अजूनकाही
‘सैराट’च्या केवळ प्रादेशिक मर्यादा ओलांडून राष्ट्रीय पातळीवर जाऊन लोकप्रिय होण्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवुडला त्याची लोकप्रियता कॅश-इन करावीशी वाटली यात नवल नाही. हा रिमेक ‘धर्मा प्रॉडक्शन्स’च्या बॅनर अंतर्गत होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं या बॅनरच्या आजवरच्या फिल्मोग्राफीकडे पाहता ‘सैराट’मधील मूलभूत घटक असलेली ग्राउंडब्रेकिंग रिअॅलिटी हरवण्याची शक्यता होती. यावर कहर म्हणजे शशांक खैतान या दिग्दर्शकाच्या हाती हा प्रकल्प सोपवण्यात आला. आता खैतान रूढ अर्थानं वाईट म्हणावा असा दिग्दर्शक नाही. म्हणजे किमान मनोरंजक चित्रपट बनवण्यात तो आजवर यशस्वी ठरलेला आहे. त्यातही ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणातच त्यानं यश मिळवलं होतं. नंतरही ‘बद्री की दुल्हनिया’ही बऱ्यापैकी मनोरंजक आणि यशस्वी ठरला. त्यामुळे हिट चित्रपट देणारा हा दिग्दर्शक ‘धर्मा’चा आवडता असणार यात शंका नाही. पण म्हणून त्याच्या मर्यादा दुर्लक्षित करता येत नाहीत. ‘किमान मनोरंजक’ आणि ‘रिअॅलिस्टिक चित्रण असलेल्या चित्रपटाचा रिमेक’ या दोन्हींमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे मीडियॉकर असण्याच्या जवळपास रेंगाळणाऱ्या या दिग्दर्शकाचा या प्रकल्पातील समावेश म्हणजे ‘धर्मा’च्या मिठाला जागून मूळ चित्रपटातील गाभा आणि आशय खालावण्याचा सुस्पष्ट संकेत होता. तरीही नेहमीप्रमाणे पूर्वग्रह बाजूला ठेवून या चित्रपटाकडे पाहणं गरजेचं आहे, याची जाणीव आहेच. अर्थात पूर्वग्रह बाजूला ठेवले तरी त्यानं काही फॅक्ट बदलत नाहीत.
‘धडक’नं साधारण तीन-चार गोष्ट योग्य पद्धतीनं हाताळल्या आहेत. ज्यातील एक म्हणजे हिंदी रूपांतर करताना पार्श्वभूमी राजस्थानी दाखवली (किंवा दाखवावी लागली), महाराष्ट्रानंतरचं असं राज्य जिथं जातिभेद दिसून येतो. तरीही इथं ‘सैराट’मध्ये पुढे असलेल्या जातिभेदावरील भाष्याला अधिक सौम्य करत, त्याचा अपवादात्मक वापर केलेला आहे. त्याऐवजी बॉलिवुडमधील मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या (आणि ‘धर्मा’च्या संवेदनशील विषयांतून अंग काढून घेण्याच्या) सोयीस्कर वृत्तीनुसार राजकारण आणि निवडणूक हे कारण पुढे केलं आहे. ज्यामुळे जातिभेदापेक्षा सिंग घराण्याचा मान आणि समोर येऊ घातलेली निवडणूक या गोष्टी मधुकर (इशान खत्तर) आणि पार्थवी (जान्हवी कपूर) यांच्या प्रेमाच्या आड येतात.
इथं रूढार्थानं दलित कुणीच नाही. म्हणजे तसा उल्लेख असला तरी ही दरी आर्थिक पातळीवरील अधिक वाटत राहते. मधुकर ऊर्फ मधुच्या वडिलांचं एक हॉटेल आहे. त्या अनुषंगानं ते साधारण उच्च-मध्यमवर्गीय म्हणून वावरत राहतात. तर सिंग घराणं हे थेट उच्चवर्गीय आहे. त्यामुळे वर्णांच्या संघर्षाऐवजी वर्गांचा संघर्ष दिसून येतो. ही मूळ चित्रपटापासून किंबहुना त्याच्या आशयापासून घेतलेली फारकत म्हणजे एक प्रकारची उणीव म्हणता येऊ शकते.
यात योग्य प्रकारे हाताळली गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे बंगाली पार्श्वभूमीच्या अनुषंगानं आलेल्या सचिन भौमिक ऊर्फ सचिन दा (खराज मुखर्जी) या महत्त्वाच्या पात्राचा समावेश. जो एक प्रकारे ‘सैराट’मधील छाया कदमच्या आक्काची जागा अप्रतिमरित्या घेतो. अखेरचं आणि महत्त्वाचं म्हणजे ‘सैराट’हून काही प्रमाणात वेगळ्या प्रकारचा शेवट. जो चांगल्या अर्थानं उल्लेख करावा असा आहे.
कुठल्याही प्रकारचं अॅडाप्टेशन समोर येणं म्हणजे दोन गोष्टींची शक्यता असते. एक म्हणजे त्याचं चांगलं असणं किंवा वाईट असणं. अर्थात ही झाली मूलभूत गोष्ट. कारण शक्याशक्यतेच्या नियमानुसार याची इतरही अनेक संभाव्य फलितं असतात. जी म्हणजे - १. सदर कलाकृती जशीच्या तशी रूपांतरित करून, तिचं अनुकूलन करणं. ज्यातून पुन्हा तिच्या चांगल्या किंवा वाईट असण्याच्या शक्यता असतात. २. सदर कलाकृतीमध्ये काही (किंवा बरेच) बदल करणं. ज्याचं फलित म्हणून पुन्हा एखादी चांगली किंवा वाईट कलाकृती समोर येण्याच्या शक्यता असतात.
थोडक्यात सांगायचं झाल्यास अॅडाप्टेशन ही एक क्लिष्ट गोष्ट आहे. कारण त्यात बदल केलेच नाही तर प्रेक्षक ‘यानं तर स्वतःचं डोकंच लावलं नाही’ असं म्हणण्याची शक्यता असते. यदाकदाचित जर बदल केलाच तर ‘आहे तसं ठेवायला हवं होतं’ असा सूर ऐकू येतो. आतापुरता विचार केल्यास बहुतांशी लोकांसाठी, त्यातही पुन्हा ज्यांनी ‘सैराट’ पाहिला आहे त्यांच्यासाठी ‘धडक’ दुसऱ्या प्रकारात मोडतो. ज्यात चुकीचं काही नाही. कारण त्यात उणीवा आहेतच. यात अभिनय आणि संवादफेकीबाबत चमत्कारिकरित्या शून्यभाव घेऊन वावरणारी मध्यवर्ती पात्रं आहेत. सोबतच एक समस्यात्मक उत्तरार्ध आहे. याखेरीज मूळ कलाकृतीमधील आशय आणि दृष्टीकोनाचा अभाव आहे. संलग्नतेच्या अगणित चुकाही आहेत.
मात्र सोबतच काही चांगल्या गोष्टी आहेत. ज्यातील मुख्य म्हणजे प्रभावी सहाय्यक पात्रं. ज्यांना मध्यवर्ती पात्रांहून अधिक भावनांचे कंगोरे आहेत. सचिन दा आणि प्रमिला ही पात्रं बंगाली पार्श्वभूमीवर उल्लेखनीय आहेत. तर पुरुषोत्तम (श्रीधर वत्सर) हे काहीसं स्टिरिओटिपिकल साइड किक पात्र पूर्वार्ध अधिक मनोरंजक बनवतं. मुखर्जीनं तर सचिन दा रूपात जोरदार बॅटिंग केली आहे. या बंगाली अभिनेत्यानं ‘कहानी’, ‘स्पेशल छब्बीस’मध्येही लहानसहान पात्रांना फुलवलं होतंच. त्यामुळे हे इतर सहाय्यक कलाकार या चित्रपटाला सहनीय बनवतात. जान्हवी कपूर, इशान खत्तर, आशुतोष राणा सगळे थोड्याफार फरकानं स्वीकारार्ह अशी कामगिरी करतात.
बाकी कथेच्या ओघात हास्यास्पदरीत्या चित्रित केलेली गाणी एखाददुसऱ्या कडव्याचा अपवाद वगळता अमिताभ भट्टाचार्यनं आधीच तयार असलेल्या मीटरमध्ये चांगली लिहिली आहेत. ‘धडक’ हे ओरिजनल टायटल साँग तर उत्तम आहेच. तरीही अजय-अतुलच्या संगीताच्या या पुनर्निर्माणाला ‘सैराट’च्या सिनेमॅटिक अनुभव प्रदान करणाऱ्या गाण्यांच्या अधूनमधून जाणवणाऱ्या स्वप्नवत झलकेचा फटका बसतो. ज्यामुळे अचानक मराठी गाण्यातील बोल गुणगुणावेसे वाटतात.
एकूणच ‘धडक’ हा मूर्खरीत्या मनोरंजक आहे. जे व्यक्तीपरत्वे बदलत जाईल. यातील खटकणाऱ्या गोष्टी त्यांच्या मूर्खपणाबद्दल एन्जॉय कराव्या अशा आहेत. तर यातील चांगल्या गोष्टीही ‘सैराट’शी तुलना केल्यास नकोशा वाटतील अशा आहेत. थोडक्यात पूर्वग्रह बाजूला ठेवल्यास तो आवडूही शकतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment