‘साहेब, बीवी और गँगस्टर ३’ : और कितने सिक्वेल, धूलियाजी?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘साहेब, बीवी और गँगस्टर ३’चं पोस्टर
  • Sat , 28 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie साहेब बीवी और गँगस्टर ३ Saheb Biwi Aur Gangster 3 तिग्मांशू धूलिया Tigmanshu Dhulia

‘कितने आदमी थे?’ हा संवाद भारतीय सिनेमातील सर्वांत परिचित व कदाचित त्यानंतर सर्वाधिक वेळा वापरला गेलेला संवाद असेल. कधी विनोदानं तर कधी खरोखरीच गांभीर्यानं. त्या संवादातून जसा कर्दनकाळ गब्बरसिंग पाठीतून जाणारी थंड कळ निर्माण करतो, तसंच कालिया व त्याच्या साथीदारांना मारण्यासाठी त्यानं रशियन रुलेट या खेळाचा केलेला वापरही. रिव्हॉल्वरच्या एका खान्यात एक गोळी ठेवून त्याचं सिलेंडर फिरवून ते मस्तकावर ठेवून ट्रिगर दाबणं, जेणेकरून एक तर तो मरेल किंवा जिवंत राहिल. आयुष्याला नशिबाच्या हवाली करणारा हा जीवघेणा खेळ मात्र सलीम-जावेद-सिप्पी-अमजद-बर्मन या पांडवांनी ‘शोले’मध्ये अविस्मरणीय करून ठेवलाय. तिग्मांशू धूलिया त्याच खेळाचा वापर प्लॉट डिवाईस म्हणून करताना मात्र त्याचा वापर म्हणावा तितका योग्यपणे करत नाहीत हेच म्हणावं लागेल.

आदित्य प्रताप सिंग उर्फ साहेब (जिमी शेरगील) हा जेलमध्ये असतो. त्याच्या धूर्त व मादक बायको माधवी देवी उर्फ बीवीमुळे (माही गिल) जेलमध्ये सडत असतो. त्याचे बाहेर यायचे प्रयत्न असफल ठरतात. त्याला त्याच्या पूर्वाश्रमीचा एकनिष्ठ नोकर कन्हैया (दीपराज राणा) व त्याची तंत्रज्ञानायुक्त मुलगी (पामेला भूतोरीया) यांच्याकडून मदत मिळते.

दुसऱ्या एका कुटुंबातील उदय प्रताप सिंग उर्फ गँगस्टर (?) (संजय दत्त) हा लंडनमध्ये गेल्या वीस वर्षांपासून राहत असतो. त्याचा हाऊस ऑफ लॉर्डस नावाचा क्लब असतो. त्याची प्रेयसी जी त्याची रखेलही आहे सुहानी (चित्रांगदा सिंग) इथं त्याच्या सावत्र भावाला विजयला (दीपक तिजोरी) ‘मैं कोठे पे नाचनेवाली नहीं हूँ’ असं ठणकावून सांगते. त्याच्या मनात मात्र उदयबद्दल तिरस्कार राहतो तो कायमचा. माधवी देवी आदित्य बाहेर आल्यामुळे चिंतित असते. ती सुट्ट्या घालवण्यासाठी लंडनला जाते. तिथं तिची गाठ उदयशी पडते. पण त्याच रात्री क्लबमध्ये एका इंग्रजानं केलेला अपमान सहन न होऊन तो त्याची छुट्टी करतो. परिणामी त्याच्यावर जेलमध्ये जायची पाळी येते. सर्वस्व गमावलेला उदय जेलमधून सुटून भारतात यायला निघतो, तेव्हा त्याची गाठ परत एकदा माधवीशी पडते.

तिग्मांशू धूलियानी सात वर्षांपूर्वी ‘साहेब, बीवी व गँगस्टर’ हा सिनेमा केला, तेव्हा त्यातील एकाच वेळी रोमान्स व थ्रिलरच्या मिश्रणासाठी नावाजला गेला. लगेचच आलेल्या त्याच्या सिक्वेलनं राजघराण्याच्या पार्श्वभूमीवर चालणारी साहेब-बीवी अर्थात आदित्य-माधवीमधला उंदिर-मांजराचा खेळ आवर्जून बघितला. मागच्या वर्षी आलेला ‘राग देस’ आणि हा पाच वर्षांनंतर आलेला मालिकेतला पुढील भाग मात्र म्हणावा तितका प्रभावी नाही. प्रभावी नसण्याचं कारण कदाचित पहिल्या दोन भागांना मिळालेला अनपेक्षित सकारात्मक प्रतिसाद त्यांना याची कथा लिहिण्यासाठी उद्युक्त करणारा असावा. तसंच आदित्य-माधवी ही पात्रं प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत, तर त्याचा फायदा उठवावा या उद्देशानंदेखील.

दुर्दैवानं पटकथाकार संजय चौहान व स्वतः धूलिया कथेत दोष तर मुबलक ठेवतात. वरतून पात्रांची रचना द्विमितीत करतात. माधवी-आदित्य हे कोण व कसे आहेत हे पहिले दोन भाग बघितलेल्यांना माहीत आहे. ते एकमेकांना कमालीचे पूरक आहेत. खरं तर त्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या मानसिकेतेचे बळी त्यांच्या भोवतालची मंडळी ठरतात. तरीही त्यांचे संबंध पुरेसे गहिरे नाहीत. त्यांना फक्त तात्पुरता स्वार्थ दिसत असतो. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते.

इथंच धूलिया रशियन रुलेट या खेळाचा वापर प्लॉट डिवाईस म्हणून करतात. हा वापर का केला याचं उत्तर विश्वासनीय नाही. सिनेमात अगदी सुरुवातीलाच त्याचं एक स्पष्टीकरण ‘रजवाड़ों के शौक’ सबबीखाली दिलं जातं. अशा पद्धतीचा खेळ कोणत्या राजघराण्याची शान होता याचा शोध घ्यावा लागेल.

ते काहीही असलं तरी हिंदी सिनेमात कथेत जेव्हा स्वार्थ, पैसा, खूनखराबा वगैरे बाबी अंतर्भूत करण्यात येतात, तेव्हा पटकथा रचताना एक परिचित रचना केली जाते. पटकथेचे सरळसरळ दोन भाग असतात. पहिल्या भागात कथेची चौकट तयार केली जाते. पात्रांची ओळख, त्यांचे स्वभाव, पार्श्वभूमी वगैरे दाखवली जाते. एकमेकांशी लढणारे कोण हे स्पष्ट केलं जातं. त्यात थोडासा रोमांस, थोडासा गुस्सा, डायलॉगबाजी केली जाते. मग एका क्लिफहँगरसारख्या क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा मध्यंतर ठेवला जातो.

मध्यंतरानंतर मग कळसाध्याय साधणाऱ्यास शेवटाकडे वाटचाल केली जाते. कथेचे असे दोन स्पष्ट भाग केल्यामुळे प्रेक्षकांना आपण काय पाहतोय याचा पत्ता असतो. उगाच कथेतील संमिश्रता, विचार करायला लावणारे प्रसंग नसल्यामुळे त्यालाही काहीतरी भारी बघितल्याचा व पैसे वसूल झाल्याची भावना बळावते.

हा सिनेमा पण यासारख्या इतर असंख्य उदाहरणांसारखा अपवाद नसणारा. धूलियांची खरी परीक्षा होती रशियन रुलेटच्या प्रभावी वापराची. ते त्याचा वापर फक्त प्रसंगातला तणाव वाढवण्यासाठी करतात ना की, पात्रांच्या आयुष्याचा खेळ करण्यासाठी. ‘शोले’मधील याचा वापर आजही लक्षात राहणारा ठरतो तो त्यामुळेच.

यातला न आवडलेला भाग म्हणजे ‘लग जा गले’ या गाण्याचं केलेलं रीमिक्स. याआधी पण ‘बॉम्बे’मधल्या ‘हम्मा’, ‘थानेदार’मधल्या ‘तम्मा तम्मा लोगे’ गाण्यांचं रीमिक्स करून सिनेमात वापरलेले आहेत. ही गाणी जी आली ती त्यांचा काळानुसार गोडवा घेऊन. कदाचित ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणं ‘लग जा गले’च्या दर्जाचं नसेलही, पण नव्वदच्या दशकातल्या पिढीला ते आपलसं वाटणारं गाणं होतं. ‘वो कौन थी’मध्ये कथेत मिसळून गेलेली त्याची सर्वच गाणी त्याच्या रहस्यमयतेत भरच घालणारी होती. इथं ते कमालीचं उपरं ठरतं.

मूळ गाण्याचं प्रेयसीनं प्रियकराला केलेलं आवाहन, त्यानंतर कायमस्वरूपी येणारा जीवघेणा दुरावा आणि अंतिम भेटीच्या आठवणी दीर्घकाळ टिकण्यासाठी राहावा यासाठी केलेलं असतं. इथं ते फक्त एक गाणं इतकंच राहतं. त्या पाठीमागची गोड, मनाला हुरहूर लावणारी भावना संजय दत्त वा चित्रांगदा सिंगच्या ना डोळ्यात दिसते ना चेहऱ्यावर. खरं तर हा दोष दिग्दर्शकाचा आहे. त्यांनी एका अजरामर गाण्याला सजवलेला रीमिक्सचा साज फक्त साजच राहतो तो ही भावनाहीन. आजच्या काळाला साजेशी गीत लिहिणारे वरुण ग्रोवर, इर्शाद कामिल, अमिताभ भट्टाचार्य वगैरे गीतकार असताना रीमिक्सचा वापर करणं कोणत्या उद्देशानं असा प्रश्न निर्माण करणारं आहे. इतर गाण्यात ‘केसरिया जुगनी’ हे गाणं बरं आहे, पण त्याचा वापर आयटम साँग म्हणून होतो.

तिग्मांशू धूलिया-जिमी शेरगील ही जोडी धूलियाच्या पहिल्या सिनेमापासून हासिलपासून सोबत आहे. त्यामुळे शेरगील आदित्यच्या भूमिकेत राजघराण्याची आब जितक्या उत्तमपणे दाखवतो, तेवढी खर्जातल्या आवाजातले कबीर बेदी दाखवू शकत नाहीत. त्यांच्याकडे राजघराणातल्या धिप्पाड पुरुषांची देहयष्टी लाभलीय, पण मुळातच त्रोटक भूमिकेत ते प्रभाव पाडू शकत नाहीत. इतर अभिनेत्यांमध्ये माही गिलनी धूर्त व मादक बायको चांगली उभी केलीय. खासकरून कायिक अभिनयाचा वापर ती छान करते. चित्रांगदा सिंगची भूमिका थोडकी आहे. संजय दत्तची भूमिका मोठी असली तरी तिला म्हणावी तितकी खोली नाही. त्यामुळे पात्र उभं करताना त्यांच्यावर मर्यादा येतात. तरीही दीर्घानुभवी सराईतपणाच्या सवयीने ते ती निभावतात.  

यात खऱ्या अर्थानं लक्षात राहणारा अभिनय करतो तो दीपक तिजोरी. भूमिकाची लांबी खूप कमी असली तरी सावत्र भाऊ असण्याची अवहेलना अप्रतिमपणे दाखवतो. खासकरून चित्रांगदा सिंगला भेटायला गेलेल्या प्रसंगात ते दिसून येतं. दुर्दैवानं ‘आशिकी’ व कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात उत्तम काम करूनही या गुणी अभिनेत्याला चित्रपट उद्योगानं नंतर मुख्य भूमिकेत घेऊ नये ही शोकांतिकाच म्हणावयास हवी. अशा फुटकळ भूमिकेत स्वतःचा ठसा मात्र उमटवल्याशिवाय तो राहत नाही हे ही तितकच खरं.

‘कितने आदमी थे?’ असं गब्बरसिंग विचारतो, तेव्हा कालिया व साथीदार ‘सरदार, दो आदमी थे’ म्हणतात. त्याच धर्तीवर या सिक्वेलबद्दल तिग्मांशू धूलियांना विचारायला हवं ‘और कितने सिक्वेल, धूलियाजी?’ तरच ते कथेत पुढील भागासाठी सोडलेल्या जागेचा विचार करतील.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख