‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ : आधीच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’पटांहून वेगळा आणि उजवा 
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’चं एक पोस्टर
  • Sun , 29 April 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा English Movie अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर Avengers : Infinity War

२००८ पासून मार्व्हलनं त्यांच्या मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘सोलो’ सुपरहिरो म्हणून ‘आयर्न मॅन’ समोर आणला. पुढे टप्प्याटप्प्यानं समोर आणलेले सोलो सुपरहिरो चित्रपट आणि ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या दोन भागांच्या रूपातून करण्यात आलेल्या क्रॉसओव्हर चित्रपट यांनी सुपरहिरोपटांना नवसंजीवनी देण्याचं काम केलं. आता आलेला ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा 'मार्व्हल'च्या याच प्रकल्पाचा एक महत्त्वाचा आणि शेवटाकडे नेणारा भाग आहे. 

या सर्व चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा हा चित्रपट गडद वातावरण, थोडाफार विरंगुळा आणि महत्त्वाचं म्हणजे भावनिक साद या गोष्टींच्या जोरावर आधीच्या दोन ‘अ‍ॅव्हेंजर्स’पटांहून वेगळा आणि उजवा ठरतो. 

‘थॉर रग्नारोक’मधील एका पोस्टक्रेडिट दृश्यानुसार ‘थॅनोस’नं (जोश ब्रोलिन) ‘अ‍ॅसगार्ड’च्या लोकांवर हल्ला केला आहे. ‘इन्फिनिटी वॉर’ त्याच ठिकाणाहून सुरू होतो. असं असलं तरी तो आपल्याला तेथील लोकांचा सगळा संहार न दाखवता केवळ ‘थॉर’ (क्रिस हेम्सवर्थ), लोकी (टॉम हिडलस्टन) आणि ‘हायेमडल’ (इड्रिस हेल्बा) विरुद्ध ‘थॅनोस’ असं एक बरंच गडद दृश्य दाखवतो. जे पाहून सदर परिस्थितीचा आणि थॅनोसची एकूण शक्तीच नव्हे, तर त्याच्या विश्वातील प्रत्येक ग्रहावरील अर्ध्या लोकांना कुठलाही भेदभाव न करता मारून (किंवा त्याच्या भाषेत मुक्ती देऊन) विश्वाचं संतुलन राखायच्या योजेनेचा, आणि आता यातून कुणाचीही सुटका नाही या गोष्टीचा अंदाज येऊन चुकतो. इथून पुढे जे घडतं ते थेट चित्रपटात पाहणं योग्य ठरेल. कारण पदोपदी काहीतरी महत्त्वाची माहिती चुकीनं का होईना, पण सांगितली जाऊ शकते. त्यामुळे त्याविषयी फार न बोलणंच योग्य ठरेल. 

जवळपास दोनेक डझन सुपरहिरोंना सोबत घेऊन वेगवेगळ्या पातळ्यांवर, ग्रहांवर किंवा एकूणच अवकाशात कुठे ना कुठे घडत असलेला हा प्रवास तसा मोजणी ठेवता न येणाऱ्या स्वरूपाचा आहे. काही वेळा पडद्यावर इतक्या घटना घडत असतात आणि त्याही संकलनाच्या रूपातून एकत्र जोडत समोर येत असतात की, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं किंवा एखाद्या पात्राशी एकरूप होणं जरासं अवघड होऊन बसतं. एकूण घडणाऱ्या सर्व घटना एकाच वेळी घडत असल्यानं त्या संकलनात एकत्र गुंफून समोर मांडणं जरी योग्य आणि अगदी मान्य असलं तरी त्यामुळे काही वेळा सहजता हरवते, हेही तितकंच खरं आहे. 

हा चित्रपट वेगवेगळ्या पातळ्यांवर घडतो. म्हणजे ‘थॅनोस’ एकापाठोपाठ एक 'इन्फिनिटी स्टोन्स' हस्तगत करण्याचे (बहुतांशी यशस्वी) प्रयत्न करत असताना त्याचा ‘अॅव्हेंजर्स’शी होत असलेला सामना आणि लढाई हा एक संघर्ष तर दुसरीकडे भावनिक पातळीवर ‘अ‍ॅव्हेंजर्स’मधील या ना त्या  कारणानं समोर येणारी आपापसातील नाती, तसंच घालमेल आणि नंतर चित्रपटातील महत्त्वाचा भाग असलेला थॅनोस आणि गमोरा (झो सॅल्डॅना) यांच्यातील भावनिक संघर्ष या दोन्ही गोष्टी घडून येत असतात. 

मात्र इथंही चित्रपट त्यानं निर्माण केलेलं गडद वातावरण आणि हलकेफुलके विनोद या दोन्ही गोष्टी एकाच वेळी किंवा खरं तर एकापाठोपाठ एक अशा प्रकारे वापरतो की, बऱ्याचदा समोरील एखादं भावनिक दृश्य त्याचा प्रभाव पाडत असतानाच त्याचा प्रभाव एखाद्या ‘पंच’मध्ये विरून जातो. जे अलीकडे ‘मार्व्हल’नं अंगीकारलेल्या जास्तीत जास्त ‘चीअरफुल’ रूपात प्रेक्षकांच्या दिशेनं अ‍ॅप्रोच घेण्याच्या पॉलिसीला धरून असलं तरी समोरील गडद वातावरण, कदाचित ‘मार्व्हल’च्या चित्रपट विश्वातील सर्वाधिक जबरदस्त खलनायक, असलेलं 'इन्फिनिटी वॉर' नामक पृथ्वीच नव्हे तर विश्वातील सर्व जिवांचं किंवा खरं तर जीवनाच्या अबाधित राहण्यासाठीचं युद्ध हे दोन प्रकारात उडी घेण्याच्या निर्णयानं म्हणावं तितकं उजवं ठरतं असं नाही. 

अर्थात पुढे शेवटाकडे जात असताना ‘थॅनोस’ आणि ‘गमोरा’ यांच्यातील नातं आणि ‘थॅनोस’ची एक वेगळी बाजू समोर आणल्यामुळे या आधीच्या उणीवांचा प्रभाव कमी होतो आणि शेवटच्या पाऊणएक तासात चित्रपट कमालीची अस्वस्थता निर्माण करण्यात आणि ‘थॅनोस’ला घाबरण्याकरिता आणखी कारणं पुरवत, हेलावून टाकणारा शेवट करतो. 

दोनेक डझन सुपरहिरो समोर असताना जवळपास अडीच तासांत त्या सर्व अभिनेत्यांना आणि त्यांच्या पात्रांना न्याय देणं जरा कठीण होऊन बसतं. ‘ब्लॅक पँथर’ (चॅडविक बोसमॅन), ‘ब्लॅक विडो’ (स्कार्लेट जोहान्सन), ‘बकी’ (सबॅस्टियन स्टॅन), आणि इतरही अनेक पात्रांना काही वेळा एखाददुसरी ओळ वगळता फारसा वाव मिळत नाही. याउलट ‘टोनी स्टार्क’ ऊर्फ ‘आयर्न मॅन’ (रॉबर्ट डाऊनी ज्यु.), थॉर, ‘डॉक्टर स्ट्रेंज’ (बेनेडिक्ट कंबरबॅच), ‘हल्क’ (मार्क रफेलो), ‘कॅप्टन अमेरिका’ (क्रिस एव्हान्स), वगैरे सुपरहिरोंच्या रूपात सदर अभिनेते नेहमीप्रमाणे प्रभावी काम करतात. रॉबर्ट डाऊनी ज्यु. तर तो अनेक पातळ्यांवर इतरांपेक्षा वेगळा का ठरतो हे सिद्ध करतो. शिवाय ‘स्पायडर मॅन’ असलेला टॉम हॉलंडदेखील अधिक स्क्रीनटाईम आणि काही हेरॉईक क्षणांच्या रूपानं समोर येत उजवा ठरतो. 

‘मार्व्हल’च्या अलीकडील चित्रपटांमधील पार्श्वसंगीत पाहता याही चित्रपटात ते उत्तम असावं अशी सकारात्मक शंका होती. ती सुरुवातीला फारशी खरी ठरत नसली तरी ‘स्कार्लेट विच’ (एलिझाबेथ ओल्सेन), ‘व्हिजन’ (पॉल बेटनी) आणि ‘थॅनोस’ एकत्र असलेलं दृश्य, तसंच ‘थॅनोस’ व ‘गमोरा’ यांचा शेवटच्या अर्ध्या तासातील एक सीक्वेन्स यात ते उठून दिसतं. 

एकूणच अँथनी व जो रसो यांनी दिग्दर्शित केलेला ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा बऱ्याच उणीवा मात्र काही चांगल्या गोष्टी, एक उत्तम, अधिक प्रभावी खलनायक अशा गोष्टींच्या जोरावर ‘मार्व्हल’च्या चाहत्यांना एकाचवेळी समागम आणि दुःख अशा दोन्ही गोष्टींची अनुभूती करून देण्याच्या त्याच्या प्राथमिक उद्देशात नक्कीच यशस्वी ठरेल. 

बाकी यावेळी ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील एक डायलॉग आठवतो. तो म्हणजे ‘द नाईट इज डार्क अँड फुल ऑफ टेरर्स’. सध्यातरी ‘इन्फिनिटी वॉर’चा शेवट आणि ‘थॅनोस’च्या रूपात समोर असलेला खलनायक पाहता हेच वाक्य ‘अ‍ॅव्हेंजर्स’ना लागू पडेल. फक्त इथं ‘नाईट’ ऐवजी ‘भविष्य’ असा लहानसा बदल करण्याची मुभा घ्यावी लागेल, इतकंच.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख