'अरायव्हल' : उत्कृष्ट सायन्स फिक्शनपट
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
यश एनएस
  • 'अरायव्हल'चं एक पोस्टर
  • Sat , 26 November 2016
  • इंग्रजी सिनेमा अरायव्हल Arrival डेनिस विलन्यूअन Denis Villeneuve एमी अॅलडम्स Amy Adams जेरमी रेन्नर Jeremy Renner

डेनी व्हीलनव्हचा चित्रपट सुरू व्हायची वेळ जशी जवळ येऊ लागते, तशी उत्सुकता, कुतूहल, आनंद वाटतोच, पण त्याचबरोबर एक प्रकारची हुरहूरही वाटू लागते. त्याच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे ‘Arrival’ हा चित्रपटही एक 'आध्यात्मिक अनुभव' असेल का? यामुळे चित्रपटाच्या ताकदीची जाणीव परत होईल का? नेहमीच काहीतरी वेगळं दाखवणारा डेनी या वेळेस सायन्स फिक्शन या जॉनरमध्ये उतरत आहे. ते कसं असेल? खरं तर इतक्या अपेक्षांचं ओझं एका चित्रपटावर आणि एका दिग्दर्शकावर टाकणं थोडं चुकीचंच आहे! कदाचित चांगले चित्रपट बघायची वाईट सवय लागल्यामुळे असं होत असेल!

डेनीचा 'अरायव्हल' पडद्यावर सुरू होतो, तेव्हा त्याखाली सबटायटल्स दाखवली गेली नाहीत. भारतात प्रदर्शित बहुतांश इंग्रजी चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असतात. त्यामुळे प्रेक्षकांचं समोरील दृश्यावरचं लक्ष विचलित होत राहतं. दृश्याच्या रचनेचा एखाद्या चित्रपटाच्या अनुभवात खूप मोठा वाटा असतो. त्यातून बऱ्याच कल्पना अव्यक्तपणे मांडलेल्या असतात. कधी ती रचना पडद्याच्या डाव्या बाजूस तर कधी उजव्या बाजूस केंद्रित असते. कधी लांबवर केंद्रित लपलेल्या ओळींची रचना असते, तर कधी वर्तुळाकार घटकांच्या समूहातून बनलेली असते. त्यात जेव्हा सतत बदलणाऱ्या सबटायटल्सची भर पडते, तेव्हा आपले डोळे साहजिकरित्या, रचनेवर प्रवास करता करता सबटायटल्सवर येऊन अडकतात आणि त्या रचनांमागचा भाववाचक अर्थ आपण गमावून बसतो.

'अरायव्हल'मधील दृश्यांची रचना आणि गोष्ट अनुभवण्याचा दृष्टिकोन, या त्याच्या सर्वांत जमेच्या बाजू आहेत. चित्रपटातली गोष्ट 'लोईस बॅंक्स' नावाच्या एका भाषाशास्त्रज्ञाची आहे. अमेरिकेतील एका विद्यापीठात ती शिकवत असते. एके दिवशी एक एलियन यान पृथ्वीवर उतरतं आणि त्या यानातील प्रवाशांची भाषा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी लोईसला बोलावलं जात. पुढील संपूर्ण चित्रपट आपण तिच्या दृष्टीतून अनुभवतो.

चित्रपट हळूहळू एखाद्या रोमांचक प्रवासासारखा उलगडून दाखवण्याच्या बाबतीत डेनी पटाईत आहे. मात्र उलगडण्यात तपशील नसेल तर ते सहजपणे कंटाळवाणं होऊ शकतं. पण 'अरायव्हल'मधील दृश्यं आणि त्यांची रचना इतकी काळजीपूर्वक केली गेली आहे की, जणू आपणच लोईस बरोबरच त्या यानात प्रवेश करत आहोत असं वाटतं. डेनीने पहिल्यांदाच सायन्स फिक्शन चित्रपट बनवला असला तरी त्याला त्याची स्वतःची 'भाषा' सापडलेली आहे. बऱ्याच दृश्यांचा दृष्टिकोन हा नवीन आणि जास्त प्रभावकारी आहे. या धर्तीचे बरेच चित्रपट जिथं तोंडात टाकलेल्या पाणीपुरीसारखे फुटतात, तिथं 'अरायव्हल'चा चवदार रस तुम्हाला सावकाशपणे मिळत राहतो आणि म्हणून तो हवासा वाटतो.

'कौल' या चित्रपटातील ध्वनी जसा त्याच्या अनुभवाचा अविभाज्य भाग आहे, तसंच काही प्रमाणात 'अरायव्हल'बद्दलही म्हणता येईल. लोईसच्या घरावरून रात्री जाणारं हेलिकॉप्टर दिसलं नाही, तरी तिला त्याचा आलेला आवाज त्या परिस्थितीच्या तातडीची जाणीव करून देतो. त्या एलियन यानातील आवाज, लोईसच्या आठवणींचे आवाज, लष्करी सूचनांचे आवाज, एलियन्सचं बोलणं आणि कधीकधी आवश्यक तिथं शांतता, यांनी सतत एक वातावरण कायम राहतं. काही भागात वापरलं गेलेलं जर्मन संगीतकार मॅक्स रिक्टरचं 'On The Nature Of Daylight' हे गाणं काही प्रेक्षकांना ओळखीचं वाटू शकतं. याच्या जागेवर दुसरं गाणं वापरलं गेलं असतं, तर कदाचित अजून योग्य ठरलं असतं.

'अरायव्हल'च्या कथानकाबाबतीत काही आक्षेप नक्की घेता येतील. या काही वेळा सांगून झालेल्या कथानकात जरी नावीन्यपूर्ण वळणं असली तरी तितक्याच साचेबद्ध कल्पनाही आहेत. एलियन्स पृथ्वीवर आल्यानंतर होणारा जागतिक गोंधळ, सतत मुख्य पात्रांवर असणारा सरकारी अधिकाऱ्यांचा अतार्किक दबाव, काहीही कारण नसताना एखाद्या विचित्रपणे लिहिल्या गेलेल्या पात्राचा एलियन्सवरचा हल्ला, मुख्य पात्राच्या आयुष्यातील एखाद्या दुःखद मृत्युतून तिला मिळणारी प्रेरणा... आणि अजून अशी बरीच साचेब्द्ध कल्पनांची उदाहरणं 'अरायव्हल'मध्ये आहेत.

इंग्रजी चित्रपटांमध्ये एक अलंकार (trope) आहे, तो म्हणजे कॉकेशियन. म्हणजे चांगल्या मनाची, सर्जनशील स्त्री येऊन गरीब घरातून आलेल्या शाळेतल्या मुलांची मदत करते आणि त्यांना वाईट मार्गावर जाण्यापासून वाचवते. या कंटाळवाण्या अलंकाराच्या काही छटा 'अरायव्हल'मध्येही दिसतात. सगळे एलियन्सबरोबर अमेरिकेतच का उतरतात? आणि नेहमी अवघड परिस्थितीतून जगाला वाचवणारी व्यक्ती कॉकेशियन अमेरिकनच कशी काय असते? की इतकंच सुदैव मानायचं की, ही मुख्य व्यक्ती काही चित्रपटात पुरुष नसून स्त्री असते? शिवाय बऱ्याच वेळा भावनावश आणि कठोर वागण्याचं काम हे चीनलाच का दिलं जातं? या अमेरिकन राजकीय दृष्टिकोनाचा थोडा कंटाळाच आलाय.

मागची बरीच वर्षं चांगल्या भूमिका केल्यामुळे एमी अॅलडम्सला आता एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. 'अरायव्हल'मधलं तिचं काम त्या यादीत नक्की जोडलं जाईल. लोईसला वाटणाऱ्या भीती, कुतूहल आणि दु:खाच्या भावना तीच्या अभिनयामुळे आपल्यापर्यंत सहज पोचतात. पण तरीही तिच्या जागी ब्री लार्सन ही अभिनेत्री असती तर ती या पात्रासाठी जास्त योग्य ठरली असती का असंही वाटून जातं. जेरमी रेन्नरने इय्न डोन्नलीची भूमिका त्याला दिलेल्या पात्राला साजेशी केली आहे. दुर्दैवाने त्याला या चित्रपटात तुलनेने छोटी भूमिका मिळाली आहे. जेरमी जेव्हा 'अव्हेंजर्स'सारख्या अॅक्शन फिल्म करत नसतो, तेव्हा तो जास्त खूश आसतो आणि हे त्याच्या आभिनयात दिसून येतं. फोरेस्ट व्हिट्टेकरसारख्या हुशार कलाकाराने या चित्रपटात एका सेनेतल्या कर्नलची भूमिका केली आहे आणि ती फारच ठराविक व दुबळी असल्यामुळे त्याचा पूर्ण वापर केला गेला नाही आहे.

'अरायव्हल'मधील प्रोडक्शन डिझाईन उत्तम आहे. त्या एलियन्सच्या यानापासून ते अगदी एलियन्सच्या डिझाईनपर्यंत खूप विचार केला गेला आहे हे लगेच कळतं. सतत जाणवत राहतं की, या डिझाईनमागे नक्कीच यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तसंच चित्रपटातील रंगांचा वापरही संस्मरणीय आहे.

लहान असल्यापासून मला हा प्रश्न पडायचा की, पूर्वी जेव्हा एका लांबच्या प्रदेशातून लोक एखाद्या नवीन प्रदेशात जात असतील, तेव्हा ते एकमेकांची भाषा माहीत नसताना परस्परांशी कसा संवाद साधत असतील? त्यांच्यात गंभीर गैरसमज होत असतील का? एकमेकांची भाषा शिकून ते भाषांतर कसं काय करत असतील? 'अरायव्हल'च्या पूर्वार्धात वाटतं की, या प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचा अनुभव मिळेल, पण उत्तरार्धात कथानक वेगळ्याच दिशेनं जातं. त्यामुळे थोडासा विस्कळीतपणा जाणवतो. संवाद साधताना येणाऱ्या मनोरंजक अनुभवांना आधी हात घालून आणि नंतर एकदमच वगळून चित्रपट भलत्याच दिशेनं जातो. याचा अर्थ असा अजिबात नाही की, 'अरायव्हल' चांगला चित्रपट नाही. हा एक उत्तम दर्जाचा चित्रपट आहे.

 

लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.

yashsk@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......