अजूनकाही
या जगात चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत. अनेकदा वाईट गोष्टी चांगल्या गोष्टींवर मात करतात. मानवी स्वभावाचंही तसंच आहे. अनेक वेळा वाईट स्वभावाची माणसं चांगल्या स्वभावाच्या माणसांची फसवणूक करून पुढे जाताना दिसतात. सध्याच्या काळात तर ‘फसवणूक’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्याचं दिसून येतं. फसवणूक केल्याशिवाय कोणाचीही जणू प्रगतीच होत नाही! परंतु दुसऱ्या माणसाची फसवणूक करताना स्वतःचं मन निगरगट्ट करण्याची गरज असते. तसंच फसवणूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारीही ठेवावी लागते. मात्र अशी फसवणूक करताना स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी जागी झाली तर काय होतं? मग कधी ती स्वतःचीच फसवणूक ठरू शकते आणि आपली वाट चुकल्याची हुरहूर लागून राहते. आणि कदाचित त्यातून चांगल्या रस्त्याची वाटही सापडू शकते.
‘चुंबक’ या नवीन मराठी चित्रपटात नेमकं हेच अतिशय साध्या-सोप्या शैलीत सांगितलं आहे. ही कलाकृती ‘शंभर नंबरी’ असल्यानं ती चुंबकाप्रमाणेच आकर्षित करून घेणारी ठरली आहे. अतिशय साधी, पण सकस कथा हे या चित्रपटाचं चुंबकीय आकर्षण आहे आणि ते शेवटपर्यंत कायम ठेवण्यात दिग्दर्शक संदीप मोदी यांना चांगलं यश मिळालं आहे.
यामध्ये उराशी एक स्वप्न बाळगून जगणाऱ्या बाळू या मुलाची कथा आहे. आपल्या गावाकडच्या बसस्टॅण्डवर स्वतःचं रसवंती गृह सुरू करावं असं बाळूचं स्वप्न असतं. त्यासाठी लागणारे २० हजार रुपये मिळवण्यासाठी म्हणून तो मुंबईत येतो आणि एका हॉटेलमध्ये कामाला लागतो. इथं त्याला ‘डिस्को’ नावाचा मित्र भेटतो. हा मित्र मुंबईत टक्केटोणपे खाऊन चांगला तयार झालेला असतो. (आधुनिक भाषेत तो ‘ओव्हर स्मार्ट’ असतो!) स्वतःच्या फायद्यासाठी त्याची काहीही करण्याची तयारी असते.
हॉटेलमध्ये काम करून बाळूकडे जमा झालेले आठ हजार रुपये दुप्पट करण्याच्या नादात त्याची फसवणूक होते आणि ते आठ हजारही तो घालवून बसतो. त्यामुळे तो हवालदिल होतो. त्यावेळी डिस्को त्याला, !तुही अशीच दुसऱ्याची फसवणूक करून वीस हजार रुपये मिळव’ असा सल्ला देतो. त्यानंतर दोघंही बनावट लॉटरीचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याचं ठरवतात. आरबीआयकडून एक कोटीची लॉटरी लागल्याचा एसएमएस बाळू काही लोकांना पाठवतो आणि त्यामध्ये प्रसन्न ठोंबरे नावाचा मासा त्यांच्या गळाला लागतो.
अर्थात प्रत्यक्षात जेव्हा प्रसन्न ठोंबरे लॉटरीच्या रकमेसाठी अनामत म्हणून लागणारे वीस हजार रुपये देण्यासाठी येतो, तेव्हा त्याच्याकडे पाहून बाळू पैसे घेण्यास कचरतो, कारण ‘गतिमंद’ असलेला प्रसन्न ठोंबरे हा वेंधळा माणूस आहे, हे बाळूच्या लगेच लक्षात येतं. अशा माणसाची आपण फसवणूक करू नये, असं त्याचं मन त्याला सांगतं. मात्र, उलट ‘अशा माणसाचीच तू फसवणूक केलीस तर तुलाच पुढे त्रास होणार नाही’ असं डिस्को त्याला सांगतो आणि त्याच्याकडून वीस हजार घेण्यास त्याला भरीस पाडतो. आणि बाळूही प्रसन्नकडून ते पैसे (आठ हजार रुपये आणि उरलेले पैसे म्हणून त्याची सोन्याची चेन) घेतो.
ते पैसे घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो गावाकडे तो परततो. मात्र बसमध्ये पुन्हा एकदा त्याची सद्सद्विवेकबुद्धी जागी होते आणि तो पुन्हा मुंबईस परततो. त्याची पुन्हा प्रसन्नशी गाठ पडते आणि दोघंही भावनिकदृष्ट्या चुंबकाप्रमाणे एकमेकांकडे आकर्षिले जातात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास कसा सुरू होतो आणि कोठे संपतो, बाळूचं स्वप्न अखेर पूर्ण होतं की नाही? यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
छोटे छोटे पण मार्मिक संवाद ही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. विशेषतः डिस्कोच्या तोंडी असलेले संवाद. ते सध्याच्या जगाच्या रीतीभाती सहज सांगून जातात. तसंच बाळू आणि प्रसन्न यांच्या प्रवासातील छोटे छोटे गमतीदार प्रसंगही बरंच काही शिकवून जातात. बस स्टॅन्डजवळील एटीएममध्ये झोपण्यासाठी म्हणून गेल्यानंतर प्रसन्न जे स्वगत बोलतो, त्यातून त्याची खरी ओळख तर होतेच, पण जीवनाचं वास्तवही सांगून जाते. शेवटचा प्रसंगातही बाळूच्या तोंडी असलेला संवाद या चित्रपटाचं सार आहे. मुख्य म्हणजे पडद्यावर कथा ओघवती ठेवण्यात आल्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते.
सर्वांत कमाल केली आहे, ती या चित्रपटातील मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांनी. बाळू झालेला साहिल जाधव आणि डिस्कोची भूमिका करणारा संग्राम देसाई, या दोघांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी आपापल्या भूमिका सहजतेनं केल्या आहेत. त्यांच्या अभिनयाला दाद दिलीच पाहिजे. मात्र त्याच्याहीपेक्षा जास्त लक्षात राहतो तो स्वानंद किरकिरे यांनी रंगवलेला प्रसन्न ठोंबरे. ही व्यक्तिरेखा त्यांनी खूपच उत्कटतेनं साकार केली आहे. विभावरी देशपांडे याही छोट्याश्या भूमिकेत छान चमकून गेल्या आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूही उत्तम आहेत.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment