अजूनकाही
काळ कितीही बदलला, कितीही आधुनिकता आली तर आपला समाज परंपरा, अंधश्रद्धा यांच्या जोखडात अजूनही अडकलेला असल्याचं अनेक घटनांवरून सिद्ध होतं. अजूनही आपल्या समाजात मुलगी जन्माला आली की, तिच्याच घरातील काही जणांना दुःख होतं. आणि मुलगा झाला की, आनंद कितीतरी पटींनी वाढतो. विशेषतः मुलगी जन्माला आली आणि घरात काही विपरीत घटना घडली की, ‘मुलगी चांगल्या पायगुणाची नाही. तिच्यामुळेच ही वाईट घटना घडली’ असं समजलं जातं. नंतर तिच्यावर जन्मभर तसाच शिक्का बसतो. समाजातील अशा कुप्रवृत्तींविरुद्ध जनजागृती करण्याच्या दृष्टीनं सरकार आपल्या परीनं प्रयत्न करतं.
मोदी सरकारचं ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हे अभियान सध्या जोरात चालू आहे. ते डोळ्यासमोर ठेवून निर्मिती केलेल्या ‘अबक’ या नवीन मराठी चित्रपटात ‘धन की पेटी’ असलेल्या मुलीचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटात हरी आणि जनी या दोन अभागी भावा-बहिणीची कथा सांगण्यात आली आहे. हे दोघेही अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले. त्यातही जनी जन्माला येते आणि तिची आई मरते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडून ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून तिच्यावर शिक्का बसतो. मात्र लोहारकाम करणारे तिचे वडील सोमा (कमलेश सावंत) तसं न समजता जनीला चांगलं शिक्षण देण्याचं ठरवतात. हरीलाही त्यांनी त्याबाबत तसं सांगून ठेवलेलं असतं. मात्र दुर्दैवानं त्यांचाही अपघातात मृत्यू होतो. त्यामुळे हरी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनीसह गाव सोडून दुसऱ्या गावाला जातो. सुरुवातीला आश्रयासाठी रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या एका कुटुंबात राहतो. तिथं आजोबा (किशोर कदम) त्याला आधार देतात. मात्र त्यांना आपला अधिक त्रास नको म्हणून हरी जनीसह गावाच्या स्मशानात राहतो. तिथं मिळणारे पैसे आणि नंतर स्वतः कष्ट करून मिळालेले पैसे गोळा करून जनीला शाळेत घालतो आणि अखेर वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो.
या चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद आबा गायकवाड यांनी लिहिले आहेत. कथा एका विशिष्ट हेतूनं लिहिलेली असली तरी पटकथा पाहिजे तेवढी बंदिस्त नाही. त्यामुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. मुख्य म्हणजे दिग्दर्शकाचं नवखेपणही दिसून येतं. मात्र छायालेखक महेश अणे यांनी अनेक प्रसंगात त्याची कसर भरून काढली आहे. काही उपकथानकं -विशेषतः रस्त्यावर काही अनाथ मुलांना सांभाळणारे आजोबा- कथेला जाणीवपूर्वक जोडण्यात आल्याचं जाणवतं. त्या आजोबांचं कुटुंब बॉम्बस्फोटात उदध्वस्त झाल्यामुळे ते रस्त्यावर आल्याचं दाखवलं आहे. (हे कारण समर्पक वाटत नाही) त्यामुळे त्यांचे आणि हरी-जनीचे अनेक प्रसंग हे एकसुरी कारुण्यानुभव वाटतात.
शिवाय निरक्षर, अडाणी मुलं जेव्हा ‘पुस्तकी संवाद’ बोलू लागतात, तेव्हा जे वास्तव दाखवायचं आहे ते कुठेतरी हरवल्याचं वाटू लागतं. कथेतील नाट्य वाढवण्यासाठी जनीला पळवून नेण्याचा प्रसंग घालण्यात आला आहे. त्यातून ‘बाप्पा’ या व्यक्तिरेखेचं दर्शन घडतं. मात्र ते सुनील शेट्टी यांना केवळ पडद्यावर दाखवण्यासाठी आहे, हेही लगेच जाणवतं. तमन्ना भाटिया ही सुंदर अभिनेत्रीही एका प्रसंगात अशीच पडद्यावर दिसून लगेच नाहीशी होते. (त्या प्रसंगाचं तात्पर्य चांगलं ठसवण्याची आवश्यकता होती). हरी-जनीचे अधूनमधून फोटो काढणारी टीव्ही रिपोर्टर हीदेखील अशीच. त्यांच्या व्यक्तिरेखा अधिक विकसित करण्याची गरज होती.
दुःख आणि दारिद्रयाच्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर किशोर कदम यांच्या आवाजातील काही कविता मात्र जीवनातील कठोर वास्तव सांगून जातात. बापी-तितुल आणि साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कथेला अनुरूप आहेत. शेवटचं अमृता फडणवीस यांचं गाणं मात्र पूर्ण प्रचारकी थाटाचं झालं आहे.
या कथेमध्ये प्रामुख्यानं लहान मुलं हीच ‘नायक’ असल्यामुळे त्यांच्याकडून अभिनयाच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत. विशेषतः साहिल जोशीनं ‘जबाबदार’ हरीची भूमिका खूपच समजून-उमजून केली आहे. मैथिली पटवर्धन (जनी), सन्नी पवार (मरग्या), आर्या घारे (झिपरी), सिधी (चिमणी) या बालकलाकारांनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. सुनील शेट्टी, सतीश पुळेकर, कमलेश सावंत, किशोर कदम, प्रेमा किरण, भक्ती चव्हाण, प्रशांत तपस्वी यांनीही छोट्याश्या भूमिकेत आपला प्रभाव दाखवला आहे.
थोडक्यात, ‘अबक’चा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा ‘नारा’ चांगला आहे, मात्र तो एकसुरी कारुण्यानुभव ठरला आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment