अजूनकाही
ज्योती सुभाष यांनी दिग्दर्शित केलेला ‘हमीद दलवाई : द अनसंग ह्युमॅनिस्ट’ हा एक तासाचा माहितीपट तयार झाला आहे. रविवारी १७ जून रोजी या माहितीपटाचे प्रदर्शन पुणे येथील फिल्म अर्काइव्ह थिएटरमध्ये झाले. त्या दिवशीच्या सायंकाळी लागोपाठ दोन शो झाले आणि साडेतीनशेपेक्षा अधिक आसनक्षमता असलेले ते सभागृह दोन्ही वेळा हाऊसफुल्ल होते. समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य आणि नाटक-सिनेमा या क्षेत्रांमधील क्रीम क्लासने यावेळी हजेरी लावली होती. याची दोन मुख्य कारणे होती. एक- ज्योती सुभाष यांनी मागील चार-साडेचार दशकांत मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीत एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून जे स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दुसरे मुख्य कारण म्हणजे, हमीद दलवाई यांचे विचार व कार्य यांच्याशी परिचित असलेली मागची पिढी आणि कुतूहल असलेली नवी पिढी मोठ्या अपेक्षेने आलेली होती.
या माहितीपटात हमीद दलवाई नावाची व्यक्ती, तिचे विचार व कार्य यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहितीपट निर्मितीला अनेक मर्यादा होत्या. एक तर ४० वर्षांपूर्वी दलवाईंचे निधन झालेले असल्याने, त्यांच्या आवाजातील एकही ध्वनिफित वा ध्वनिचित्रफीत उपलब्ध नाही. दुसरे- त्यांच्या साथीला असलेले बहुतांश नेते व कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. आणि तिसरे- त्यांनी १९६५ ते ७७ या दहा-बारा वर्षांत निर्माण केलेला झंझावात अनुभवलेली माणसेही आता फारच थोडी उरली आहेत. त्यामुळे दलवाईंनी स्वत: केलेले लेखन, त्यांच्यावर लिहिले गेलेले लेख, उपलब्ध असलेली काही छायाचित्रे आणि त्या काळाचे साथीदार असलेल्या काही व्यक्तींच्या मुलाखती, एवढ्याच आधारावर हा माहितीपट निर्माण करावा लागणार होता. दुसरी मोठी मर्यादा ही होती की, दलवाईंचे ललित लेखन (एक कादंबरी आणि तीन डझन कथा), त्यांचे वैचारिक लेखन (दोन पुस्तके आणि दोन पुस्तिका) आणि १९६५ नंतरच्या दशकभरात त्यांनी केलेली आंदोलने इतकाच पसारा समोर ठेवला, तरी तो सर्व एखाद्या माहितीपटात विहंगमावलोकन स्वरूपातही बसवता येणे कठीण आहे.
आता तयार झालेल्या माहितीपटात नसिरुद्दीन शाह सूत्रधाराच्या आणि डॉ. हमीद दाभोलकर व अमृता सुभाष हे दोघे सहसूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. कोकणातील मिरजोळी (ता. चिपळूण, जि.रत्नागिरी) या दलवाईंच्या गावात या माहितीपटाचे बरेचसे चित्रीकरण झालेले असून, उर्वरित चित्रीकरण पुणे येथे झालेले आहे. मुलाखती, चर्चा, वर्तमानाचे संदर्भ आणि काही प्रमाणात दलवाईंची कल्पनाचित्रे असे या माहितीपटाचे स्वरूप आहे. दलवाईंचे मित्र-मार्गदर्शक या भूमिकेत वावरलेले भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी; दलवाईंचे सहकारी, कार्यकर्ते म्हणून ज्यांना निकटचा सहवास लाभला ते सय्यदभाई, अन्वर शेख; नंतरच्या पिढीचे (पण ज्यांना या ना त्या प्रकारची प्रेरणा हमीदभाईंपासून मिळाली ते) रझिया पटेल, अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी आणि हमीदभाईंचे बंधू राज्यसभेचे सदस्य हुसेन दलवाई इत्यादींच्या मुलाखतींमधील तुकडे या माहितीपटात आहेत. नसिरुद्दीन शाह, डॉ. हमीद दाभोलकर, अमृता सुभाष आणि स्वत: ज्योती सुभाष आपापले अनुभव आणि दलवाईंचे लेखन यांच्याआधारे दलवाईंचे विचार व कार्य यांची कालसुसंगतता मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. वस्तुत: ज्योती सुभाष यांनी मागील वर्षभरातील त्यांचा बहुतांश वेळ या माहितीपटासाठी दिला आहे. त्यांनी जे ध्वनिचित्रमुद्रण केले आहे, ते जवळपास ३३ तासांचे आहे. त्यातील खूपच थोडे तुकडे निवडून हा एक तासाचा माहितीपट केलेला आहे. म्हणजे उर्वरित ३२ तासांच्या ध्वनिचित्रमुद्रणाचा उपयोग करून आणखी एक-दोन माहितीपट सहज तयार करता येतील.
आता तयार झालेल्या ‘द अनसंग ह्युमॅनिस्ट’ या माहितीपटावर आलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच संमिश्र आहेत. उदाहरणार्थ : ज्यांना दलवाईंच्याविषयी खूप काही माहीत आहे आणि जे खूप मोठ्या अपेक्षा बाळगून गेले होते, त्यांना यातील अपूर्णत्वाची जाणीव तीव्रतेने झाली. ज्यांना दलवाईंच्याविषयी काहीच माहीत नाही अथवा केवळ नाव व जुजबी माहिती आहे, त्यांना एक मोठे व समृद्ध दालन खुले झाल्याचा अनुभव आला. ज्यांनी दलवाईंचे व त्यांच्याविषयीचे बहुतांश लेखन वाचलेले आहे त्यांना या माहितीपटात वर्णन केलेले प्रसंग, त्यात आलेली विधाने यांचे सर्वच संदर्भ बरोबर समजत होते आणि ते आपल्या मनातील आशय त्याला जोडू पाहात होते. त्यातून त्यांची स्थिती, ‘काय आले आहे’ याचा आनंद आणि ‘काय राहून गेले’ याचे असमाधान अशी होती. याउलट असे मागचे-पुढचे काहीच संदर्भ माहीत नसलेल्या प्रेक्षकांना, समोर दिसणार्या व एकामागोमाग येणाऱ्या दृश्यांची व विधानांची संगती लावणे जड जात होते. अर्धवट कळले, त्यामुळे आणखी जाणून घेतले पाहिजे अशी अस्वस्थतेची भावना त्यांच्या मनात घर करून गेली. परिणामी तिथे उपलब्ध करून दिलेल्या दलवाईंच्या पुस्तकांची चांगली विक्री झाली. आणि बाहेर पडताना अनेकांनी या माहितीपटाची डीव्हीडी विक्रीसाठी आहे का किंवा उपलब्ध कधी होईल, युट्यूटबवर टाकली जाईल का? अशी विचारणा केली. या सर्व प्रतिक्रियांचा विचार केला तर दलवाईंच्या विचारांना व कार्याला उजाळा देण्याची प्रक्रिया एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे, असे म्हणावे लागते.
‘साधना’च्या दृष्टिकोनातून पाहिले तर दलवाईंचे कार्य ऐन भरात होते, तेव्हा तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते यांनी, दलवाईंनी चालवलेल्या सामाजिक सुधारणेच्या व राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याला सर्व प्रकारचे बळ पुरवले होते. आणि मागील तीन वर्षांच्या काळातील ‘साधना’नेही विस्मृतीत चाललेल्या दलवाईंच्या वारशाला उजाळा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. (याच दरम्यान महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांनी त्यांचा ३०० वा-समाजकार्य जीवनगौरव- पुरस्कार हमीद दलवाईंना मरणोत्तर दिला. तिथेच या माहितीपटाचे बीज ज्योती सुभाष यांच्या मनात पडले.) ‘पुनर्भेट हमीद दलवाईंची’ हा १५ ऑगस्ट २०१५ चा विशेषांक आणि त्यानंतर दलवाईंची आऊट ऑफ प्रिंट झालेली पुस्तके नव्या आवृत्तीत आणणे, असंग्रहित लेखन पुस्तकरूपाने प्रकाशित करणे, इंग्रजी लेखन मराठीत आणणे या आघाडीवर काम केले. आता असा प्रयत्न चालू आहे की, दलवाईंचे सर्व लेखन आधी इंग्रजीत (इंग्रजीतील नामवंत प्रकाशन संस्थांकडून) आणि मग हिंदी, उर्दू व अन्य भाषांतून (अर्थातच, हेसुद्धा त्या त्या भाषांमधील प्रथितयश प्रकाशन संस्थांकडून) प्रकाशित व्हावे. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानेही ‘समग्र हमीद दलवाई’ प्रकाशित करायला हवे.
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, यांचे समग्र लेखन साहित्य संस्कृती मंडळाने १९९० च्या दरम्यान मराठी व इंग्रजीत आणल्यामुळे, त्या दोघांचेही राष्ट्रीय स्तरावरील स्थान अधिक ठळक होत गेले आणि त्यांच्या कार्याची महनीयता व कालसुसंगता अधिकाधिक अधोरेखित होत गेली. परिणामी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात, विद्यापीठीय वर्तुळात आणि सामाजिक संशोधनाच्या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्यांना आता ज्योतिबा आणि डॉ. आंबेडकर यांच्याशिवाय पुढे सरकताच येत नाही. याच प्रक्रियेत यापुढे सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या साहित्याची मोठी भर पडणार आहे. सयाजीरावांची भाषणे, रोजनिशा, पत्रव्यवहार व अन्य कागदपत्रे यांचे १२ खंड राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झाले आहेत, आणखी तेवढेच प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या उपलब्धीमुळे पुढील २५ वर्षांनी द्रष्टा राजा सयाजीराव ही प्रतिमा संपूर्ण भारतभर ठळक होण्यास चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘समग्र हमीद दलवाई’ राज्याच्या साहित्य व संस्कृती मंडळाकडून मराठीत आणि इंग्रजीत आले तर आधी राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिवादी वर्तुळात आणि मग सामाजिक व राजकीय वर्तुळात दलवाईंच्या विचार-कार्याची कालसुसंगतता अधोरेखित होत जाईल, स्वीकारार्हता वाढत जाईल.
रामचंद्र गुहा या समकालीन भारतातील नामवंत इतिहासकाराने ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या संपादित ग्रंथात ज्या १९ व्यक्तींचा समावेश केलेला आहे, त्यात हमीद दलवाईंचा समावेश १९ व्या क्रमांकावर करून ‘द लास्ट मॉडर्निस्ट’ असे संबोधले आहे. आणि गेल्या महिन्यात ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकातून जवळपास महिनाभर ‘मायनॉरिटी स्पेस’ या शीर्षकाखाली देशभरातील दोन डझन विद्वानांचा जो वादसंवाद झाला, तो दलवाईंच्या विचारांभोवती फिरला असे म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला ऑगस्ट २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक (कुराण व संविधान या दोहोंनुसार) अवैध ठरवला. त्यानंतरच्या काळात, त्या मागणीचा पहिला उद्गाता म्हणून दलवाईंचे नाव बर्यापैकी चर्चेत आले. त्यामुळे, मुस्लिम समाजातील सामाजिक सुधारणांना गती देण्यातून हिंदुत्ववाद्यांचा मुकाबला करण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे, हा दलवाईंचा विचार नीट लक्षात घेतला, तर आजचा काळ अधिक अनुकूल आहे. या संदर्भात काही लोकांना अशी भीती वाटत असते की, दलवाईंचा विचार घेऊन सर्वसामान्य मुस्लिम समाजात जाऊन काम करता येणे अवघड आहे. आणि काहींना अशी भीती वाटते की, दलवाईंचे विचार पुढे करण्यातून हिंदुत्ववादी शक्ती त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. ही दोन्ही प्रकारची भीती निराधार आहे असे अजिबात नाही, पण म्हणून रॅशनल व सेक्युलर दलवाईंना बाजूला सारायचे की, अधिक सावधपणे, अधिक निर्धाराने व अधिक हुशारीने काम करायचे? अर्थातच, सारासार विचार व देशहित लक्षात घेता दुसराच पर्याय निवडायला हवा!
दलवाईंनी १९७० मध्ये स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आता उंबरठ्यावर आले आहे. आणि दलवाईंच्या इच्छा-पत्रानुसार स्थापन झालेली हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्थाही छोटे-मोठे उपक्रम राबवत ४० वर्षे टिकून आहे. या दोन्ही संस्थांना सर्व प्रकारचे बळ मिळाले आणि दलवाईंशी या ना त्या प्रकारचे नाते सांगणाऱ्या अन्य व्यक्ती व संस्थांनी आपापल्या स्तरावर अधिक ताकदीने व अधिक गतीने काम केले, तर पुढील दोन-तीन वर्षांत सामाजिक पर्यावरण अधिक अनुकूल झालेले असेल. त्यासाठी पायाभूत प्रकल्प म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा ५० वर्षांचा विस्तृत इतिहास लेखनाचा प्रकल्प मार्गी लागायला हवा. दलवाईंचा झंझावात अनुभवलेल्या एखाद्या मान्यवराने मराठी व इंग्रजी चरित्र लिहायला हवे. आणि बारा वर्षांपूर्वी आलेल्या, देशातील मुस्लिम समाजाचे समग्र म्हणावे असे चित्रण करणाऱ्या न्यायमूर्ती राजिंदर सच्चर समितीच्या अहवालानंतर स्थिती किती बदलली आणि कशी, यावरही सखोल अभ्यास व संशोधन होणे आवश्यक आहे. हे सर्व घडून आले तर दलवाईंच्यावर पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट येणे दूर नसेल. ‘द अनसंग ह्युमॅनिस्ट’च्या निमित्ताने सांगायचे आहे ते एवढेच!
(‘साधना’ साप्ताहिकाच्या ३० जून २०१८च्या अंकातून)
.............................................................................................................................................
हमीद दलवाई यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment