इच्छा-आकांक्षानी भरलेली ‘बकेट लिस्ट’
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘बकेट लिस्ट’ची पोस्टर्स
  • Sun , 27 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie बकेट लिस्ट Bucket List माधुरी दीक्षित Madhuri Dixit

‘बकेट लिस्ट’ हा शब्द तसा आधुनिक युवा पिढीचा. त्यामुळे सर्वसामान्यांना तसा तो अपरिचितच आहे. जुन्या पिढीला तर हा शब्दही माहीत नसावा. या शब्दाच्या खोलात जायचं तर ‘बकेट लिस्ट’ म्हणजे इच्छा-आकांक्षाची यादी. आपल्या आयुष्यात आपल्याला महत्त्वाच्या अशा कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत, त्याची आपल्या इच्छेनुसार केलेली यादी. अर्थात एकदा का संसार नावाच्या जीवनाच्या रहाटगाडग्यात तुम्ही अडकलात की, ही ‘बकेट लिस्ट’ तुम्हाला माळ्यावरती अडगळीतच टाकून द्यावी लागते.

थोडक्यात या ‘बकेट लिस्ट’मधील तुमची एकही इच्छा तुम्हाला पूर्ण करता येईल की, नाही याची तुम्हालाच हमी देता येत नाही. बहुतेक सर्वसामान्य लोकांचा हाच अनुभव असतो. अलीकडच्या तरुण पिढीत मात्र अशी ‘बकेट लिस्ट’ तयार करण्याची आणि शक्यतो ती पूर्ण करण्याची तळमळ दिसून येते.

‘बकेट लिस्ट’ या नवीन मराठी चित्रपटात इच्छा-आकांक्षाची सफल पूर्ती करणारी नाट्यपूर्ण कथा पाहायला मिळते. नवीन विषय, त्यादृष्टीनं आवश्यक असणारी भावनाप्रधान कौटुंबिक कथा आणि या चित्रपटाद्वारे साक्षात माधुरी दीक्षित या एकेकाळच्या बॉलिवुडमधील गाजलेल्या अभिनेत्रीनं मराठीत केलेलं पदार्पण, यामुळे ही ‘बकेट लिस्ट’ निश्चितच पाहण्यासारखी आहे. या चित्रपटाद्वारे लेखक-दिग्दर्शक तेजस प्रभा देऊस्कर यांनी एक अतिशय नवखा विषय हसत-खेळत पद्धतीनं सादर केला आहे. 

या चित्रपटाची कथा कौटुंबिक आहे आणि शेवटपर्यंत कथेत संमिश्र भावनांचं दर्शन घडत असल्यामुळे ही ‘बकेट लिस्ट’ हलकीफुलकी झाली आहे. यामध्ये पाहायला मिळते, ती मधुरा साने नावाच्या एका सुखवस्तू गृहिणीची कथा. ती इतरांप्रमाणेच स्वतःचं मोठं कुटुंब मायेनं सांभाळणारी एक गृहिणी आहे. नवरा, दोन मुलं (एक मुलगा, एक मुलगी), सासू-सासरे आणि आजेसासू असं एकत्र कुटुंब सांभाळणारी ही गृहिणी सर्वांकडे लक्ष देता देता स्वतःचं आयुष्य मात्र विसरून गेली आहे. अर्थात आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तिनं हे साहजिकच आनंदानं मान्य केलं आहे. त्यामुळे तिची त्याबद्दल कसलीच तक्रार नाही.

मात्र तिच्या आयुष्यात अचानक सई नावाची मुलगी येते आणि मधुराला सईची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्याची इच्छा होते. अर्थात ही सई कोण असते? आणि मधुराला सईची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्याची इच्छा का होते? आणि ती त्या सईच्या ‘बकेट लिस्ट’मधील इच्छा पूर्ण करू शकते का? यासाठी हा मनोरंजक चित्रपट पडद्यावरच पाहणं इष्ट ठरेल. 

या चित्रपटाच्या कथेत प्रामुख्यानं चार पिढ्या येतात. त्यामधील अंतर छोट्या-छोट्या प्रसंगातून फार छान पद्धतीनं दर्शवण्यात आलं आहे. मधुरावर सासूगिरी करणारी करणारी जशी ‘सासू’ आहे, तशीच त्या ‘सासू’वर सून म्हणून अधिकार गाजवणारी आणि प्रसंग पडताच तिला टोमणे मारणारी ‘आजेसासू’ही आहे. तसंच मधुराची मुलगी- राधिका- आधुनिक काळानुसार ‘स्मार्ट’ दाखवली आहे. तिच्याकडून मधुराला ‘बकेट लिस्ट’चा अर्थ कळतो. अर्थात मधुराला स्वतःची ‘बकेट लिस्ट’ करायला वेळच मिळालेला नसतो. त्यामुळे सईची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्यासाठी तिनं केलेली धडपड हेच कथेचं मुख्य सूत्र बनलं आहे. त्याला तसं सबळ कारणही आहे. विशेष म्हणजे सईची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करताना पारंपरिक विचाराची मधुरा कधीकधी पूर्णपणे ‘मॉड’ होऊन जाते. मात्र त्यामुळे मधुरा एका दुःखी कुटुंबात आनंद निर्माण करू शकते. ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्यासाठी मधुरानं केलेली बाईक रायडिंग, पबमध्ये जाऊन तिथं केलेला राडा आदी प्रसंग प्रभावीपणे वठले आहेत. (पबमध्ये साक्षात रणधीर कपूर असूनही त्याच्याबरोबरचा प्रसंग मात्र तेवढी मजा आणत नाही. तो आणखी वाढवण्याची गरज होती).

सईची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्यासाठी मधुरा धडपड करताना काही अंगलट आलेले प्रयोग आणि त्यामुळे मधुराच्या घरच्यांचा झालेला विरोध हे गृहीतच आहे. मात्र त्याची तीव्रता जाणवताना तिथं समंजसपणाचंही सम्यक दर्शन घडतं, ही बाब निश्चितच दिलासा देऊन जाते. शिवाय कुटुंबातील व्यक्तींची एकमेकांना असलेली साथ किती महत्त्वाची असते, त्याचंही योग्य दर्शन घडतं. एका महत्त्वाच्या विषयाचं खेळकर पद्धतीनं सादरीकरण हे ऑपरेशन टेबलवरील अगदी पहिल्या प्रसंगापासून जाणवतं. त्यामुळे चित्रपटाची कथा कुठेही रटाळ होत नाही.      

मधुराची भूमिका माधुरीनं समजून-उमजून केली आहे. तीच या कथेची नायिका असल्यामुळे तिच्यावरचा कॅमेरा प्रामुख्यानं केंद्रित झाला झाला आहे. काही विनोदी प्रसंग तिनं छान रंगवले आहेत. शुभा खोटे (आजेसासू), वंदना गुप्ते (सासू), प्रदीप वेलणकर (सासरा) यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना मजा आणली आहे. याशिवाय सुमित राघवन (नवरा), कृत्तिका देव (मुलगी), रेणुका शहाणे व मिलिंद फाटक (साईचे आई-बाबा), सुमेध मुदगलकर (सईचा भाऊ) आणि सईच्या मित्र-मैत्रिणी यांच्याही भूमिका छान वठल्या आहेत.

इतर तांत्रिक अंगाबरोबरच अर्जुन सोरटे यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणामुळे हा चित्रपट चकचकीत होण्यास चांगली मदत झाली आहे. तसेच रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कथेच्या आशयाला पूरक ठरली आहेत.

थोडक्यात, ‘बकेट लिस्ट’ करमणुकीनं तर भरलेलीच आहे, शिवाय ती अवयवदानासारख्या महत्त्वाच्या विषयाला प्रोत्साहित करणारीही आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......