‘राझी’ : पारंपरिक हेरपट आणि युद्धाच्या पलीकडील ‘सिनेमॅटिक ब्रिलियन्स’!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘राझी’ची पोस्टर्स
  • Sat , 12 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie राझी Raazi अलिया भट Alia Bhat विकी कौशल Vicky Kaushal मेघना गुलजार Meghna Gulzar

‘हॉरर्स ऑफ वॉर’ अर्थात युद्धाचं भीषण वास्तव हे केवळ प्रत्यक्ष युद्धभूमीवर कधीच नसतं. युद्धभूमीसोबतच देशांतर्गत हालचाली, सदर देशांच्या गुप्तचर यंत्रणा, युद्धात अप्रत्यक्षरित्या आणि पडद्यामागून कार्य करणारे, जरी थेट गोळ्या खाण्याचा धोका नसला तरी गुप्त मोहिमांमध्ये जवळपास कुणालाही खबर न लागता मृत्यूची संभावना असणारे गुप्तहेर, अशा अनेक पातळ्यांवर युद्ध सुरू असतं. त्यात ते शीतयुद्ध असेल तर हे अप्रत्यक्ष कार्य आणखी जोमानं सुरू असतं. 

१९७१ च्या पूर्वार्धात भारत-पाकिस्तान दरम्यान अशाच प्रकारचं काहीसं शीतयुद्धाकडे झुकणारं युद्ध सुरू होतं. ज्याला डिसेंबर १९७१ मध्ये संपूर्ण युद्धाचं स्वरूप प्राप्त झालं. सुदैवानं हे युद्ध काही दिवस, किंबहुना एका पंधरवड्यात संपलं असलं तरी त्यामागे अशाच एका गुप्त मोहिमेची आणि गुप्तहेराची पार्श्वभूमी होती. याच सत्यघटनेवर आधारित हरिंदर सिक्का लिखित ‘कॉलिंग सेहमत’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. ज्यावर मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’' हा चित्रपट बेतलेला आहे. 

हिदायत खान (रजित कपूर) हा भारतीय इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमधील कर्मचारी पाकिस्तानी ब्रिगेडियर सय्यद (शिशिर शर्मा) साठी भारतातील गुप्त खबरी पोहोचवण्याचा आव आणत, खरं तर भारतीय गुप्तचर संघटनेकरिता काम करत असतो. १९७१ च्या सुरुवातीलाच त्याला आपल्या फुप्फुसात ट्युमर असल्याचं कळतं. मात्र याच कालावधीत त्याला पाकिस्तानी सैन्य भारताविरुद्ध काहीतरी कारवाई करत असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळते. मग त्याच्या प्रकृतीमुळे आणि काहीच दिवसांच्या संभाव्य आयुष्यामुळे ही कामगिरी करत, पाकिस्तानमध्ये राहून भारतीय गुप्तचर यंत्रणेला तेथील बातम्या पुरवण्याची जबाबदारी त्याची मुलगी सेहमतवर (आलिया भट) येते. 

याकरिता सेहमतचं लग्न ब्रिगेडियर सय्यदचा मुलगा, इकबालशी (विकी कौशल) ठरवलं जातं. आणि त्यापूर्वी तिला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी खालिद मीरवर (जयदीप अहलावत) येते. पुढे नियोजित वेळापत्रकानुसार तिचं लग्न होतं आणि मग सुरू होते तिची पाकिस्तानमधील गुप्त मोहीम. जी नक्कीच रंजक, भावनिक आवाहन करणारी आणि खिळवून ठेवणारी आहे. 

सुरुवातीचं सेहमतचा परिचय करून देणारं दिल्ली विद्यापीठामधील दृश्य पाहून पुढे तद्दन फिल्मी चित्रपट वाढून ठेवला आहे की काय अशी शंका येते. मात्र ही मोजकी दृश्यं संपल्यानंतर मात्र चित्रपट चांगलीच पकड घेतो. आणि मेघना गुलजार आणि भवानी अय्यर यांची पटकथादेखील तिचं चित्रपटातील महत्त्व स्पष्ट करते. 

आजवरचे भारतीय हेरपट पाहता त्यात सरळ सरळ पाकिस्तानी यंत्रणा, पाकिस्तानी लष्कर अधिकारी यांना ‘देश के दुश्मन’ म्हणून चित्रित केलं आहे. कदाचित पाकिस्तानमध्येही असे चित्रपट बनले असतील तर त्यातही भारतीय हेरांना याच पद्धतीनं चित्रित केलं गेलं असेल. मात्र अशा वेळी चित्रपट हे माध्यम दोन देशांमधील परिस्थिती भडकावणारं किंवा तिचं चुकीचं चित्रण करणारं माध्यम नव्हे, याचा जवळपास सर्वच चित्रपटनिर्मात्यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसून येतो. ज्यामुळे होतं काय की, तथाकथित देशभक्ती जागृत करणारी दृश्यं, टाळ्या वाजवल्या जाणारे ‘लार्जर दॅन लाईफ’ नायक, पराकोटीचा (तथाकथित) राष्ट्रवाद, इत्यादी गोष्टींचं लोकांना आवडेल अशा पद्धतीनं चित्रण केलं जातं. मात्र यामुळे संवेदनशील विषय बाजूला पडतो. शिवाय संबंधित दोन्ही राष्ट्रांमधील जनतेमधील प्रक्षोभ वाढीस लागतो, तो वेगळा. 

या पार्श्वभूमीवर केवळ एक वास्तवादी हेरपट म्हणून संयमी आणि संतुलित गोष्टीशी आपली नाळ कायम राखत, कुणालाही ‘दुश्मन व्यक्ती’ किंवा ‘दुश्मन मुल्क’ न दाखवता केवळ राजकीय व देशांतर्गत परिस्थती निवळली नसल्याने आणि देशांतर्गत संबंध तकलादू असल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दोन्ही देशातील लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी आपापली कामं बजावताना केलेल्या कधी योग्य तर चुकीच्या गोष्टी अशा स्वरूपाच्या घटना आपल्यासमोर येतात. ज्यात कुणीही चूक वा बरोबर किंबहुना ‘हरामखोर’ नसून ‘इकबाल’च्याच शब्दात सांगायचं झाल्यास ‘जिस तरह हम भी तो अपने मुल्क के लिए यह सब करते हैं’' अशा स्वरूपाचं काम करणारे, एका प्रकारे, एकाच जागेवर आणि परिस्थितीत असणारे देशाचे नागरिक आहेत. जे केवळ आपापला देश सुरक्षित रहावा म्हणून प्रत्येक चांगली अथवा वाईट कृती करत आहेत. 

मध्यंतराच्या वेळी आलियानं केलेली एक कृती आणि त्यानंतरचा तिचा ‘शॉवर सीन’ हा कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. आणि हिटलरनं त्याच्या ‘बंकर’मधील, आत्महत्येपूर्वीचे शेवटचे दिवस दाखवणाऱ्या ‘डाऊनफॉल’ या जर्मन चित्रपटात किंवा इतरही जागतिक पातळीवरील चित्रपटांतील ‘हॉरर्स ऑफ वॉर’ची अनुभूती देणारं हे दृश्य मानावं, अशा रीतीनं त्याचा परिणाम होतो. 

मेघना गुलजारचं दिग्दर्शकीय कमबॅक असलेल्या ‘तलवार’' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद विशाल भारद्वाजनं लिहिले होते. आणि ती पटकथा बरीच संतुलित, अपवाद वगळता कुणाचीही बाजू न घेणारी होती. त्यामुळे ‘तलवार’चं यश हे काहीसं अपघाती आणि बहुतांशी विशालच्या पटकथेत होतं, अशी शंका बाळगण्यास वाव होता. मात्र या चित्रपटात मेघनानेच सहलेखन केलेली पटकथा आणि तिनेच लिहिलेली संवाद यांच्यासोबत ‘राझी’ एक उत्तम चित्रपट असण्याच्या पातळीवर खरा ठरतो. त्यामुळे ‘तलवार’ यशाचं गमक तिच्या दिग्दर्शनातही होतं असं म्हणता येतं. 

याखेरीज तिला आलिया भट, विकी कौशल, शिशिर शर्मा, रजित कपूर, जयदीप अहलावत, यांच्यासारख्या तगड्या अभिनेत्यांनी तितकीच सुंदर साथ दिलेली आहे. ज्यामुळे कुठलंही पात्र पूर्णतः कृष्ण किंवा पूर्णतः धवल तर बनत नाहीच, उलट प्रत्येक पात्र आवश्यक भावनिक गुंतवणूक करण्यास भाग पाडतं. त्यामुळे कास्टिंगच्या बाबतीतही तिनं बाजी मारली आहे. 

शंकर-एहसान-लॉयचं पार्श्वसंगीत आणि ‘ओरिजनल स्कोअर’ही अगदी ‘टू द पॉइंट’ आहे. काही वेळा जरासं पारंपरिक वाटत असलं तरी इतर वेळी त्यानं भावनिकरित्या इन्व्हॉल्व्ह (गुंतवणूक) आणि इव्हॉल्व्ह (विकसित करणं) करण्याचं काम केल्यानं त्याच्या पारंपरिक बनण्याकडे जरासं दुर्लक्ष करता येतं. 

‘गुलजार’ (मेघना नव्हे) ‘तलवार’'नंतर पुन्हा एकदा यातही आपल्या शब्दांची किमया साधतात. ‘ऐ वतन’ हे गाणं तर अक्षरशः कमाल आणि थक्क करणारं आहे. याखेरीज ‘राझी’ आणि ‘दिलबरो’देखील आपापली कामं करतातच. 

एकूणच ‘राझी’ हा ‘सिनेमॅटिक ब्रिलियन्स’चा आणि भारतीय हेर आणि थरारपटांमधील कदाचित सर्वोत्तम म्हणावा अशा प्रकारचा चित्रपट आहे. ज्यात केवळ ‘नीरज पांडे’सारखा ‘पांडे-इझम’ म्हणावा अशा प्रकारचा कमालीचा आणि पराकोटीचा राष्ट्रवाद आणि देशभक्ती नक्कीच नाही. किंबहुना त्याच्या नसण्यातच चित्रपटाच्या आणि पटकथेच्या यशाचं खरं गमक आहे. आणि त्यामुळेच हा ‘सिनेमॅटिक’ अनुभव टाळू नये असा आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 14 May 2018

संज्ञामालिन्य ( = cognitive dissonance) चं हे मासलेवाईक उदाहरण आहे. गंमत बघा महेश भट चा मोठा मुलगा राहुल भट प्रत्यक्षात एक अतिरेकी आहे. २६/११ चा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली रेकीच्या वेळेस राहुल भटाच्या घरी राहायला होता. राहुल भट दहशतवादी आहे. त्याचा बाप महेश भट नावापुरती काश्मिरी हिंदूंची जाहीर बाजू घेतो. याच राहुल भटाची धाकटी सावत्र बहीण आलिया भट सिनेमांत देशप्रेमी भूमिका रंगवते. लोकांना हे बघून कळंत नाही की भट कुटुंब विश्वासार्ह आहे की देशद्रोही? देशप्रेम आणि देशद्रोह या दोन विरोधी भावना व विरोधी संज्ञा आहेत. भावनांना हात घालून परस्परविरोधी चित्रं प्रकट करायचं व त्याच्या आधारे संज्ञांचा गोंधळ उडवून द्यायचा. अशी ही संज्ञामालिन्याची योजना आहे. यासाठी भट कुटुंब फार काळजीपूर्वक निवडलं आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख