अजूनकाही
फेब्रुवारी २०१८ मध्ये फेडेरिको गार्शिया लोर्का या स्पॅनिश नाटककाराच्या ‘द हाऊस ऑफ बर्नार्डा अल्बा’ या नाटकाचं मी परीक्षण केलं होतं. तेव्हा कल्पना नव्हती की, लगेचच लोर्काच्या ‘यर्मा’चं हिंदी रूपांतर बघण्याची संधी मिळेल. लोर्काची गाजलेली ग्रामीण त्रिपुटी म्हणजे ‘ब्लड वेडिंग’, ‘यर्मा’ आणि ‘द हाऊस ऑफ बर्नार्डा अल्बा’.
आता मुंबर्इच्या ‘ड्रामा स्कूल, मुंबर्इ’ या नाट्यकलेचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतर्फे त्यांच्या विद्यार्थ्यांमार्फत ‘यर्मा’चं हिंदी रूपांतर सादर केलं आहे. या नाटकाचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध नाटककार महेश दत्तानी यांनी केलं आहे. हे नाटक जरी नाट्यकलेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सादर केलेलं असलं तरी नाट्यकलेच्या सर्व बाजूंनी विचार करता हा एक उत्तम प्रयोग होता, यात काही शंका नाही.
एक कलावंत म्हणून लोर्का डाव्या विचारांचा होता. त्यानं समाजातील अनेक विसंगतींवर प्रकाश टाकला. समाजाचे काही आग्रह एक प्रकारे सार्वत्रिक असतात, मग तो समाज स्पॅनिश असो की, भारतीय. भारतात जसं कुटुंबव्यवस्थेत ‘मुलगा होणं’ या गोष्टीला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसंच ते स्पॅनिश समाजातही होतं. परिणामी लग्न करून घरात आणलेली सून/ पत्नी वांझोटी नाही ना, याची काळजी नवऱ्याला/ कुटुंबप्रमुखाला असे. आपली सून/ पत्नी घराण्याला वारस देर्इल ना, याची चिंता असे. मग ते कुटुंब धनाढ्य असो की, गरीब. मुलाचा आग्रह असतोच. या मध्यवर्ती सूत्राभोवती लोर्कानं ‘यर्मा’ हे नाटक उभं केलं आहे. ते त्यानं १९३४ साली लिहिलं व त्याच वर्षी त्याचा प्रयोग झाला.
या नाटकात लोर्कानं संवादांच्या जोडीनं मुक्त छंदातील गाणी वापरली आहेत. ‘यर्मा’ची कथा स्पेनच्या ग्रामीण भागात घडते. अशा नाटकाचं रूपांतर करणं अवघड असतं. पण नेहा शर्मा यांनी हे शक्य करून दाखवलं आहे. त्यांचं रूपांतर एवढं बेमालूम उतरलं आहे की, आपण एका पाश्चात्य नाटकाचा हिंदी अवतार बघत आहोत, हे प्रेक्षक विसरून जातात. नेहा शर्मा यांनी नाटकात राजस्थानी/ हरयाणवी हिंदीचा वापर केला आहे.
माटी ही विवाहित पण वांझोटी तरुण स्त्री. नाटक सुरू होतं, तेव्हा तिच्या लग्नाला दोन वर्षं झालेली असतात. तिला आता मूल हवं असतं. तिच्या नवऱ्याला यात फारसा रस नसतो. तो रात्रं-दिवस शेतात राबत असतो. माटी मात्र मुलासाठी झुरत असते. एके दिवशी तिला तिची मैत्रीण भेटते, जी लग्न झाल्यानंतर पाचच महिन्यांत गरोदर झालेली असते. हे बघून माटीचं वैफल्य अधिकच धारदार होतं. रानात तिला एक प्रौढ म्हातारी भेटते, जिला पाच मुलं असतात. तिनं चार-पाच लग्नं केलेली असतात. ती म्हातारी माटीला सल्ला देते की, नवऱ्याला सांग जरा जास्त प्रयत्न कर. म्हातारी माटीला दुसरा आणि वेगळाच प्रश्न विचारते – ‘तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे? प्रेम जर नसेल तर काही खरं नाही, बार्इ. प्रेमाशिवाय जगता येत नाही.’ यावर माटी स्वच्छ शब्दांत नवऱ्यावर प्रेम नसल्याचं सांगतं आणि गावातला दुसरा पुरुष आवडत असल्याचंही मान्य करते. इथून नाटक पकड घेत जातं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
लग्नात प्रेमाला किती स्थान आहे? मुलं होण्यासाठी फक्त संभोग पुरेसा आहे का? स्त्री वांझोटी असली तर पुढे काय? वांझोट्या स्त्रीनं कसं जगायचं? कशासाठी जगायचं? प्रत्येक स्त्रीला आर्इ होण्याची इच्छा असतेच का? रानातच माटीला तिच्याच वयाच्या दोन स्त्रिया भेटतात. त्यातील एक तर माटीला सरळ सांगते की, तिला आर्इ होण्यात काहीही रस नाही. तिच्या दृष्टीनं आयुष्यात मस्त मजा करावी, खावं-प्यावं, इकडे-तिकडे मनोसक्त भटकावं वगैरे वगैरे. दुसरी स्त्री तर घरी लहान मूल आहे हे साफ विसरूनच गेलेली असते. जेव्हा तिला मुलाची आठवण करून दिली जाते, तेव्हा ती घराकडे धाव घेते. या दोन स्त्रियांच्या कहाण्या माटीला अंतर्मुख करतात.
एव्हाना माटीच्या लग्नाला पाच वर्षं झालेली आहेत. मुलं नसल्याचं वैफल्य दिवसेंदिवस गडद होत जातं. तिचा नवराही आता तिच्यावर वैतागत असतो. तो रात्री शेतात काम करत असताना माटी गावभर मजा करते, अशा अफवा त्याच्या कानी आलेल्या असतात. माटीवर पाळत ठेवण्यासाठी तो त्याच्या दोन बहिणींना घेऊन येतो. माटी अधिकच संतापते. ती त्यांना न जुमानता तिची रात्री भटकण्याची सवय सोडत नाही. तिच्या मते मूल नसलेलं घर म्हणजे तुरुंग. शिवाय त्या घरात रात्री माटीचा नवरासुद्धा नसतो. मग रात्री घरी राहायचं कशासाठी व कोणासाठी?
माटीची दुसरी एक मैत्रीण तिला सांगते की, कदाचित दोष माटीच्या नवऱ्यातच असेल, त्याच्यातच माटीचं पोटपाणी पिकवण्याची क्षमता नसेल. माटीनं त्यापेक्षा दुसरा पुरुष शोधावा व आर्इ व्हावं. माटी मात्र व्यभिचाराच्या शक्यतेला उडवून लावते.
माटीची आर्इ अधूनमधून तिला भेटायला येत असते. पण लवकरच तिच्या लक्षात येतं की, तिच्या येण्यामुळे माटीला स्वतःच्या वांझोटेपणाचं भान येत राहतं. मैत्रीण माटीला सांगते की, तिच्या आर्इला कोणी जडीबुटी देणारा व स्मनाशाजवळ राहणारा बाबा माहिती आहे. माटी या बाबाला भेटण्याचं ठरवते. तिथं पूजाअर्चा सुरू असतात. माटीला तो बाबा आश्वस्त करतो की, आता तिला मूल होर्इलच. तेवढ्यात तिथं माटीच्या दोन नणंदा तिच्या नवऱ्याला घेऊन येतात. तिथं माटीचं व तिच्या नवऱ्याचं मोठं भांडण होतं. नवरा म्हणतो की, इथं येऊन तू आमच्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगलीस. जर आपल्या नशिबातच मूल नसेल तर त्यासाठी दुःखी होण्याची काय गरज आहे? आपण आहे त्यात खुश राहू. हे ऐकून माटी पिसाळते. तिच्या लक्षात येतं की, आपल्या नवऱ्याला मूलं असलं काय अन् नसलं काय, काही फरक पडत नाही. म्हणजे मग तिचा आर्इ होण्याचा मार्ग कायमचा बंद. रागानं वेडीपिशी झालेली माटी नवऱ्याचा खून करते. या रक्तरंजित प्रसंगावर नाटक संपतं.
मुलासाठी रक्त वाहणं, बळी देणं, अनेक प्रकारचे अघोरी प्रकार करणं भारतीयांना नवीन नाहीत. काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात मानवत खून प्रकरण खूप गाजलं होतं. त्यात उपसरपंचाची रखेल अपत्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून आठ-दहा खून करवून घेते. हीच मानसिकता नाटककार लोर्कानं ‘यर्मा’त दाखवली आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘माटी’तील सर्व पात्रं ड्रामा स्कूल मुंबर्इचे २०१७-१८ या वर्षाचे विद्यार्थी आहेत. ड्रामा स्कूल मुंबर्इनं पाडलेला हा स्तुत्य पायंडा आहे. ही संस्था अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांमार्फत अभिजात नाटक बसवून घेते. या अगोदर रशियन नाटककार एव्हगेनी श्वार्टस यांचं ‘द ड्रगन’ आणि शेक्सपियरचं ‘ज्युलिएट और उसका रोमिआ’ ही नाटकं सादर केली होती. दिग्दर्शक महेश दत्तानी मूलतः नाटककार असले तरी अलिकडे त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘माटी’चा त्यांनी दिग्दर्शित केलेला प्रयोग उत्तम होतो. यात त्यांना तरुण सळसळत्या रक्ताच्या रंगकर्मींची मोलाची साथ लाभली आहे. त्यांनी ‘माटी’च्या मध्यवर्ती भूमिकेत दोन मुलं व एका मुलीला घेतलं आहे. हे तिघं आलटून पालटून प्रत्येक प्रयोगात ‘माटी’ होतात. यामुळे ही कथा ‘माटी’ची असली तरी ती कोणत्याही निपुत्रिक स्त्रीची असू शकते, हे अधोरेखित होतं. या भूमिकेत तन्वी, संकेत व विष्णू आहेत. या तिघांनी माटीच्या मनातील कल्लोळ व्यवस्थित आविष्कृत केला आहे. यातही संकेत व विष्णू यांचा खास उल्लेख केला पाहिजे. ते पुरुष असूनही स्त्रीच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या आहेत. तसं पाहिलं तर हे एका प्रकारे समूह नाटक आहे. म्हणून सर्व कलाकारांचा उल्लेख करणं शक्य नाही.
‘माटी’ एक प्रकारचं संगीत नाटक आहे. यातील गाणी अभिनव ग्रोव्हर यांची आहेत. केवळ ही गाणी जरी मन लावून ऐकली तरी माटीचं दुःख समजू शकतं. या गाण्यांना अमोल भट्ट यांनी तितक्याच चांगल्या चाली दिल्या आहेत. चांगली शब्दरचना व चांगल्या चालींमुळे प्रयोगात रंगमंचावर एक प्रकारची प्रसन्नता जाणवत राहते. अशा नाटकात वेशभूषेला महत्त्व असतं. ही जबाबदारी सोनल खराडे यांनी व्यवस्थित सांभाळली आहे.
अशा प्रकारच्या प्रायोगिक नाटकासाठी नेहमी चांगल्या हॉलची गरज असते. ‘जी 5 ए’च्या चालकांना या नाटकाचं महत्त्व पटल्यामुळे त्यांनी हॉल मोफतमध्ये उपलब्ध करून दिला. अशा प्रयोगांना अशी ठसठशीत मदत करणं गरजेचं असतं.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment