अजूनकाही
प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांची आज जयंती. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीचा हा लेख...
.............................................................................................................................................
देव आनंदबद्दल नेहमी सांगितलं जाई की, ‘त्यांचे सिनेमे नेहमी काळाच्या पुढे असतात.’ ‘बाजी’, ‘जिद्दी’, ‘गाइड’, ‘प्रेम पुजारी’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘हम दोनो’ अशा अनेक चित्रपटांतून देव आनंदनी काळाच्या पुढचा विचार मांडला आहे. ‘गाइड’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘हम दोनो’ हे देव आनंद यांचे आवडते सिनेमे होते.
१९६५ साली त्यांनी ‘गाइड’सारखा ‘बोल्ड’ सिनेमा बनवला, जो काळाच्या खूप पुढे होता. १९५१ सालचा ‘बाजी’ एका शहरी पार्श्वभूमीवरील क्राइम थ्रिलर होता. १९७१ सालच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील ड्रग्सचा विळखा, हिप्पी कल्चर, नातेसंबध असो वा १९६७च्या ‘ज्वेल थीफ’मधील चतुर चोर… त्याचबरोबर ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘काला पानी’, ‘गॅम्बलर’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘हीरा पन्ना’ हे सर्वच सिनेमे काळाच्या पुढे होते.
देव आनंद यांच्याबद्दल दोन गोष्टी सर्वांत जास्त चर्चिल्या जात असत. एक म्हणजे ‘गाइड’ सिनेमा आणि दुसरी म्हणजे त्यांची प्रेमप्रकरणं. २००७ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमॅन्सिंग विथ लाईफ’ या आत्मकथेमध्ये त्यांनी या दोन्हींवर भरभरून लिहिलं आहे. लंडनमध्ये एका सोहळ्यात या पुस्तकाचं लोकार्पण झालं होतं. यानंतर भारतात तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते दिल्लीत ‘रोमॅन्सिंग विथ लाईफ’चा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देव आनंद यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. ते असं, ‘जे आपल्या आयुष्याबद्दल सत्य घटना प्रामाणिकपणे लिहू शकतात, त्यांनीच आत्मकथा लिहाव्यात. आत्मस्तृती आणि खोटे बोलणाऱ्यांनी आत्मकथा लिहिण्याची गरज नाही.’
देव आनंद यांची ही आत्मकथा बरीच गाजली. काही दिवसांतच ती बेस्ट सेलर ठरली. गेल्या वर्षी नवाजुद्दीन सिद्धिकीनं आपल्या ‘अॅन ऑर्डनरी लाईफ’ या आत्मकथेत मैत्रिणीचं नाव छापल्यानं वाद झाला होता. त्या वेळी मला देव आनंद यांचं वरील विधान वारंवार आठवत होतं. अखेर वाढत्या वादाला कंटाळून नवाजनं ही आत्मकथा मागे घेतली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मंटो’च्या प्रमोशनच्या वेळी त्यानं म्हटलंय, ‘आत्मकथेत अजून वादग्रस्त सत्य लिहीन, पण यावेळी कुणाचंही नाव छापणार नाही.’
देव आनंद यांनी अनेक वेळा कबुली दिली की, मला ‘गाइड’बद्दल वारंवार बोलायला आवडतं. काही वर्षांपूर्वी (२०००चा काळ असावा) दूरदर्शनवर ‘गाईड’ प्रथमच दाखवण्यात येत होता. सिनेमा सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या प्रतिक्रिया डीडीनं दाखवल्या. त्यात देव ‘गाइड’बद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘ ‘गाइड’ला कुणीही वितरक मिळत नव्हता. या सिनेमासाठी दागिने, स्थावर मालमत्ता विकून पैसा लावला होता. सिनेमाच्या निर्मितीमुळे कर्जबाजारी झालो होतो. मी हवालदिल झालो. काय करावं सुचेना. अशी बोल्ड फिल्म बॉक्स ऑफिसवर टिकणार नाही. आम्ही आमचं नुकसान करणार नाही, अशी भूमिका सर्वच वितरकांनी घेतली होती. अखेर एकजण काही शो दाखवण्यासाठी तयार झाला. कसाबसा शो झाला. सिनेमा बघून लोकं कथानकाच्या प्रेमात पडले. मला हायसं वाटलं. हळूहळू वितरकानं शो वाढवले.’
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
...............................................................................................................................................................
प्रत्येक मुलाखतीमध्ये देव आनंद यांचा मुख्य विषय ‘गाइड’च असायचा. मी त्यांच्या कितीतरी मुलाखती पाहिल्या-वाचल्या आहेत. त्या सगळ्यांमध्ये हेच दिसतं. १९६६साली प्रदर्शित झालेल्या ‘गाइड’नं पाच फिल्मफेअर अवार्ड पटकावून नवा उच्चांक बनवला होता. इतकंच नव्हे तर तो भारताकडून ‘ऑस्कर’साठी नामांकित झाला होता. जगभरात झालेल्या, होत असलेल्या विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आजही ‘गाइड’ नियमित दाखवला जातो. असा मान मिळवणारा हा एकमेव सिनेमा असावा.
केसांचा टोपदार झुपका, सतत हलणारी मान, काळी पॅण्ट पांढरा शर्ट-कोट आणि संवाद फेकीची विशिष्ट शैली, अशी देव आनंदची छबी अनेक सिनेमांतून आपण पाहिली आहे. असं सांगितलं जातं की, रुबाबदार वेशात ते ज्या वेळी बाहेर पडत, त्या वेळी अनेक तरुणींना मूर्च्छा येत. कालांतरानं पांढरा शर्ट, कोट काळी पॅण्ट अशा वेशात त्यांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. कारण अनेक मुलींनी देव आनंद यांना त्या रूपात पाहून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या.
२६ सप्टेंबर १९२३ साली तत्कालिन अखंड पंजाबच्या गुरदासपूरमध्ये जन्मलेल्या देव आनंद यांना नऊ भाऊ-बहीण होते. देव आनंद यांचे वडील- किशोरीमल एक वकील होते. इंग्रजी साहित्यात एम.ए. असलेल्या देव आनंद यांनी १९४६ साली ‘हम एक हैं’मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण त्यांना यश १९४८ साली आलेल्या ‘जिद्दी’ सिनेमातून मिळालं. बॉम्बे टॉकीजचा हा सिनेमा इस्मत चुगताईंच्या कथेवर आधारित होता. या चित्रपटानंतर देव आनंद यांनी आपल्या मोठ्या भाऊ चेतन आनंदसोबत मिळून ‘नवकेतन फिल्म्स’ची स्थापना केली. १९५० साली आलेला ‘अफसर’ नवकेतन बॅनरची पहिली निर्मिती. हा सिनेमा साधारण ठरला. पण १९५१ साली आलेल्या ‘बाजी’नं मात्र मोठं यश मिळवलं. गुरुदत्तचं दिग्दर्शन आणि देव आनंद यांचा अभिनय असा सुरेख संगम दर्शकांनी हातोहात उचलून धरला. हा थ्रिलर सिनेमा सुपरहिट ठरला.
‘बाजी’नंतर एकाहून एक असे अनेक सरस सिनेमे नवकेतननं दिले. १९८० पर्यंत चेतन आनंद, देव आनंद आणि विजय आनंद हे त्रिकूट सिनेसृष्टीची शान समजली जात होती.
‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘फंटुश’, ‘कालापानी’, ‘तेरे घर के सामने’, ‘तेरे मेरे सपने’, ‘हिरा-पन्ना’, ‘इश्क इश्क इशक’, ‘अव्वल नंबर’, ‘गॅम्बलर’, ‘सेन्सॉर’पासून ते शेवटचा २०११ साली आलेला ‘चार्जशिट’ अशा कितीतरी सिनेमांची निर्मिती देव आनंद यांनी केली. नवकेतन व्यतिरिक्त इतर बॅनरखालीही त्यांनी काम केलं. जवळजवळ १०० सिनेमांमधून देव आनंदनी अभिनय केला आहे. १९९० पासून त्यांच्या अनेक चित्रपटांना यश मिळत नव्हतं. ‘एकापाठोपाठ सतत दर्जाहीन सिनेमे बनवतो’ म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली होती. पण त्यांनी सिनेनिर्मिती थांबवली नाही. ‘थांबणं माझ्या स्वभावात नाही’ असं ते म्हणायचे. ४ डिसेंबर २०११ साली त्यांचं लंडनमध्ये निधन झालं. त्या वेळी ते रूटीन चेकअपसाठी गेले होते. नसिरूद्दीन शाह अभिनित ‘चार्जशिट’ची निर्मिती त्या वेळी ते करत होते.
नेहमी प्रसन्न आणि उत्साहित राहणारे देव आनंद आपल्या सुखासीन जगण्यासाठी प्रसिद्ध होते. ‘मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुँए में उड़ाता चला गया’ हे एक गाणं नसून देव आनंद यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान होतं. ते मल्टिस्टार आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व होतं. ते अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखनही करत. संगीत आणि फिल्म मेंकिगची त्यांना चांगली समज आणि जाण होती.
त्यांच्या प्रेमप्रकरणांचे अनेक किस्से बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी या प्रेमसंबंधांना कधीही नाकारलं नाही. आपल्या रोमँटिक आयुष्याबद्दल देव आनंद भरभरून बोलत. अभिनेत्री सुरैय्यासोबत त्यांनी सहा चित्रपटांमध्ये काम केलं. एकदा देव आनंद यांनी शूटिंग सुरू असताना सुरैया यांना पाण्यात बुडण्यापासून वाचवलं, तेव्हापासून सुरैय्या देव आनंद यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या. परंतु त्यांच्या आज्जीला देव आवडत नव्हते. त्यामुळे दोघांचं मीलन होऊ शकलं नाही.
देव आनंदनं एका सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी कल्पना कार्तिकशी अचानक विवाह केला. या धक्क्यातून सुरैया सावरू शकल्या नाहीत. परिणामी त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. एका मुलाखतीत देव आनंद यांनी कबुली दिली होती की, सुरैय्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. सुरैय्यानंतर अनेक अभिनेत्रीशी देव आनंद यांचं नाव जोडलं गेलं. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणतात, ‘मी संपूर्ण आयुष्य विचारासोबत रोमान्स केला आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या हिरोइनसोबत मी रोमान्स केला आहे. जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा तुम्हाला कुणाशी तरी प्रेम करावं लागतं, नसता तुम्ही ते काम कसं करू शकाल?’
२०११ साली ‘हम दोनो’ सिनेमा कृष्णधवलचा रंगीत झाला. २००७ सालीच देव आनंदनी ‘हम दोनो’च्या रंगीत आवृत्तीची घोषणा केली होती. चार वर्षांत हा सिनेमा रंगीत झाला. फेब्रुवारी २०११ला औरंगाबादला असताना बोटावर मोजण्यइतक्या प्रेक्षकांत बसून मी हा सिनेमा पाहिला होता. बाहेर पडणारी मंडळी देवला पाहून नाक मुरडत होती, त्यांना मुन्नीला बदनाम करणारा सिनेमा हवा होता. त्यामुळे जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या सुपरस्टार देव आनंदला त्यांनी नाकारलं होतं. ४० वर्षांचा हा टप्पा देव आनंदला वेदना देऊन गेला. हा चित्रपट आपलं निर्मितीमूल्यदेखील वसूल करू शकला नाही.
देव आनंद नेहमी स्वत:ला तरुण म्हणवून घेत. २००७ साली आत्मकथेच्या प्रकाशनावेळी लंडनमध्ये काही जणांनी त्यांना त्यांचं वय विचारलं. त्या वेळी ते एकाला म्हणाले, ‘मी १८ वर्षांचा आहे’, दुसऱ्याला सांगितलं, ‘मी १०० वर्षांचा आहे’; तर तिसऱ्याला म्हणाले, ‘मी एजलेस आहे. वयाच्या सीमेच्या पलीकडचा मी आहे’. देव आनंद चिरतरुण व्यक्तिमत्त्व होतं. वयाच्या ८८व्या वर्षांतही ते तेवढ्याच उत्साहानं दिग्दर्शन, निर्मितीमध्ये रमत असत.
२००६ साली अतिथी संपादक म्हणून बीबीसीला लिहिलेल्या एका लेखात ते म्हणतात, ‘सुंदरता वस्तूंमध्ये नाही तर बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर सुंदरता अवलंबून असते. तुमच्या डोळ्यांवर आहे, की कोण आणि काय सुंदर वाटेल. मला ज्या वेळी एका सुंदर मुलीला घेऊन सिनेमा बनवायचा आहे, त्यावेळी मी एका जेमतेम व कुरूप दिसणाऱ्या मुलीला घेऊन सिनेमा बनवेन आणि ती पडद्यावर सर्वांत जास्त सुंदर दिसेन. ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या वेळी झिनत अमानला घेऊन मी हा प्रयोग करून दाखवला.’
देव आनंद सतत नवनव्या प्रयोगासाठी प्रसिद्ध होते. सिनेमात नवे विषय हाताळणं, नव्या तारकांना संधी देणं, सिनेमाचे वेगवेगळे फॉर्म त्यांनी वापरले. ‘गाइड’, ‘प्रेम पुजारी’, ‘ज्वेल थीफ’, ‘लॉकेट’, ‘लव्ह अॅट टाईम्स स्क्वेअर’ या सिनेमांत विविधरंगी छटा त्यांनी भरल्या होत्या.
असाच एक प्रयोग त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करून केला. देव आनंद आणीबाणीत इंदिरा गांधींचे कट्टर विरोधक झाले होते. जनता पक्षाला त्यांनी पाठिंबा देऊ केला, पण जनता पक्षाचं सरकार फार दिवस टिकलं नाही. यामुळे देव आनंद संजय गांधींच्या निशान्यावर आले. कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही, असं ठरवून त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला.
१९७९ साली ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ (NPI) नावाच्या राजकीय पक्षाची उभारणी केली. ‘रोमॅन्सिग विथ लाईफ’मध्ये राजकीय पक्षाच्या उभारणीवर काही पानं त्यांनी खर्ची केली आहेत. संजीव कुमार, एफसी मेहरा आणि जीपी सिप्पी असा दिग्गज मंडळींना घेऊन त्यांनी हा पक्ष उभारला होता. या पक्षाची पहिली जाहीर सभा दादरच्या शिवाजी पार्कमध्ये झाली होती. हा असा पहिलाच प्रयोग होता, जिथं सर्वच सिनेसृष्टीतील महत्त्वाची नावं एकत्र येऊन देशातील राजकारणावर भाष्य करत होती. त्यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कवर मोठा जनसमुदाय जमा झाला होता. पक्षाचा उद्देश होता की, लोकसभेच्या चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणं, पण योग्य उमेदवार मिळाला नसल्यानं देव आनंदनी आपला राजकीय पक्ष बरखास्त केला.
आपल्या ७० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत देव आनंद यांनी अनेक दर्जेदार सिनेमे केले. अनेक पात्रांत त्यांनी जीव ओतून अभिनय केला. प्रत्येक वयोगटात त्यांचे लाखो चाहते होते. त्यांच्या फिल्मी योगदानाबद्दल २००१ मध्ये त्यांचा पद्मभूषण आणि २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अशा हरहुन्नरी, जवादिल नायक अभिनेत्याला एका चाहत्याची स्मृतिवंदना.
.............................................................................................................................................
लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
kalimazim2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment