अजूनकाही
‘मनमर्जियाँ’ पाहून झाल्यावर ‘There’s nothing more devastating than love’ केवळ हे एकच वाक्य मनात रेंगाळतं. कारण प्रेमाहून अधिक विध्वंसक गोष्ट शोधूनही सापडणार नाही. मात्र हा काही केवळ इथंच संपेल असा विषय नाही. कारण प्रेम ही केवळ एक-दोन वाक्यांतून स्पष्ट होईल अशी गोष्ट नाही. प्रेम हे खूप गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्यामुळे एकीकडे भयंकररीत्या चुकीच्या दिशेनं गेलेल्या प्रेमाहून विनाशकारी गोष्ट नाही, तर दुसरीकडे हेच प्रेम योग्य दिशेनं गेल्यास त्याहून अधिक समाधानकारी, स्वर्गीय काही नाही. याकडे अधिक रोमँटिक चष्म्यातून पाहायचं झाल्यास ‘प्रेम चुकीचं कसं असू शकेल? माणसं चुकीची असू शकतात’ असं म्हणता येईल. अगदी सौम्यपणे मांडायचं झाल्यास वेळ चुकीची असते, निर्णय चुकीचे असतात.
‘मनमर्जियाँ’ साधारण याच सर्व संकल्पना अधिक विस्तृत आणि तरल पद्धतीनं समोर आणतो. तो आपल्यासमोर काही पात्रं आणतो आणि त्यांच्या कृतींच्या परिणामांना समोर आणत या गोष्टी उलगडत जातो. वरवर पाहता ही पात्रं, त्यांचे निर्णय चुकीचे भासू शकतात. किंबहुना चुकीच्या भासण्यापेक्षा ती अतर्क्य वाटू शकतात. मात्र त्यांना समजून घेण्यासाठी या वरवरच्या भौतिक गोष्टी, बऱ्या-वाईटाच्या ऐहिक संकल्पनांच्या पल्याड जावं लागतं. ज्याची तयारी दिग्दर्शक-लेखक द्वयीनं सद्य काळातील काही उत्तम कलाकारांच्या सोबतीनं केली असली तरी या एरवी अतर्क्य भासणाऱ्या पात्रांना समजून घेण्याची प्रेक्षकांची तयारी आहे की, नाही हा दृष्टिकोनाचा भाग आहे.
रुमी (तापसी पन्नू) ही पूर्वाश्रमीची हॉकीची खेळाडू. ती काही रूढ अर्थानं मुख्य प्रवाहातील टिपिकल बॉलिवुड चित्रपटातील नायिका नाही. मुळात कश्यपकडून तशा पात्रांची अपेक्षा तरी का असेल म्हणा! असो. अनाथ असणं इतकाच काय तो तिचा उच्चतम टिपिकल गुणधर्म. ती जशी आहे तशी आहे. त्यात ती ‘लोग क्या कहेंगे’ म्हणत बदल करवून घेणार नाही, हेही स्पष्ट आहे.
विकी संधू (विकी कौशल) हा तिचा प्रियकर. तो डीजे असतो. त्याव्यतिरिक्त काहीच करत नसल्यानं आयुष्यात स्थिरस्थावर नाही. मात्र तो रुमीवर जीवापाड प्रेम करतो. हे दोघं म्हणजे लैला-मजनू, सोनी-महिवाल आदि प्रसिद्ध युगुलांचे आद्य अवतारच मानायला हवेत. दोघांमध्ये आयडेंटिकेल ट्रेट्स आहेत. ज्या त्यांच्या अव्यावहारिक, अस्ताव्यस्त, मात्र सोबतच लहरी व्यवहाराचा, स्वभावाचा पाया आहेत. पण हे दोघं व्यावहारिक जगासाठी अतर्क्य आहेत. दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं तरी त्यांचं हे प्रेम दोघांसाठीही विध्वंसक आहे. पण त्याची पर्वा करतील ते रुमी-विकी कसले! ते तर एकमेकांसाठी ‘बॉनी अँड क्लाइड’ आहेत. अभेद्य, अविभाज्य, जणू एकमेकांशी अनंत काळापासून ओळख असलेले, त्यांच्या नजरेतून मूर्ख भासणाऱ्या जगाहून निराळे आणि भौतिक मर्यादांच्या पार जाऊन पोचलेले.
या दोघांचं प्रेम वगैरे गोष्टी, त्यांच्या एकत्र असण्याची ओढ आणि गरज या बाबी मान्य असल्या तरी ते दोघेही एकाच वेळी एकमेकांसाठी बनलेले आणि एकमेकांसाठी घातक ठरणारे. रुमी त्यातल्या त्यात काहीशी समंजस, भावनिक-व्यावहारिकदृष्ट्या मॅच्युअर म्हणता येईल. याउलट विकी व्यवहारशून्य, बेजबाबदार असतो. शिवाय रुमीच्या कुटुंबानं आपलं प्रेम स्वीकारायचं ठरवल्यावरही स्वतःच्या जबाबदारी टाळण्याच्या, तीपासून दूर पाळण्याच्या स्वभावामुळे लग्नास नकार देणारा. या दोघांचं एकत्र असणं हे त्यांचं सामर्थ्यही आहे आणि दुर्बलताही. मात्र एकमेकांपासून दूर असणंही त्यांना व्हल्नरेबल बनवतं. म्हणूनच प्रेम ही अतर्क्य गोष्ट आहे. ‘कारवाँ’मध्ये शौकत म्हणतो तसा ‘लोगों को हक जमाना आता हैं, रिश्ता निभाना नहीं’ यातलाच प्रकार.
तर रुमी-विकीच्या या ‘फक्ड अप’ कथेत अगदी सुरुवातीलाच राजबीर भाटिया ऊर्फ रॉबीचा (अभिषेक बच्चन) प्रवेश होतो. विकीच्या लग्न करण्या-न करण्याच्या निर्णयाबाबत उड्या मारत राहण्याच्या स्वभावाला कंटाळून रुमी अॅरेंज मॅरेजसाठी स्थळं पाहण्यास होकार देते. तेव्हा तिला आलेलं पहिलं स्थळ म्हणजे रॉबी. हा सर्वांगानं विकीच्या अगदी उलट असतो. शांत, आयुष्यात स्थिरावलेला, लंडनस्थित बँकर. या गोष्टींहून महत्त्वाचं म्हणजे तो पाहताक्षणी रुमीच्या प्रेमात पडतो. विकी करत असेल तितकंच प्रेम तोही तिच्यावर करतो. एकूणच तिन्ही पात्रांचा मानसिक, भावनिक पातळीवर भडका उडालेला असतो. प्रत्येक जण या ना त्या द्वंद्वात असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात उलथापालथ होत असतो. प्रत्येक जण स्वैरपणे आपल्या समस्या सोडवत, स्वतःचंच म्हणणं खरं ठरवत काही ना काही कृती करतो.
ही तीन मध्यवर्ती पात्रं वगळता इतर प्रत्येक जण चकित होतो, या अव्यवहारी निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे हादरतो. But what do they know about love! या सगळ्या गोष्टी त्यांच्या पल्याड आहेत. कारण याच ‘मनमर्जियाँ’ आहेत.
विकी कौशल हे साधारण तीनेक वर्षांपूर्वी बॉलिवुडला गवसलेलं रत्न आहे. या वर्षी त्याच्या पूर्ण शक्तीनिशी उपयोगात आणलं जात आहे. त्यानं वर्षाच्या सुरुवातीच्या नेटफ्लिक्स फिल्मपासून सुरुवात करत, आता ‘मनमर्जियाँ’च्या निमित्तानं आणखी एक वेगळ्या बाजाचा परफॉर्मन्स दिला आहे. रुमीपासून दूर गेल्यावर आपण तिच्याशिवाय राहूच शकत नाही, याचं आत्मभान होत असताना त्यानं समोर आणलेली व्हल्नरेबलिटी असो किंवा कधी ‘साले आशिकों की जान लेगा तू’ म्हणत व्यक्त होत, तर इतर वेळी फक्त चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांचा वापर करत अव्यक्तपणे भूमिकेला दिलेलं मूर्त स्वरूप एक अभिनेता म्हणून त्याच्या क्षमतेचं सार्थ दर्शन आहे. पन्नूही रुमीसारख्या बऱ्याच कॉम्प्लेक्स पात्राला सहजतेनं समोर आणते. तर बच्चनही रॉबीच्या निमित्तानं बॉलिवुड चित्रपटातील आणखी एक ‘अल्टिमेट नाइस गाय’ प्रदान करतो. (असंच आणखी एक प्रातिनिधिक पात्र म्हणजे ‘तनू वेड्स मनू’मधील मनू.) रुमी तर त्याला मजेत ‘रामजी’ म्हणूनही संबोधते.
वरवर पाहता दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या डार्क शैलीच्या आणि त्याच्या फिल्मोग्राफीमधील डार्क विश्वात ‘मनमर्जियाँ’ काही प्रमाणात मिसफिट वाटू शकतो. पण इतकी विरोधाभासी आणि आत्मघातकी पात्रं एखाद्या गँगस्टर चित्रपटातही फिट बसणार नाहीत. शिवाय या चित्रपटाच्या उत्तरार्धात जितका खिळवून ठेवणारा अजब, विस्मयकारी थ्रिल अनुभवता येतो, तोही क्राइम जॉन्रमधील चित्रपटाहून अधिक परिणामकारक आहे. कनिका ढिल्लनची कथा, पटकथा आणि संवाद सर्व काही त्याच्या उणीवांसहित पदरात घ्यावं असं आहे.
सिल्वेस्टर फॉन्सेकाची सिनेमॅटोग्राफी चित्रपटाच्या लूकला साथ देणारी आहे. अमित त्रिवेदीच्या साऊंडट्रॅकविषयी बोलल्याशिवाय ‘मनमर्जियाँ’ची चर्चा करण्यात अर्थ नाही. बहुधा ‘गँग्स ऑफ वासेपुर’नंतर पहिल्यांदाच कश्यपच्या चित्रपटातील प्रत्येक गाणं अगदी परफेक्ट झालं आहे. ‘मुक्काबाज’मधील गाणीही काहीशी खटकणारी होती. मात्र इथं पात्रांच्या भावनिक कल्लोळापासून ते आनंदात सर्वत्र साथ देणारी ही गाणी कुठेही खटकत नाहीत. उलट ती त्यांच्या बोलांच्या जोरावर तळापासून ढवळून काढतात. ती पात्रांशी आणि परिणामी प्रेक्षकांशी एकरूप होतात.
‘मनमर्जियाँ’ कश्यपचा प्रेमाकडे पाहण्याचा सर्वाधिक रिअॅलिस्टिक म्हणावा असा दृष्टिकोन आहे. तो समजून घ्यायला त्याच्या पात्रांना समजून घ्यावं लागेल. जे त्या पात्रांइतकंच क्लिष्ट असेल. पण तो प्रवास अनुभवावा असा आहे इतकं मात्र नक्की. बाकी गुलज़ार ‘बायोस्कोप’ या मराठी चित्रपटाबाबत म्हणतात तसं ‘इस नयी रवायत का स्वागत हैं ’ म्हणत, टिपिकल बॉलिवुड प्रकाराहून काहीशा वेगळ्या अंदाजात लव्ह ट्रँगलकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनाचं कौतुक करायला हवं.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment