‘अँट-मॅन अँड द वास्प’ : एकाच वेळी मनोरंजक, स्वीकारार्ह आणि टाकाऊ 
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘अँट-मॅन अँड द वास्प’चं एक पोस्टर
  • Sat , 14 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie अँट-मॅन अँड द वास्प Ant-Man and The Wasp

‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील त्यातल्या त्यात उत्तम आणि मनोरंजक चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘अँट-मॅन’. जो आधी एडगर राइट या प्रसिद्ध दिग्दर्शकानं दिग्दर्शित करण्याचं ठरलं होतं. मात्र आपल्या या प्रकल्पाबाबत हवं तितकं स्वातंत्र्य न मिळाल्यानं निर्मात्यांशी झालेल्या मतभेदामुळे राइटनं सदर प्रकल्पातून काढता पाय घेतला. तरीही मूळ पटकथा त्याचीच असल्यानं चित्रपटावर त्याच्या दिग्दर्शकीय शैलीचा प्रभाव जाणवत होता. आता या सीक्वेलनंतर चित्रपटाच्या टोनमध्ये झालेल्या बदलांनंतर अगदी लेखनाच्या पातळीवरही असलेली राइटची उणीव अधिक ठळकपणे जाणवते. 

साधारणतः दोन वर्षांपूर्वी ‘अॅव्हेंजर्स’ना केलेल्या छुप्या मदतीनंतर स्कॉट लँग ऊर्फ अँट-मॅन (पॉल रड) पोलिसांच्या ट्रॅकरच्या सहाय्यानं स्वतःच्याच घरात एक प्रकारच्या नजरकैदेत आहे. तर हँक पिम (मायकल डग्लस) आणि त्याची मुलगी, होप ऊर्फ वास्प (एवँजलिन लिली) सब-अटॉमिक क्वांटम फिल्डमध्ये अडकलेल्या जेनेटला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यासाठी गरजेची एक सुरंग ते बनवत आहेत. 

इथपर्यंत कथानक अगदी साधं सोपं वाटत असलं तरी पुढे जाऊन चित्रपटाला त्या सुरंगासाठी गरजेचा एक भाग आणण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या विक्रेत्याशी घडलेल्या वादाच्या रूपानं एक शत्रू आणि अधिकचं उपकथानक लाभतं. ज्याला पुढे जाऊन एवा उर्फ घोस्टच्या (हॅना जॉन-कॅमन) निमित्तानं आणखी एक शत्रू आणि पर्यायानं उपकथानकाची जोड मिळते. 

‘मार्व्हल’चे बरेचसे सुपरहिरो चित्रपट, त्यांत आलटून पालटून असलेली गंभीर आणि विनोदी दृश्यं, यांना जरी आता सरावलो असलो तरी ही अधिकची उपकथानकं चित्रपटाच्या गतीवर, तसंच कथेवर (नकारात्मकरित्या) परिणामकारक ठरतात. 

‘अँट-मॅन’च्या (२०१५) विनोदाची जातकुळी अधिक दृश्य स्वरूपाची होती. ज्याला मुख्य कारण म्हणजे त्याचा पटकथाकार, एडगर राइट हा दिग्दर्शक होता. ज्याचे स्वतःचे चित्रपट त्याच्या ‘व्हिज्युअल स्टाइल’साठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ‘अँट-मॅन’मध्ये अशाच ‘व्हिज्युअल’ विनोदांचा समावेश अधिक होता. जो खरं तर त्याचा प्लस पॉइंट ठरला होता. मात्र इथं अपवादात्मक परिस्थिती वगळता ती स्टाइल हरवलेली आहे. 

याउलट सदर चित्रपटात स्वतः पॉल रडसोबत असलेले इतर चार लेखक ती शैली आणि तसा विनोद उभा करण्यात अयशस्वी ठरतात. ज्यामुळे त्यांना पात्रांमधील गोंधळ आणि त्याला कारणीभूत असणारे संवाद यावर मुख्य भर द्यावा लागतो. ज्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या टोनमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवतो. 

तरीही चित्रपट किमान मनोरंजक असण्याच्या पातळीवर यशस्वी ठरतो. ज्यामागील मुख्य कारण म्हणजे रड आणि लिली यांचे परफॉर्मन्स. याखेरीज मायकल पेन्याचा पडद्यावरील वावरही तितकाच महत्त्वाचा ठरतो. कारण चित्रपटाच्या सूरात झालेल्या बदलाच्या दृष्टीनं त्याचे गोंधळलेले सहाय्यक पात्र, लुईस, महत्त्वाचे ठरते. डग्लसबाबत तक्रार असण्याचं काही विशेष कारण उरत नाही. 

‘मार्व्हल’च्या किंवा खरं तर अलीकडील कुठल्याही चित्रपटाबाबत मुख्य तक्रार अशी असते की, त्यांचे ट्रेलर खूप काही उघड करतात. मग ते कथेच्या अनुषंगानं असो किंवा त्यातील अॅक्शन सीन्सच्या दृष्टीनं असो. इथंही नेमकं तेच होतं. कारण एखाद-दुसरं दृश्य वगळता सर्व महत्त्वाची दृश्यं ट्रेलरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्यामुळे ज्या मिनीमलिस्टिक अॅक्शनबाबत (त्यातही शेवटच्या क्रिएटिव्ह दृश्याबाबत) आधीचा चित्रपट प्रसिद्ध होता, तसं काहीच अनुभवण्यास मिळत नाही. त्यामुळे अधूनमधून पेन्याच्या किंवा रडच्या करामतींमुळे चेहऱ्यावर उमटणारी हास्याची लकेर वगळता विशेष काही हाती लागत नाही. ज्यामुळे यासाठीच हे दोन तास सदर चित्रपटाला द्यायचे का, असा प्रश्न पडतो. 

अर्थात पुढे पुन्हा प्रश्न असतोच, का नाही? कारण आपले प्रॉडक्ट दाखवून गर्दी खेचण्याच्या या युगात ट्रेलरमध्येच सगळी दृश्यं समोर मांडून चित्रपटगृहात येऊन समोरील पडदा दूर ठेवून मोबाईल स्क्रीनवर लक्ष ठेवणाऱ्या या पिढीला आकर्षित करण्यासाठी असेच हातखंडे वापरावे लागतात. मात्र इथं एक किमान अपेक्षा असते, ती म्हणजे असे हातखंडे वापरून वेगळं काही बहाल करता येणं अशक्य असल्यास काही प्रमाणात का होईना हातचं राखून ठेवता यायला हवं. नेमकं हेदेखील इथं घडत नाही. 

एकूणच कथा किंवा दिग्दर्शन या महत्त्वाच्या पातळींवर फार काही न देणारा हा चित्रपट एकदा पाहण्यालायक ठरतो. तो रंजक आहे त्याच्या नायकामुळे, त्याच्या भुरळीमुळे आणि ट्रेलरमध्ये दाखवण्याचा राहिलेल्या काही दृश्यामुळे. 

नेहमीप्रमाणे श्रेयनामावलीनंतरच्या दृश्याच्या रूपातून ‘इन्फिनिटी वॉरच्या वेळी अँट-मॅन कुठे होता?’ या प्रश्नाचं उत्तर देतो. हे उत्तर संपूर्ण चित्रपटाहून अधिक रंजक होतं हे विशेष. आणि ‘मार्व्हल’च्या अलिखित नियमानुसार आता हीच गरजेची गोष्ट असल्यानं चित्रपटाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल असं म्हणायला वाव आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......