‘मंकी बात’ : टाळला तरी चालेल असा आणखी एक चित्रपट
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘मंकी बात’ची पोस्टर्स
  • Sat , 19 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie मंकी बात Monkey Baat विजू माने Viju Mane

स्वीकारार्ह चित्रपटांचेही स्वतःचे असे काही गुणधर्म आणि वैशिष्ट्यं असतात. म्हणजे साधारण दर्जाची कथा, जिचं लक्ष पूर्णतः तिच्या नायकांवर केंद्रित आहे, त्यासाठी पूरक अॅक्शन सीक्वेन्सेस किंवा नाट्य निर्माण करणं. सोबतीला थोडीफार भावनिक आवाहन करणारी दृश्यं असतात. एकूण त्यात सर्व गोष्टींचं संतुलन राखण्याचा किमान प्रयत्न केलेला असतो. मूळ कथानक बऱ्यापैकी सरळसोट असल्यानं त्याचा प्रवास ठरलेला असतो. त्यामुळे असे चित्रपट फारसं वेगळं वळण न घेता कथेला त्या बेसिक ‘प्लॉट’नुसार वाटचाल करू देतात. ज्यात मुख्य पात्रांना चमकण्याच्या थोड्याफार संधी मिळतात. 

मात्र अलीकडील काळात, खासकरून गेल्या दीडेक दशकात अशा ‘स्वीकारार्ह’ चित्रपटांचा उद्रेक झालेला आहे. ज्यामुळे त्यांनी अनेक अलिखित नियम आणि क्लिशे तयार केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं जितकं अवघड आहे, तितकंच अवघड त्या क्लिशेंचा व नियमांचा योग्य तितका वापर करत एखादा किमान मनोरंजक चित्रपट बनवणं हेही आहे. त्यामुळे या गोष्टींच्या (किंबहुना प्रयत्नांच्या) अभावामुळे स्वीकारार्हतेच्या जवळपास रेंगाळणाऱ्या चित्रपटांची संख्याही तितकीच वाढली आहे. विजू माने दिग्दर्शित ‘मंकी बात’ चांगला-वाईट यांची किमान परिसीमाही गाठू न शकल्यानं फक्त त्याच्या आसपास रेंगाळत राहतो. 

चित्रपटाच्या कथेविषयी फार काही बोलावं असं नाही. कारण त्याच्या ट्रेलरमधून तो जवळपास सगळ्या गोष्टी उलगडून दाखवतो. वायू (वेदांत आपटे) हा काहीसा ‘फिश आऊट ऑफ वॉटर’ अर्थात इतरांमध्ये समविष्ट न होणारा मुलगा आहे. ज्याच्याभोवती चित्रपट फिरतो. एका बेसिक घटनेच्या आधारावर चित्रपट सुरू होतो. मात्र तो कायम चांगला बनता बनता अधिक वाईट ठरू लागतो. आणि एखाद-दुसरा चांगला क्षण किंवा दृश्यंही वाईट बाबींच्या प्रभावाखाली दुर्लक्षित होतात. 

पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले आणि इतरही बहुतांशी लोक त्यांच्या भूमिकांमध्ये असमाधानकारक वाटत राहतात. ज्याला मुख्य कारण त्यांच्या तोंडी असलेले काहीसे अप्रभावी संवाद आणि स्टिरियोटिपिकल पात्रं हे आहे. त्यामुळे चित्रपटाचा भार मुख्यतः वर येऊन पडतो. जो इतरांचे परफॉर्मन्स पाहता नक्कीच उजवा वाटतो. 

अवधुत गुप्तेचं ‘ब्रुस अल्मायटी’ आणि मग त्यावरून उचललेला आपल्याकडील ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’सारख्या भासणाऱ्या दृश्यांमधून, ‘कृष्णा’वर बेतलेलं पात्र रूढार्थानं टाळ्याखाऊ असलं तरी चित्रपटाच्या टोनमध्ये झालेल्या बदलामुळे विशेष ठरत नाही. वॉचमन बहादुर थापा (समीर खांडेकर) आणि फॉरेस्ट ऑफिसर (मंगेश देसाई) ही पात्रं तर अनुक्रमे नेपाळी (?!) आणि दाक्षिणात्य स्टिरियोटिपिकल असण्याचा कहर आहेत. 

याखेरीज चित्रपटात अधूनमधून प्रसंगनिष्ठ विनोदाचा मारा केलेला आहे. तो काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो, इतकंच. नसता भरकटलेल्या आणि वेळोवेळी रेंगाळणाऱ्या कथेमुळे काहीशी निराशा होण्याची शक्यता जास्त आहे. 

गाणी पॉप साँग्जसारखी आणि फास्ट पेस्ड असली तरी त्यांचे बोल तसे नसल्यानं ती जराशी त्रासदायक ठरतात. ‘कुठे येऊन पडलो यार’ त्यातल्या त्यात बरं असलं तरी त्यातील ‘श्श्या’ कमालीचा कर्कश्श आहे. सलील कुलकर्णीचं पार्श्वसंगीत स्वीकारार्ह असलं तरी अनेकदा ते ‘ओव्हर द टॉप’ असल्यानं गाण्यांप्रमाणेच त्रासदायक ठरतं. 

चित्रपट अनेकदा सहजासहजी लक्षात येणाऱ्या संलग्नतेच्या समस्यांची पर्वा करत नाही, त्यामुळे त्या चुका अधिक लक्ष वेधून घेतात. कृष्णा सोरेनचा कॅमेरा विजू मानेच्या दिग्दर्शनाखाली फार युक्तीबाज ठरत काहीतरी ‘सिनेमॅटिक’ दाखवत असल्याचा आव आणणारा आहे. मात्र प्रत्यक्षात तो ‘आम्ही काहीतरी भारी करतोय’ असा आव आणणारा अधिक ठरतो. 

विजू मानेबाबत गोष्ट ही आहे की, त्याचे जवळपास सर्वच चित्रपट त्याच्या मीडियॉकर दिग्दर्शकीय कौशल्याचं दर्शन घडवतात. जे काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘शिकारी’मधूनही दिसून आलं होतं. अर्थात त्याच्या दिग्दर्शनासोबतच त्याचे पटकथालेखकही याला तितकेच जबाबदार आहेत. उदाहरणार्थ, त्याच्या चित्रपटांबाबत ‘हे याहून अधिक चांगलं होऊ शकलं असतं’ असा विचार मनात येतो. जे त्याच्यात एक चमक असल्याचं द्योतक आहे. मात्र ते चांगले क्षण किंवा चित्रपट त्याच्याकडून दरवेळी येता येता राहून जातात. 

याखेरीज त्याच्या चित्रपटांमध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांच्यात कमलीची तफावत आढळते. इथंही पूर्वार्ध अधिक हलक्याफुलक्या ‘चिल्ड्रन्स फिल्म’कडे वळणारा असला तरी उत्तरार्ध मात्र काहीतरी संदेश देऊ पाहणाऱ्या, इतर एक दोन विविध भाषिक चित्रपटांचा ‘रिप ऑफ’ वाटणारी दृश्यं आणि प्रौढपणाचा आणलेला उसना आव यांच्या माऱ्यानं रेंगाळत जातो. 

मराठी चित्रपटांचा किंबहुना आपल्याकडील सर्व भाषिक चित्रपटांचा प्रॉब्लेम हा आहे की, ते प्रेक्षकांना गृहित धरून आणि चित्रपटाचा विषय अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याच्या उद्देशानं बौद्धिक पातळीवर खालावून ठेवत; शिवाय त्याला टिपिकल पार्श्वसंगीताची जोड देत आपला आशय समोर आणतात. ज्यात अगदी या वर्षीच्या त्यातल्या त्यात उत्तम म्हणाव्या अशा ‘आपला मानूस’पासून ते अगदी गेल्या महिन्यातील ‘न्यूड’, अशा सर्व चित्रपटांचा समावेश होतो. आणि हीच गोष्ट आधीच मीडियॉकर असलेल्या ‘मंकी बात’लाही लागू पडते. त्यामुळेच तो स्वीकारार्हतेच्या किमान पातळीवरही जात नाही. आणि ‘टाळला तरी चालेल असा आणखी एक चित्रपट’ अशा वर्णनास पात्र ठरतो. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......