अजूनकाही
‘फॉर अ चेंज’ म्हणून काळ्या रंगाचा गॉगल लावून, सोबतीला काळ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी दाढी अशा अवतारात चेहऱ्यावर एक मिश्किल भाव आणि सुरकुत्या घेऊन चित्रपटभर वावरणारा ‘रजनीकांत’ पाहणं नक्कीच चांगलं आहे. ज्याला चांगलं दिग्दर्शन आणि संगीताची साथ आहे. ज्यामुळे दरवेळीप्रमाणे अभेद्य, अशक्य असा नायक ‘रजनी’ न दिसता एक भेद्य व्यक्ती आपल्याला समोर दिसतो. अर्थात त्यातही गरजेचा मसाला, काही विरेचित क्षण आहेत. आणि तसंही, रजनीकांतला त्याच्याच चित्रपटात अॅक्शन करताना पाहिलं नाही तर काय पाहिलं!
चित्रपटाची सुरुवातच मुळी डॉक्युमेंटरीवजा दृकश्राव्य कथनानं होते. ज्यातून कॉर्पोरेट जगतानं आणि राजकीय आश्रयानं झोपडपट्ट्या हटवून त्या जागी मोठी टॉवर्स बांधण्याच्या, आणि ‘प्योर मुंबई’चा नारा लावत तेथील रहिवाश्यांना बेघर करणाऱ्या प्रकल्पांवर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे चित्रपट या विषयाला हात घालणार हे तर पक्कं असतं. त्यामुळे फक्त त्याचं फलित कसं होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
काला करिकालन (रजनीकांत) हा धारावीमधील एका झोपडपट्टी भागातील मोठा ‘दादा’ असतो. ज्याला त्या भागातील लोक ‘मानतात’, त्याचा आदर करतात. ज्याला कारण अर्थातच तो एक चांगला व्यक्ती आणि रूढ शब्दांत ‘मसीहा’, गरिबांचा वाली असतो. तर हरिदेव अभ्यंकर उर्फ हरिदादा (नाना पाटेकर) हा एक मोठा नेता (आणि पूर्वाश्रमीचा गुंड) आहे. ज्याचं आणि कालाचं वैयक्तिक पातळीवरील वैर आहे. मग याच वादाला हरिदादाचं धारावीच्या झोपडपट्टीला नेस्तनाबूत करून, तेथील रहिवाश्यांना चांगली घरं देण्याच्या नावाखाली मुंबई ‘प्योर’ करणं या गोष्टीमुळे पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.
कालाचा मुलगा, लेनिन (मनिकांडण), त्याची प्रेयसी (अंजली पाटील) यांच्यात त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून मतभेद असले तरी शेवटी त्यांचा उद्देश धारावीचं भलं हेच आहे. ज्याला झरीनाचीही (हुमा कुरेशी) साथ लाभते.
‘काला’बाबत खास बाब अशी की, यातही खास रजनी स्टाइल दृश्यं आणि क्षण असले तरी ते कमी आहेत. यात नेहमीप्रमाणे सबकुछ रजनीही तसा कमी आहे. यात त्याला अधिक मानवी, मूर्त स्वरूप लाभलं आहे. तो केवळ काहीही करू शकणारा नायक नाही, तो भेद्य आहे. त्याला उणीवा (आणि काही वेळा मर्यादाही) आहेत.
शिवाय वेळोवेळी तो लुंगी वर करून, चष्मा काढून हाणामारी करेल अशा ठिकाणी तो बॅकफूटवर जाऊन त्याचे लोक, त्याची मुलं पुढे येऊन लढतात, हेही त्याचा स्टेटस पाहता समजण्यालायक आहे. तरीही दोनेक वेळा रजनीचा विध्वंसक अवतार पहायला मिळतोच. आणि तो मिळायलाही हवा. कारण तोच पाहण्यासाठी तर प्रेक्षक त्याच्या सिनेमाला येतात. भर पावसामध्ये ‘काला’च्या ‘सिग्नेचर ट्यून’ आणि त्याला जोड असलेल्या जबरदस्त पार्श्वसंगीत आणि छायांकनाच्या सोबतीनं एका पुलावर रजनी तशी करामत करतोच.
नाना पाटेकरचा हरिदादा साऊथ इंडियन चित्रपटांतील एरवीच्या ‘फिल्मी’ खलनायकासारखा नाही. तो स्वभावानं अधिक शांत आहे. त्याचा थंड डोक्याचा नेता त्याच्या शुभ्र कपड्यांच्या आणि कालाच्या काळ्या कपड्यांसोबतच त्यांच्या विचारांतील कॉन्ट्रास्टही अधोरेखित करतो.
हुमा कुरेशीचं उपकथानक चांगलं असलं तरी काहीसं अनावश्यकही आहे. पंकज त्रिपाठी आणि अंजली पाटील दोघेही लहान भूमिकांमध्ये आहेत. बाकी ईश्वरी रावनं कालाची पत्नी, ‘सेल्वी’च्या भूमिकेत चार चाँद लावले आहेत. जगासमोर अभेद्य असलेला काला तिच्यापुढे शांतपणे बसलेला पाहून, हे फक्त हीच करू शकते, याची जी अनुभूती येते, ती त्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित आली नसती.
‘काला’चं यश त्याच्या दिग्दर्शनातही आहे. पा. रणजितनं रजनीकांतच्या प्रतिमेला धक्का न लागू देता त्याला ‘व्हल्नरेबल’ दाखवण्याची किमया साधली आहे. हीच बाब मुरली जीच्या छायाचित्रणासाठी लागू पडते. पुलावरील फाइट सीक्वेन्स ते कालाचं शेवटचं दृश्य… वेळोवेळी छायांकनाला दाद द्यावीशी वाटते. याखेरीज संतोष नारायणचं पार्श्वसंगीत, कालाची सिग्नेचर ट्यून या बाबीही खास उल्लेख कराव्या अशा आहेत.
‘काला’चं वर्णन करताना ‘काला रे’ गाण्यातील ‘सैंया काला रे’ हे शब्द आठवतात. ज्यात योगायोग म्हणजे याच्या हिंदी व्हर्जनमधील काही गाणी याच ‘काला रे’ लिहिणाऱ्या वरुण ग्रोवरनं लिहिली आहेत.
'काला'चा काहीसा कंटाळवाणा असलेला थर्ड अॅक्ट वगळता त्यात आवडणार नाही असं विशेष काही नाही. अगदी स्ट्राईकचा भागही चित्रपट म्हणून पाहिल्यास त्या ठिकाणी योग्यच वाटतो. मात्र त्यादरम्यान चित्रपट रेंगाळतो हेही तितकंच खरं.
मात्र शेवटचं दृश्य आणि त्याला असलेली संगीताची जोड यांच्या जोरावर चित्रपट पुन्हा रुळावर येऊन एका चांगल्या प्रकारे या प्रकरणाचा अंत करतो. दरवर्षी पाहण्यात आलेल्या चित्रपटांच्या यादीतील काही चित्रपटांतील काही विशेष सिनेमॅटिक दृश्यं खास लक्षात राहतात. वेळोवेळी वेगवेगळ्या चित्रपटांनी हे काम केलेलं आहे. यावेळी ते काम 'सुपरस्टार रजनी'च्या ‘काला’चा शेवट करेल, एवढं मात्र नक्की आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment