अजूनकाही
‘जेनेटिक इंजिनीअरिंग’ (किंवा सदर चित्रपटात वापरली ती ‘जेनेटिक एडिटिंग’ ही संज्ञा) आणि तिच्या माध्यमातून तयार झालेले किंवा विकसित झालेले प्राणी आणि त्यांनी पृथ्वीवरील एखाद-दुसऱ्या शहरात घातलेला धुमाकूळ, अशा प्रकारची कथा आपल्यासाठी काही फारशी नवी नाही. अगदी स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘ज्युरासिक पार्क’पासून ते ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’चित्रपट मालिकेपर्यंत अनेकदा अशा चित्रपटांची निर्मिती होत ते अगदी यशस्वीही होत आले आहेत. ‘रॅम्पेज’देखील याहून वेगळ्या वाटेनं जातो असं नाही.
सुरुवातीलाच ‘एलियन’ किंवा तत्सम चित्रपटांमधील आयकॉनिक सीन्सची आठवून करून देणारा ‘स्पेस शटल’मध्ये एका ‘जेनेटिक इंजिनीअरिंग’मुळे विकसित झालेल्या अवाढव्य, हिंस्र उंदरासोबत अडकलेल्या एका वैज्ञानिकेचा तिथून निसटण्याचा सीक्वेन्स चित्रपटाला गरजेचं असलेलं वातावरण तयार करतो. आणि पुढे दोनेक तास चालणाऱ्या ‘रॉक’पटाची जोरदार सुरुवात करतो.
तर याच सीनमधील वैज्ञानिक तिच्यासोबत जे जेनेटिक इंजिनीअरिंगशी निगडित पॅकेजेस घेऊन निघते, ते स्फोटामुळे येऊन पडतात पूर्वाश्रमीचा लष्करी अधिकारी, प्राण्यांचा ट्रेनर आणि इतरही बरंच काही असलेल्या ‘डेव्हिस’च्या (ड्वेन जॉन्सन) नियंत्रणाखाली असलेल्या सॅन डिअॅगो प्राणिसंग्रहालयात. तिथं डेव्हिसचा खास मित्र असलेल्या जॉर्ज या गोरिलाच्या, तसंच एक कोल्हा आणि मगरीच्या संपर्कात येऊन या तिन्ही प्राण्यांवर त्यांची रिअॅक्शन होऊन त्यांची अनैसर्गिक वाढ होऊ लागते.
या प्रकरणात एनर्जाइझर या कॉर्पोरेट कंपनीचा हात आणि त्याहून जास्त म्हणजे फायदा असल्यानं त्या कंपनीची सीईओ क्लेअर वायडन (मलिन अॅकरमन) आणि बर्क (जो मँगनिएलो) यांचा या प्राण्यांना हरतऱ्हेनं मिळवण्याचा खटाटोप सुरू होतो. पण सोबतच या प्रयत्नांमुळे सॅन डिअॅगो, शिकागो आणि इतरही काही शहरं आणि तेथील नागरिक धोक्यात असल्यानं त्यांना वाचवायची जबाबदारी डेव्हिसवर येऊन पडते. ज्याच्यासोबत यावेळी एनर्जाइझरमध्ये काम करणारी डॉ. केट कॅल्डवेल (नाओमी हॅरिस) आणि एजंट रुसवेल (जेफ्री डीन मॉर्गन) हे दोघेही आहेत.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
एकूणच चित्रपटाचं मूलभूत कथानक बरंच मनोरंजक असलं तरी चित्रपटाच्या उत्तरार्धात चित्रपटाचं लक्ष कथानकापेक्षा सीजीआय इफेक्ट्स, शहराचा विध्वंस आणि नायकाच्या शौर्याचं अगाध पद्धतीनं केलेलं रेखाटन यांच्यावर केंद्रित झाल्यानं शेवटाकडे जात असताना आपल्यावर ‘आता उरलो फक्त ‘सीजीआय’चे सीक्वेन्स पाहण्यापुरता’ अशी वेळ येते!
त्याचं आधीचं काम पाहता 'ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सन' हा अशा हेरॉईक (heroic) रोल्सकरिता अगदी योग्य निवड आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. इथंही तो गरजेपुरता अभिनय करतो, अशक्यप्राय अॅक्शन सीन्समधूनही प्रेक्षकांना भुरळ पाडत टाळ्या घेतो. इतर सर्व लोकांची कामंही एखाद्या कमर्शिअल चित्रपटाला गरजेची आहेत, तितकी ठीक असल्यानं त्याबाबतही तक्रार करायला जागा उरत नाही.
पण या सर्वांत ‘जेफ्री डीन मॉर्गन’चा ‘रुसवेल’ हा जास्त प्रभावी आहे. यापूर्वी काही चित्रपटांत आणि ‘द वॉकिंग डेड’, ‘सुपरनॅचरल’ आणि इतर काही सीरियल्समध्ये दिसलेला हा अभिनेता इथं ‘कॉमिक रिलीफ’सोबतच चांगलं सहाय्यक पात्र साकारत त्याला शक्य तितके इनपुटस देतो.
सीजीआय आणि व्हीएफएक्स इफेक्ट्सच्या रूपानं चित्रपटांना अधिक चकचकीत करण्याचं प्रमाण आणि तंत्र विकसित झालं असलं तरी अनेकदा त्याचा अतिरेक होतो, हेही तितकंच खरं आहे. इथंही नेमकं तेच होतं.
व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे विकसित करण्यावर तितकासा भर दिलेला दिसून येत नाही. डेव्हिस हे नायकाचं पात्र असो किंवा केटचं पात्र असो, त्यांच्या भावनिक विश्वावर फारसा भर नाहीच. उदाहरणार्थ केटची बॅकस्टोरी महत्त्वाची आणि भावनिक आवाहन करणारी असली तरी ती तितक्या प्रभावी रूपात आणि योग्य त्या वेळी समोर येत नाही. तर विरोधाभास म्हणजे जॉर्ज या गोरिलाचं पात्र डेव्हिसच्या पात्राहून अधिक भाव खाऊन जातं.
एकूणच 'रॅम्पेज' फार ग्रेट नसला तरी अगदी वाईटही नाही. तो त्यानं ट्रेलरमधून केलेलं एका आकर्षक चित्रपटाचं आश्वासन पूर्ण करतो. तो एका चांगल्या मूलभूत कथेचं भलंही जरासं विस्कळीत स्वरूपातील सादरीकरण करत असला तरी त्या सादरीकरणात त्याचे स्वतःचे असे आश्वासक क्षण आहेत. मूलतः जराशा हिंस्र असलेल्या मानवी मनाला आवडतील अशी, विध्वंसक दृश्यं तो तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पडद्यावर प्रभावीपणे दाखवतो. आणि मीडिऑकर असूनही त्याच्या 'टार्गेट ऑडिएन्स'ला खुश करतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment