‘ब्रिज मोहन अमर रहे!’ : सदोष तरीही मनोरंजक चित्रपट 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘ब्रिज मोहन अमर रहे!’चं पोस्टर
  • Sat , 11 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie ब्रिज मोहन अमर रहे Brij Mohan Amar Rahe नेटफ्लिक्स Netflix

दक्षिण आशियाई भागामध्ये आपल्या ऑनलाईन स्ट्रीमिंग नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’नं कंबर कसली आहे. येत्या काही काळात येऊ घातलेले ‘नेटफ्लिक्स ओरिजनल’ चित्रपट आणि ‘घौल’, ‘बाहुबली : बीफॉर द बिगनिंग’, तसंच इतरही बरेच प्रकल्प पाहता भारतीय प्रेक्षकाला दर्जेदार कंटेंटची कमी भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. ‘ब्रिज मोहन अमर रहे!’च्या निमित्तानं एक संमिश्र प्रतिक्रिया अपेक्षित असलेला रंजक चित्रपट देण्यात ‘नेटफ्लिक्स’ यशस्वी झालं आहे. 

ब्रिज मोहन (अर्जुन माथुर) हा दिल्लीतील एक लाँजरी (स्त्रियांची अंतर्वस्त्रं) स्टोअरचा मालक आहे. त्या छोटेखानी दुकानातून मिळणारं उत्पन्न त्याला पुरत नाहीये. ज्यामुळे अनेक बँकांकडून घेतलेलं कर्ज, इतर स्थानिक सावकारांकडून घेतलेले पैसे, अशा अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात समस्या निर्माण करत करतात. तर त्याची पत्नी, स्वीटीला (निधी सिंग) स्वतःचं वजन घटवण्यासाठी कुठल्याशा कंपनीत पैसे गुंतवायचे असतात. 

दरम्यान त्याला एका व्यापाऱ्यानं न विकल्या जाणाऱ्या स्टॉकमधील माल विकून फसवलेलं असतं. ज्यामुळे त्याच्या अंगावर रघु भाईचे (सनी हिंदुजा) पंचवीस लाख रुपयांचं अधिकचं कर्ज होतं. या सर्व गोष्टींच्या एकत्रित आणि अतिशयोक्तीपूर्ण परिणामांतून निर्माण झालेल्या हास्यास्पद (चांगल्या आणि वाईट दोन्हीही अर्थांनी) प्रसंगांतून ब्रिज मोहनवर स्वतःच्याच खुनाचा आरोप केला जातो. त्याचीच गोष्ट म्हणजे ‘ब्रिज मोहन अमर रहे!’ 

सदर चित्रपटातील मुख्य समस्या म्हणजे चित्रपटाच्या मांडणीमध्ये बरेच बदल जाणवतात. जे पटकथेच्या पातळीवर अधिक आहेत. चित्रपटाचं मूळ कथानक कागदावर उतरवत असताना उत्तम वाटत असलं तरी दृश्य स्वरूपात दिसताना त्यात अनेक बदल घडतात, जे काही प्रमाणात अपेक्षित असतं. इथं मात्र ते बदल खटकतात. कारण चित्रपटातील पात्रं आणि त्यांचा भोवताल यांच्यात आकस्मिक बदल घडतात. ज्याची कारणं स्पष्ट केली जात नाहीत. त्यामुळे ही आकस्मिकता नकारात्मक परिणाम करणारी ठरते. 

याखेरीज बऱ्याच घटना केवळ लहान, स्वतंत्र स्किट्स म्हणून ठीक वाटतात. मात्र एकसंध पटकथा म्हणून विचार करता त्या काहीशा असंबद्ध वाटतात. शिवाय काही पात्रं अनावश्यक ठरतात. कारण त्यांना कथेत मूलतः काही हेतू असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचं अस्तित्वच अपरिणामकारक ठरतं. ज्याचं मुख्य उदाहरण म्हणजे ब्रिजचे आजोबा. कारण चित्रपटभर काहीच न करणाऱ्या या पात्राची उत्पत्ती केवळ काही विनोदांपोटी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

चित्रपट त्याचं विश्व उभं करायला काहीसा वेळ घेतो. कारण सुरुवातीला पटकथेवर पकड सैल असल्यानं त्यात तितकीशी गुंतवणूक होत नाही. मात्र उत्तरार्धात आणि त्यातही पुन्हा थर्ड अॅक्टमध्ये चित्रपट अधिक वेगानं पुढे जाऊ लागतो. त्यातील अतिशयोक्तीपूर्ण, गडद छटा असलेलं विश्व जेव्हा वास्तवावर, पोलिस यंत्रणा आणि न्यायालयीन कामकाजावर तीव्र ताशेरे ओढू लागतं, तेव्हा एक कलाकृती म्हणून हा चित्रपट प्रभावी ठरतो. 

मुख्य भूमिकांमधील जवळपास सर्वच अभिनेत्यांची ‘ओव्हर द टॉप’ कामं योग्य वाटतात. मात्र सर्वांत जास्त परिणामकारक कुणी ठरत असेल तर ते म्हणजे जज सिन्हा (योगेंद्र टिकू) हे पात्र. ‘परमाणु’सारख्या सर्वसामान्य चित्रपटातही टिकू त्यांच्या हास्यास्पद प्रकारे लिहिलेल्या पात्राच्या अनुषंगानंही लक्षात राहतात. जी कायमच सहाय्यक भूमिकांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याची खासीयत राहिलेली आहे. त्यानिमित्तानं ‘कोर्ट’मधील जज सदावर्ते आणि ‘जॉली एलएलबी’तील जस्टिस त्रिपाठीनंतर लक्षात राहिल, असा न्यायाधीश चित्रपटात दिसून आला आहे. 

ब्लॅक कॉमेडी प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारे वर्क होऊ शकते किंवा फसलेली वाटू शकते. त्यामुळे ‘ब्रिज मोहन अमर रहे!’बाबतीतही संमिश्र प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. कारण एकीकडे यावर ‘कोएन ब्रदर्स’च्या डार्क कॉमेडी चित्रपटांचा न पुसता येणारा प्रभाव आहे. ज्यांच्या फिल्मोग्राफीत फार्गो, बर्न आफ्टर रीडिंगसारख्या क्लासिक चित्रपटांचा समावेश आहे. तर दुसरीकडे यात बरेचसे प्लॉट होल्स आहेत. अर्थात त्यांच्याकडे रंजक दृश्यांच्या गदारोळात दुर्लक्ष करता येणं शक्य आहे. 

एकूणच ‘ब्रिज मोहन अमर रहे!’ एका सदोष पटकथेपेक्षा मुख्य कलाकारांचा अभिनय आणि शेवटचा तगडा भाग यांवर अवलंबून आहे. तो सदोष असला तरी त्यातील विनोदाच्या माध्यमातून येणाऱ्या तीव्र वास्तववादी, व्यवस्थेवर ताशेरे ओढणाऱ्या दृश्यांच्या उपकरणामुळे वाखाणण्याजोगा आहे. बॉलिवुडमधील या वर्षातील ब्लॅक कॉमेडी चित्रपट पाहता हे वर्ष या प्रकारातील चित्रपटांसाठी चांगली लाइमलाईट घेऊन आल्याचं दिसतं. ‘ब्लॅकमेल’, ‘कालाकांडी’नंतर आता हाही या रांगेत स्थान मिळवतो आहे. 

टीप - ‘ब्रिज मोहन अमर रहे!’ हा चित्रपट ३ ऑगस्ट रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ऑनलाईन स्ट्रीमिंग नेटवर्कवर प्रदर्शित झाला आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......