अजूनकाही
साक्षीच्या लग्नाला ग्रहण लागलंय. ती नवऱ्याला सोडून वापस भारतात का आलीय, हे उर्वरित तिघींना माहिती नसतं. तिने स्वतःला त्यांच्या रोषापासून वाचवण्यासाठी त्याचं कारण लपवून ठेवलेलं असतं. तिचं कारण मात्र खास भारतीय पुरुषांची मानसिकता दाखवणारं आहे. हा प्रसंग स्वरा भास्कर अतिशय उत्तमपणे करते. हा सिनेमाचा हायलाईट आहे. तिच्याजागी दुसऱ्या अभिनेत्रीची कल्पना करणं चुकीचं ठरेल. दिग्दर्शकाने तिची केलेली निवड योग्य, की तिने पटकथेची केलेली निवड योग्य? मात्र यात फायदा प्रेक्षकांचाच हे नक्की. यामुळे चौघींच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय याचाही उलगडा होतो. तरीही सिनेमा एकजिनसीपणा टाळतो. हा दोष तार्किकतेचा न राहता त्याच्या ‘आम्ही क्रांतिकारक काहीतरी करतोय’ या आविर्भावात आहे.
कालिंदी पुरी (करीना कपूर), अवनी शर्मा (सोनम कपूर), साक्षी सोनी (स्वरा भास्कर) व मीरा सुद (शिखा तलसानिया) या दिल्लीत राहणाऱ्या शाळकरी जीवश्चकंठश्च मैत्रिणी. वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्या तरी एकमेकींपासून कधीही दूर न राहणाऱ्या. पैकी कालिंदी कामानिमित्तानं ऑस्ट्रेलियात असते. मीरानं एका अमेरिकन मुलाशी पळून जाऊन लग्न केलंय. साक्षीचं लग्न होऊन सहाच महिने झालेत, पण ती भारतात परत आलीय. तर अवनी ‘डिव्होर्स लॉयर’ म्हणून प्रसिद्ध आहे पण तिचं लग्न मात्र होत नाहीये. शाळकरी मैत्री असल्या तरी कालिंदी व अवनीच्या आयुष्यात एक टप्पा येतोय, ज्यासाठी त्या तयारही आहेत व नाहीतही. कालिंदीचा प्रियकर रिषभ मल्होत्रानं (सुमित व्यास) तिला लग्नाची मागणी घातलीय. तिला तो आवडतो. तिचं प्रेम आहे, पण इतक्यात लग्न करावं की नाही याबद्दल ती साशंक आहे. तरीही ती ‘हो’ म्हणते. तिच्या होकारामुळे उरलेल्या तिघी तिच्या लग्नासाठी एकत्र येतात. सासरकडच्या मंडळींना तोंड देता देता कालिंदीच्या मनात एकूणच लग्नाबद्दल तिडीक निर्माण होते. ती ऐन साखरपुड्याच्या दिवशी सगळं सोडून पळून जाते...
दिग्दर्शक शशांक घोष यांचा हा पाचवा सिनेमा. २००३ मध्ये आलेल्या ‘वैसा भी होता है भाग २’ या सिनेमामुळे ते एकदम चर्चेत आले. त्याच्या कथानक मांडण्याच्या वेगळेपणामुळे त्याचं कौतुकही झालेलं. सोबत कैलाश खेरच्या ‘अल्ला के बंदे’ या गाण्यानं तर सिनेमाची भरपूर हवाच केली होती. नंतर आलेल्या ‘क्विक गन मुरुगन’मध्ये भारतीय वेस्टर्न बनवला होता. मुळात चॅनल व्हीवर असणाऱ्या या पात्राला सिनेमाचं नायक करण्यात आलं होतं. ‘मुंबई कटिंग’ या अँथालॉजीतली एक कथा दिग्दर्शित केलेली. त्यानंतर हृषिदांच्या ‘खुबसुरत’चा आधार असणारा ‘खुबसुरत’ दिग्दर्शित केलेला. चारही सिनेमांमध्ये वेगवेगळी कथानकं हाताळण्याचा अनुभव घोषना आहे. तसंच बॉक्स ऑफिसवर कुठल्या प्रकारचा सिनेमा सध्या धुमाकूळ घालतोय, याच्याशी त्याला देणंघेणं नसावं असं दिसतं. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत फक्त तीन सिनेमे आणि एक अँथालॉजी सेगमेंट इतकंच काम असणाऱ्या घोषकडून सशक्त कथानक व काही एका भाष्याची अपेक्षा होती. कारण ट्रेलरनं अपेक्षा वाढवल्या होत्या.
पटकथाकार निधी मेहरा-मेहुल सुरी यांनी कथेत दोष ठेवायचा नाही, याचा कसोशीनं प्रयत्न केला आहे. दरवेळी कथानकात दोष असावाच असं नाही, तर तार्किक उत्तर देण्यात यावीत, हे अपेक्षित असतं. शक्यतो पटकथेनं सर्व गोष्टी स्पष्टपणे समोर मांडाव्यात, जेणेकरून पात्रांबद्दल व त्यांच्या वागण्यामागची कारणं कळावीत. या कथेत जिथं मुळातच दिग्दर्शकाला एक हलकाफुलका सिनेमा अपेक्षित आहे, तेव्हा तर त्यांचं स्पष्टीकरण देणं ही प्राथमिक गोष्ट ठरते. इथं सर्व गोष्टी स्पष्टपणे कळण्यासाठी पटकथेत जागा तयार केलेल्या आहेत. उदा. चौघीजणी जेव्हा फुकेतला जातात, तेव्हा तिथं दंगामस्ती करताना त्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय याचा उलगडा होतो. खरं तर त्या ज्या परिस्थितीत फुकेतला जातात हे विश्वसनीय आहे, पण पटकथेचा विचार केला तर अनावश्यक आहे असं वाटतं. त्यामुळे तार्किक कथानक असलं तरी त्याचं असं जागा तयार करणं खटकतं. त्यामुळे कथा नैसर्गिकपणे फुलत नाही. तसंच चौघीजणी शाळकरी मैत्रिणी असल्या तरी एकमेकीत घट्ट मिसळल्यात असं वाटत नाही. एक प्रकारे पात्रांच्या वागण्यात तुटलेपणा जाणवतो. हा तुटलेपणा व्यक्तीरेखांचा जितका आहे, तितकंच त्यांचं पडद्यावर साकारणं यातही आहे.
हे म्हणण्याचं कारण पहिल्या परिच्छेदात आहे. मुलींनी पुरुषी जोखडातून बाहेर येण्यासाठी त्यांच्यासारखंच वागणं म्हणजे मुक्त होणं असं काहीसं पात्ररचना करताना पटकथाकार ठरवतात. चौघीजणी सतत सिगरेट-दारू पिणं, शिव्या व लैंगिकतेबद्दलचे संवाद हेच नैराश्यातून बाहेर येण्यासाठी उपयोगाचं आहे अशा आविर्भावात बोलतात. त्यांचं वागणं, बोलणं नैसर्गिक न वाटता आपण काहीतरी वेगळं करतोय या दृष्टिकोनातून येतं. यामुळे पात्रावर कुरघोडी होतेय असंही वाटतं. त्यामुळे काही काही प्रसंगात जिथं त्यांनी सर्वसामान्यांसारखं वागणं अपेक्षित आहे, तिथं शिव्यांचा आधार घेतात. मागच्या वर्षी आलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमात शेवटी त्या चौघी सुद्धा जेव्हा दारू-सिगरेटचा आधार घेतात, तेव्हा स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांसारखी व्यसनं करणं इतकंच आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर सोशल मीडियावर चर्चाही झालेली. त्यातल्या चौघी खऱ्या होत्या, कारण दिग्दर्शकानं त्या तशा उभ्या केलेल्या. इथल्या चौघीजणी कधी खऱ्या, तर कधी खोट्या वाटतात. त्यामुळे त्यांचं वागणं कधी खरं, तर कधी खोटं होतं. अर्थात याचा दोष पटकथाकाराबरोबर दिग्दर्शकालाही आहे. त्याची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी सदोष असावी, नाही तर त्यांनी अजून विश्वसनीय वाटणारे संवाद व पात्रांना त्रिमिती आकार देण्यासाठी पटकथाकारांना भाग पाडलं असतं. ते होत नाही.
वरील चर्चा सोडली तरी सर्वांचाच चांगला अभिनय ही जमेची बाजू. खास उल्लेख करायला हवा स्वरा भास्करचा. एकीकडे ती ‘नील बटे सन्नाटा’ व ‘अनारकली ऑफ आरा’सारख्या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसते. इथं तिची भूमिका महत्त्वाची असली तरी करीना कपूरभोवती फिरणारं कथानक असल्यामुळे तिला कमी प्रसंग मिळतात. त्यातही अतिश्रीमंत असणारी, सतत दारू-सिगरेट पिणारी व तोंडात शिव्या यातनं चेहऱ्यावर मग्रुरी दाखवणारी साक्षी तिने अप्रतिम साकारलीय. सुदैवानं सिनेमाचा हायलाईट असणारा प्रसंग तिच्यावर चित्रित झालाय. सोनम कपूर व करीना कपूर त्यांच्या पात्राला जिवंत करण्याचं आटोकाट प्रयत्न करतात, पण त्यात नैसर्गिकपणा नाही. शिखा तलसानियाचं मीरेचं पात्र या तिघींपेक्षा कमी प्रसंग असणारं आहे, पण ती लक्षात राहते. इतर अभिनेत्यात विवेक मुश्रन, सुमित व्यास, मनोज पहावा चांगली साथ देतात.
एक-दोन गाणी चांगली आहेत. फुकेतमध्ये चित्रित केलेलं पार्श्वभूमीला वाजणारं ‘वीरे’ लक्षात राहणारं. अशात गेल्या काही वर्षांत हिंदीत प्रत्यक्ष नायक-नायिकांनी गाणं म्हणणं दुर्मीळ होत चाललंय. शक्यतो पार्श्वभूमीला प्रसंगांच्या मूडनुसार त्यांचा वापर केला जातो. हे लक्षण चांगलं आहे की नाही यावर नाही बोलता येणार, पण यामुळे कधी काळी गाण्यांवर व संगीतावर कथानकाची कमालीची भिस्त असायची, तो लंबक मात्र दुसऱ्या टोकाला पडत चाललाय हे नक्की. हा बदल चांगला असेल तर पटकथेकडून आता जिवंत, विश्वसनीय पात्ररचना व वास्तववादी सिनेमा अपेक्षित आहे.
हिंदी सिनेमात एक प्रकारे रोमँटिसिझम सतत डोकावत असतो. कथेत कितीही दुःखाचे प्रसंग असले तरी शेवट नेहमी गोडच असावा असा एक अलिखित नियम असावा असं वाटतं. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. घोष यांच्या पहिल्या सिनेमानं वेगळ्या वाटेवरून जाणारा दिग्दर्शक असं चित्र उभं राहिलं होतं, पण ‘खुबसुरत’ व यावरून ते मळलेल्या वाटेवरूनच मार्गक्रमणा करणार असं तरी सध्या दिसतंय.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment