अजूनकाही
एखाद्या सिनेमाचा रिमेक करण्याचा मोह दिग्दर्शक-निर्मात्याला होणं गैर नाही. त्यातील व्यावसायिक गोष्टी आवडल्या असतील. कथा अजून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्गापर्यंत न्यावीशी वाटली असेल. एकूणच सिनेमाच्या प्रेमातच असेल, जेणेकरून त्याचा प्रभाव आपल्या शैलीत मांडता यावा. करण जोहरने ‘सैराट’ हिंदीत निर्माण करणं हे वरील कारणांपैकी आहे. ‘सैराट’चं व्यावसायिक यश फक्त त्यातील गाणी व भारतीयांना आवडणार्या प्रेमकथेभोवती फिरत राहतं, त्यातही पहिल्या भागापुरतंच. त्यामुळेच पंजाबी, कानडी नंतर हिंदीत येणं हे त्याच जुन्याच मुद्द्याला अधोरेखित करणारं आहे. पडद्यावरील प्रेमकथांचं भारतीयांना असणारं प्रचंड आकर्षण. ‘फँड्री’चा रिमेक न होणं यातही हे दिसून येतं. ‘सैराट’चा एकूण जनमानसात असणारा प्रभाव ‘न भूतो न भविष्यति’ असा झालाय. अगदी गेल्या दोन वर्षातले प्रेमकथांभोवती फिरणारे मराठी सिनेमे बघितले तरी त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे ‘सैराट’चा प्रभाव दिसून येतो. कधी तो कथानकात, तर कधी चित्रीकरणात. दिग्दर्शक शशांक खैतान यांनी केलेला हा रिमेक मात्र प्रभावित करण्यात उणा पडतो, असंच म्हणावं लागतं.
उदयपूरमध्ये राहणारा मधुकर (ईशान खट्टर) हा एका स्पर्धेत पार्थवीच्या (जान्हवी कपूर) हस्ते पुरस्कार स्वीकारतो. ती श्रीमंत राजकारणी करण सिंगची (आशुतोष राणा) मुलगी असते. दोघंही एकाच कॉलेजात असतात. लव्ह अॅट फर्स्ट साईट अशा पद्धतीचं त्यांचा प्रेम असतं, पण पहिल्यांदा कोण मन मोकळं करेल यासाठी मात्र त्यांच्यात गमतीशीर स्पर्धा लागते. ती त्याला एका इंग्लिश गाण्यातून तसं करायला सांगते. तो करतो. मैत्री वाढल्यावर एका किसची मागणी तो करतो. ती म्हणते ते हवं असेल तर तिच्या भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीला ये. वडील करण सिंगला हे कळतं, तेव्हा ते तिला व त्याला रंगेहात पकडतात. त्याची व त्याच्या मित्रांची रवानगी पोलिस स्टेशनात होते. तिथं येऊन पार्थवी धुडगूस घालून त्याच्यासोबत पळून जाते.
रिमेक करताना घ्यावयाची काळजी म्हणजे मूळ सिनेमाचा जो गाभा आहे, तो जसाच्या तशा त्या कथेत आणणं. ‘सैराट’चा गाभा हा प्रेमकथेपेक्षा सामाजिक वास्तवाचा आहे. मंजुळेंनी त्याला होईल तितका वास्तववादी करण्याचा प्रयत्न केला होता. खासकरून दुसर्या भागातली कथा ही त्याचं उत्तम उदाहरण. तसेच मंजुळेंनीच एका ठिकाणी म्हटलंय की, ते लहानपणापासून हिंदी सिनेमे बघूनच मोठे झालेत. त्यामुळे त्यातील वास्तवाला फाटा देण्याच्या गोष्टीलाच त्यांनी कथेच्या केंद्रस्थानी आणलं. त्याला आजच्या काळाची जोड दिली. चित्रीकरणात ते पहिल्या भागात भलेही लोकप्रिय असणारं तंत्र म्हणजे गाणी-संगीताचा भरपूर वापर करत असले तरी नंतरच्या भागात पूर्णपणे स्वतःचं कथानक मांडतात. त्याला जातीय उतरंड व मानसिकतेची जोड देऊन शेवटाकडचा धक्का देतात जो ‘फँड्री’प्रमाणेच सुन्न करणारा ठरतो. दोन सिनेमांमध्ये अशी ट्रेडमार्क शैली तयार करून मंजुळेंनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय.
पटकथाकार-दिग्दर्शक शशांक खैतान कथा घडवतात राजस्थानमध्ये, जिथे वरच्या जातीचे श्रीमंत करण सिंग आहेत, तर खालच्या जातीचे मधुकरचं कुटुंब हे एक रेस्तराँ चालवतात. नायक मध्यमवर्गीय व्यावसायिक घरातला, तर नायिका श्रीमंत राजकीय नेत्याची मुलगी, जो त्याची पिढीजात हवेली आलिशान हॉटेल म्हणून वापरतोय. इथं मूळ सिनेमातला जातीय संघर्ष वर्गसंघर्ष म्हणून दाखवलाय. त्यामुळे जातीचा मुद्दा जो सिनेमात सुरुवातीलाच मधुकरचे वडील बोलतात, तो पटत नाही. श्रीमंत-मध्यवर्गीय असा तिढा तयारच होत नाही. कारण करण सिंग जरी श्रीमंत राजकरणी असला तरी अशा पद्धतीचं पात्र यापूर्वी हिंदी सिनेमांनी खूपदा दाखवलंय.
खैतानकडून त्याला त्रिमिती आकार द्यायची अपेक्षा होती. ती फोल ठरते. त्यामुळे त्यानं पार्थवीच्या विरोधात वागणं किंवा मधुकरच्या वडिलांनी लोकभयास्तव त्याला फोनवर घरी परत येऊ नको म्हणणं हे क्लिशे ठरतं. तसेच जातपंचायत जी ‘सैराट’मध्ये दाखवली होती, ती या बदलामुळे बाजूला पडते. हा बदल मग संपूर्ण सिनेमात सतत दिसत राहतो.
असा बदल करण्याचं मुख्य कारण मूळ सिनेमातल्या सामाजिक वास्तवाचा टोन सौम्य करणारा ठरतो. हा टोन सौम्य केल्यामुळे आपल्याला माहीत असलेलंच वास्तव ‘सैराट’मध्ये जसं अंगावर येतं, तसं इथं होत नाही. प्रेक्षकांचं कॅथॉर्सिस होत नाही. कथानक नेहमीच्या हिंदी सिनेमांच्या कथानकासारखं राहतं.
त्यामुळेच दिग्दर्शक शशांक खैतान मूळ गाभ्याला हातच लावत नाहीत असं दिसतं. त्यांना ‘सैराट’मधील जळजळीत वास्तव नकोय, पण नायक-नायिकांचे गिलेशिकवे, रूसवेफुगवे हवे आहेत. मग ते त्यांच्या पळून कोलकत्त्यात गेल्यानंतरचा धडपडीचा भाग दाखवतात, ती मात्र केविलवाणी धडपड ठरते. त्यासाठी मधुकरचा मामा, त्याचा मित्र सचिन भौमिक वगैरे पात्रांची निर्मिती करतात. सचिन भौमिक बंगाली ख्रिश्चन असणं हेसुद्धा क्लिशे बनून येतं. हिंदी सिनेमात अल्पसंख्य लोकांचं चित्रण ठोकळेबाज, सरसकटीकरण करणारं असतं, तसंच हे आहे.
करण जोहरसारख्या मोठ्या निर्मात्यानं यात पैसे गुंतवावेत यात त्याची व्यावसायिक दृष्टीच तेवढी दिसून येते. ज्या सामाजिक वास्तवाला मंजुळे भिडतात, तिथपर्यंत जायचंच नाही याच उद्देशानं याची निर्मिती केल्यासारखं वाटतं. खरंतर जोहरनं आतापर्यंत किती सिनेमांत समकालीन वास्तव मांडलय हा मोठा प्रश्नच आहे.
दिग्दर्शक शशांक खैतान हे त्याच्याच मुशीत वाढलेले. त्यांनी कुठेही मधुकर-पार्थवीला जीवघेणा संघर्ष करायला लावलं नाही. जोहरच्या सिनेमात असणारा चकचकीतपणा बाजूला सारून सर्वसामान्यांसारखे वागणारे आहेत असं दाखवतात, पण ते प्रभावी वाटत नाही. त्यात बर्याचदा कृत्रिमता जाणवते. तसंच नवीन शहरात पहिल्यांदाच गेलेले ते दोघं कुठंही आपण कुठल्या अजब नगरात आलो आहोत अशा आविर्भावात वागत नाहीत. मधुकरच्या चेहर्यावर ते काही ठिकाणी दिसून येतं. तसंच शेवटाकडे जाता जाता सिनेमाची दमछाक व्हायला लागते, हे स्पष्टपणे जाणवत राहतं. पटकथेत त्यांना शोधण्याची दोन्ही घरातली धडपड दिसून येत नाही. ‘सैराट’ला टेंपलेट म्हणून वापरल्याने पटकथेतील दोष तसेच राहतात.
अभिनयात बोलण्यासारखं म्हटलं तर ईशान खट्टर जीव ओतून भूमिकेत शिरतो. उदयपूरमधला खुशालचेंडू कॉलेजयुवक ते परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे घाबरून गेलेला मधुकर यातील बदल तो उत्तम दाखवतो. खासकरून पोलिस स्टेशनात त्याला घेऊन जातात, तिथून त्याच्यात जे बदल घडायला लागतात ते तो निव्वळ मुद्राभिनयातून छान दाखवतो. जान्हवी कपूरचा अभिनय याच्या तुलनेत तोकडा पडतो. काही काही प्रसंगात ती प्रयत्न करते, पण तो प्रयत्नच राहतो. कदाचित पुढील सिनेमात तिचा अभिनय सुधारेल. ती दिसते मात्र सुंदर. सिनेमॅट्रोग्राफर विष्णु राव उदयपूरचं सौंदर्य जसे अप्रतिमपणे चित्रीत करतात, तसंच तिचं दिसणंसुद्धा. आशुतोष राणा ते ऐश्वर्या नारकर मंडळी त्रोटक प्रसंगात दिसतात.
गाणी हा ‘सैराट’चा जीव की प्राण. अजय-अतुलच्या असंख्य श्रवणीय अल्बम्समध्ये याची गणना अगदी पहिल्या पाचात व्हावी. इथं मात्र ‘धडक’ हे टायटल ट्रॅक व ‘झिंगाट’ हीच तेवढी प्रभावी ठरतात. तसंच ‘सैराट’च्या पहिल्या भागात एका नंतर एक गाणी येऊन कथानकाचा भाग फुलवला होता. इथं तशाच पद्धतीचा परिणाम साधण्याचा प्रयत्न दिसतो, पण मूळ गाण्यांचा प्रभाव पुसला जात नाही.
मराठी प्रेक्षक याच्याकडे कसा बघेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. त्याला ‘सैराट’ तोंडपाठ आहे. त्यामुळे याच्याशी तुलना होणं हे आलंच. पण दोन्हीतला जमीन-अस्मानातला फरक मात्र सतत दिसत राहतो. हा फरक जसा व्यावसायिक आहे, तसाच सिनेमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातला आहे. कवीमनाचे मंजुळे सिनेमाला सामाजिक भाष्य करण्याचं व्यासपीठ मानतात, तर जोहर-खैतान प्रभुती वास्तवाला व्यावसायिक कोंदणात घालून पेश करण्याचं मानतात. त्यामुळे त्यांनी केलेला हा रिमेक अनावश्यक ठरतो.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment