‘मसान’ : जबरदस्त अनुभव देणारा आणि अंतर्मुख करणारा सिनेमा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अनंत देशमुख
  • ‘मसान’चं पोस्टर
  • Sat , 26 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मसान Masaan रिचा चड्ढा Richa Chadha संजय मिश्रा Sanjay Mishra विकी कौशल Vicky Kaushal

‘मसान’ हा काही पॉप्युलर सिनेमा नाही. त्यात आजचे आघाडीचे समजले गेलेले कलावंत नाहीत. त्यात मुळात फारशी गाणी नाहीत आणि लोकप्रिय होतील अशी तर नाहीच नाही. तरीही एकदा चित्रपट सुरू झाला की, तो जबरदस्त वेगानं आपल्याला मूळ कथावस्तूकडे खेचून घेतो... इतकी विलक्षण ताकद तिच्यात आहे.

‘मसान’ म्हणजे स्मशान. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला. नीरज धायवान यांनी तो दिग्दर्शित केला आहे आणि वरुण ग्रोवर यांनी त्याची पटकथा लिहिली आहे.

चित्रपटाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा दीपक चौधरी. तो बनारसच्या हरिश्चंद्र घाटावरील एका कामगाराचा मुलगा. या घाटावर मृतावर शेवटच्या क्रिया केल्या जातात. हा मुलगा इतर वेळी आपल्या नातेवाईकांबरोबर प्रेतं जाळण्याचं काम करतो. खरं तर तो इंजिनिअर झालेला. तो नोकरीच्या शोधात असतो. अशा वेळी इंटरनेटवर त्याची ओळख श्यालू गुप्ता या उच्च मध्यमवर्गीय मुलीबरोबर होते. ते परस्परांना भेटतात आणि त्याची परिणती प्रेमात होते. वास्तविक पाहाता रंगमंचावर काय दाखवावं, काय दाखवू नये याचे संकेत भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्रा’त सांगितले आहेत. त्यात ‘स्मशानाचे चित्रण नसावे’ हाही एक संकेत आहे. पण इथं तर नायकच त्या व्यवसायाशी निगडित. म्हणून अनेक दीर्घ आणि तपशीलवार दृश्यं. पण ती कुठेही उपरी, अ-कलात्म वाटत नाहीत. तिथला एक नाट्यात्म प्रसंग असा आहे. दीपक आणि श्यालू यांच्या गाठीभेटी वाढल्यावर त्यांचं मोबाईलवर बोलणं सुरू होतं. एकदा असंच दीपक हरिश्चंद्र घाटावर फेऱ्या मारता मारता बोलत असतो आणि त्याच वेळी कॅमेरा आजूबाजूची जळणारी प्रेतं दाखवत त्याच्याभोवती फिरतो आहे, असं दाखवलं आहे. उत्कट प्रेमालाप आणि मृत्यूसंस्कार म्हणजे प्रत्यक्ष जीवनातील विरोधी ताण, इथं कलात्मतेनं सूचित केला आहे. पुढे  तसंच घडतंही. अचानक एके दिवशी दीपक प्रेतकर्म करत असताना श्यालूचंच प्रेत समोर येतं.

पण इतकं एकसुरी हे कथानक नाही. त्याला समांतर जाणारं तितकंच दाहक वास्तव असलेलं आणखी एक कथानक आहे. अगरवाल व देवी पाठक हे तरण-तरुणी परस्पराच्या प्रेमात असतात. एके दिवशी ते दोघं एका लॉजवर जातात. तो तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून अंगठी देतो आणि मग त्यांचं मीलन होतं. दरम्यान धाड पडते. पोलिस त्या दोघांना क्रूरतेनं मारतात. तो स्वत:ला बाथरूममध्ये कोंबून घेतो. हाताची नस कापतो. मरतो. त्या तरुणीची होणारी कोंडी, घुसमट नंतर तपशीलांसह येते.

बाप (विद्याधर पाठक) गरीब. त्याच्याकडे पोलिस केस दाबून टाकण्यासाठी दीड लाख मागतो. बापाचे प्रयत्न. बाप आणि मुलीचा वाद. मुलगी नोकरी मिळवण्याचे प्रयत्न करते. ती मिळते तर एकजण तिच्याकडे थेट मागणी करतो. ती नोकरी सोडते. तिचे पुन्हा प्रयत्न. पुढे तिला रेल्वे रिझर्वेशन ऑफिसात नोकरी मिळते.

ती (देवी) आपल्या मृत प्रेमिकाच्या घरच्यांचा पत्ता शोधते. पण व्यर्थ. असाहाय्यतेनं त्यानं दिलेली अंगठी ती गंगार्पण करते.

हे मी इथं अगदीच ओबडधोबड पद्धतीनं लिहिलं आहे. मूळ चित्रपटात अतिशय कलात्म रीतीनं दाखवलं आहे. उदाहरणार्थ, गंगेच्या प्रवाहात पैसे फेकून दिल्यावर मुलं डुबकी मारून ती शोधून काढतात. त्यासाठी घाटावर बेटिंग चालतं. त्याचं देवीच्या लहान भावाला असलेलं आकर्षण, याचा दिग्दर्शकानं केलेला उपयोग लक्षणीय आहे.

उत्तरार्धात दीपक मृत श्यालूच्या हातातील जपून ठेवलेली अंगठी गंगेत फेकतो आणि अगरवालच्या नातेवाईकांनी नाकारल्यावर त्यानं तेव्हा देऊ केलेली अंगठी आता त्याची खूणही नको म्हणून देवी गंगेला अर्पण करते. त्याच वेळी देवीची ही अवस्था लक्षात घेऊन किनाऱ्यावर काही अंतरावर बसलेला दीपक आपली पाण्याची बाटली तिला देऊ करतो. शेवटी कुठे जाणार आहे, हे ठाऊक नसलेल्या नावेत ते दोघे समदु:खी प्रवासाला निघतात. तो जीवनप्रवास ही अर्थपूर्णरीत्या दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटात कुठेही सामाजिक प्रश्नावर भाष्य नाही वा ते कुठे प्रचाराच्या पातळीवर येत नाही.

पटकथालेखनातले वेगळेपण, ठिकठिकाणी दिसून येणारी दिग्दर्शनातली कल्पकता आणि रिचा चढ्ढा, विकी कौशल, श्वेता तिवारी या कलावंतांनी दाखवलेली प्रगल्भता, यामुळे एक जबरदस्त अनुभव आपल्यावर कोसळतो आणि त्यामुळे आपण अधिकच अंतर्मुख होतो.

.............................................................................................................................................

लेखक अनंत देशमुख समीक्षक, संपादक आहेत.

dranantdeshmukh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख