‘सत्यमेव जयते’ : देशप्रेमाचे उमाळे! 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘सत्यमेव जयते’चं एक पोस्टर
  • Thu , 16 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie सत्यमेव जयते Satyameva Jayate जॉन अब्राहम John Abraham मनोज वाजपेयी Manoj Bajpayee

काही चित्रपट असे असतात की, जे सुरू होताच ते किती वाईट असणार आहेत याची कल्पना येते. ‘सत्यमेव जयते’नं त्याची पुनरावृत्ती होते इतकंच. कारण हा भयावह चित्रपट आहे. याला ‘सो बॅड इट्स गुड’ असंही म्हणता येईल की नाही, याची शंका आहे. 

वीर (जॉन अब्राहम) हा पोलिस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याच्या मोहिमेवर असतो. (जी काही कारणानं फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे. नंतर विस्तार करायचा असावा.) तर त्याला थांबवण्याच्या उद्देशानं शिवांश राठोड (मनोज बाजपेयी) या स्टार-कॉपला सुट्टीवरून बोलावून घेतलं जातं. राठोड हा प्रामाणिक, लाच न घेणारा अधिकारी असल्यानं (अर्थातच) तो या कामगिरीसाठी उत्तम असतो. मात्र वीरला (म्हणजे पोलिसांना जिवंत जाळणाऱ्या आपल्या ‘नायका’ला!) निर्दोष, निष्पाप लोकांना काहीही करायचं नसल्यानं तो राठोडला या केसपासून दूर राहायचा सल्ला देतो. 

तर एकूण असा सगळा कथानकाचा भाग आहे. याला पाया किंवा गाभा म्हणता येणं शक्य नाही. कारण हा मुळातच पोकळ, दिखाऊ भाग सध्याच्या अतिरेकी राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्या काळात, ‘१५ ऑगस्ट’च्या निमित्तानं लोकांमध्ये ‘देशभक्ती’पर भावना निर्माण करण्यासाठी एकत्र बांधायचा असफल प्रयत्न आहे. 

असफल यासाठी की, अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करण्याचे अनेक सफल प्रयत्न झाले आहेत. तेही कुठलाही (तथाकथित) राष्ट्रवादी विचार मनात न ठेवता. ज्याची दोन उत्तम उदाहरणं म्हणजे ‘दबंग’ आणि ‘सिंघम’. वरील दोन्ही चित्रपट समकालीन व्यवस्थेवर ‘सिनेमॅटिक’ प्रकारे बोलणारे होते. ज्यात काही त्रुटी असल्या तरी तितकीच चांगली पटकथादेखील होती. शिवाय (गाड्या उडवण्याचा वगैरे अपवाद वगळता) बहुतांशी दृश्यं काही प्रमाणात संवेदनशील असल्यानं त्यातील अतिशयोक्तीकडे दिग्दर्शकीय आणि चित्रपट माध्यमाच्या स्वातंत्र्याचा उपभोग म्हणून दुर्लक्ष करता येणं शक्य आहे. इथं मात्र एकाच वेळी अतिशयोक्तीपूर्ण आणि निर्बुद्ध दृश्यं समोर घडत असल्यानं कुठल्याही अर्थानं दोन्हींचा समतोल साधला जात नाही. परिणामी ती ‘सिनेमॅटिक’ न ठरता ‘बी-ग्रेड’ सिनेमांसारखी आउटडेटेड ‘फिल्मी’ ठरतात. 

मुळात अशा चित्रपटांमध्ये लॉजिकल किंवा दृश्य-संलग्नतेच्या चुका काढणं टाळलेलंच बरं. मात्र जेव्हा नायक भ्रष्ट अधिकाऱ्याला जाळण्याआधी त्याच्या घरातील ‘हराम का पैसा’ असलेल्या नोटा जाळतो, तेव्हा संपूर्ण स्क्रीनभर ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’ आणि ‘पाँच सौ कुपन्स’ लिहिलेलं असतं, तेव्हा याकडे दुर्लक्ष का करावं? कारण यात प्रेक्षकाला गृहित धरून त्याला काहीही दाखवावं, असा आविर्भाव दिसून येतो.

याखेरीज चित्रपट भौतिकशास्त्र आणि आर्म्सचा अभ्यासही नीट करत नाहीच. (ज्याची अपेक्षा तरी एखाद्या ‘व्यावसायिक’ चित्रपटाकडून का ठेवावी म्हणा!) ज्यामुळे नायक टायर अक्षरशः टराटरा फाडतो, लोड न केलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडतो. थोडक्यात अशक्य ते सर्व करतो. फक्त समस्या अशी आहे की, ऐंशी किंवा नव्वदचं दशक नाही व रटाळ बी-ग्रेडी चित्रपट खपवून घ्यावा इतके वाईट दिवस चित्रपट या माध्यमाला आलेले नाहीत. 

यावर भर म्हणून चित्रपटात (फक्त लेखक-दिग्दर्शकाला) अशक्यप्राय वाटणारा ट्विस्ट आहे. जो याआधीही बऱ्याच चित्रपटांत दिसून आला आहे. एखाद्या लेखक-दिग्दर्शकानं आणि परिणामी चित्रपटानं स्वतःला फारच गंभीर काहीतरी करत असल्याचं समजत शक्य तितकी वाईट कामगिरी करण्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही. 

‘परमाणु’पासून अब्राहमला अक्षय कुमारप्रमाणे देशप्रेमाचे उमाळे येऊ लागले आहेत. फक्त त्यानं एक बाब लक्षात घेतलेली नाही, ती म्हणजे कुमार हा त्याच्यापेक्षा जास्त चांगला अभिनेता आहे. शिवाय तो त्याच्याकडील ‘हिरॉइक चार्म’ बाजूला ठेवू शकतो. ज्यामुळे तो एखाद्या पात्राच्या निर्मितीचा केवळ आभास निर्माण न करता ते पात्र अधिकाधिक खरंखुरं ठरण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो. ज्यात एखाददुसरा भाषेचा लहेजा किंवा तत्सम बाह्य गोष्टींचा अपवाद वगळता अन्य बाबीत यशस्वीही ठरतो. जे मानसिक आणि शारिरीक बदल करणं आणि त्यांना हवं तेव्हा घालवणं अब्राहमला शक्य नाही. 

याउलट मनोज बाजपेयी हा नक्कीच उजवा आणि उत्तम अभिनेता आहे. मात्र त्यालाही जोवर चांगलं दिग्दर्शन लाभतं नाही, तोवर तो विशेष काही करू शकत नाही. ज्यासाठी ‘अय्यारी’, ‘बागी २’, या त्याच्या अलीकडील चित्रपटांतील कामगिरीकडे पाहता येतं. एकीकडे मनोजला गुरू मानणारे नवाजसारखे लोक (‘मुन्ना मायकल’सारखे अपवाद वगळता) एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स देत असताना अलीकडील काळातील मनोजची कामगिरी निराश करणारी आहे. पण पुन्हा who doesn't love a paycheck. 

बाकी ‘दिलबर दिलबर’ गाण्यातील स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन आदि मुद्दे देशप्रेमाच्या उमाळ्यांआड दुर्लक्षित राहतील. कारण देशप्रेम महत्त्वाचं. महिला सबलीकरण करण्यासाठी इंडी फिल्म्स आहेत. त्याची अपेक्षा व्यावसायिक चित्रपटांकडून का ठेवावी? तसंही या चित्रपटात स्त्रियांना वाचवण्यासाठी नायकाला स्वतःचे कपडे फाडून खलनायकी प्रवृत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे ‘नायक’ अब्राहमचं चकाकणारं शरीर आणि ‘दिलबर’मधील ‘आयटम गर्ल’चं चकाकणारं शरीर, हे एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करतात. 

बाकी सेन्सॉर बोर्ड कमालीचं दांभिक आहे. कश्यप, टॅरंटिनोसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांवर बंदी आणत, त्यातील अतिरिक्त हिंसेचा निषेध करत अश्मयुगीन संस्कारांचा जप करणाऱ्या तथाकथित समाजकंटकांनी आणि सेन्सॉर बोर्डानं इथं मात्र लोकांना जाळणाऱ्या टुकार दृश्यांकडे दुर्लक्ष केलं आहे.

बाकी सदर चित्रपटाचा दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी, रेमो डि’सुझा (दिग्द. रेस ३) इत्यादी दिग्दर्शक लोक बॉलिवुड चित्रपटांना निर्बुद्ध करण्याच्या तयारीनं दिग्दर्शन करत आहेत. ज्यामुळे कधीही स्थिर न होणारा कॅमेरा जो ‘ला ला लँड’च्या सिनेमॅटोग्राफरला लाजवेल; श्रेयनामावली ‘नार्कोज’ला मागे टाकेल; ‘५६ इंच की छाती’, ‘अच्छे दिन तो आ गये’, ‘पाटील हो या कादरी, सबकी एक बिरादरी’सारख्या (‘हेट स्टोरी ४’ची आठवण करून देणाऱ्या) संवादांमुळे ‘टॅरंटिनो’ला लाजवेल अशा प्रकारचा चित्रपट पुन्हा होणे नाही. हे वर्ष ट्रॅशी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी नक्कीच आशादायी असलं तरी इतरांसाठी पूर्णतः बंडल आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख