अजूनकाही
जवळपास दशकभरापूर्वी अहमदनगरला एक अफवा पसरली होती. रात्रीच्या वेळी कुठलीशी (बहुधा) चेटकीण रात्रीच्या वेळी भटकत असायची. आता नक्की आठवत नाही, पण मुलं गायब व्हायची अशा अर्थाची चर्चा त्यावेळी सुरू असावी. तिच्यापासून वाचण्यासाठी काय करायचं, तर घरावर पांढऱ्या (की काळ्या) रंगात मोठे क्रॉस बनवायचे. नंतर कधीतरी त्या चर्चा थांबल्या. तरी पुढेही अनेक दिवस बहुतांशी घरांवर त्या खुणा दिसायच्या.
अशा अनेक गोष्टी काही दशकभरापूर्वी बऱ्याच ठिकाणी आढळून यायच्या. राजस्थान वगैरे भागात अशा कथांच्या परिणामामुळे खाली करण्यात आलेली, ओसाड पडलेली बरीचशी गावं आढळतील. अगदी महाराष्ट्रातही काही भागात विशिष्ट काळात गावात वास्तव्य न करण्याचे अलिखित नियम वर्षानुवर्षं पाळण्यात आल्याचंही दिसून येईल.
‘स्त्री’मध्ये सांगण्यात येणारी आख्यायिकादेखील अशाच प्रकारची आहे. विकी (राजकुमार राव) हा एक लेडीज स्पेशलिस्ट टेलर असतो. तो ज्या गावात राहतो, त्या चंदेरीमध्ये एक विचित्र गोष्ट प्रचलित असते. ज्यानुसार गावात प्रत्येक वर्षी चार दिवस भीतीचं सावट पसरलेलं असतं. कारण ‘स्त्री’ म्हणून ओळखलं जाणारं एक भूत या चार दिवसांत रात्री गावाचा जवळपास ताबा घेऊन पुरुषांना काबीज करतं. त्यानंतर ते पुरुष कायमचे गायब होतात. ओघानंच विकी, त्याचे मित्र जना (अभिषेक बॅनर्जी) आणि बिट्टू (अपारशक्ती खुराना) यांचा या सर्व गोष्टींशी संबंध येऊन या स्त्रीचा नाश करण्याचं एक छोटेखानी मिशन ते हाती घेतात. यात ते यशस्वी होतात का? तर अर्थातच हो. कितीही झालं तरी हा हिंदी चित्रपट आहे. त्यामुळे मध्यवर्ती पात्रांना यश तर मिळणारच. त्यामुळे इथं महत्त्वाचं काय, तर त्यांचं पुढे वाढून ठेवलेल्या घटनांना सामोरं जाण्याचा रंजक प्रवास.
हॉरर कॉमेडी हा चित्रपट प्रकार आपल्याला तसा नवीनच म्हणता येईल. चंद्रमुखीचा रिमेक असलेल्या भूलभुलैयासारखी मोजकी नावं वगळता दोन जॉन्रचं मिश्रण असलेला हा रंजक प्रकार आपल्याकडे फारसा विकसित करण्यात आलेला नाही. त्यामुळे आपल्या विनोदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या राज-डीके या जोडीनं ‘स्त्री’च्या निमित्तानं एक धाडसी प्रयोग केला असं म्हणायला वाव आहे. कारण या प्रकारात भूलभुलैयासारखं कल्ट म्हणावं असं नाव समोर असल्यानं त्यानं सेट केलेला बेंचमार्क बराच अधिक होता. त्यातही त्यांनी हा प्रकार बऱ्याच यशस्वीपणे हाताळून एक चांगला चित्रपट समोर आणला आहे.
अगदी टोकाच्या म्हणता येतील अशा या दोन प्रकारातील स्वैर वावर भल्याभल्यांना थकवेल असा असतो. त्यातही पुन्हा दोन्हींमध्ये समतोल राखता येतोच असं नाही. ‘स्त्री’ याबाबत बराच यशस्वी ठरतो. अगदी लेखनापासून ते संगीत आणि दिग्दर्शनापर्यंत सगळीकडे एक विलक्षण ऊर्जा दिसून येते. खासकरून अमलेंदु चौधरीचा कॅमेरा रात्रीच्या वेळीचे भीतीदायक क्षण एकाच वेळी अंगावर येतील आणि सुंदर वाटतील अशा प्रकारे टिपतो.
कथेतील स्त्री हे का करते याची कथा चित्रपटाच्या ओघात सांगितली जाते. संक्षिप्तपणे सांगायचं झाल्यास या कथेचा सरळ रोख स्त्रियांना स्वातंत्र्य न देता त्यांच्यावर बंधनं लादणं, स्वतः स्त्रियांकडे अधाशीपोटी पाहत त्यांचं प्रेम मात्र नाकारायचा विरोधाभासी प्रकार, यांसारख्या सामाजिक परिस्थितीकडे आहे. त्यामुळे केवळ आऊट अँड आऊट व्यावसायिक चित्रपटाच्या वरवरच्या स्वरूपाखाली ‘स्त्री’ सक्षम स्त्रीवादी भूमिका घेत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो. शिवाय असं करताना सत्ताधारी आणि समकालीन घटनांची खिल्ली उडवत आपली विनोदी बाजूही तो भक्कमपणे सांभाळतो.
एकीकडे निवृत्त न्यायाधीश महोदयांचं ‘मोराच्या अश्रूंनी लांडोर गरोदर राहते’सारख्या वक्तव्यांची खिल्ली उडवत दुसरीकडे ‘मिशन इम्पॉसिबल’वजा थीम किंवा ‘येस मीन्स येस’ म्हणत ‘पिंक’सारख्या समकालीन चित्रपटांचे संदर्भ देत शाब्दिक आणि प्रासंगिक विनोद साधला जातो. ज्यामुळे ‘स्त्री’ आपल्या विनोदासाठी रील ते रिअॅलिटी दोन्हींचा वापर करतो.
यात उणीवा नाहीत असं नाही. उदाहरणार्थ, लहानपणापासून चंदेरीमध्ये वाढलेली मध्यवर्ती पात्रं इतकी वर्षं या प्रकाराला अनभिज्ञ असल्यासारखी वागत जेव्हा रुद्रकडून (पंकज त्रिपाठी) सगळं काही जाणून घेऊ पाहतात, तेव्हा ते अप्रस्तुत ठरतं. कारण त्यांनीच वारंवार उल्लेख केल्याप्रमाणे ती तिथंच तर वाढलेली आहेत. त्यामुळे कथा एकसंध नाहीये हे खरं असलं तरी या उणीवा एकूण परिणामात अडथळा ठरत नसल्यानं त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणं शक्य आहे.
चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कास्टिंग अगदीच चपखल आहे. राजकुमार रावपासून ते पंकज त्रिपाठी आणि सोबतीला बॅनर्जी-खुराना जोडीनं केलेली अफलातून बॅटिंग! अर्थात श्रद्धा कपूरचा अपवाद वगळता. तिचं काम ठीक म्हणावं असं असलं तरी त्याऐवजी इतर कुणी असतं तर आणखी उत्तम झालं असतं.
रावबाबत सहसा तक्रारीला जागा नसतेच. त्यामुळे इथंही नाहीच. त्याच्या असण्यानं या वैचित्र्यपूर्ण अॅब्सर्ड कथेत जान येऊन ती अधिकच फुलते. बाकी त्रिपाठी नेहमीप्रमाणे सीन स्टीलर ठरतो. इम्प्रवाईज केल्या असाव्यात अशा भासणाऱ्या शारीरिक करामतींची जोड असलेल्या त्याच्या अभिनयामुळे प्रत्येक दृश्यात एक निराळीच ऊर्जा निर्माण होते. तो एक अजब (आणि अफाट) रसायन आहे हेच खरं.
वरवर केवळ विनोदी भासणारा ‘स्त्री’ सूक्ष्मपणे स्त्रीवादासारखे अनेक अंडरकरंट्स घेऊन वावरतो. जे कदाचित दुर्लक्षित राहण्याची शक्यता असली तरी ते चित्रपटाच्या एकूण परिणामात ते भर घालतात. ज्यामुळे ही सूक्ष्मता लेखक-दिग्दर्शकाचं कौतुक करावी अशी आहे. ‘स्त्री’चं स्पिरीट चांगलं आहे. (नो पन इंटेंडेड) ‘स्त्री बस दो चीजों की भूकी हैं. प्यार और इज्जत’ असं म्हणणाऱ्या चित्रपटाचं स्पिरीट का चांगलं नसेल म्हणा!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment