अजूनकाही
चित्रपटातील खलनायकाच्या बाजूचं पात्र जमिनीवर पडलेल्या नुडल्सवरून घसरून, हवेत साताठ फूट वर उडून बेशुद्ध पडतं. त्यानंतर तीन मध्यवर्ती पात्रं त्याला मृत समजून कुणाच्या चुकीमुळे तो मेला यावर वाद घालतात. तर चौथं पात्र त्याला आपण मारल्याच्या धक्क्यामुळे निरर्थक बडबड करतं. सदर चित्रपटाचं सार ‘ये क्या चल रहा है’ या एकाच वाक्यात सांगता येईल.
एखाद्या चित्रपटाचा सीक्वेल बनवणं यात काहीच गैर नाही. कारण ते या माध्यमाचं व्यावसायिक अंग झालं. जागतिक पातळीवर किंवा अगदी भारतातही अशा चित्रपट मालिका आहेतच. मात्र रटाळ पटकथेच्या जोरावर आणि आधीच्या चित्रपटातील गाजलेल्या पात्रांच्या जीवावर पूर्ण चित्रपटाची भिस्त ठेवून एक पूर्णतः अप्रामाणिक प्रॉडक्ट माथी मारणं गैर आहे.
दुसरीकडे हेही स्पष्ट आहे की, ‘बागी’ किंवा ‘रेस’सारख्या चित्रपट मालिकांचं यश निर्मात्यांना सीक्वेलच्या निर्मितीची भुरळ घालत असावं. ज्याचा परिणाम म्हणून ‘फुकरे रिटर्न्स’ किंवा ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’सारखे चित्रपट समोर येतात.
चीनमधील एका विमानतळावर उतरल्यानंतर हरप्रीत कौर ऊर्फ हॅप्पी (सोनाक्षी सिन्हा) आणि आधीच्या चित्रपटातील हरप्रीत कौर ऊर्फ हॅप्पी (डायना पेंटी) या दोघींमधील नामसाधर्म्यामुळे दोघींची अदलाबदल होते. ज्यातून उडालेला गोंधळ, तसंच घटनांचा परिणाम यांच्यावर सदर चित्रपटाच्या कथानकाचा पाया रचला गेला आहे.
चीनमधील एका व्यावसायिकाला पाकिस्तानमधील स्थानिक राजकीय व्यक्तीच्या मदतीनं चीनमध्ये कसलं तरी कंत्राट मिळवायचं असतं. ज्यासाठी त्यानं भारतातील हॅप्पीला तिच्या गायक नवऱ्याला एका स्टेज शोचं खोटं कारण पुढे करून चीनमध्ये बोलावून घेतलेलं असतं. या हॅप्पीच्या मदतीनं पाकिस्तानमधील सदर व्यक्तीला ब्लॅकमेल करून आपलं काम करवून घ्यायचं असतं. (ज्यातून पुढे जाऊन विमानतळावरील घोळ होतो.) या भारत-पाक रहिवाशांमधील संबंध काय? तर त्यासाठी आधीचा चित्रपट पहावा.
भारतीय चित्रपटसृष्टीतील बऱ्याचशा चित्रपटांचा प्रसंगनिष्ठ विनोदावर भर दिसून येतो. ज्यामुळे बरेचसे लेखक पात्रांमधील गैरसमजांतून निर्माण झालेल्या (नकारात्मक दृष्टीनं) हास्यास्पद घटनांमधून विनोदनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येतात. इथंही तसंच होताना दिसतं. मात्र प्रत्येक वेळी हा प्रकार परिणामकारक होतोच असं नाही. एकाच वेळी अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा वापर करत, दुसरीकडे भावनिक पातळीवर साद घालणारी दृश्यं समोर आणत दोन्हींचा योग्य तितका समतोल साधणंही जमतंच असं नाही. ‘हॅपी फिर भाग जाएगी’ मुख्यतः याच गोष्टीवर अवलंबून असल्यानं आधीच फसलेली कथा अधिक फसत जाते.
याखेरीज आजही बहुतांशी भारतीय चित्रपट जेव्हा इतर राष्ट्रांची पार्श्वभूमी वापरतात, तेव्हा त्यात वंशद्वेषाचा समावेश हमखास दिसून येतो. त्यामुळे इथं चीनच्या पार्श्वभूमीवर तिथल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील साम्याच्या जोरावर किती विनोद झाले असतील याची गणनाच नको. ही एकूणच भारतीय जनमानसाची बरीच मागास म्हणावी अशी खोड आहे. कारण अशा वेळी आपण स्वतः काही काळापूर्वी (किंवा अजूनही) सर्रास ‘ब्राऊन मेन’ म्हणून उल्लेखले जातो याचा सोयीस्कर विसर पडतो. ज्यामुळे भारतात स्थायिक असलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तींची, आशियातील इतर देशातील रहिवाश्यांची किंवा अगदी पूर्वोत्तर भारतातील नागरिकांची त्या त्या ठिकाणी लागू पडणाऱ्या वर्ण, उंची किंवा चेहऱ्यावरील साधर्म्यावरून केली जाणारी हेटाळणी ही गोष्ट आपल्या मागासलेपणाचं आणि बेगडी देशप्रेमाचं उदाहरण आहे.
पण याची पर्वा कोणाला! कारण ही आपल्या भारतीयत्वाचं प्रमाण मानायची गोष्ट थोडीच आहे? त्याकरिता चित्रपटगृहात सोयीस्कररीत्या वाजणाऱ्या राष्ट्रगीताला विरोध न करणं, आपलं बौद्धिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न न करणं या आणि अशाच इतर गोष्टी आहेत की!
शिवाय शेवटी चित्रपटातील विनोदी दृश्यं म्हणजे दोन पात्रांच्या अनुक्रमे केवळ भारतीय आणि पाकिस्तानी असण्यावर केलेले विनोद. एखाद्या पात्रानं मद्यपान करून बरळणं, वाईट यमक जुळवत केलेल्या हास्यास्पद (!) कृती समोर मांडणं. नसता गेला बाजार एका पात्राचं प्रथम नाम ‘फ’ आणि आडनाव ‘क्यू’ ठेवून दोन्हींचा सलग उच्चार केल्यावर निर्माण झालेल्या अभिजात दर्जाच्या विनोदाची पेरणी करणं हा पर्याय आहेच!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment