अजूनकाही
कविता महाजन यांचं अचानकपणे निधन झाल्यावर त्यांच्या लेखनावरच्या आणि व्यक्तिमत्त्वावरच्या फेसबुकवरच्या प्रतिक्रिया डोक्यात घोंघावत होत्या. कालपरवापर्यंत फेसबुकवर वावरणाऱ्या एका सर्जनशील लेखकाच्या जाण्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. दिवसभरात केव्हातरी फेसबुकवरच दिसलेला मार्गारेट अटवूड यांचा सर्जनशील लेखनावरच्या व्याख्यानाचा व्हिडिओ अर्धवट बघितला होता. त्याखाली ‘सर्जनशील लेखन असं शिकता येतं का?’ अशा प्रतिक्रिया वाचल्या होत्या. हे सगळं मनात ताजं असतानाच अलीकडेच काही देशांमध्ये प्रदर्शित झालेला ‘द वाईफ’ हा चित्रपट बघायला मिळाला. मेग वोलीत्झर यांच्या ‘द वाईफ’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची सुरुवात झाली आणि मनात कविता महाजन यांनी परिश्रमपूर्वक केलेलं लेखन, मार्गारेट अटवूड यांच्या व्याख्यानावरच्या प्रतिकिया आणि या चित्रपटाची कथा यांच्यात एक अर्थपूर्ण साखळीच तयार झाली.
ही कथाखरं तर जोन कासलमन या स्त्रीची. तिचा नवरा जो कासलमन याला साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर होण्यानं चित्रपटाला सुरुवात होते आणि त्यानंतर वर्तमान आणि भूतकाळाची सांगड घालत कथा उलगडत जाते. कलाकाराची तगमग, त्याग, परिश्रम, यश, पुरुषसत्ताक जगात स्त्री कलाकाराची होणारी घालमेल, वडील-मुलगा यांच्यातलं नातं अशा अनेक बाजूंना स्पर्श करत चित्रपट पुढं सरकतो.
१९५० चा काळ. जो कासलमन हा प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखनावरचे नेहमीचेच धडे देतोय- ‘लेखन हे आतून येतं, लेखकाच्या आत धडका मारतं, लेखनही लेखकाची गरज असते’ इत्यादि इत्यादि.... जोनही त्याची विद्यार्थी. तिनं लिहिलेल्या कथांमधल्या त्रुटी तो दाखवतो. सर्जनशील लेखन शिकवणारा हा प्राध्यापक स्वत: मात्र सामान्य लेखक असतो.
जोन त्यानंतर एका पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमाला जाते. या कार्यक्रमानंतर त्या पुस्तकाची लेखक उद्वेगानं जोनला म्हणते, “चुकूनही कधी पुस्तक लिहिण्याच्या फंदात पडू नकोस. हे शेल्फवरचं माझं पुस्तक उघड. बघ, कसा आवाज येतोय. कोऱ्या करकरीत पुस्तकाचा कर्रकर्र... आतापर्यंत कुणी त्याला हातच लावला नाहीये. हे जग पुरुषांचं आहे. इथले प्रकाशक पुरुष, वाचकही त्याच मानसिकतेचे.”
“पण लेखकानं लेखन करायलाच हवं ना?” जोननं शांतपणे विचारलेला प्रश्न.
“पण लेखकानं लिहिलेलं वाचलंही जायला हवंच,” चिडून मिळालेलं सणसणीत उत्तर.
या संवादानंतर सुरू होतो जोनचा प्रवास. त्या प्राध्यापकाशी जवळीक करण्यासाठी त्याच्या घरात काम करणं आणि त्याचा घटस्फोट झाल्यानंतर त्याच्याशी विवाह करणं. पुढं दोन मुलं होणं, त्याची पहिली कादंबरी प्रकाशित होण्यासाठी तिनं प्रयत्न करणं आणि त्यानंतर त्याच्या एकामागून एक कादंबऱ्या प्रकाशित होणं असा सगळा प्रवास आतापर्यंत होतो. वरवर सुखी कुटुंब. ती त्याच्याकडे सतत प्रेमळ नजरेनं बघणारी, त्याची काळजी घेणारी. वडील आणि मुलातले थोडे ताण आहेत, पण ते सर्वसाधारण कुटुंबासारखंच. तसं सगळं छान चाललेलं. मुलीचं बाळंतपण जवळ आलेलं. त्यात नोबेल पारितोषिक मिळाल्यावरचा आनंद.
जो कासलमन प्रत्येक पार्टीत पत्नीचे भरभरून आभार मानतो. कुणीतरी त्याला पार्टीत विचारतं, “जोन लिहिते का?’ तो थोडं थांबून उत्तर देतो, “नाही.” कॅमेरा तिच्याकडे वळतो, ती तशीच नेहमीसारखी स्थिर. ओठांवर मंद हसू. दुसरीकडे तिचं त्याच्या बारीकसारीक हालचालींवर बारकाईनं लक्ष असतं. तो गबाळा, आपल्या आजीच्या पाककृतींपलीकडे फारसं काही बोलू न शकणारा, अहंकारी, चिडचिडा, प्रत्येक वेळी तिला सावलीसारखा सोबत ठेवणारा आणि प्रसिद्धी मिळाल्यानं आत्ममग्न झालेला. ती अतिशय संयमी वागणारी, टापटीपीनं राहणारी, मोजकं बोलणारी, आत्मविश्वासानं वावरणारी आणि प्रेमळ दिसणारी. (मार्गारेट अटवूडच!)
त्यांचा मुलगा लेखन करण्यासाठी धडपडत असतो. वडील एवढे नामवंत लेखक, त्यामुळे तो साहजिकपणे त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. मुलगा तरुण पिढीचा प्रतिनिधी- कमी बोलणारा, चिडचिडा, आपल्याला महत्त्व दिलं जात नाही म्हणून दुखावलेला. वडलांना तरुण मुलाचं मन ओळखता येत नाही. याउलट जोन मुलाची तगमग जाणते, वडील-मुलातले ताण कमी व्हावे यासाठी प्रयत्न करते.
हे कुटुंब स्टोकहोमला जायला निघतं आणि तेव्हापासून त्यांच्या संबंधातले ताणेबाणे उलगडत जातात. जो कासलमनचं चरित्र लिहिण्यासाठी उत्सुक असणारा एक लेखक त्यांचा पिच्छा पुरवतो, संधी शोधून जोनला गाठतो. तिनं शिकत असताना लिहिलेली कथा विद्यापीठातल्या ग्रंथालयातून हुडकून काढल्याचं सांगतो, तिनं लेखन का सोडलं हे खोदून खोदून विचारतो. ती त्याला एका मर्यादेपलीकडे दाद देत नाही, पण तेव्हापासून तिचं मन ढवळून निघतं. हाच चरित्रकार पुढं मुलालाही गाठतो आणि तिथून चित्रपटाचं वळण बदलतं.
नवऱ्याच्या रंगेलपणाकडे दुर्लक्ष करून ध्येय गाठलं, पण आता आपल्या हाती काय लागलं? हा प्रश्न तिला छळतो. समारंभात तिला कुणीतरी विचारतं, “आपण काय करता?” ती ताठ मानेनं उत्तर देते, “I’m the kingmaker.” समोरची व्यक्ती हसत हसत म्हणते, “माझी पत्नीसुद्धा अगदी असंच म्हणत असते.” ती मात्र आतल्या आत संतापते. स्टोकहोमला आल्यापासून आपल्याला एका मोठ्या लेखकाची पत्नी म्हणून दुय्यम गणलं जातंय, हे बोचत असतंच. हॉटेलला परतताना तिच्या मनात वर्षानुवर्ष साठलेली खदखद बाहेर येते. हॉटेलच्या चार भिंतींच्या आत चार दशकांपासून धारण केलेला मुखवटा ती टराटरा फाडून मोकळी होते.
अमेरिकेला परततानाच्या प्रवासात तिच्या मागावर असलेला चरित्रकार पुन्हा तिच्याकडे येतो, तेव्हा ती त्याला निक्षून सांगते, “लक्षात ठेव, भलतंच काही लिहिलंस तर मी तुला कोर्टात खेचेन.” स्टोकहोमला जातानाच्या प्रवासात ती विमानात कोडं सोडवत बसलेली दिसते. परतीच्या प्रवासापर्यंत ती प्रेक्षकांसह सर्व पात्रांसाठी कोडं बनते. नवऱ्यासाठी, चरित्रकारासाठी, मुलांसाठी. भूतकाळातल्या एका दृश्यात ती नवऱ्याला म्हणालेली असते, “आपलीपात्र ही थोडीशी औपचारिक आहेत.” त्यावरतो उत्तरतो, “आपल्या नात्याचा शेवट होणार आहे.” चित्रपट संपल्यावर आपण सुरुवातीपासूनच्या अशा प्रसंगांना, संवादांना, तिच्या हालचालींना आठवून तिच्या वर्तनाचं कोडं नव्यानं सोडवायला लागतो. मोनालिसासारखं गूढहास्य करणाऱ्या तिच्या मुखवट्यामागच्या चेहऱ्याचा शोध घ्यायला लागतो. तरीही कलाकाराच्या अंतरंगाचा ठाव लागणं अवघडच.
ग्लेन क्लोज या अभिनेत्रीनं साकारलेली जोन बघण्यासाठी तरी हा चित्रपट बघायलाच हवा असा. या चित्रपटातल्या अप्रतिम अभिनयासाठी या वेळीतरी त्यांना ऑस्कर मिळेल, असं चाहत्यांना वाटतंय. जो कासलमनची भूमिका साकारणारे जोनाथन प्राईस हे अष्टपैलू अभिनेते. त्यांची ओळख रंगभूमीवरचे कलाकार म्हणून, विशेषत: शेक्सपिअरच्या नाटकांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जातात. त्यांनी जोचं पोकळ आणि अहंकारी व्यक्तिमत्त्व उत्तम उभं केलंय.
चित्रपटाचे दिग्दर्शक ब्योर्न रुन्ग्याहे स्वीडनचे. त्यांनी या चित्रपटाद्वारे इंग्रजी चित्रपटविश्वात दमदारपणे पदार्पण केलं आहे. मोजक्या दृश्यांमधून नोबेल पुरस्कारांची तालीम, पुरस्कारसमारंभ त्यांनी सुरेख उभं केलंय. कलाकारांच्या, विशेषतः जोनच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासाठी केलेला कॅमेऱ्याचा वापरही खासच. उत्तम पटकथा, सर्वच कलाकारांचा सुरेखअभिनय, मोजक्या प्रतिमांचा वापर यामुळे हा चित्रपट बघणं हा छान अनुभव ठरतो.
वर सुखाचा पापुद्रा असलेल्या नातेसंबंधांमध्ये काय ताण असतो, हे दाखवतानाच हा चित्रपट कलाकाराच्या वरवर स्थिर दिसणाऱ्या मनाच्या डोहात वेगळेच काहीतरी दडलेले असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
.............................................................................................................................................
लेखिका विशाखा पाटील प्राध्यापक व ग्रंथसंपादक आहेत.
pvishakha@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment