साधारण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नाट्यसंमेलन होतं. पण यंदा नाट्यपरिषदेच्या निवडणुकाच मुळी एप्रिलमध्ये पार पडल्या. आणि तेव्हाच नवीन कार्यकारिणी निवडून आली. आता या वर्षीचं नाट्यसंमेलन होणार की नाही असा प्रश्न पडला. नाट्यपरिषदेच्या अध्यक्षापासून सगळे नवीन, तरुण. त्यात निवडणुकीच्या वेळीस, ‘हे सगळे आपल्या कामात इतके व्यस्त असतात, हे काय नाट्यपरिषदेला वेळ देणार?’ ही चिंता व्यक्त केली जात होती. उलटसुलट चर्चा चालू असताना बातमी आली या वर्षीचं नाट्य संमेलन होणार, आणि ते मुंबईत होणार!
ते मुंबईतच का होणार, यावर काही चर्चा वा वाद झाले नाहीत. याचा अर्थ ते सगळ्यांना मान्य होतं असा घेऊ. कारण एरवी संमेलनाच्या जागेवरूनही वाद झाले आहेत. पण नेहमी संमेलनाच्या तयारीला सहा-सात महिने मिळतात. यंदा त्यासाठी फक्त दीड महिनाच मिळणार होता. त्यामुळे बहुधा याच विचारांनी इतर ठिकाणच्या नाट्यपरिषद शाखांनी ही जबाबदारी टाळली असावी. व्यावसायिक नाट्यसृष्टी मुंबईत. त्यात आधीच म्हटल्याप्रमाणे कार्यकारिणी नवीन होती. म्हणूनच उत्साहीही होती. बरेचसे पदाधिकारी मुंबईतले. त्यामुळे सर्वार्थानं संमेलन मुंबईत होणं सोयीचं होतं. पण मुंबईत कुठे? कारण प्रत्येक ठिकाणी शहर आणि ग्रामीण असे दोन भाग असतात, तसंच मुंबईत शहर आणि उपनगर असे दोन भाग आहेत. मध्यवर्ती नाट्यपरिषद शहरात आहे. त्यांनी मग हा प्रस्ताव मुंबईत (शहर व उपनगर) टाकला. इथून माझा या संमेलनाशी संबंध आला. कारण हा प्रस्ताव मुलुंड शाखेपर्यंत आला. (मी नाट्यपरिषद मुलुंड शाखेचा उपाध्यक्ष आहे.) आम्ही लगेच त्यात इंटरेस्ट दाखवला. आमच्या टीममध्ये दिगंबर प्रभूंसारखा खंदा गडी होता. ज्याचा कामाचा उरकही जबरदस्त होता आणि नाटकाचा मॅनेजर व निर्माता म्हणून बावीस वर्षं काम केल्यानं अख्ख्या महाराष्ट्रातील नाट्यसृष्टीशी त्याचे जवळचे संबंध होते. त्याला म्होरक्या करून आम्ही मध्यवर्तीला प्रस्ताव दिला. दिगंबर प्रभूवरच्या विश्वासानं तो मंजूर केला गेला. आणि आम्ही सगळे कामाला लागलो. ९८व्या नाट्य संमेलनाचं स्थळ कवी कालिदास नाट्य संकुल, मुलुंड ठरलं आणि तारखा १३, १४, १५ जून ठरल्या.
आम्ही कामाला लागलो आणि प्रसाद कांबळी (अध्यक्ष), शरद पोंक्षे (कार्यवाह), डॉ. गिरीश ओक, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, लीना भागवत, मधुरा वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, संतोष कणेकर, मंगेश कदम आणि इतर सगळ्या मध्यवर्तीच्या कार्यकारिणीची भक्कम भिंत आमच्या पाठीशी उभी राहिली. नाट्यपरिषद मुलुंड शाखेतर्फे आम्ही म्हणजे दिगंबर प्रभू, राजू वेंगुर्लेकर, अंजली वळसंगकर, अशोक नारकर, अरविंद राणे आणि मी कामाला लागलो. आम्हाला साथ होती मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ, मराठा मंडळसारख्या खंद्या संस्थांची.
कुठले कार्यक्रम करायचे, कोणी करायचे आणि ते संमेलनात कोणत्या दिवशी कुठल्या वेळेला होणार हे सगळं ठरवणारे मध्यवर्ती होते. थोडक्यात या संमेलनाचे मध्यवर्ती हे ब्रेन होते व आम्ही हात. त्यातून असं ठरलं की, हे संमेलन अविरत ६० तासांचं करायचं. आम्ही (मुलुंड शाखा) अचंबित. हे कसं होणार? या विचारात आम्ही असताना आमच्या हातात (म्हणजे whatsappनी) कार्यक्रम पत्रिकाच आली. या सर्व निर्णयात व नियोजनात आमचा दिगंबर प्रभू होताच. मध्यवर्तीचा कामाचा हा धडाका पाहून आम्हालाही स्फुरण आलं. आम्हीही आता, ते एक आव्हान म्हणून स्वीकारलं. अर्थात त्यांचा भक्कम पाठिंबा गृहीत धरूनच.
संमेलनं सरकारी अनुदानावर होतात. आणि जिथं सरकारचा संबंध येतो, तिथं तारेवरची कसरत होतेच. ती या नवीन कार्यकारणीने लिलया पेलली. ती कशी ते तुम्हाला उद्घाटन व समारोपाच्या कार्यक्रमासाठी नेमलेल्या उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांच्या यादीवरून कळेल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते मंत्री विनोद तावडे, उपाध्यक्ष मा. खासदार किरीट सोमैया, उद्घाटक ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा. शरद पवार आणि मा. राज ठाकरे आणि समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा. उद्धव ठाकरे व मा. सुशीलकुमार शिंदे. अर्थात स्वागताध्यक्ष म्हणून विनोद तावडे व उपाध्यक्ष म्हणून किरीट सोमैया यांचा सहभाग खूप मोठा व मोलाचा होता. त्यात स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनीही उत्तम साथ दिली. आजचे हे नेते आणि राजकारणी एकेकाळी धडाडीचे कार्यकर्ते होते आणि आजही त्यांच्यातला कार्यकर्ता जागा आहे, याची हे संमेलन एक साक्ष ठरलं. (यात कोणाचीही भलावण नसून त्यांची एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला आलेली प्रचीती आहे!)
नाट्यसंमेलनाध्यक्षा म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी, संगीत नाटकाच्या अर्ध्वयू मा. कीर्ती शिलेदारांची निवड करून मध्यवर्तीनी आपली कल्पकता सिद्ध केली आणि परिषदेच्या विचारांची दिशाच जणू जाहीर केली. आज संगीत रंगभूमीला फार चांगले दिवस नाहीत. आणि जे मागे पडले आहेत, त्यांना आपल्या बरोबरीनं घेतले पाहिजे. संगीत रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त व्हावी या विचारानंच कीर्ती शिलेदारांची संमेलनाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती.
कुठलेही विक्रम करणं हे काही कलेचं साध्य नव्हे. कुठलाही कलाकार जेव्हा आपलं नाव ‘लिम्का बुक’ किंवा ‘गिनीज बुका’त आलं म्हणून मिरवतो, तेव्हा थोडं नवलच वाटतं. कारण कलेचा दर्जा संख्येत नाही मापता येत. म्हणून साठ तास अविरत संमेलन करताना कुठलाही विक्रम आपण करतोय या समजुतीत संमेलनकर्ते नव्हते, ही एक चांगली बाब होती. विक्रम नसला तरी एक धाडस जरूर होतं आणि म्हणूनच एक थरार निर्माण झाला होता.
कार्यक्रम ठरले, त्यांच्या वेळा ठरल्या. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या परिषदेच्या सभासदांच्या राहण्या-खाण्याचं, वाहनांचं आयोजन, नियोजनही झालं. पण कुठल्याही कार्यक्रमाची यशस्विता त्याला मिळणाऱ्या लोकाश्रयावरूनच ठरते. एरवी संकष्टी-चर्तुर्थीच्या कारणानं मराठी नाटकाकडे न फिरकणारा मायबाप रसिक प्रेक्षक अविरत साठ तास कार्यक्रमाला हजेरी लावेल काय? तेसुद्धा मुंबईत आणि कामाच्या दिवशी? १३, १४, १५ जून २०१८ संमेलनाचा हा काळ आठवड्याचा अगदी मध्यभागी होता. त्यात पावसाची टांगती तलवार होतीच. फुकट मिळतंय म्हणून प्रेक्षक येईल असं म्हणाल तर आजकाल टीव्हीपासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर घरातच काय अगदी हातातल्या मोबाईलमध्ये करमणुकीची बक्कळ सोय असते.
But destiny supports courage. प्रेक्षकांना साकडं घालण्यासाठी मुलुंड शाखेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली. संमेलनाच्या पूर्वरंगाचं आयोजन करून वातावरण तापवायला सुरुवात झाली. मुलुंड शाखेची पुर्वरंगाचीही कल्पना नाट्यसंमेलनासाठी अभिनव अशीच होती. भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी आणि मुलुंड इथं विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. भांडुपच्या शिवाजी तलावावर पूर्वरंगाचा दिमाखदार सोहळा साजरा झाला. त्यानंतर ठिकठिकाणी लोककला, एकांकिका, गाण्याचे कार्यक्रम सादर झाले. ९ आणि १० जूनला पूर्वरंगाच्या निमित्तानं मुलुंड शाखेनं जणू एक मिनी संमेलनच भरवलं. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि संमेलनाच्या उपस्थितीची आमची धाकधूक थोडी कमी झाली. त्यात ऑर्डर दिल्यासारखी संमेलनाच्या तीनही दिवशी पावसानं Casual Leave टाकली. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांनीही संमेलनाला भरघोस दाद दिली. सुरुवातच हाउसफुल्लनी झाली. अर्थात ओपनिंग सचिन-सेहवागनीच केलं होतं.
तेरा तारखेला पहाटे पहिला कार्यक्रम मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारा अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’, हा हुकमी एक्का यशस्वी ठरला. आणि तिथून संमेलनाचा टोन सेट झाला. तो थेट सोळाला पहाटेच्या ‘सुखन’पर्यंत त्याचा क्रम वाढताच राहिला. ‘मराठी बाणा’ला कालिदासचं सभागृह तुडुंब भरलं होतं तर ‘सुखन’ या ओम बुधकरच्या उर्दू शेरोशायरी आणि कव्वालीच्या कार्यक्रमाला सभागृह ओसंडून वाहिलं. जितके प्रेक्षक आत होते, तेवढेच आत येण्याची धडपड करत होते. शेवटी त्यांच्यासाठी वेगळ्या सभागृहात टीव्हीची सोय करावी लागली. ९८व्या नाट्यसंमेलनाची ही पण एक खासीयत ठरली. कारण नेहमी दिंडीनं सुरू होणारं व समारोपाच्या कार्यक्रमानं संपन्न होणारं नाट्य संमेलन यंदा दिंडीच्या आधी ‘मराठी बाणा’च्या नांदीनं सुरू झालं आणि ‘सुखन’च्या कव्वालीनं संपन्न झालं.
चारशे लोककलावंतांच्या सहभागानं नटलेल्या दिंडीनं मुलुंडमध्ये संमेलनाचा माहोल वृद्धिंगत केला. खास उभारलेल्या सुधा करमरकर रंगमंचावर उद्घाटन सोहळा संपन्न झाला. नवीन कार्यकारणीने इथंही एक नवीन आणि स्वागतार्ह्य पायंडा पाडला. संमेलनाध्यक्षा, स्वागताध्यक्ष, उद्घाटक व दोन प्रमुख पाहुण्यांव्यतीरिक्त नाट्य परिषदेचे प्रतिनिधी म्हणून फक्त अध्यक्षच उपस्थित होते. रंगमंचावरील हा आटोपशीरपणा आपोआप त्या सोहळ्यातही झिरपला. सगळ्यांची भाषणं त्यामुळे आटोपशीर झाली. विविध पक्षाचे राजकारणी असून कार्यक्रमाचं निमित्त साधून कुठलेही ताणेबाणे कसले गेले नाहीत. नाटक आणि फक्त नाटक हाच विषय बोलला गेला. नाट्यपरिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी आणि नाट्य-निर्माता संघाचे प्रशांत दामले यांचा सत्कार करून नवीन कार्यकारिणीनं आपला ‘साथी हात बढाना’चा इरादा स्पष्ट केला. तर संमेलनाला खास निमंत्रित ख्यातनाम नाट्यदिग्दर्शिका विजयाबाई मेहता व सई परांजपे यांचाही सत्कार करून नव्यांना जुन्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, हेही उपस्थितांना जाणवून दिलं.
राजकारणात नाटक आणि नाटकात राजकारण या नेहमीच्या कोट्या करत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एक मुद्दा मात्र महत्त्वाचा मांडला की, संहितेबरोबर नाटकही मोठं होणं गरजेचं आहे. पुढे त्याच मुद्द्याचा विस्तार करताना ते म्हणाले की, मोठं म्हणजे त्याचं सादरीकरण भव्य असणं गरजेचं आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी हिंदीतील फिरोजखान दिग्दर्शित ‘मोगले आझम’चं दिलं. आता खरं तर प्रत्येक संहितेचं सादरीकरण इतकं भव्य होऊ शकत नाही, हे त्यांनाही माहीत असणारच. पण मुद्दा हा आहे की, नाटकात भव्यता आणताना त्याचं नाटकीय रूप मात्र कायम राखणं महत्त्वाचं असतं. असं म्हणतात ‘Theatre should be theatrical’. आज तंत्रज्ञान विकसित झालं म्हणून तुम्ही जर माध्यमांची सरमिसळ करू लागलात तर घोळ होऊ शकतो. कधीतरी प्रयोग म्हणून थिएटरमध्ये व्हिडिओचा वापर करणं आपण समजू शकतो. (खरं तर तो बऱ्याचदा नाईलाज म्हणून किंवा (वर उल्लेखलेल्या) भव्यतेच्या हव्यासापोटीही केला जातो.) पण नाटकात लेपलचा वापर करणारी सिरीअलमधील तरुण नटांची पिढी पाहिली की, वाटतं आपण नाटकाच्या जिवंतपणापासून दुरावतोय का?
जर एका संगीत नाटकाच्या प्रयोगानंतर हे जाहीर करावं लागत असेल, की त्यांनी ‘त्या नाटकात गाणी लाईव्ह म्हटली होती’ तर त्यात तंत्राची वा तंत्रज्ञाची सरशी होत असेलही, पण त्याचबरोबर नाटकाची पीछेहाट झालेली असते, हे आपल्याला कळत नसतं. नाटक, सिनेमासारखं होऊन त्याची भव्यता वाढत नसते. प्रत्येक माध्यमाची भव्यता वेगवेगळ्या रूपात आणायची असते, आणता येते. बाहेर रत्तन थिय्याम किंवा आपल्याकडे जब्बार पटेल सारख्यांना हे माहीत असल्यानेच त्यांच्या नाटकात ती (नाटकातील) भव्यता दिसून येते. काही अंशी ती नुकत्याच आलेल्या राजेश जोशी (हा गुजराथी रंगभूमीवरचा) दिग्दर्शित ‘कोडमंत्र’मध्ये दिसून आली.
अलीकडे पाहिलेल्या अशाच एका भव्य नाटकात तलवार उपसताना होत असलेला आवाज(?) सिनेमातल्या सिंक साऊंडसारखा वापरताना ऐकला होता. असले सिंक साऊंडचे प्रयोग नाटकात परिणामकारक तर होत नाहीतच, पण जर ते फसले (आणि ज्याची शक्यता जास्त असते.) तर ते रसभंगही करतात. तोच आवाज जर त्याच्या मनोवस्थेसाठी (म्हणजे एखाद्या पात्राला तलवार उपसावी असं वाटल्यानं, अथवा खूप राग आलेला आहे हे सांगायचं असेल तर) वापरला असता तर जास्त परिणामकारक ठरला असता. (पण हा जर-तरचा मुद्दा झाला. त्यामुळे तो valid होत नाही). तीच गत स्टेजवर दाखवलेल्या तलवार युद्धाची. ती नेहमीच हास्यास्पद वाटते. हुशार नाटककार तेव्हा दुसऱ्या जिवंत कलेचा वापर करतो. उदाहरणार्थ स्टेजवरचं तलवार युद्ध अनेकदा कथ्थक या नृत्य प्रकारात अथवा मार्शल आर्ट पद्धतीनं दाखवलं जातं. अर्थात त्यासाठी ते तुम्हाला नाटकात आधीच कुठेतरी पेरावंही लागतं. (हे झाले Theatre Craft).
राज ठाकरे यांच्या भाषणातील भव्यतेच्या मुद्द्यावर इथं विस्तृत लिहिण्याचं कारण हे की, असे काही मुद्दे शरद पवार, विनोद तावडे, संमेलन उद्घाटक व संमेलनाध्यक्षा यांच्या भाषणातही आले होते, ज्याच्यावर नाट्यसंमेलनात चर्चासत्र होणे गरजेचं होतं. पण चर्चासत्रांना गर्दी होत नाही या सरसकट भीतीनं या संमेलनात फक्त एकच चर्चासत्र ठेवण्यात आलं. ते हाउसफुल्ल झालं. पण चर्चेची फक्त हौस भागवणारं झालं. ‘सांस्कृतिक आबा-धुबी’ या त्याच्या सवंग नावाप्रमाणेच ते उथळ झालं. ती गर्दी हृषिकेश जोशी, जितेन्द्र जोशी, चिन्मय मांडलेकर सारख्या नटांसाठी होती का, या शंकेला वाव होता. पण आमच्यासारख्या तरुण आयोजकांना हाही एक धडा मिळाला की, अशी संमेलनं ही फक्त गर्दी जमवण्यासाठी नसून त्यातून रंगभूमीला काही दिशा मिळणं, तिची सद्यस्थिती कळणं, तिच्या सर्व घटकांच्या समस्यांचं आकलन होणं यासाठीही भरवली जावीत.
९८व्या नाट्यसंमेलनाला झालेल्या गर्दीची खासीयत ही होती की, त्यात तरुणांचा समावेश जास्त होता. त्यामुळे संमेलनाला एक सळाळता उत्साह दिसत होता. काही तरुणांनी सादर केलेल्या ‘प्लास्टिक’ या पर्यावरण विषयावरच्या पथनाट्यानं संमेलनाच्या माहोलमध्ये वेगळेच रंग भरले. जागोजागचे सेल्फी पॉइंट तरुणांना आकर्षित करत होते. गेल्या वर्षीच्या गाजलेल्या एकांकिकांच्या संमेलनातील प्रयोगांना अपेक्षेप्रमाणे तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळालाच, पण पंचरंगी पठ्ठे बापूराव, रंगबाजी, संगीतबारी, झाडीपट्टीतील नाटक, दंडार, दशावतार, नमन सारख्या सर्व लोककलांना सर्व थरातील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. रात्री-बेरात्री, अगदी मध्यरात्रीचे कार्यक्रमही जवळ-जवळ हाउसफुल्ल गेले. इतकंच काय तर प्रातःस्वर या संगीत कार्यक्रमालाही सभागृह तुडुंब भरलेलच होतं. आरलीन प्रोडक्शनच्या अंध कलाकारांनी सादर केलेल्या ‘अपूर्व मेघदूत’नं तर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. या सर्व कार्यक्रमांना मध्यवर्तीच्या कार्यकारणीतील सगळे उपस्थित होतेच, पण नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांनीही आपली हजेरी लावली होती.
Commercial Stall हे खरं तर कुठल्याही संमेलनाचं एक रेव्हेन्यू मोड्यूल असतं. पण पावसाच्या भीतीनं stall उभारले गेले नाहीत. आणि त्यामुळे उपस्थित रसिक प्रेक्षकांचा एक मोठा तोटा झाला. इतर stallची नाही, पण पुस्तकांच्या स्टॉलची मात्र उपस्थितांना खूप उणीव जाणवली.
उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच गो. ब. देवल पुरस्कार व समारोप सोहळाही उत्तम झाला. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत नाटकाचं कलादालन उभं करण्याची घोषणा केली. ज्याचा पाठपुरावा पुढे नाट्य परिषदेला घ्यावा लागेल. त्याचप्रमाणे ‘नटरंग’ या स्मरणिकेचं प्रकाशनही झालं. ज्याचं संपादकत्व माझ्याकडे होतं. स्मरणिकेच्या संपादकीयात मी म्हटल्याप्रमाणे ‘नटरंग’ हे २०१८ सालच्या नाट्य-सृष्टीचं दस्तऐवज ठरावं या उद्देशाने मी त्याचा मजकूर गोळा केला. आज महाराष्ट्रभरातून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून तो उद्देश काही अंशी सफल झाला असं मी म्हणेन. अर्थात त्यात काही त्रुटीही राहिल्या असतीलच. वेळेच्या व संपादक म्हणून (मी अशा प्रकारचं काम प्रथमच करत असल्यानं) माझ्यात असलेल्या मर्यादांमुळे त्या राहिल्यात याची नोंद घ्यावी.
९८व्या नाट्यसंमेलनाचं फलित काय? याचं उत्तर आज देणं कठीण आहे. पण उद्घाटन सोहळ्यात शरद पवारांनी जे भाषण केलं, त्यात ते म्हणाले होते की, ‘आजची बाल रंगभूमी ही उद्याची प्रायोगिक रंगभूमी आहे व आजची प्रायोगिक रंगभूमी ही उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहे’. या त्यांच्या वाक्याचा, आमची नाट्यपरिषद पुढच्या काळात किती गांभीर्यानं विचार करते, त्यावरच नजीकच्या व भविष्यातील नाट्यविश्वाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. नव्या जुन्या प्रायोगिक, बाल, संगीत नाट्यक्षेत्रातील अनेकांचे सत्कार करून त्यांची दखल घेऊन, नाट्यपरिषदेच्या नवीन कार्यकारिणीनं सुरुवात तरी उत्तम केली आहे. अविरत साठ तासांच्या या गाजलेल्या नाट्य-संमेलनानं कुठले विक्रम मोडले की नाही हे महत्त्वाचं नाही, पण नाट्यसृष्टीत एका नवीन उत्साहाचा संचार मात्र निर्माण केला. पुढची काही वर्षं तरी या संमेलनाबद्दल बोललं जाईल. दिमाखदार व यशस्वी ९८व्या नाट्यसंमेलनानं १००व्या नाट्यसंमेलनाची उत्सुकता निर्माण केली आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं या नवीन कार्यकारणीनं नाट्यसृष्टीत या निमित्तानं एक सौहार्दाचं वातावरण निर्माण केलं आहे, हेच या नाट्यसंमेलनाचं आज दिसणारं फलित आहे.
‘रंगवाचा’ या द्वैमासिकामधून साभार
.............................................................................................................................................
लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.
mahendrateredesai@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment