‘गोल्ड’ : अक्षयकुमार राष्ट्रवाद, देशप्रेम आदि गोष्टींना वाहिलेले चित्रपट का करतो?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘गोल्ड’ची पोस्टर्स
  • Sat , 18 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie गोल्ड Gold अक्षय कुमार Akshay Kumar रीमा कागती Reema Kagti

अक्षयकुमार राष्ट्रवाद, देशप्रेम आदि गोष्टींना वाहिलेले चित्रपट का करतो, हा प्रश्न जरा अप्रस्तुत आहे. राजकीय वरदहस्त कायम ठेवत सामान्य प्रेक्षकांचीही दाद मिळवावीशी वाटणं साहजिक आहे. अक्षयकुमारला ते लीलया जमतंही. ‘गोल्ड’ही काही वेगळा चित्रपट आहे अशातला भाग नाही. कारण शेवटी तो एक अक्षयकुमारचा चित्रपट आहे. दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असली तरीही आपल्याकडे फेस व्हॅल्यू शेवटी नायकालाच असते की!

तपन दास (अक्षय कुमार) हा भारतीय हॉकी टीमचा मॅनेजर आहे. १९३६ मधील एका ऑलिम्पिक मॅचदरम्यान सुरू झालेल्या ‘गोल्ड’चं लक्ष्य निश्चित असलं तरी दरम्यानचा प्रवास बऱ्याच वेगवेगळ्या टप्प्यांतून जातो. ब्रिटिश इंडियासाठी खूप खेळून झालं, आता स्वतंत्र भारतासाठी स्वतःचा संघ बनवून खेळायचं आणि गोल्ड मेडल मिळवायचं, असं साधारण ध्येय जवळपास सर्वच मध्यवर्ती पात्रांनी समोर ठेवलेलं असतं. 

मग दरम्यानच्या काळात महायुद्ध वगैरे गोष्टींमुळे पुढील ऑलिम्पिक स्पर्धा उगवायला थेट १९४८ मधील लंडन ऑलिम्पिक्सची वाट पहावी लागते. ज्याची पूर्वतयारी म्हणून १९४६ ला गेली दहा वर्षं स्पर्धेच्या घोषणेची वाट पाहणारा तपन दोन वर्षं आधीपासूनच स्पर्धेच्या तयारीला लागतो. ज्यात नंतर भारत-पाक फाळणीमुळे (तात्पुरता) व्यत्यय येतो. मग अपेक्षित वळणं घेत पुढे जाणाऱ्या ‘गोल्ड’चं मूलभूत कथानक नक्कीच रंजक आहे. त्यामुळे ते अक्षयकुमारनं निवडलं यात नवल नाही. मात्र मूळ समस्या निर्माण होते ती पटकथेच्या पातळीवर. ‘गोल्ड’ त्याचं विश्व उभं करायला गरजेहून अधिक काळ घेतो. ज्यामुळे तो काही काळाने थोडासा संथ वाटू लागतो. जी पटकथेच्या मांडणीमधील मुख्य उणीव आहे. चकाकणारी पीरियड फिल्म, देशप्रेम उफाळून आणणरी पैसा वसूल दृश्यं असा सगळा मामला असला तरी चित्रपट म्हणून काही वेगळे देण्यात ‘गोल्ड’ अयशस्वी ठरतो. 

कदाचित मॅनेजर तपनच्या मध्यवर्ती भूमिकेमुळे तसेच मूळ खेळापेक्षा त्यामागील राजकारण आणि इतर पैलूंमुळे पूर्वार्धात गोल्ड ‘मनीबॉल’ या बेसबॉलशी निगडीत एका प्रसिद्ध अमेरिकन चित्रपटाची आठवण करून देतो. तर पुढे जाऊन हॉकीच्या खेळाला अधिक वेळ दिल्यानं चित्रपट ‘स्पोर्ट्स फिल्म’ या प्रकाराला जागते. मात्र इथेही समस्या अशी की, सदर चित्रपट वेगवेगळ्या चित्रपटांची आठवण करून देण्याव्यतिरिक्त विशेष काही करत नाही. शिवाय उत्तरार्धही ‘चक दे!’सारख्या नावाजलेल्या चित्रपटाच्या कथानकाला समांतर तणावांतून जात असल्याने तोही विशेष प्रभावी ठरत नाहीच. शेवटाकडे जात असताना काहीसा तणाव जाणवत असला तरी पुढे काय होणार हे निश्चित असतं. तरीही थोड्याफार फरकानं देशप्रेमाची भावना जागृत करण्यात ‘गोल्ड’ यशस्वी ठरतो. पण शेवटी त्याचं चित्रपट म्हणून चांगलं असणं महत्त्वाचं की, संपूर्ण चित्रपटातील उणीवा शेवटी ‘दंगल’प्रमाणे अतिरिक्त राष्ट्रगीत वाजवून भावनिक साद घालणं महत्त्वाचं हा कळीचा मुद्दा आहे. 

अक्षयकुमार हा एक चांगला अभिनेता आहे. तो सातत्यानं चांगले चित्रपट समोर घेऊन येत असला तरी त्याच्या विषयाची निवड काहीशी चिंताजनक आहे. अर्थात ही बाब काही त्याविषयी तक्रार असू शकत नाही. शेवटी स्वतंत्र देशातील रहिवासी म्हणून त्यालाही स्वातंत्र्य तर आहेच. असो. अक्षयकुमारचा यातील बंगाली भाषेचा लहेजा खटकणारा असला तरी अलीकडील इतरही चित्रपटांमध्ये तो इतर सहाय्यक अभिनेत्यांना सप्रेस करण्याऐवजी त्यांचं महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या दृश्यापुरतं त्यांना बॅटिंग करू देतो. जे अधिक योग्य ठरतं. इथंही अमित साध, विनीत कुमार सिंह, कुणाल कपूर, सनी कौशल, अतुल काळे या लोकांना त्या त्या दृश्यांमध्ये पुढे चमकू देतो. आपला चार्म बाजूला ठेवत अतुल काळेच्या पाया पडण्यासारखी दृश्यंही तो करतो हे विशेष. याच गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतात. बाकी मौनी रॉय फक्त दिसते चांगली! 

लक्षात न राहणाऱ्या कुठल्याशा एका प्रेमगीताचा अपवाद वगळता जावेद अख्तर यांनी गाणीही विशेष अडथळा ठरत नाहीत. अल्वरो गतिएरेज यावेळीही त्याच्या कॅमेऱ्याची जादू करतो. ज्यामुळे या ठीकठाक म्हणाव्याशा पीरियॉडिक चित्रपटाला अधिक सुंदर छटा लाभते. 

दिग्दर्शक रीमा कागतीची मांडणी चांगली असली तरी लेखनातील दोष, इतर चित्रपटांतील दृश्यांचं पुनर्निर्माण करणारी दृश्यं, इत्यादी गोष्टी हा चित्रपट तिचा, दिग्दर्शकाचा न बनवता आधी उल्लेख केल्याप्रमाणे केवळ कुमार अँड गँगचा बनवतात. जिथं अभिनेत्यांची टीम तगडी असली तरी दिग्दर्शकीय कौशल्य आणि पटकथेतील सफाईदारपणाचा अभाव यांच्यामुळे ‘गोल्ड’ केवळ एक इमोशनल अत्याचार बनतो. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख