजवण्याचे धडे घेतलेत म्हणे! त्यामुळे पडद्यावर तो खराखुरा वाटतो.
या सिनेमातील इतरांच्या अभिनयाबद्दल काय बोलावं! मुळात राघवन हे अभिनेते निवडताना पात्रांना न्याय देणारेच निवडतात. छाया कदमांची अतिशय छोटी पण कथेला आकार देणारी भूमिका आहे. त्या ती नेहमीप्रमाणे समरसून करतात. त्यामुळे त्यांचं असणं खटकत नाही. तोच प्रकार तब्बूपासून आयुष्यमान खुरानापर्यंत. त्यामुळे सर्वच जण भूमिकेला न्याय देतात असं म्हणणं बहुदा अतिच होईल. आपल्याला काय दाखवायचं आहे हे दिग्दर्शकाच्या डोक्यात पक्कं असेल व त्याला योग्य त्या अभिनेत्यांची साथ असेल तर उगाच यांनी-त्यांनी अभिनय चांगला केलाय वगैरे म्हणण्याला अर्थ उरत नाही.
सरतेशेवटी श्रीराम राघवनकडून एवढीच अपेक्षा होती की, पात्रांची मानसिकतेचा अजून खोलात दाखवली असती तर बरं झालं असतं!
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment