अजूनकाही
तरुणाई, त्यांची मैत्री आणि त्यांची मौजमस्ती हा चित्रपटाचा विषय आता अंगवळणी पडला आहे. हल्ली केवळ तरुणाईला आकर्षित करण्यासाठी प्रेम आणि मैत्रीमध्ये थोडा फार बदल करून तेच ते विषय मोठ्या पडद्यावर मांडण्यात येत आहेत. दिग्दर्शक सचिन दरेकर यांचा ‘पार्टी’ हा नवीन मराठी चित्रपट त्याच पठडीतील आहे. ‘पार्टी’ या नावामुळे हा चित्रपट एकाच रात्रीतील ‘पार्टी’भोवती, त्या ‘पार्टी’त घडणाऱ्या घटनांभोवती फिरतो की काय, असं सुरुवातीला साहजिकच वाटून जात. परंतु ‘पार्टी’मध्ये पाहायला मिळते ती चक्क कट्ट्यावरच्या चार मित्रांच्या मैत्रीची आणि त्या अनुषंगानं केल्या जाणाऱ्या मौजमस्तीची कथा. अर्थात या मौजमस्तीला शेवटी वास्तवाच्या नावाखाली शोकांतिकेचीही जोड देण्यात आली आहे. त्यामुळे कथेच्या दृष्टीनंही तशी ही ‘पार्टी’ बेरंग करणारी ठरली आहे.
ओमकार (सुव्रत जोशी), सुमीत (स्तवन शिंदे), चकऱ्या (अक्षय टंकसाळे), मनोज (रोहित हळदीकर) हे चार जिवलग मित्र. प्रत्येकाचा जीवन जगण्याचा ‘अंदाज’ वेगवेगळा असला तरी अडी-अडचणीला एकमेकांना मदत करून कोणत्याही चांगल्या गोष्टीचं सेलिब्रेशन म्हणून ‘दारूची पार्टी’ करणं हा त्यांचा स्वभावधर्म. त्यामुळे त्यांची मैत्री वरचेवर दृढ होत चाललेली असते. पण ‘मैत्री’ कोठपर्यंत कामाला येणार? ज्याला त्याला शेवटी स्वतःचं करिअर करावंच लागतं. त्यामुळे मधल्या काळात हे मित्र एकमेकांपासून दुरावतात आणि तब्बल अठरा वर्षांनंतर एकत्र येतात. त्यानिमित्त त्यांनी केलेली ‘पार्टी’ ही पूर्वीसारखी मौजमजेची ठरते का? का नाही? त्यासाठी या ‘पार्टी’चा आस्वाद घ्यायला हवा.
चित्रपटाच्या पूर्वार्धात या चार मित्रांची नुसतीच मौजमस्ती पाहायला मिळते. त्या अनुषंगानं घडणारे काही किस्से मजा आणतात खरे, मात्र ती तेवढ्यापुरतीच आहे हे चटकन लक्षात येतं. सगळेच मित्र मध्यमवर्गीय असल्यानं सर्वांनाच ‘कडकी’ भासते आणि मग ‘पार्टी’ करण्यासाठी त्यांनी केलेला नेहमीचा आटापिटाही पाहायला मिळतो. चकऱ्याचं शेजारी राहणाऱ्या दिपालीवर (मंजिरी पुपाला) प्रेम असतं, मात्र कायम एकत्र राहण्यासाठी नुसतं प्रेम करून चालत नाही हे वास्तव त्याला कळून चुकतं. तर सुमितला केवळ वेगवेगळ्या मुलींना ‘पटवण्यात’ रस असतो. प्रेम वगैरे तो गांभीर्यानं घेत नाही. ओंकारचंही शेजारी नव्यानं राहायला आलेल्या अर्पितावर प्रेम असतं आणि दोघांनीही लग्न करण्याचं ठरवल्यानंतर अर्पिताच्या आयुष्यात असं काही वादळ येतं की, त्यामध्ये तिचं आणि तिच्यावरील प्रेमामुळे ओंकारचंही आयुष्य उदध्वस्त होणं, या गोष्टी कथेला कलाटणी देतात. त्यामुळे ‘पार्टी’चं शोकांतिकेत रूपांतर होतं.
चित्रपटाची कथा फ्लॅशबॅक पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. मात्र तिचं प्रवाहीपण कायम टिकत नाही. सुरुवातीचे अनेक प्रसंग तुटकपणे जाणवतात तर काही प्रसंग केवळ विनोदनिर्मितीसाठी आहेत याची जाणीव होते. पटकथाही विस्कळीत असल्यामुळे ती पकड घेत नाही. सुमितचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न एका रात्रीत कसं पूर्ण होतं याचं उत्तर मिळत नाही. ‘भाऊ’सारखी स्थानिक पुढाऱ्यांची व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. तसंच अर्पिताच्या गुंतवणूक प्रकरणाचा नीट उलगडा करणं आवश्यक होतं. एकूणच ‘पार्टी’च्या पटकथेचाच ‘हँगओव्हर’ झाला आहे असं जाणवत राहतं. ‘पार्टी’ मनोरंजक होण्याच्या दृष्टीनं अर्थातच नाचगाणी आणि इतर मालमसाला भरण्यात आला आहे.
सुव्रत जोशी, स्तवन शिंदे, अक्षय टंकसाळे, आणि रोहित हळदीकर या चारही प्रमुख कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. त्यातला त्यात अक्षय टंकसाळेनं अधिक मजा आणली आहे. प्राजक्ता माळी, मंजिरी पुपाला यांच्यासह अन्य सहकारी कलाकारांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. ‘पार्टी’त मौजमजा करणारी चार ‘कार्टी’ असली तरी पटकथेचा ‘हँगओव्हर’ झाल्यामुळे ती बेरंग करणारी ठरली आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment