अजूनकाही
साधे विचार, लवचीक भावना, निर्मळ आनंद ही लहानपणी सहज सापडणारी स्वभाववैशिष्ट्यं प्रौढ वयात आढळेनाशी होतात. 'मोआना'सारखा अॅनिमेटेड चित्रपट बघताना तर 'आपण आता लहान नाही' याची सारखी आठवण होत राहते. तसं बघायला गेलं, तर 'अॅनिमेशन' हा कलाप्रकार फक्त लहान मुलांसाठी असतो, हा समज अगदी चुकीचा आहे. 'परसेपोलिस', 'मेरी अॅंड मॅक्स', 'वोल्टझ विथ बशीर' यांसारख्या खास प्रौढांसाठी बनवलेल्या आणखीही अॅनिमेटेड चित्रपटांची उदाहरणं देता येतील. याशिवाय काही चित्रपट सर्व वयोगटांसाठी बनवले जातात. त्यात 'टोय स्टोरी', 'श्रेक', 'अप' आणि 'वॉल-ई' यांसारख्या चित्रपटांचा समावेश करता येईल. वास्तविक, हे वर्गीकरण ढोबळ आहे. त्याला विशेष अर्थ नाही. कारण ज्याप्रमाणे 'वोल्टझ विथ बशीर' आवडणारी लहान मुलं निश्चितच सापडतील, तशीच 'फ्रोझन' आणि 'मोआना' यांसारखे चित्रपट आवडणारी मोठी माणसंसुद्धा चिकार आहेत; पण तरीही अॅनिमेटेड चित्रपट बनवणारे स्टुडिओ आजकाल एखाद्या विशिष्ट वयोगटाला उद्देशून चित्रपट बनवत आहेत, असं वाटायला लागलं आहे. पूर्वी लहान आणि मोठ्या अशा दोन्ही वयोगटांसाठी बनवल्या जाणाऱ्या अॅनिमेटेड चित्रपटांचा रोख आता पुन्हा लहान मुलांसाठीसाठीचे चित्रपट बनवण्याकडे वळला आहे. डिझनी स्टुडिओचा 'मोआना' हा चित्रपट या नवीन पॅटर्नमधला एक यशस्वी चित्रपट नक्की ठरेल.
'मोआना'ची गोष्ट हवाईतल्या बेटांवर आणि तिथल्या पॅसिफिक महासागरात घडत असल्याचं 'मोआना'चा ट्रेलर बघितल्यावर लगेच समजतं. चित्रपटासंदर्भातल्या मुलाखतीत दिग्दर्शक जोन मसकर आणि रोन क्लेमेंट्स त्यांनी केलेल्या 'साऊथ पॅसिफिक' आणि पॉलिनेशियाच्या परदेशातल्या संशोधनाबद्दल सांगतात. सुरुवातीला हे वाचताना थोडं गोंधळायला होतं. कारण हवाई बेटं आणि दक्षिण पॅसिफिक महासागर ही दोन ठिकाणं दोन टोकांना असल्याचं नकाशा पाहताना लगेच लक्षात येतं, पण आणखी थोडं बारकाईने पाहिलं, तर हा हवाई प्रदेश म्हणजे त्रिकोणी आकाराच्या पॉलिनेशियाच्या उत्तर टोकाचाच भाग असल्याचं लक्षात येतं. हे सांगण्यामागचा उद्देश म्हणजे, 'मोआना'मधली सांस्कृतिक पार्श्वभूमी केवळ काही छोट्या बेटांपर्यंत मर्यादित नाही, तर पॅसिफिक महासागरातल्या ऑस्ट्रेलियापासून ते अमेरिकेमधल्या अनेक बेटांपर्यंत तिच्या वेगवेगळ्या छटा अढळतात. या संस्कृतीत अर्थपूर्ण जगण्याला खूप महत्त्व आहे; माती आणि समुद्र या जीवनदायी स्रोतांबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. ही भावना इथल्या लोकांच्या विधींमधून, संगीतामधून, नृत्यामधून आणि तत्त्वज्ञानामधून स्पष्टपणे दिसते. त्यामुळे 'मोआना'मध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संदेशावर भर असणं साहजिक आहे. मात्र तो प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीनेच मांडला गेला आहे, पण तरीही काही प्रेक्षकांना तो गुडीगुडी आणि कंटाळवाणा वाटू शकतो.
एकूणच चित्रपटांमधून कुठला तरी ठोस संदेश देणं, हे डिझनीचं वैशिष्ट्य आहे, असं म्हणायला हरकत नाही. तरीही 'तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या स्वप्नांना सामोरं जाऊन त्यांचा स्वीकार करा' ही गोष्टसुद्धा त्यांच्या प्रत्येक चित्रपटात आवर्जून सांगितलेली असते. मग वानर बनण्याची इच्छा असणारा माणूस चित्रपटामध्ये साकारलेला असेल (टार्झन) किंवा अख्खं आयुष्य एकाच बेटावर घालवावं लागण्याची कल्पना न पटणारी चित्रपटातली नायिका 'मोआना' असेल, संदेश एकच - कोणाचीही पर्वा न करता आणि कोणालाही न दुखावता तुम्हाला ज्यातून आनंद मिळेल तेच करा. हा संदेश लहान मुलांसाठी नक्कीच उपयुक्त आहे, पण एका मर्यादेनंतर त्याचं 'मोआना'मधलं सादरीकरण बाळबोध आणि 'अति गोड' वाटू शकतं.
पालकांच्या काळजीचं मुलांवर येणारं बंधन डिस्नीच्या पूर्वीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दाखवलं गेलं आहे. या बंधनातून पळून जाऊन मोआनाच्या गोष्टीची सुरुवात होते. वाटेत तिची 'माऊई' नावाच्या दैवतासमान व्यक्तिमत्त्वाशी भेट होते आणि त्या दोघांच्या साहसी प्रवासाची गोष्ट या चित्रपटातून आपल्यासमोर उलगडत जाते. हा साहसी प्रवास ठरावीक पद्धतीने अपेक्षित वळणं घेत असला, तरी या दोन्ही पात्रांचं व्यक्तिमत्त्व ठाशीवपणे आणि मनोरंजक पद्धतीने रेखाटल्यामुळे चित्रपट बघताना अजिबात कंटाळा येत नाही. उलट 'समुद्राखालचं जग अजून पाहायला मिळालं असतं, तर अजून मजा आली असती!', हीच भावना चित्रपट संपल्यानंतरही मनात येत राहते. तसंच मोआनामधलं कुठलंच दृश्य पुन्हा पुन्हा आठवत राहत नाही किंवा ते सर्वांग सुंदरही नाही. 'लाईफ ऑफ पाय'मधली बरीच अॅनिमेटेड दृश्यं जशी अजून आठवतात, तशी 'मोआना'मधली दृश्यं नक्कीच आठवणार नाहीत. तरी मोआना आणि माऊई चित्रपटाच्या एका भागात एका खेकड्याला भेटतात त्या दृश्यातलं संगीत, लिखाण आणि रंगसंगती हे सगळं छान जमून आलं आहे.
'मोआना'मधली एकूण संगीत-रचना डिझनीच्या ठरावीक वळणाने जाणारी असली, तरी त्यातल्या शब्दांच्या रचनेत एक वेगळा सहजपणा आहे. गद्य कविता आणि यमक असलेल्या कविता या दोन्ही प्रकारांचं मिश्रण असलेल्या गाण्यांचं रूप आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतं. कदाचित पॉलिनेशियन संस्कृती आणि डिझनीच्या ठरीव सांगीतिक पद्धत अशा दोन गरजांमधून गाण्यांचं हे रूप तयार झालं असावं. चित्रपटातला एकूण अभिनय सुरेख आहे आणि 'आवलीई क्रव्हाल्यो' आणि 'ड्वेन जोनसन' यांची प्रमुख भूमिकांसाठी केलेली निवड चोख आहे. ड्वेनचे आधीचे चित्रपट पाहिलेल्यांच्या मनात त्याचा अभिनय अति नाटकी असण्याची शंका येऊ शकते, पण त्याने माऊईची भूमिका अगदी नेमकेपणाने निभवली आहे. 'रेछ्ल हाऊसने' हे मोआनाच्या आजीची भूमिका वठवणारं पात्र अगदी थोडा वेळ चित्रपटात दिसतं, पण या पात्राने कमी वेळात मोहक अभिनयातून आजीची भूमिका जिवंत केली आहे. बाकी चित्रपटाची पटकथा, त्यातले संवाद, त्यातले विनोद, त्याचं पार्श्वसंगीत आणि इतर बाबतींमध्ये तसं फार नाविन्य नाही; डिझनीचा नेहमीचा मसाला आहे आणि या चित्रपटातल्या बहुतेक भागांमध्ये तो सुंदर मुरला आहे. काही परीक्षकांच्या मते, 'मोआना'त डिझनीने त्यांचा वर्षानुवर्षांपासूनचा 'फॉर्म्युलाच' सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीने वापरला आहे; पण हे खरं नाही. वास्तविक, या 'फॉर्म्युला'चा सर्वोत्तम वापर 'मुलान', 'द लायन किंग' आणि 'टार्झन' या चित्रपटांमध्ये केला गेल्याचं दिसून येतं.
'मोआना'मधल्या माऊईचं अॅनिमेशन फारसं भावेलच असं नाही. त्याचं अॅनिमेटेड शरीर आणि त्याची हालचाल एखाद्या रबरच्या बाहुल्यासारखी वाटते. पॉलिनेशियन पुरुषांच्या शरीराच्या साचेबद्ध कल्पनेप्रमाणे या पुरुषांचं शरीर आडदांड आणि पीळदार असतं, त्यांची सावळी त्वचा थोडी चामड्यासारखी असते आणि प्रथापरंपरांना अनुसरून त्यांच्या अंगावर गोंदणं काढलेली असतात. या धर्तीवर माऊईचं एकूण व्यक्तिमत्त्व रेखाटलं आहे. याचबरोबर 'मोआना'च्या बाबतीत कोणाची 'सांस्कृतिक प्रतीकात्मकेबाबत' तक्रार असेल, तर ती योग्यच ठरेल. वास्तविक, ही तक्रार बऱ्याच अॅनिमेटेड चित्रपटांना लागू होईल. उदाहरणार्थ - 'कुंगफू पँडा' आणि त्यातली चिनी 'सांस्कृतिक प्रतीकात्मकता'. 'सांस्कृतिक प्रतीकात्मकते'बद्दलची ही चर्चा एखाद्या चित्रपटाच्या मूल्यमापनाची चर्चा करताना निश्चितच अवाजवी ठरत नाही. कारण चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून जसे हितकारक संदेश पोचतात, तशाच एखाद्या संस्कृतीबद्दलच्या अर्धवट कल्पनाही पोचतात.
मागच्या वर्षी आलेल्या 'झूटोपिया'च्या यादीत 'मोआना' हा चित्रपट म्हणजे एक चांगली भर आहे. 'झूटोपिया'च्या तुलनेत 'मोआना'मध्ये नैतिक मुद्द्यांवर कमी भर असला, तरीही लहान मुलांना आनंद मिळेल असं बरंच काही या चित्रपटात आहे. प्रौढांच्या अनुभवाबद्दल मात्र काही खात्रीलायक विधान करणं अवघड आहे; पण त्यांना हा चित्रपट कंटाळवाणा वाटणार नाही, हे नक्की! आणि 'मोआना' बघून घरी जात असताना, 'कधीतरी हवाईला जाऊन येऊ', असा विचारही डोक्यात येऊन जाईल.
लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.
yashsk@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment