‘पलटण’ : चित्रपटातील सैनिक सीमेचं रक्षण करतात, पण प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतात!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘पलटण’चं पोस्टर
  • Mon , 10 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पलटण Paltan जे. पी. दत्ता J. P. Dutta

दिग्दर्शक जे. पी. दत्ता म्हणजे कधी काळी यशस्वी असणाऱ्या, मात्र आता आऊटडेटेड झालेल्या व्यक्तीसारखे बनले आहेत. त्यांना आपल्या यशासाठी नेहमीच भावनिकता आणि राष्ट्रप्रेम यांवर अवलंबून राहावं लागलेलं आहे. ‘उमराव जान’नंतर त्यांनी आपली सेकंड इनिंग सुरू करण्यासाठी या जुन्याच साथीदारांची मदत घेतली आहे. असं असलं तरी ‘पलटण’च्या अगदी लेखन ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींबाबत ते (अलीकडील काळातील राम गोपाल वर्माप्रमाणे) आपल्याच जुन्या चित्रपटांमधील यश आणि दृश्यांचं पुनर्निर्माण करू पाहत आहेत. मात्र चित्रपटाला आवश्यक असणारी किमान बरी म्हणता येईल अशीही कथा नसणं आणि सोबतीला कमीत कमी अभिनय कौशल्य असलेल्या लोकांची फौज, यांमुळे हा प्रयत्न असफल ठरतो. चित्रपटातील सैनिक पात्रांनी देशाच्या सीमेचं रक्षण केलं असलं तरी प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

युद्धाच्या एका दृश्यानंतर कुठल्याशा गावातील शुकशुकाट असलेल्या गल्लीतील फ्रेमनं पुढील दृश्याला सुरुवात होते. एक पोस्टमन त्या गल्लीतील घरांची दारं एकापाठोपाठ एक वाजवून ‘अमुक तमुक शहीद हो गया हैं’ असं सांगत फिरतो. ठीक आहे. याला युद्धावरील चित्रपटातील, युद्धाची काळी आणि भयानक बाजू दाखवणारं दृश्य म्हणता येईल. मात्र या दृश्यातूनच चित्रपटातील तर्काच्या अभावाचा, तसंच लाऊड मेलोड्रामाचा अंदाज येतो. कारण रात्रीच्या वेळी पत्रं वाटत फिरणाऱ्या पोस्टमनच्या घरोघरी जाऊन ‘आपका बेटा शहीद हो गया हैं ’ असं म्हणायच्या पार्श्वभूमीवर घरातील सदस्य हंबरडा फोडत असल्याचं दाखवत, प्रेक्षकाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देण्याचे प्रयत्न केले जातात. ज्यावर एखाद्या फाऊंड फुटेज चित्रफितीतही आढळणार नाहीत वाईट दृश्यं आणि भडक अभिनय मात करतात. परिणामी सदर दृश्यांतील गांभीर्याचं उसनं अवसान गळून पडतं.

‘पलटण’ला एकसंध पटकथा तशी नाहीच. मुळात यात कथेचाही अभावही  जाणवतो. कारण कथा म्हणून दत्ता १९६७ मधील भारत-चीन सैन्यातील, सिक्कीमजवळ झालेल्या एका छोटेखानी चकमकीवर अवलंबून राहतात. ज्यामुळे साधारण एखाद्या आठवड्याभरात घडलेल्या घटनेला दोनेक महिन्यांमधील घडामोडींचं स्वरूप प्राप्त होतं. परिणामी दीडेक तासही भरपूर होतील अशा प्रकारचं मूळ कथानक (?) पावणे तीन तासांच्या एपिक (!) वॉर ड्रामामध्ये रूपांतरित होतं. ज्यात अनावश्यक फ्लॅशबॅक्स, मध्यवर्ती पात्रं म्हणावीत अशा सैनिकांचं प्रेमजीवन, कुटुंबांतील सदस्यांचे रँडम शॉट्स, गाणी या आणि अशाच इतर गोष्टींचा समावेश केला जातो. एकूणच ६७ मधील घटनेवर ऐंशी किंवा नव्वदच्या दशकात, दत्तांच्या कारकिर्दीतील सोनेरी दिवसांत चालून गेला असता असा चित्रपट ‘डंकर्क’, ‘हॅकसॉ रिज’सारखे सिनेमे प्रदर्शित होत असतानाच्या काळात प्रेक्षकांच्या माथी मारला जातो.

चित्रपटात खास जेपी स्कूलमधील कथानकाशी असंबद्ध लोकांमधील असंबद्ध संवादांची निरर्थक दृश्यं, म्हणींसारखे वाटणारे, यमक जुळवण्यावर भर दिले गेलेले संवाद, कायम रागात असणारा एक सरदार अशा गोष्टींचा पुरेपूर वावर दिसून येतो. ‘नो गट्स, नो ग्लोरी; नो लीजंड्स, नो स्टोरी’सारखे संवाद मात्र ‘सो बॅड इट्स गुड’ कॅटेगरीमध्ये येतील असे बनत नाहीत. (त्यासाठी ‘हेट स्टोरी ४’ किंवा गेला बाजार ‘सत्यमेव जयते’च्या संवादलेखकाचा आदर्श घ्यावा!) बाकी सीमारेषेवरील चिनी जवान हिंदी बोलत आहेत, वारंवार ‘हिंदी चिनी भाई भाई’चे नारे लावत आहेत (तेही १९६७ मध्ये), दगड रचून बनवलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर भारतीय सैनिक चीनच्या सैनिकांसमोर आपल्या ‘प्लॅन’ची चर्चा करत आहेत (तेच सैनिक ज्यांना हिंदी येत आहे), भारत-चीन सैन्यातील जवान एकमेकांवर दगड फेकत आहेत किंवा कुठलासा भारतीय सैनिक चीनव्याप्त भागात जाऊन भारतीय सैन्याला फेन्स तयार करण्याचा वेळ मिळावा म्हणून चिनी सैनिक आपल्यामागे पळतील अशा हिशोबानं जणू पकडापकडी खेळत असल्यासारखी एक अन् अनेक दृश्यं लिहिण्याचा आत्मविश्वास कुठून येतो ते लेखकालाच माहीत.

‘पलटण’मध्ये खोटेपणाचा अतिरेक तर आहेच. पण मुळात पीव्हीसी पाइपसारख्या दिसणाऱ्या, आरपार पाहता येणाऱ्या गोष्टीला ग्रेनेड लाँचर म्हणत, सुमार व्हीएफएक्सच्या जोरावर (त्यातील पात्रांच्या दृष्टीनं) खतरनाक वगैरे दृश्यं चित्रित करत एक तर्काचा अभाव असणारं उत्पादन समोर आणावंसं का वाटत असेल हा खरा प्रश्न आहे. आपण एक पीरियड फिल्म बनवत आहोत याचं भान राखत किमान प्रॉप्स आणि कॉस्ट्यूम विभागात तरी स्वीकारार्ह ठरेल अशी कामगिरी करण्याइतपतही समज (आणि कुवत) आपल्यात नसेल तर आपण कशाच्या जोरावर ‘वॉर’सारख्या विषयावर चित्रपट निर्मिती करत आहोत, या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे.

चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारण्याचा एक संकेत पाळण्याचा सल्ला बरेचसे दिग्दर्शक-लेखक देत असतात. ज्यात साधारण आपल्याला चित्रपट का बनवायचा आहे, सदर कथेतून नक्की काय सांगायचं आहे, इत्यादी प्रश्नांचा समावेश होतो. न्यूनतम अभिनय कौशल्य आणि एका पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी आवश्यक असावी अशा किमान नावीन्यपूर्ण कथेचा अभाव या दोन्हींच्या मेळातून समोर आलेल्या ‘पलटण’च्या निमित्तानं प्रत्येक चित्रपटाच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांनी सदर प्रश्न स्वतःला विचारण्याची किती गरज आहे याची प्रचिती येते.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......