‘रणांगण’ला एक क्रेडिट नक्कीच द्यावं लागेल. ते म्हणजे ‘सो बॅड इट्स गुड’ बनण्याचं
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘रणांगण’चं पोस्टर
  • Sat , 12 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie रणांगण Ranangan स्वप्निल जोशी Swapnil Joshi सचिन पिळगावकर Sachin Pilgaonkar राकेश सारंग Rakesh Sarang

‘रणांगण’चा दिग्दर्शक राकेश सारंग हा खरं तर टीव्ही शोचा सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक आहे. अर्थात ही काही समस्या नाही. कारण कुणी चित्रपट दिग्दर्शित करावा, कुणी नाही, हे सांगण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि तसं करण्याचा हेतूही नाही. मात्र समस्या अशी आहे की, त्याचा पिंडच मुळी टीव्ही शो दिग्दर्शकाचा आहे. त्यामुळे होतं काय की, त्यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातही त्याच्या छायांकन, चित्रण आणि एकूणच दिग्दर्शकीय शैली(?)वरील एकता कपूर स्टाईलच्या खास टीव्हीकरिता प्रसिद्ध असलेल्या प्रकारांचा प्रभाव दिसून येतो. जो नक्कीच सकारात्मकरित्या उल्लेख करावा असा नाही. 

‘रणांगण’ची कथा बरीच गुंतागुंतीची आहे. अगदी ‘अॅव्हेंजर्स ऑफ इन्फिनिटी वॉर’सारखी. त्यामुळे त्याविषयी फार बोलणं म्हणजे स्पॉयलर देणं ठरेल. तरी थोडक्यात सांगायचं झाल्यास ‘रणांगण’ ट्रेलरमध्ये दिसतो, त्याप्रमाणे शामराव देशमुख (सचिन पिळगावकर) आणि श्लोक (स्वप्निल जोशी) यांच्यातील संघर्ष समोर मांडतो. जो नात्यांच्या आणि (तथाकथित) अभिमान, किंबहुना अहंकाराच्या बऱ्याच गुंत्यातून निर्माण झालेला आहे. 

मात्र मुद्दा असा आहे की, या कथेचा जीव फार लहान आहे. असं असलं तरी ही कथा एखाद्या टीव्ही सीरियलला शोभण्यासारखी आहे. त्यामुळे ती टीव्हीवर ताणली गेली असती तर कुणाला त्याचं फार विशेष वाटलं नसतं. शिवाय नागीण किंवा तत्सम दांभिक आणि टाकाऊ परंपरांना वाहिलेल्या सीरियल्स पाहता त्यास कोणी विरोध केला असता असंही वाटत नाही. हीच कथा जेव्हा एक चित्रपट म्हणून, कलाकारांची भलीमोठी फौज घेऊन समोर येते, तेव्हा मात्र तिच्या उणीवा स्पष्ट आणि अधोरेखित करण्यालायक बनतात. 

शामराव देशमुखांना घराण्याकरिता हवा असलेला ‘वारस’ आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अनैतिक आणि गुन्हेगारी मार्गांचा वापर, त्यातही पुन्हा श्लोक या त्यांनी कोणे एकेकाळी घरात आणलेल्या मुलानेही केलेल्या अनैतिक गोष्टी, इत्यादी अनेक पातळींवर ‘रणांगण’ घडतो. अर्थात हे कथानक नव्वदच्या दशकात किंवा आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘इडियट बॉक्स’ म्हणून हिणवल्या गेलेल्या टीव्हीवर शोभले असते. चित्रपटाच्या रूपानं समोर आलेल्या या कथानकातील केवळ उणीवाच समोर येत राहतात. 

यातील कन्फ्लिक्ट हा मुळातच फार लहानसा आणि प्रतिगामी स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्यातील उथळपणा ठळकपणे समोर येतो. शिवाय इथे त्याला गरजेचे असलेले परफॉर्मन्सदेखील समोर येत नाहीत. कारण मुळातच यातील पात्रं अगदी टोकाच्या पद्धतीनं आणि विकसित करण्याचा फारसा प्रयत्न न करता लिहिलेली आहेत. एकीकडे शामराव आणि श्लोक ही पात्रं तद्दन खलनायकी, बेरकी स्वरूपाची आहेत, तर दुसरीकडे शामरावचा मुलगा वरद (सिद्धार्थ चांदेकर), वरदची पत्नी सानिका (प्रणाली घोगरे) किंवा शामरावची पत्नी कालिंदी (सुचित्रा बांदेकर), तिचा भाऊ अण्णा (आनंद इंगळे) ही पात्रं कमालीची बाळबोध आणि उथळ आहेत. 

त्यामुळे या दोन्ही तऱ्हेच्या पात्रांमधील कमालीची तफावत आहे त्याहून अधिक विनोदी भासते. समोर घडत असलेल्या घटना दिसूनही लक्षात न येणारी ही पात्रं अधिक वेडी भासू लागतात. सारिकाचे प्रश्न आणि कृती तर जास्तच बाळबोध वाटतात. आधी वरदच्या दिशेनं, नंतर श्लोकच्या दिशेनं, तर पुढे कधीतरी फार्म हाऊसवरील खोलीच्या दिशेनं धावणारी सारिका पराकोटीची ‘ओव्हर द टॉप’' काम करणारी ठरते. पुढे जाऊन ती पुन्हा बऱ्याच वेळा कधी श्लोकच्या तर कधी वरदच्या दिशेनं धाव घेताना दिसून येतेच. मात्र हे काम शामरावांच्या आणि श्लोक या सचिन आणि स्वप्निलच्या जोडीपुढे काहीच जास्तीचं वाटत नाही. कारण त्यांनी अनुक्रमे लावलेल्या खोट्या मिश्या आणि वाढवलेले केस यांच्यासोबतच अधिक वरचा स्वर लावत केलेला अभिनय जास्त अपरिणामकारक ठरतो. 

सचिन आणि स्वप्निल एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेले आणि काही चांगले किंवा किमान सामान्य स्वरूपाचे परफॉर्मन्स त्यांनी दिलेले आहेत. मात्र अलीकडे त्यांनी भौतिक गोष्टी, आवाजात वरच्या पट्टीचा वापर इत्यादी गोष्टींना महत्त्व द्यायला सुरुवात केल्यानं त्यातील मुळातच जराशी कमतरता असलेली नैसर्गिकता हरवली आहे. 

ज्या नैतिक मूल्यांवरून श्लोकनं शामरावविरुद्ध युद्ध पुकारलं आहे, तोदेखील एका प्रकारे त्याच नैतिक मूल्यांच्या चष्म्यातून गुन्हेगार आहेच. मग तोही चुकीचा ठरत नाही का? नसल्यास का नाही? त्याला स्वतःला त्या चष्म्यातून, किंबहुना यादीतून वगळायचा नैतिक अधिकार त्याला कुणी दिला असे प्रश्न अनुत्तरित राहतात. 

इथं सचिन, स्वप्निल ते थेट सिद्धार्थ चांदेकर व्हाया आनंद इंगळे आणि सुचित्रा बांदेकर ते प्रणाली घोगरे अशी बरीच मोठी कास्ट इथे दिसून येते. मात्र मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, संतोष नार्वेकर, अली असगर, वैभव तत्ववादी, संतोष जुवेकर असे बरेचसे, अगदी आपण गणती विसरू इतके कॅमिओही यात आहेत. 

ज्यात कहर म्हणजे या लोकांचे क्लोज अप्स अनेकदा मोबाईलमध्ये झूम करत असताना एकानंतर एक कळ दाबत हळूहळू केल्या जाणाऱ्या ‘झूम इन’प्रमाणे चित्रण केलेले असल्यानं ते अधिकच हास्यास्पद ठरतात. 

चित्रपटात पार्श्वसंगीत हे ‘पार्श्व’ नसून संवादाच्या जोडीने, तितक्याच मोठ्या आणि कर्कश्श आवाजात वाजत असतं. यात संगीतकार म्हणून सचिन पिळगावकर यांनाही क्रेडिट दिलं असल्यानं हा त्यांचा निर्णय असावा का असा प्रश्न पडतो. सोबत जवळपास चारेक गाणी येतात. तीही चित्रपटाच्या ओघात नसल्यानं चित्रपटाच्या आधीच नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या परिणामात आणखी भर घालत चित्रपटाची लांबी वाढवत त्याचा प्रभाव आणखी कमी करतात. 

मात्र चित्रपटाला एक क्रेडिट नक्कीच द्यावं लागेल. ते म्हणजे ‘सो बॅड इट्स गुड’ बनण्याचं. कारण चित्रपट काही ठिकाणी इतका उथळ ठरतो आणि अनैच्छिकरित्या विनोदी ठरतो की, त्यानं काही वेळा खरोखर मजा येते. अर्थात हे काही वेळाच होतं. कारण इतर वेळी चित्रपट त्याच्या नव्वदच्या दशकातील चित्रपट बनण्याची इच्छा पूर्ण करून घेत राहतो. आणि मग तो समकालीन चित्रपटांपुढे अधिकच उणीवा असलेला ठरतो. आणि वारस वगैरे गोष्टींवर शेकड्यानं उपलब्ध असलेल्या कथा आणि कविता पाहता, त्या शेकड्याच्या रूपात असलेल्या ‘क्रिएटिव्ह वर्क’मध्ये एका चित्रपटाची भर ‘रणांगण’ घालतो. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख