अजूनकाही
गेल्या वर्षी, २०१७ मध्ये आलेला स्टँड अप कॉमेडियन कुमैल नान्जियानी आणि एमिली गॉर्डन यांच्या स्वतःच्या कथेवर आधारित ‘द बिग सिक’ हा चित्रपट या वर्षी जानेवारीमध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील पटकथा लेखनासाठीचा प्रबळ दावेदार होता. ‘ऑक्टोबर’चा ट्रेलर पाहता क्षणीच आठवण आली, कारण ढोबळमानानं दोघांची कथा ‘नायकाची आजारी असलेली मैत्रीण आणि मग त्याच्या तिच्या कुटुंबासोबतच्या दवाखान्यातील चकरा’ याभोवती फिरते. मात्र हे वगळता दोन्हींमध्ये विशेष साम्य नाही, हेही स्पष्ट केलेलं बरं.
डॅन (वरुण धवन) हा एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ट्रेनी म्हणून काम करत असतो. कामात अघळपघळ करणाऱ्या, कशातही रस नसलेल्या, सतत या ना त्या कारणानं संतप्त होणाऱ्या, नेहमी नाखूष राहणाऱ्या त्याच्या स्वभावामुळे केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या आसपास असणाऱ्या इतर लोकांनाही त्रास होत असतो. तो या ना त्या प्रकारे त्यांच्या कृती आणि प्रतिसादांतून दिसून येतो.
एकूणच त्याचं आयुष्य कमालीचं अस्ताव्यस्त आहे. ते कुठल्याच अर्थानं नायकत्वाचं रूप धारण करणारं नाही, करू इच्छित नाही. आणि त्याच्या याच अस्ताव्यस्त आयुष्याला सुरुंग लावत, त्याच्या इनर कन्फ्लिक्टला मूर्त स्वरूप प्राप्त होतं, ते त्याची सहकारी, शिऊलीच्या (बनिता संधु) एका अपघातानंतर. तिच्या अपघातानंतर तो हळूहळू अस्वस्थ होत जातो. आणि हा अपघात अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच आल्यानं आपणही जरासे चकित होतो. कारण थोडाफार संवाद वगळता तिच्यात आणि त्याच्यात कुठलंही नातं इथवर तयार झालेलं नसल्यानं आपली एक प्रेक्षक म्हणून समोरील पात्रांशी म्हणावी तितकी भावनिक जवळीक निर्माण झालेली नसते. आणि कदाचित तसं होऊ न देता, आपल्यालाही सुरुवातीच्या काळात असणाऱ्या डॅनच्या जागी ठेवण्याचा उद्देश असावा.
आणि सुरुवातीला चित्रपटात हाच दोष असावा असं वाटत राहतं. कारण डॅनच्या दवाखान्यातील वाढत्या चकरा, त्याची भावनिक गुंतागुंत आणि ओढाताण पाहून तो शिऊलीच्या आजारपणात इतका का गुंततो आहे, हा त्याच्या मित्र आणि सहकाऱ्यांना पडणारा प्रश्नच आपल्यालाही पडतो. त्यामुळे तो असं का करतोय वगैरे अनेक प्रश्न वारंवार पडत राहतात.
पुरुषांवर भावनिकरीत्या तितकंसं विकसित न झाल्याचा एक आरोप नेहमी होत असतो, जो काही प्रमाणात खराही आहे. मात्र यासोबत आणखी एक फिनॉमेनन आहे. तो असा की पुरुष लहानसहान गोष्टींमुळे खुश होतात, त्यात गुंतत जातात. त्यामुळे डॅनला जेव्हा शिऊलीनं अपघातापूर्वी त्याची विचारपूस केल्याचं कळतं, तेव्हा त्या एका लहान गोष्टीमुळे त्याची शिऊलीच्या आयुष्यात झालेली गुंतवणूक समर्थनीय ठरते. अर्थात ही आणि इतरही बरीचशी दृश्यं बहुतांशी प्रेक्षकांकडून विनोदी म्हणून पाहिली जातील. आणि त्यात तशी विनोदी अंगंही आहेतही. मात्र त्यातही या दृश्यांना असलेली सूक्ष्म आणि तरल भावनिक कोमलतेची असलेली जोडही आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
डॅनचा दवाखान्यातील कर्मचाऱ्यांशी किंवा शिऊलीची आईशी (गितांजली राव) असलेला संवाद त्याला एक पात्र म्हणून आणखी विकसित तर करतोच, पण सोबतच त्याच्या पात्राची प्रौढ छटादेखील समोर आणतो. वरुण धवननं साकारलेला ‘डॅन’ हा ‘बदलापूर’नंतरचा किंवा खरं तर आजवरच्या त्याच्या सर्वच भूमिकांमधील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स ठरण्याच्या पातळीवर जातो. शिवाय व्यावसायिक पातळीवरील वरुण आणि समांतर सिनेमातील वरुण यांच्यातील कमालीचा फरक यातही दिसून येतो.
अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट तसा आऊट अँड आऊट वरुणचा असला तरी शिऊलीच्या भूमिकेतील बनिता संधु; तिची आई म्हणून दिसणारी गितांजली, डॅनचा बॉस अस्थाना म्हणून असलेला प्रतीक कपूर हे सर्वच लोक तितक्याच परिणामकारक रुपात आपापल्या भूमिका साकारतात.
जुही चतुर्वेदीची पटकथा आणि संवादही वरुणच्याच बरोबरीने चित्रपटाचा कॅनव्हास व्यापून टाकतात. ‘पिकू’च्या रूपानं आपल्याला याआधीही दिसलेलं तिचं काम आणखी वेगळ्या आणि आणखी प्रभावी रूपात समोर येतं. तिच्या पटकथेला तितक्याच ताकदीनं पडद्यावर दाखवण्याचं काम अविक मुखोपाध्यायची सिनेमॅटोग्राफी करते. ज्याला शंतनू मोइत्राच्या ओरिजनल स्कोअरची साथ आहे.
चित्रपटांमध्ये खिन्न किंवा विषण्ण करणाऱ्या दृश्यांना जोड म्हणून मेलनकॉली (melancholy) संगीत वापरलं जातं. शंतनूचं पार्श्वसंगीत वेळोवेळी चित्रपटात गरजेच्या असलेल्या आशावादाला आणि अगदी खिन्न वातावरणालाही पूरक वातावरण तयार करतं. आणि भारतीय चित्रटसृष्टीला अधिक हावरट बनत, शंतनूकडून आणखी काम करवून घेण्याची गरज का आहे तेही स्पष्ट होतं.
'क्वेंटिन टॅरंटिनो' या दिग्दर्शकाला 'कान्स' फिल्म फेस्टिव्हल दरम्यान 'टेरी गिलियम' या नव्वदच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शकानं चित्रपट दिग्दर्शनाविषयी एक सल्ला दिला होता. तो म्हणजे, “दिग्दर्शक म्हणून तुझं काम काही फार अवघड नाही. तुला फक्त योग्य ती लोकं एकत्र आणून, त्यांच्याकडून हवं ते काम करवून घ्यायचं आहे. तुझी व्हिजन तुला त्यांना सांगत त्यांच्याकडून ती फ्रेम पडद्यावर आणायची आहे.” शूजित सरकारच्या कामाकडे पाहता तो अशाच मार्गाचा अवलंब करत असावा अशी दाट शक्यता वाटावी, इतक्या सुरेख प्रकारे त्याचं काम समोर दिसतं. आणि आता याला शूजितचा नवीन ‘मास्टरपीस’ मानायला हरकत नाही.
बाकी बॉलिवुडच्या सामान्य प्रेक्षकाला शांत, निवांत अशा क्षणांची तितकीशी सवय नाही. त्यामुळे यातील तरल, निवांत क्षणांबाबत ‘चित्रपट संथ आहे’ असं टोकाचं मत व्यक्त होण्याची शक्यता आहे. अगदी चित्रपट लांबला आहे, असंही वाटण्याची शक्यता आहे. मात्र शूजित चित्रपट लांबला आहे, हे लक्षात न येण्याइतका नवखा नक्कीच नाही. त्यामुळे चित्रपट संथ वाटेल असा ठेवण्याचं कारण आपल्याला डॅनच्या प्रवासात त्याच्यासारखीच भावना निर्माण करत सामील करणं हे आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. आणि ‘एंजॉय द सायलन्स’ या उक्तीचा अवलंब करत, संपूर्ण चित्रपटासोबतच त्याची शेवटची फ्रेमही (जी या वर्षीच्या काही उत्तम फ्रेम्सपैकी एक आहे) डोळ्यात साठवायला हवी.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nikhil Alte
Sat , 14 April 2018
Well described Sir Thank you