अजूनकाही
‘एक तास तुम्हाला ऐकून घेतले जाईल आणि एका तासाचे इतके इतके रुपये’ असा आशय असलेला ‘लिसनर’ हा तरुण ददेजा दिग्दर्शित हिंदी लघुपट सध्या चर्चेत आहे. एका उंची हॉटेलमध्ये जेवणासोबतच ‘लिसनर’ (श्रोता)सुद्धा तुम्हाला मेनू कार्डमध्ये उपलब्ध आहे. हा ‘लिसनर’ तुम्हाला निव्वळ ऐकून घेणार आहे, हसऱ्या चेहऱ्यानं, पूर्णपणे. ना तो तुमचं बोलणं अडवणार आहे, ना तुम्हाला कोणता सल्ला देणार आहे, ना तुमच्याविषयी मत बनवणार आहे. मग यातून फुलत जाणारी कथा, निरनिराळे ग्राहक आणि त्यातून दिसणारी आजच्या समाजाची परिस्थिती आणि अंतर्मुख करायला लावणारा एक अखेरचा धक्का. एक लघुपट म्हणून उत्सुकता ताणून धरण्यात आणि कमी वेळात गहन विषय पोहोचवण्यात तो यशस्वी ठरला आहे, हे नक्की.
वर वर पाहता अतिरंजित वाटणारा ‘येथे लिसनर मिळेल’ हा पर्याय उद्या वास्तवात आला तर नवल वाटणार नाही. आपल्या समाजात आज बोलणारे खूप आहेत, पण ऐकणारे कमी. जीवनशैली अधिकाधिक तणावाची होते आहे. रस्त्यावरच्या ट्रॅफिकपासून, घर आणि कामाच्या ठिकाणच्या तणावांपासून ते राजकारण-कला-समाजकारण यात घडणाऱ्या असंख्य घटनांचा साठा मनात ओथंबलेला असतो. सोशल मीडियामुळे तर बोलण्यास आणि व्यक्त होण्यास खुलं रानच मिळालं आहे. दुसऱ्या बाजूला शांतपणे प्रत्यक्ष ऐकेल अशा व्यक्ती मात्र कमी आहेत. कारण प्रत्येकालाच बोलायचं आहे. जो ऐकतो तोसुद्धा समजून घेण्यासाठी ऐकत नाहीच, तर प्रतिक्रिया देण्यासाठी ऐकतो.
असं का होतं? याची कारणं आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशात दडलेली आहेत. अगदी वैयक्तिक पातळीवरून सुरुवात केली, तर आपली चिकाटी कमी होत आहे आणि अस्वस्थ राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे. कुटुंबसंस्था बदलत आहे आणि माणसाचा माणसाशी प्रत्यक्ष संपर्क कमी होत आहे. ‘सहज जाता जाता तुमच्या घरी चक्कर टाकली’ हे पूर्वीच्या काळातलं मोकळेपण संकुचित होत आहे. आपल्या समाजाची ‘सामूहिक’कडून ‘व्यक्तिगत’कडे वाटचाल होत आहे. आपल्याला माहितीचा प्रचंड मोठा साठा उपलब्ध आहे, तंत्रज्ञान नवनवे उच्चांक गाठत आहे. परंतु या अजस्त्र माहितीवर प्रक्रिया करायला ना वेळ आहे, ना अंगी ऊर्जा. जग जवळ आलं आहे, असं म्हणतात, पण ते खरंच जवळ आलंय की माणसांना माणसांपासून दूर करतंय, हा प्रश्न आहे.
हा लघुपट प्रश्न तर विचारतोच, पण काही उत्तरंही देतो.
यातलं सर्वांत महत्त्वाचं उत्तर म्हणजे – माझं कुणी ऐकून घेतलं तर मला हलकं वाटतं. ही गरज दर्शवण्याचीच आज खरी गरज आहे.
ऐकणं हे ऐकणं असतं. मग घटना छोटी असो वा आयुष्याचा प्रश्न असो, त्यात गुंतलेल्या भावना खऱ्या असतात. सोशल मीडियावरील आपलं अवलंबनदेखील अंतर्मुख करतं.
जसं मला ऐकून घ्यायला हवं आहे, तसं मीसुद्धा ऐकून घेतलं पाहिजे आणि कसं ऐकून घेतलं पाहिजे, याची झलकसुद्धा दिसते. अर्थात लघुपटात वापरलेला गमतीचा भाग अलहिदा, परंतु ‘लिसनर’ कसा असला पाहिजे, हे काही प्रमाणात तरी आपल्याला पडद्यावर दिसतं.
थोडक्यात काय, तर ‘ऐकणं’ जर तुम्हाला ‘पहायचं’ असेल तर हा पर्याय चुकवू नये.
.............................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Kunda Pramilani
Fri , 01 June 2018
परिक्षण वाचून लघूपट पाहिला. अप्रतिम लघुपट आहे. लिंकवर पाहिला. काय अफलातून कन्सेप्ट आहे. कौन्सिलरच्या डोक्यातूनच आली असावी. ओळख करून दिल्याबद्दल आभार.