अजूनकाही
‘परमाणु’ हा चित्रपट पाहणं, हा काही माझ्या यादीत नव्हता. कारण त्याविषयी फारसं काही ऐकलेलं वा वाचलेलं नव्हतं. पण पुण्याहून एक पाहुणे आले. त्यांच्या टॅक्सीच्या चालकानं त्यांना ऐकवलेली ‘परमाणु’ची गोष्ट त्यांनी मला ऐकवली. पाहुणचार करताना त्याच एका सिनेमाचा खेळ वेळेत बसत होता म्हणून सिनेमा पाहिला गेला. कधीकधी अचानक आपला वेळ उत्तम जातो. तसं समाधान हा चित्रपट बघताना मिळालं.
आणखी एक वैयक्तिक गोष्ट इथं सांगणं जरुरीचं आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे माझाही अणुबॉम्बला विरोध होता. १९७४ साली इंदिरा गांधींनी जेव्हा अणुस्फोट घडवून आणला, तेव्हा मी कीव-युक्रेनमध्ये विद्यार्थिनी म्हणून राहत होते. बातमी मिळाल्यावर अजिबातच आनंदी नव्हते. पण त्या दिवसभरात परिचयाचे असंख्य - अरब आणि आफ्रिकी - विद्यार्थी वसतिगृहातील खोलीवर भेटायला आले. प्रत्येक जण अभिनंदन करून म्हणत होता की, ‘छान झालं. आता आपल्याजवळ बॉम्ब आहे. आता हे बडे देश आपल्याला धमकावू शकणार नाहीत.’ मी त्यांना म्हटलं, ‘पण चीन जवळ आहे की!’ त्यावर ते म्हणाले, ‘चीन आपला नाही.’
माझ्या वास्तव्याच्या दोन वर्षांत माझा अनुभव असा होता की, ‘तिसऱ्या जगातील’ लोकांसाठी भारत हा त्यांचा नेता होता आणि त्याच्याकडून त्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा असायची. आता सगळंच बदललं आहे. अलिप्ततावादी चळवळ संपल्यात जमा आहे. हिंदूंचं नेतृत्व करणारे, ‘तिसऱ्या जगातील’ नेते म्हणून स्वीकार्य आहेत किंवा नाहीत हे जाणून घेण्याचं साधन नाही. पण तेव्हा मात्र भूमिका घेण्याबाबत माझा गोंधळच उडाला होता. १९९८च्या अणुबॉम्ब चाचणीला विरोधच केला होता. त्याची आवश्यकताही अजूनही मनाला पटलेली नाही.
त्याच १९९८च्या अणुबॉम्ब चाचणीवर हा चित्रपट आहे. आणि चित्रपट म्हणून मला आवडलेल्या चित्रपटांपैकी आहे. २ तास ९ मिनिटांचा हा चित्रपट अतिशय वेगवान आहे. पटकथा एकदम बंदिस्त आहे. नायक अश्वथ (जॉन अब्राहम) आयआयटी इंजिनिअर, वडील सैनिक व १९६२ च्या युद्धात वीरचक्र मिळवलेले, बायको अनुजा साठे सुशिक्षित, एक पाच-सहा वर्षांचा मुलगा. सुखी मनमिळाऊ कुटुंब. अश्वथ डिफेन्स मिनिस्ट्रीत काम करणारा, पण १९९५ साली बॉम्ब बनवण्याच्या कार्यक्रम अर्धवट तऱ्हेनं पंतप्रधानांपर्यंत पोचवल्यानं अपयशी व म्हणून नोकरी गमावलेला. बायकोचा त्याला पूर्ण पाठिंबा. वाजपेयी सरकार आल्यावर गुप्तपणे त्याच्यावर ही कामगिरी सोपवली जाते. तो ती कशाप्रकारे यशस्वी करतो? त्याची कथा म्हणजे हा चित्रपट.
जॉन अब्राहमचं पात्र काहीच प्रसंगांतून ठळक केलं आहे, त्याचप्रमाणे त्याची बायको. नंतर त्याचे सहकारी, ज्यांना तो निवडतो. प्रश्न पडतच नाहीत असं नाही. पोखरण जवळील जैसलमेर शहरात सीआयए व पाकिस्तानी एसआयएसचे हेर असतात. त्यामानानं भारतीय गुप्तहेर खातं अगदीच निष्प्रभ दाखवलं आहे. किंवा जैसलमेरसारख्या ठिकाणी पोलीसही अगदीच जोकर दाखवले आहेत. पण या गोष्टी सिनेमाचं स्वातंत्र्य म्हणून सोडून देता येतील. सगळ्यांची कामं उत्तम. पार्श्वसंगीत म्हणून राजस्थानी संगीत सुखद आहे. रणाचं छायाचित्रण छान आहे. एकही जास्तीचं अनावश्यक चित्रण नाही. संपूर्ण चित्रपटात सर्वजण शुद्ध हिंदीत बोलतात आणि ते कानांना सुखावह वाटतं.
भक्तांना देशभक्तीचे उमाळे येतील असा हा सिनेमा आहे आणि चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान देणाराही आहे.
.............................................................................................................................................
लेखिका वासंती दामले मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.
vasdamle@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sourabh suryawanshi
Tue , 26 June 2018
युधिष्ठिर, भिम, अर्जुन, नकुल, सहदेव म्हणे code name. हसू आलं खूप movie म्हणून छान पण यशोगाथा म्हणून बकवास !
Gamma Pailvan
Tue , 26 June 2018
वासंती दामले, सोव्हियेत साम्राज्य कोसळल्यावरच अलिप्ततावादी चळवळीचं प्रयोजन उरलं नाही. पण पूर्वी भूमिका घेण्यावरून तुमचा जो गोंधळ उडालेला होता तो आजून शमलेला दिसंत नाही. एकीकडे चित्रपट देशभक्तीचे उमाळे आणवणारा म्हणताय तर दुसरीकडे चांगलाही म्हणताय. एक ठाम बाजू घ्यावी म्हणतो मी. आपला नम्र, -गामा पैलवान