अजूनकाही
‘संजू’ या चित्रपटाच्या चर्चेसोबतच आणखी एक विषय किंवा गर्दीतील आणखी एक सूर ऐकू आला, तो म्हणजे ‘म्हणजे आता गुन्हेगारांवरही पिक्चर बनणार का?’ मुळात ‘संजू’ हा काही चरित्रपट प्रकारातील, जेलमध्ये गेलेल्या व्यक्तीवर आलेला पहिला चित्रपट नाही. याआधी भारतातच नव्हे तर अगदी हॉलिवुडमध्येही असे कित्येक चित्रपट बनले आहेत. याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचीच आयुष्यं फार रंजक असतात, आहेत. गुन्हेगारांची त्याहून किंचित अधिक रंजक असणार यात फारशी शंका नाही. त्यात आपल्याला रस असतो, हेही वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. आपण काल्पनिक गुन्हेगारांचे चरित्रपट ठरतील असे चित्रपट किंवा क्राईम थ्रिलर जसे पाहतो आणि हिट करतो तसंच याहीबाबतीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुणाला चित्रपट बनवावासा वाटला तर फार नवल नाही. त्यात तो सेलिब्रिटी असेल तर सोन्याहून पिवळं!
याखेरीज चरित्रपटात शंभर टक्के सत्य दाखवतील अशी अपेक्षा नसावीच. कारण कितीही झालं तरी हे चित्रपट म्हणजे सदर व्यक्तीची ‘पब्लिसिटी कॅश इन’ करण्याचं आणि यशस्वी ठरण्याचं सोपं माध्यम समजलं जातं. त्यामुळे सत्य दाखवावं अशी अपेक्षा असली तरी तसं नसल्यास फार काही बिघडतंय असंही नाही. त्यामुळे याकडे ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेत रचलेली काल्पनिक कथा म्हणून पाहणं गरजेचं आहे.
बाकी राहिला प्रश्न ‘संजू’चा संजय दत्तचा, प्रसिद्धीच्या झोतात असताना जवळपास वाया गेलेला मुलगा, जो मध्यंतरी गँगस्टर लोकांच्या संपर्कातही आला, पुन्हा त्यातून बाहेर येऊन स्टार बनला, पुन्हा त्या जुन्या केसच्या निमित्तानं ‘आत’ गेला आणि आता पुन्हा बाहेर येऊन स्टार बनला. एकूणच सगळा एकदम फिल्मी मसाला ठासून भरलेला मामला आहे. त्यामुळे त्यानं राजकुमार हिरानीला आकर्षित केलं नसतं तरच नवल.
याशिवाय बोलायचं झाल्यास हिरानी दिलेलं वचन पाळून त्याच्या शैलीनुसार आणखी एक अप्रतिम चित्रपट समोर आणतो. जो त्याच्या फिल्मोग्राफीमधील सर्वोत्तम चित्रपट ठरण्यासही पात्र आहे.
एन. डी. त्रिपाठी (पियूष मिश्रा) या आपला चरित्रग्रंथ लिहिणाऱ्या लेखकाला संजय दत्त (रणबीर कपूर) स्वतःची गांधीजींशी तुलना केल्याच्या कारणानं मारत असल्याच्या पार्श्वभूमीवर हिरानी चित्रपटाला सुरुवात करतो. ज्यातून ‘संजू’चा कल आपलं अधिकाधिक वास्तववादी चित्रण असलेलं चरित्र लिहिण्याकडे कसा आहे, हे सांगितलं जातं.
जो २०१३ मध्ये संजय दत्तला सुनावलेल्या पाच वर्षांच्या कैदेच्या निर्णयाचा दिवस असतो. ज्यानंतर मान्यता दत्त (दिया मिर्झा) विनी डियाझ (अनुष्का शर्मा) या नामवंत (पण काल्पनिक) चरित्रग्रंथ लेखिकेला संजयचं चरित्र लिहिण्याची गळ घालते. ज्यानिमित्तानं स्वतः संजय दत्तच्या कथनाच्या माध्यमातून ‘रॉकी’च्या चित्रणाचा काळ आणि त्यानंतरचा संजूचा ड्रग्सविरुद्ध सुरू असलेला लढा कथन केला जातो.
त्यानंतर संजूचा मित्र कमलेश कापसीच्या (विकी कौशल) कथनाच्या माध्यमातून १९९२मधील बॉम्बस्फोट प्रकरण आणि त्यानंतर संजय दत्तला झालेली अटक, हे प्रकरण हाताळलं आहे. तर एकूणच उत्तरार्ध मुख्यतः सुनील दत्त (परेश रावल) आणि संजयच्या या पिता-पुत्राच्या नात्यावर केंद्रित आहे.
त्यामुळे अभिजात जोशी, राजकुमार हिरानी या पटकथाकार जोडीनं चरित्रपटातील तसा महत्त्वाचा आणि गहन प्रश्न स्पष्टपणे सोडवला आहे. ज्यानुसार चित्रपट बहुतांशी भागात संजय आणि सुनील यांचं नातं (ज्याला कमलेशच्या पात्राच्या निमित्तानं आणखी भावनिक कोमलता आणि किनार प्रदान केली आहे), तसंच संजयवरील आरोप, त्याला झालेली कैद आणि सदर प्रकरणांत माध्यमांनी केलेला हस्तक्षेप यांच्याभोवती फिरतो. याखेरीज संजय दत्तच्या आयुष्याशी निगडीत काही व्यक्तींनी त्यांचा सहभाग या चित्रपटातून वगळण्याची मागणी केल्यानं ‘संजू’ विशिष्ट घटनांच्या आणि कालखंडाच्या माध्यमातूनच भावनिक आवाहन करत राहतो, जे समजण्यालायक आहे.
रणबीरनं ‘संजू’च्या निमित्तानं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीपैकी एक ठरेल असा असा सर्वोत्तम अभिनय केला आहे. ज्याला परेश रावल आणि विकी कौशल यांनी सहाय्यक भूमिकांमध्ये तितकीच योग्य, संयत अभिनयाच्या रूपात साथ दिली आहे. मनिषा कोईरालादेखील नर्गिस दत्त म्हणून विशेष उल्लेखनीय काम करते. चित्रपटात उल्लेख कराव्या अशा बऱ्याच जोड्या असल्या तरी कपूर-रावल-कोईराला किंवा कपूर-रावल-कौशल या जोड्या आपल्या एकत्र असण्याच्या काळात पडद्यावर काही नितांतसुंदर अशी दृश्यं उभी करतात. सोबतीला बोमन इराणी, अश्विन मुशरणसारख्या हिरानीच्या नेहमीच्या कलाकारांचीही साथ आहेच.
‘संजू’ हिरानीच्या ट्रेडमार्क शैलीनुसार विनोद आणि गंभीर बाबी यांच्यात योग्य समतोल साधत पुढे सरकत राहतो. अर्थात सुरुवातीला रणबीरचा संजयच्या भूमिकेतील परफॉर्मन्स काहीसा कॅरीकेचरिश स्वरूपाचा आहे. ज्याला मनिषा कोईरालाच्या पात्राच्या प्रवेशानंतर अधिक गंभीर रूप प्रदान केलं जातं. आणि चित्रपटाचं विनोदी अंग बाजूला पडते. त्यानंतर खऱ्या अर्थानं ट्रेलरमधून सांगितलेल्या ‘कुर्सी की पेटिया बांध लिजीये’सम प्रवासाला सुरुवात होते.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सदर चित्रपट म्हणजे एका बाप-लेकाची कथा असल्याचं हिरानीनी स्पष्ट केलं होतं. जे चित्रपट पाहिल्यानंतर पटतं. त्यातही याच उद्देशानं हेतूपुरस्सर केलेला उत्तरार्ध पाहता हिरानीसारख्या पटकथाकार-दिग्दर्शकाला त्यात आढळलेली भावनिक बाजू लक्षात येते.
‘संजू’ हा एक स्मार्ट चित्रपट आहे. ज्यात जोशी-हिरानी जोडी विनीचं काल्पनिक पात्र स्वतःला समांतर पद्धतीनं उभं करून चित्रपटाचा आणि संजय दत्तच्या एकूणच आयुष्याचा फाफटपसारा एकाच वेळी एकसंध आणि खिळवून ठेवणाऱ्या रूपात एकत्र आणतात.
‘तमाशा’सारख्या चित्रपटाचं अद्भुत चित्रण करणाऱ्या एस. रवी वर्मननं ‘संजू’मध्येही छायाचित्रणाबाबत अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. पार्श्वसंगीत भावनिक पातळीवर मॅनिप्युलेटिव्ह असलं तरी रोहन-रोहनची यातील गाणी चित्रपटात अडथळा ठरत नाहीत. ए. आर. रहमाननं ज्यावर पाहुणा संगीतकार म्हणून काम केलं आहे ते ‘रुबी रुबी’ गाणंही चित्रपटात योग्य ठिकाणी तितक्याच योग्य चित्रणाच्या सहाय्यानं दिसतं. बाकी ‘कर हर मैदान फतेह’ आवडणार नाही अशी व्यक्ती दुर्मीळ असावी. शेवटच्या श्रेयनामावली दरम्यान येणारं ‘मीडिया’वरील एक भन्नाट, काहीसं ‘मुन्नाभाई’मधील एका गाण्याला जवळ जाणारं गाणंही हेतूपुरस्सर तयार केलेलं असलं तरी त्यातही विशेष खटकावं असं काही नाही.
‘संजू’ हा त्याचा दृष्टिकोन आणि हाताळणी यांबाबत कसलीही भीड न बाळगणारा एक चांगला चित्रपट आहे. तो पूर्णतः प्रामाणिक आहे की नाही याचा विचार न करता दिग्दर्शक त्याला अपेक्षित असलेल्या आणि सांगू पाहणाऱ्या गोष्टीप्रती किती प्रामाणिक आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. इथं तरी हिरानी त्याला अपेक्षित असलेल्या गोष्टीला पुरेपूर न्याय देतो!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
meera k
Fri , 06 July 2018
'संजू' या चित्रपटावर चारचार लेख का बरे प्रसिद्ध करावेसे वाटले असेल आपल्याला? त्यातही काही वेगळे विश्लेषण देण्याचा प्रयत्नही दिसत नाही. असो. आम्हीच थांबणे योग्य.