अरुण साधूंच्या ‘झिपऱ्या’ कादंबरीतील ‘झिपऱ्या’ची रंगलेली गोष्ट!   
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘झिपऱ्या’चं पोस्टर
  • Sat , 23 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie झिपऱ्या Ziprya अरुण साधू Arun Sadhu अमृता सुभाष Amruta Subhash प्रथमेश परब Prathamesh Parab

सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांची ‘झिपऱ्या’ ही कादंबरी एकेकाळी खूप गाजली होती. त्याच कादंबरीतील ‘झिपऱ्या’ दिग्दर्शक केदार वैद्य यांनी मोठ्या पडद्यावर आणला आहे. कादंबरीतील काळ अर्थातच जुना आहे. त्यामुळे हा ‘झिपऱ्या’ सध्याच्या काळातील वाटण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याची गरज होती. त्यामानानं चित्रपटात आवश्यक ते बदल केलेही आहेत मात्र ते तोकडे वाटतात. त्यामुळे चित्रपटाच्या कथेचा काळ जुनाच वाटतो. त्याकडे दुर्लक्ष केलं तर एक चित्रपट म्हणून ‘झिपऱ्या’ची गोष्ट मनावर चांगली पकड घेते.  

‘झिपऱ्या’मध्ये पाहायला मिळते ती झोपडपट्टीत राहणाऱ्या झिपऱ्या नावाच्या मुलाची कथा. आई आणि एकुलती एक बहीण यांच्यासमवेत झोपडपट्टीत राहणारा झिपऱ्या निरक्षर आहे. कारण तो मुळी शाळेतच गेलेला नाही. मात्र व्यवहारी जगात वावरताना त्याला आलेलं शहाणपण तसं खूप मोठं आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करून तो पैसे मिळवून कसाबसा आपला उदरनिर्वाह करत आहे. बूट पॉलिशचाच धंदा करणारी नाऱ्या, अस्लम, गंजू, पोंब्या ही इतर काही मुलं त्याच्या टोळीतील साथीदार आहेत. या टोळीचा पिंगळ्या नावाचा त्यांचा बॉस मात्र पैशासाठी हपापलेला आहे. धंदा कमी झाला तर पिंगळ्याकडून मारझोड होते. पिंगळ्याची दादागिरी मात्र या सर्वांना नाईलाजानं सहन करावी लागते. झिपऱ्याला अशीच मारहाण होत असताना अचानक घडलेल्या अपघातात पिंगळ्याचा लोकलखाली पडून मृत्यू होतो आणि त्यानंतर झिपऱ्या त्या टोळीचा बॉस होतो. मग तो आपल्या सहकाऱ्यांना या नरकयातनांमधून बाहेर काढण्यासाठी झिपऱ्या प्रयत्न करतो. त्यामध्ये तो यशस्वी होतो का, यासाठी चित्रपटच पाहायला हवा.   

या चित्रपटाच्या कथेतील सर्व प्रसंग मुंबईतील लोकल रेल्वे स्टेशनवर आणि त्यालगत असलेल्या झोपडपट्टीत घडतात. ते वातावरण खूप प्रभावी झालं असून शेवटर्यंत कायम टिकलं आहे. धावत्या लोकलप्रमाणेच चित्रपटातील अनेक प्रसंग वेगवान झाले आहेत. तसंच बूट पॉलिशचा धंदा करणाऱ्या मुलांचं भावविश्व उभं करण्यातही दिग्दर्शकाला चांगलं यश आलं आहे.

झिपऱ्यासह त्याच्या साथीदारांच्या व्यवहारी जगात वावरताना निर्माण झालेल्या भावभावना काही प्रसंगातून खूप चांगल्या रीतीनं प्रकट झाल्या आहेत. यातील नाऱ्या हा मुलगा आडदांड मात्र मंदबुद्धीचा आहे. शारीरिक गरजेतून त्यानं व्यक्त केलेल्या भावना, तसंच झिपऱ्याची तरुण बहीण लीली हिनं पाहिलेली स्वप्नं त्यांचं भावविश्व अधिक गडद करतात. लीली ज्यांच्या घरी घरकामाला जाते, ती पारशी मॅडम आणि झिपऱ्याला शिकण्याचा आग्रह धरणारे शाळा मास्तर, ही या चित्रपटातील सकारात्मक पात्रं या जगात सगळीच माणसं वाईट नसतात, तर अनेक चांगली भली माणसंही असतात हे दाखवून देतात. 

झिपऱ्याच्या टोळीतील अस्लम या मुलाचं पात्रही चित्रपटाच्या कथेत ठळकपणे लक्ष वेधून घेतं. सिनेमा पाहून त्यामधील आवडती डॉयलॉगबाजी करणारं हे पात्र अनेक प्रसंगांत झिपऱ्याला भारी पडलं आहे. बूटपॉलिशऐवजी चांगला धंदा करावा म्हणून पैसे मिळवण्यासाठी झिपऱ्याला वाईट काम करण्यासाठी प्रवृत्त करणारा हा अस्लम कंगाल परिस्थितीला कसा बळी पडतो, हे विदारक सत्य वास्तवाची जाणीव करून देतं. त्यामुळे शेवटचा प्रसंग लक्षात घेता कथेचा ‘हिरो’ अखेर अस्लमच ठरतो आणि झिपऱ्याची मात्र केवळ गोष्ट बनून राहते. 

सर्वच कलाकारांनी केलेला उत्तम अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चिन्मय कांबळीनं ‘झिपऱ्या’ची भूमिका प्रभावीपणे सादर केली आहे. मात्र अस्लमच्या भूमिकेतील प्रथमेश परबनं त्याच्यावर बाजी मारली आहे. अनेक प्रसंगांत तो भारी पडला आहे. नाऱ्याच्या भूमिकेतही सक्षम कुलकर्णी एकदम फिट्ट बसला आहे. तर लीलीची भूमिका अमृता सुभाष हिनं मोठ्या ताकदीनं सादर केली आहे. झिपऱ्या हा खुनी आहे हे कळल्यावर सर्व झोपडवासीयांसमोर तिनं दुःखाच्या उमाळ्यातून व्यक्त केलेली चीड, अगतिकता आणि काळजी सुन्न करून जाते.

याशिवाय नचिकेत पूर्णपात्रे (पिंगळ्या), प्रवीण तरडे (पक्याभाई), दीपक करंजीकर (शाळामास्तर) आदी कलाकारांची कामंही चांगली झाली आहेत. या चित्रपटातील ‘अलीबाबा...’ आणि इतर गाणीही कथेला पूरक असून श्रवणीय झाली आहेत. तौफिक कुरेशी यांनी दिलेलं पार्श्वसंगीतही उत्तम आहे.

थोडक्यात, अरुण साधूंच्या ‘झिपऱ्या’ कादंबरीतील ‘झिपऱ्या’ची ही गोष्ट चांगली रंगली आहे!   

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख