‘लेथ जोशी’ : यंत्रावर मनस्वी प्रेम करणाऱ्या माणसाची भावपूर्ण गोष्ट! 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘लेथ जोशी’चं एक पोस्टर
  • Sat , 14 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie लेथ जोशी Lathe Joshi चित्तरंजन गिरी Chittaranjan Giri अश्विनी गिरी Ashwini Giri सेवा चौहान Seva Chouhan मंगेश जोशी Mangesh Joshi

विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे काळानुसार अनेक बदल होत गेले. नवनव्या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे अनेक यंत्रे कालबाह्य झाली आणि त्याच्या जागी अत्याधुनिक यंत्रे आली. पूर्वी जिथं एक यंत्र दहा माणसांचं काम करत होतं, तिथं नवीन आधुनिक यंत्रं हजार माणसांची कामं करू लागली. त्यामुळे माणसांची कामं साहजिकच कमी होत गेली. काळानुसार माणसंही ‘कामबाह्य’ होऊ लागली. या यंत्रांमुळे मनुष्यबळाचं (Man Power) महत्त्व कमी होऊ लागलं आणि हळूहळू माणसाचं जीवनही यांत्रिकीकरणाकडे झुकू लागलं. मात्र पूर्वी यंत्रावर मनापासून काम करताना विशेषतः कामगारांना त्या यंत्राविषयीदेखील एक प्रेम, आस्था आणि एक वेगळाच जिव्हाळा निर्माण व्हायचा. त्या यंत्राचं आणि त्यावर काम करणाऱ्या कामगारांचं एक अनोखं नातं निर्माण व्हायचं, जे मानवी नात्यांसारखंच असायचं.

अशाच एका यंत्रावर मनस्वी प्रेम करणाऱ्या अशा एका कलासक्त माणसाची भावपूर्ण गोष्ट ‘लेथ जोशी’ या नवीन मराठी चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा तशी छोटीशी आहे. मात्र भूतकाळ, आणि भविष्यकाळात होणारे बदल यांची अनोखी सांगड घालताना लेखक-दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. काळानुसार जर मनुष्य बदलत गेला नाही तर एखाद्या जुनाट यंत्राप्रमाणे त्याचीही अवस्था ‘भंगारात’ जमा करण्यासारखीच होईल, असा विवशतापूर्ण संदेशही हा चित्रपट देऊन जातो. 

‘लेथ जोशी’मध्ये पाहायला मिळते ती विजय जोशी या कनिष्ठ मध्यमवर्गीय सदगृहस्थाची अनोखी कथा. हे जोशी साठे नावाच्या एक उद्योजकांच्या कंपनीत एका लेथ मशीनवर काम करणारे साधे कामगार. सुमारे ३५ वर्षं ते एकाच लेथ मशीनवर काम करत असल्यामुळे त्या मशीनवर त्यांचा जीव जडतो. मशीनचं आणि त्यांचे एक वेगळंच भावनिक नातं निर्माण होतं. शिवाय सकाळी उठून घरचा डबा घेऊन सायकलवरून कंपनीत जाणं आणि लेथ मशीनवर काम करून सायंकाळी पुन्हा सायकलवरून परतणं, हीच त्यांची गेली अनेक वर्षांची दिनचर्या होते. त्यामध्ये कधीच खंड पडलेला नसतो.

त्यामुळे त्यांचं जीवन यांत्रिकी स्वरूपाचं होतं. घरात वयोवृद्ध अंध आई, घरकाम करतानाच केटरिंगचा व्यवसाय करून त्यांना आर्थिक मदत करणारी पत्नी आणि तांत्रिक व्यवसाय करणारा एक तरुण मुलगा असं त्यांचं चौकोनी कुटुंब आहे. कंपनीचे मालक साठे अचानक आजारी पडतात आणि कंपनीची सर्व सूत्रं त्यांच्या तरुण मुलाकडे येतात. या तरुण मुलाचा दृष्टिकोन आधुनिक असल्यामुळे कंपनीत नवं तंत्रज्ञान आणताना तो जुन्या तंत्रज्ञानाचा त्याग करण्याचं ठरवतो.

त्यामुळे  एक दिवस अचानक लेथ मशीनवरील कामं बंद होतात आणि काम नसल्यामुळे जोशी यांना कंपनीतून काढलं जातं. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची जोशी यांची तयारी नसते. त्यामुळे त्यांची मन:स्थिती विचित्र होते. आपली नोकरी गेली आहे हे घरी न सांगता ते नित्याप्रमाणे डबा घेऊन रोज बाहेर पडतात आणि सायंकाळी घरी परततात. तिकडे त्यांची पत्नी मात्र मुलाच्या मदतीनं काळानुसार बदलत जाते आणि केटरिंगचा व्यवसाय वाढवते. पुरणपोळीपासून चायनीज फूड पुरवण्याच्या ऑर्डर्स स्वीकारते. जोशी यांची मात्र काळानुसार बदलण्याची मानसिकता तयार होत नाही. उलट भंगारात जाणारं आपलं ‘ते’ लेथ मशीन विकत घेऊन स्वतःचं युनिट टाकण्याची त्यांची इच्छा असतं. मात्र त्यांचा मुलगा त्यांना विरोध करतो. त्यामुळे जोशी यांची अवस्था काय होते? त्यासाठी चित्रपट पडद्यावर पाहायला हवा. 

चित्रपटाच्या कथेत तसं फार मोठं नाट्य नाही. संवादही खूप साधे आणि कमी आहेत, मात्र जे आहेत ते परिस्थितीवर  मार्मिक भाष्य करणारे आहेत. विशेषतः जोशींची आई, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यातील ‘घरसंवाद’ मजा आणतात. त्यामुळे कथेची उत्कंठता कायम टिकून राहते. या कथेत ‘काळ’ हे आपोआपच एक अदृश्य पात्र बनलं आहे. बदलत्या काळाच्या खुणा सांगणारे अनेक प्रसंग पडद्यावर नुसते पाहायला मिळतात. त्यावरून काळाची महतीही अप्रत्यक्षपणे कळून येते.

“लेथवर तुम्ही नुसते काम करत नाहीत तर त्यातील तुम्ही एक चांगले कलाकार आहेत’, हे उद्योजक साठे यांनी जोशी यांना उद्देशून काढलेले उद्गार जोशी यांच्या कामावरील श्रद्धेची साक्षच पटवतात. तसंच तेच लेथ मशीन विकत घेऊन आपलं स्वतःचं युनिट टाकण्याचा जोशी यांचा मनोदय म्हणजे वरून साधा, निरुत्साही वाटणारा माणूस आतून किती निग्रही आणि कलेवर मनापासून प्रेम करणारा कलाकार आहे, त्याची ओळख पटवून देणारा ठरतो.

मात्र एका बाजूनं विचार केला तर जोशी यांची काळानुसार न बदलण्याची मनोवृत्ती लक्षात घेता काळाच्या दृष्टीनं त्यांची एक प्रकारे शोकांतिकाच होते, याचीही जाणीव होते. त्यासंदर्भात शेवटचे दृश्य बरंच काही सांगून जातं.  

चित्रपटातील कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयामुळे हा चित्रपट प्रभावी झाला आहे. चित्तरंजन गिरी यांनी जोशी यांच्या भूमिकेतील ‘मूकनायक’ अतिशय संयतपणे रंगवला आहे. अनेक वेळा त्यांची ‘नि:शब्द नजर’ अनेक संवादापेक्षा भारी ठरली आहे. बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अश्विनी गिरी, तसंच मुलाच्या भूमिकेत ओम भुतकर यांनीही उत्तम काम केलं आहे. सेवा चौहान यांनीही अंध आई छान रंगवली आहे. छायाचित्रण आणि इतर तांत्रिक बाजू यामुळेही चित्रपट प्रभावी झाला आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......