अजूनकाही
लातूरमध्ये कापड लाईनला एका कपड्याच्या दुकानासमोर एक मुस्लिम आजोबा शिवणयंत्रावर पँट्स अल्टर करून देणं किंवा तत्सम कामं करतात. मी कितीदा तरी माझ्या जीन्सची लांबी त्यांच्याकडून कमी करून घेतलीय. त्यांचं स्वतःचं दुकान नाही. त्यांच्यासारखेच इतर शिंपी कापड लाईनमध्ये दिसतात. त्यांचंही स्वतःचं दुकान नाही. कपड्याच्या दुकानाबाहेर एका मशीनवर त्यांची गुजराण होते. महिन्याची दोन टोकं सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकीनऊ येत असणार. ‘सुई-धागा’मध्ये सुरुवातीला एके ठिकाणी मौजी स्वतःची मशीन घेऊन बसतो, त्यावेळी मला यांची आठवण येत होती. फरक एवढाच आहे मौजी एक स्वप्न बघतो, जे पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड चालू असते. लातूरमधले ते शिंपी मात्र आहे तिथेच आहेत. त्यांनी ही फिल्म बघितली तर त्यांना मौजीकडून नक्कीच प्रेरणा मिळेल, हेच शरत कटारीयांना अपेक्षित असावं.
उत्तर प्रदेशच्या एका छोट्या शहरात राहणारा मौजी (वरुण धवन) एका शिवणयंत्र विक्रेत्याच्या दुकानात कामावर आहे. दररोज आपल्या घरून निघून रेल्वेचा प्रवास करून तो दुकान उघडण्यासाठी पोचत असतो. त्याची बायको ममता (अनुष्का शर्मा) ही आदर्श सून आहे. तरी तिला नवर्याची काळजी आहे. मौजीचे वडील (रघुवीर यादव) एका सरकारी विभागात कामाला असतात. सतत मौजीवर तोंडसुख घेणारे. त्याचा भाऊ जास्त शिकलेला, नोकरी करणारा, पत्नीसहित वेगळं राहणारा. त्यातच ममता मौजीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मौजीला अपमानित होताना बघते. तिला ते आवडत नाही. ती तसं त्याला बोलते, तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. दुसर्या दिवशी दुकानात नेहमीसारखं अपमानित विनोद करणार्या मालकाच्या मुलाला तो बुकलून काढतो. परिणाम, नोकरी गमावतो. तसाच घरी येतो, तेव्हा वडिलांच्या निवृत्तीची छोटेखानी पार्टी चालू असते. वडील डोक्यावर हात मारून घेतात, तर आईला दवाखान्यात ठेवायला लागतं. त्याच वेळी मौजी ठरवतो, स्वतःची मशीन घेऊन काम चालू करायचं.
शरत कटारिया लिखित-दिग्दर्शित सिनेमात सर्वांत चांगली, जमलेली गोष्ट म्हणजे पहिला भाग. छोट्या शहरातलं निम्न मध्यमवर्गीय कुटुंब, त्यांच्या अडचणी, त्यांची स्वप्नं, ते राहत असलेलं छोटंसं गाव, तिथल्या नोकरी\व्यवसायाच्या मर्यादा, घर, गल्ल्या वगैरे गोष्टी इतक्या तपशिलात उभं करतात की, एक क्षण वाटतं यांनी हे सर्व लिहिलेलं नसणार तर कॅमेरा घेतला अन निघाले चित्रण करत... इतकं ते खरं, वास्तववादी वाटतं. त्याला उत्तम संवादांची व निर्मितीमूल्याची जोड दिलीय. त्यामुळे मौजी व ममताचा संघर्ष इतका खरा वाटतो की, जणू आपण एखाद्या लघुकथेचं पडद्यावरील रूपांतरच बघतोय! याच्या उलट मध्यंतरानंतर सिनेमा थोडा संथ होतो, तो त्याला गाठावयाच्या उद्देशासाठी. हा संथपणा पहिल्या भागाच्या तुलनेत कळण्यासारखा आहे, कारण मौजी व ममताला जे करायचं आहे, ते ते कसं करतात याचं चित्रण अविश्वसनीय तरीही कथेला न्याय देणारं आहे.
ही कथा एक निश्चित उत्तर देणारी असली तरी त्या उत्तरामागे मौजी-ममताच्या मेहनतीची जोड आहे. ही मेहनत ते करतात, कारण त्यांना आत्मविश्वास परत मिळवायचा असतो. स्वावलंबी व्हायचं असतं. दुसरं कारण निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात कमी शिक्षण झालेला मुलगा हा कधीच आपल्याला चांगले दिवस दाखवू शकत याची आई-वडिलांना खात्री असते. विशेष म्हणजे त्यांचा एक मुलगा चांगली नोकरी, पगार असून सुनेसोबत वेगळं राहत असतो, याचं वैषम्य वाटत असल्यामुळे असेल. ते एका मुलानं आपलं न ऐकता सुनेच्या कह्यात जाणं पटलं नसणार, पण तिच्या फटकळ तोंडाला बंद करता येत नाही म्हटल्यावर ते मौजीच्या मागे लागतात. तोही दहावी पास न झालेला, दुनियादारी न कळणारा, कसंतरी नोकरी करत त्याच्याकडे असणार्या कौशल्याला दाबून ठेवणारा असतो. त्यांच्या आजोबांनी सुई-दोरा हातात घेऊन त्याच्या वडिलांचं बालपण हालअपेष्टांनी पुरतं खराब केलेलं असतं. तो गादीचा वारसा परत चालवायला लागू नये म्हणून त्यांनी नोकरी केलेली असते. मौजी नेमकं तेच करतो हे त्यांना आवडत नसतं. या सर्व कारणांमुळे त्यांच्यात व मौजीत विस्तव जात नसतो.
शरत कटारियांचं लहान शहर, गावातल्या लोकांचं आयुष्य कसं आहे याचं सूक्ष्म ज्ञान आहे. त्यामुळे ते तपशिलात पात्रं उभी करतात. त्यासाठी वास्तव वाटेल असे घटना, प्रसंग उभे करतात. तसेच विद्यमान सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत वस्त्रोद्योगामध्ये लहान शहर, तालुके व खेडेगावात जे कारागीर, हातमागावर जगणारे लोक आहेत, तसेच ज्यांच्याकडे शिवणकलेचं कौशल्य त्यांना स्वतःचा उद्योग उभारणीसाठी मदत करून देणं आणि ते उभं राहिल्यावर बाजारपेठ उपलब्ध करून देणं अशी योजना आहे. त्याच योजनेचा पुसटसाही उल्लेख न करता पटकथेत त्याला गुंफतात. त्यामुळे सिनेमा प्रचारकी राहत नाही. उलट मौजी व त्याच्या कुटुंबियांमध्ये ते इतके खोलात शिरतात की, हा सिनेमा अशा कुठल्या योजनेला डोळ्यासमोर ठेवून लिहिलाय असं वाटतच नाही. तेच कटारियांचं कौशल्य आहे.
अशा या सिनेमात मध्यंतरानंतरचा भाग जरा अजून संघर्षमय झाला असता तर बरं झालं असतं असं वाटतं. कारण वास्तवात यशस्वी किंवा दखलपात्र होण्यासाठी खूप मेहनत व संयम ठेवावा लागतो. तसंच पहिल्याच फटक्यात यश मिळेल याची खात्री नसते. असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतं. अपयशी व्हावं लागतं. चटकन सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. याचा अर्थ आयुष्य खूप आणि खूपच खडतर आहे, लोकांचं आयुष्य गेलं तरी ते यशस्वी होत नाही, हे जसंच्या तसं दाखवावं असं नाही. तर निदान कथानकापुरता तरी संघर्ष, अडचणी अजून हव्या होत्या इतकंच वाटतं.
आनंद राय, शरत कटारिया व शशांक खैतान हे तिघेजण भारतातल्या लहान खेडेगावात, छोट्या शहरात घडणार्या कथा मांडतात ते कौतुकास्पद आहे. तसेच वरुण धवन, अनुष्का शर्मासारखे शहरी वातावरणात वाढलेले अभिनेते त्यांचा शहरीपणा सोडून पटकथेला न्याय द्यायचा प्रयत्न करतात, हे नेहमीच्या मुंबई केंद्रीत कथानकांना छेद देणारं आहे. अशा छोट्या शहर-खेडेगावात कथा घडत असल्यामुळे आपोआप त्याला तिथला पोत मिळतो. ती वास्तववादी वाटायला लागते. प्रेक्षक चटकन त्यांच्याशी समरस होतो. दुसर्या बाजूनं हिंदी व्यावसायिक सिनेमाचे तेच तेच पोत बघण्याची सवय लागलेल्या प्रेक्षकांना आपलीच कथा पडद्यावर मांडलीय असं वाटतं. हीच या तिघांच्या सिनेमाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आशा करूयात ते यापासून फारकत घेणार नाहीत.
वरुण ग्रोवरच्या शब्दांना अनू मलिकनी इतक्या छान चाली बांधल्यात की, त्या ऐकल्याशिवाय राहवत नाही. प्रत्यक्ष पडद्यावर अभिनेते गात नसले तरी त्यांचं पार्श्वभूमीला वाजणं खटकत नाही. ही गाणी कथेचाच भाग वाटतात. ज्येष्ठ छायांकनकार अशोक मेहतांच्या कॅमेरा मौजीच्या कुटुंबाच्या छोट्या छोट्या गोष्टी अप्रतिमपणे चित्रित करतो, तसेच तो मौजीचं राहतं गाव, खोल्या, गल्ल्या खूप सुंदरपणे पडद्यावर पेश करतो. सर्व अभिनेत्यांचा एकाच पातळीवरचा अभिनय ही जमेची तसेच एकजिनसीपणाची बाजू. त्यातही याची मेरूमणी आहे अनुष्का शर्मा. लहान शहरात राहणारी, परिस्थितीची प्रचंड जाण असणारी, गरीब घरातून आल्यामुळे संघर्ष केल्याशिवाय आत्मविश्वास, मोठेपणा मिळवता येत नाही याची पक्की जाणीव असणारी, कुटुंबातली धाकटी सून तिनं मूर्तीमंत उभी केलीय. मागच्याच आठवड्यात नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘मंटो’ बघितला असेल, आता अनुष्काची ‘ममता’ बघावी. भूमिका जगणं वगैरे म्हणतात तसा प्रकार तिनं इथं केलाय. तिला यापुढे अशाच उत्तमोत्तम भूमिका मिळाव्यात, ही अपेक्षा.
लातूरमधले किंवा कुठल्याही अशा शहरातले शिंपी जसे मेहनत करून पोटाची गुजराण करतात, तसंच तिथंच ‘मौजी-ममता’ कुठेतरी मेहनत करत असतीलच. त्यांनीही हा सिनेमा बघावा व प्रेरणा घ्यावी. इतरांनीही चुकवू नये.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment